चटणी...!
चटणी...!
सकाळचे सहा वाजले , मी अंघोळ करून 6.20 वा. ची ट्रेन धरायला घाईघाईत जेवनाचा डबा घेऊन निघालो. गाडी पकडून संभाजीनगर ला कॉलेज ला आलो. सकाळचे आठ ते एक वेगवेगळे लेक्चर झाले. कॉलेज सुटल्या नंतर पुन्हा मित्रा सोबत रेल्वे स्टेशन गाठलं. गाडी यायला वेळ होता, म्हणून प्लॅटफॉर्म नंबर चार वर जेवण करायला गेलो. हा आमचा नित्ते नियम असायचा. पोटात कावळे ओरडत होते. खर तर पोटात काही नसेल तेव्हा वर्गात मन रमत नाही ते सारखं आणलेल्या डब्या कडे जात. आता पोटभर जेवायचं म्हणून डब्बा उघडला तर आत मध्ये पोळी आणि शेंगदाण्याची मिरची. माझी आई मला आवडतात म्हणुन पोळ्या मस्त चिळबिळीत तेल लावून करायची,पण रोजच मिरची डब्यात असायची. मित्रांनी डबा उघडला कि,त्यांच्या डब्यात मस्त बटाटा किंवा मग टमाटर ची चटणी असायची.मग मला थोड नाही तर खुप वाईट वाटत .त्यांची आई कशी भाजी करुन देते,माझी आई का करुन देत नाही. खर तर माझ्या आईचा एक सल्ला असायचा "पोरा शिक्षण घ्यायच असल तर भाकरीच्या पाटी कड नाही तर पाटी पेन्शिली कड लक्ष असाव. सकाळी गप गुमाण शिळ पाक किंवा मग पोळी चहा मध्ये कुस्करून खायची आणि जायच". पण मी मात्र याउलट शिळ कधी खाणार नाही. त्या दिवशी डोक्यात राग धरूनच जेवण केल आणि घरी जाऊन आईला चांगल बोलायच ठरवलं.
चार वाजता गाडी गावी पोहचली. पोटात पोळी मिर्ची पडल्याने राग थोडा शांत झाला होता. आई संध्याकाळी शेतातून घरी आली आणि मी थोड बोलू म्हणत घरात तांडव केला. आई मात्र मला काहीच बोलली नाही. ती फक्त मला स्पष्टीकरण देत बसली." अरे पोरा,सकाळी पाच ला उठुन गाई आणि बैला खालच शेण कुर कराव लागत.ते उरकल का मग स्वयंपाकाला लागते तोवर तुह्या गाडीचा येळ होतो. बर जाऊदे,उद्यापासून तोह्या बापाला शेण कुर करायचं सांगते अन तुला मी भाजी पोळी करून देईल." त्यानंतर मात्र आई ने मला खुप कमी वेळा चटणी पोळी दिली. बर्याचदा भाजी पोळी झाली नाही कि, मग बाप म्हणायचा "त्या चड्डीच्या खिशात पैसे आहे ते घेऊन जा". अर्थात पैसे खुप असायचे अस नाही, तर फक्त विस रुपये घेऊन मी जायचो.एक दिवस त्या वीस रुपयावरुन रडताना पाहीलं.बाप म्हणत होता," औरंगाबाद सारख्या शहरात जातोय,सोबत पैशावाल्यांची पोर असतील.वीस रूपयात पोरग काय खाणार.पण काय करणार कधी कधी तर ते वीस रुपये पण खिशात राहत नाही. " हे शब्द चुकुन माझ्या कानी पडले.त्यानंतर मात्र माझे सर्वच नखरे गळून पडले.मला भाजी मिळावी म्हणून बापाला सकाळी उठून शेणकुर कराव लागत होत. तर आईला डबा करावा लागत.मी घरून निघाल्यावर आई बाप सकाळी सात वाजता शेतात कामाला गेलेले असायचे. त्या दिवशी मात्र खुप रडलो.त्याला वडीलांकडून मिळणाऱ्या विस रुपयानी माझ पोट कित्येक दिवस भरल आहे. एक वडा पाव आणि एक कट चहा यावर दिवस निघून जायचा.
एवढ सगळ सांगायच कारण ही तसच आहे.आज बोट ठेवीन ते खायला मिळेल.पाहीजे ते खरेदी करु शकतो.बायको नोकरीला आहे. घरात पैसा खेळतोय. माझी दोन अडीच वर्षाची पोरगी दिवसाला शंभर दिडशे खर्च करत आहे. कशाची कमी नाही. नोकरी निमित्ताने गेल्या एक वर्षापासून आई वडीलांपासून दुर आहे. या एका वर्षाने जगण्याच सार समजावलं.आईच्या हातची चटणी आणि तेल लावलेल्या पोळ्या खावून मला कधीच अशक्तपणा किंवा मग कुठला आजार झाला नाही. त्या चटणी भाकरीच्या कृपेने शिक्षण घेता आलं. खर तर ती चटणी भाकर नव्हती तर आई बाप नावाच्या देवाने बनवलेला माझ्या भविष्यासाठी चा प्रसाद होता.आज बाहेर फिरताना सर्व काही खायला मिळत.पण ,पण आज सर्वात जास्त जर काही खायची इच्छा होत असेल तर ती आई च्या हातची तेल टाकलेली शेंगदाण्याची चटणी आणि पोळी.बापाने दिलेल्या वीस रुपयात खाललेला वडापाव आणि चहा आणि आजीने बनवलेली बाजरीची भाकर दुधात कुस्करून तोडी लसून टाकून बनवलेला हिरव्या मिरचीचा ठेसा खाण्याची. काही गोष्टी ची किंमत वेळ निघून गेल्यानंतर कळते.आज फास्टफूड खाऊन सत्तर किलो वजन होऊन पोट वाढलयं.थोडा चाललो तरी थकायला होत. पण आधी कधीच अस झालं नाही. अन्नात पौष्टीक पदार्थ खालले कि सर्वच ठिक अस नाही. कधी कधी चटणी मिरची खाऊन देखील सदृढ राहता येत फक्त त्या चटणी मिरची मध्ये आईच प्रेम आणि आशिर्वाद असावे.देवाकडे एकच मागण करत असतो पुन्हा एकदा आईच्या हातची चटणी भाकर खाण्यासाठी गावाजवळ नोकरी दे.आणि नोकरीतून मिळणारा पैशा बापाच्या चड्डीच्या खिशात हमेशा खेळता राहील हाच एक आशिर्वाद दे.
