शिवनातीर ते वैणगंगा काठ...!
शिवनातीर ते वैणगंगा काठ...!
मराठवाडा खर तर गोदावरी नदी खोर्यात येतो. याच गोदावरी नदीची उपनदी शिवना ,जिच्या काठावर खेळत बागडत मी मोठा झालो. शिवना नदीत पोहायला , सुरपारंबी खेळायला, उन्हाळ्यात क्रिकेट खेळायला मज्जा यायची. शिवना नदी पासून सुरु झालेला माझा प्रवास सध्या तरी वैनगंगा नदी पर्यंत पोहचला आहे. याप्रवासात ज्या काही वेगवेगळय़ा गोष्टी अनुभवायला मिळाल्या त्या सर्वांशी शेअर कराव्या यासाठीचा हा प्रयत्न.
आमच गाव म्हणजे भर पावसाळ्यात पाण्याच टैंकर लागणार गाव. शेतीचे छोटे छोटे तुकडे आणि प्रत्येक तुकड्यात विहीर किंवा कुंपनलिका. गावाशेजारून भली मोठी शिवना नदी वाहते पण फक्त पावसाळ्यात तेही काही काळासाठी. विहीरी तर भरपूर पण पाणी नाही. म्हणून पावसावर सर्व शेती अवलंबून असलेल गाव. काळी ,कसदार माती. उन्हाळा लागला कि बहुतेक वेळा शेतातुन नांगरटी सुरु असेल तेव्हा आवाज येतोच. मग आवाजावरून अंदाज लावायचा आज कुणाचे बांधावरूंन भांडण सुरु आहे. शेतीचे होणारे वाटे आणि बांधावरून होणारी भांडण उन्हाळ्यात कायमचेच. तसा मी शेतकरी पुत्र इतरांना पर्यटन करताना काय दिसेल माहीत नाही ,पण जेव्हा मी मराठवाडा ते पुर्व विदर्भ असा प्रवास करतो तेव्हा माझ्या नजरेस मात्र शेती आणि मातीच्या गोष्टी च लक्षात येतात.
आजतागायत ऐकत आलो होतो कि, मराठवाडा आणि विदर्भ नेहमी दुष्काळात असतो. मात्र जेव्हा पुर्व विदर्भ बघतो तेव्हा वाटत जर याला दुष्काळ म्हणत असाल तर मग मराठवाडा तर वाळवंट आहे. माझ्या गावाची जी परिस्थिति सांगितली अगदी त्या उलट इथे बघायला मिळत. मराठवाडा म्हणजे कापुस,मका,ज्वारी,बाजरी,गहू इत्यादी कमी पाण्याची पिके. भंडारा जिल्ह्यात मात्र बहुतांशी भात शेती केली जाते. म्हणजे भरपुर पाणी लागणारे पिकं. माझ्यासाठी विषेश बाब म्हणजे एवढी पाण्याची आवश्यकता असताना कुठेही विहीर,बारव आढळत नाही.क्वचित काही ठिकाणी विहीर आढळतात पण त्या बोटावर मोजण्या इतक्या. गेली आठ महिने इकडे राहतोय,कुठेही भांडणाचा आवाज ऐकला नाही. उत्पनांची साधने कमी असली तरी कुणीही रिकामटा नाही. भात शेती मुळे शेतीला मोठ मोठे बांध घातलेले असल्याने तो प्रश्न इथे तरी मिटलेला वाटतो.विहीर नाही मग भात शेती कशाचा आधारावर करतात? तर जागोजागी नहर (पाटाचे पाणी) चे पाणी आहे.शेतापर्यंत हे पाणी छोट्या चर ( नाली ) ने पोहचवले जाते. विशेष म्हणजे हे पाणी अगदी उन्हाळ्यात देखील मिळते. माझ्या सारख्या दुष्काळातून आलेला आणि भर उन्हाळ्यात फक्त जनावरांची मका तेवढी हिरवी बघणारा ,जेव्हा इथे धानाने बहरलेली हिरवीगार रान बघतो तेव्हा हरवून जातो. तसा सुर्य उन्हाळ्यात इकडे आग शकतो,पण गर्द हिरवेगार धानाची रान बघून मन प्रसंन्न होत.
जवळूनच वाहणारी वैणगंगा आणि वैणगंगेवर बांधलेले गोसे-खुर्द हे मोठे धरण यामुळे याभागात मुबलक पाणी असाव. सध्या पावसाळा अनुभवत आहे.माझ्या मराठवाड्यातील पिकं दुष्काळासोबत दोन हात करत आहे. इथे मात्र प्रत्येक दिवसागणीक पाऊस पडतो. पावसाच पाणी शेतांमध्ये मावत नाही. यावरून ऐक गोष्ट लक्षात येत कि, इथली जमीन ज्यास्त पाणी शोषत नाही .पाणी तुंबुन शेतात तसच राहत. म्हणून बहुधा चहुकडे पाणीच पाणी दिसत असावं.
आमच्यासाठी ज्या गोष्टी खुप जुन्या झाल्या त्या सर्व गोष्टी आजही इकडे विदर्भात अनुभवायला मिळतात. माझा मराठवाडा दुष्काळी आहे ,मात्र संपन्न आहे. मराठवाड्यात पुणे - मुंबई सारखे नाही पण काहीसे बरेच उत्पन्नाची साधने आहेत. प्रत्येक घरात धनसंपत्ती बर्यापैकी आहे. प्रत्येक घरात दोन तीन गाड्या आहेतच. उत्पन्नाची साधने आल्यामुळे भरभराट आली आहे.
आम्ही एक फोटो स्टेटस ला ठेवायचो, नवरा सायकल चालवतो आणि मागे बायको बसलेली. अस प्रेम मिळायला हवं वगैरे वगेरे...विश्वास बसणार नाही पण या गोष्टी आजही इकडे पुर्व विदर्भात बघायला मिळतात. ज्या प्रमाणे मराठवाडा किंवा इतर संपन्न भागात गाड्या बघायला मिळतात, अगदी तसच इथे प्रत्येक घरात दोन तीन सायकल बघायला मिळतात. शाळात जाणाऱ्या मुलांसाठी, शेतात कामावर जाणाऱ्या बाई साठी, माणसासाठी प्रत्येकाच्या साठी सायकल. गाड्या आहेत पण कमीच. महाराष्ट्रात चहुकडे बॅंकेचे जाळे पसरले , जमाना स्मार्ट होऊन डिजीटल झाला. इकडे मात्र त्या प्रमाणात बॅंकेचे जाळे पसरलेले नाही. आजही पोस्ट ऑफिस जर कुणी टिकवून ठेवले असेल तर याच लोकांनी. पोस्टात आजही अनेक व्यवहार चालतात.
खर तर फिरल्याने अनेक गोष्टी कळतात. इकडची भाषा,खाद्यसंस्कृती,शेती अशा अनेक गोष्टी अनुभवायला मिळाल्या. या बद्दल अजून खुप लिहायचं आहे पण तुर्तास एवढंच...पुढील लेखात सविस्तर बोलेलच.....!
