शहरातून गावाकडे वळणारी पाऊल
शहरातून गावाकडे वळणारी पाऊल
डोळ्यात स्वप्न घेऊन पम्या शहराच्या दिशेने झेपावत होता. माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण शिक्षण देखील पुर्ण केल.त्या नंतर मात्र पम्या गावात थांबायला तयार नव्हता. गावात शेणा मुतात आणि शेतात राबराब राबताना बापाला बघितल्याने पम्याच्या मनात शेती आणि खेड्याविषयी न्युनगंड तयार झाला होता. खुप खुप शिकायच , मोठ्ठा इंजिनिअर व्हायच म्हणून छ.संभाजीनगर च्या एका प्रतिष्ठित महाविद्यालयात कम्प्युटर इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. पम्याच आणि काळ्या मातीच नात हळुहळू दुरावू लागलं. पम्या शहराच्या गंमती जमती मध्ये रमू लागला. इंजिनिअरिंगला असताना बापाच्या कष्टाच्या पैशाने मन लावून पम्या शिकत होता.हा,हा म्हणता म्हणता तीन वर्ष निघून गेले. पम्या कंप्युटर इंजिनिअर झाला. पण नोकरी काही करता मिळेना.एक दोन वर्ष कंप्युटर च्या दुकानात सेल्समन म्हणून काम केल, एक दोन वर्ष सिसिटीव्ही टेक्नेशिअन म्हणून काम केल. आता मात्र पम्या वैतागला अस कमी पगारात किती दिवस काम करायच . आपल्या ज्ञानाला इथे न्याय मिळत नाही म्हणून अजुन पुढे झेप घ्यायची ठरवली.
नोकरीच्या शोधत पुणे गाठलं. बरीच वर्षं शिक्षणात अंतर पडल्याने पुन्हा बापाचा पैसा खर्च करून काही कोर्सेस केले.याचीच फळश्रृती चांगल्या आयटी कंपनीत नोकरी मिळाली. आता पम्या आणि माती यांचा संपर्कच तुटला होता.पायाला ठेवेल तिथे स्टालिश चेहरा दिसेल अशी फर्शीच असायची.फाडफाड इंग्रजी बोलणारे लोक सोबत असायचे.एवढे सगळ होऊन सुध्दा पम्या समाधानी वाटत नव्हता. लग्न झाल्यावर बायकोला सुध्दा सोबत पुण्याला घेऊन गेला होता.दोघांचा गुण्यागोविंदाचा संसार होता ,त्यात एक वर्षाची मुलगी घरात होती. तिच्या आवाजाने घर आनंदाने भरून जायच.तरी देखील पम्या मात्र समधानी कधीच दिसला नाही.
खर तर ही जीवनशैली पम्यानेच स्वतः साठी निवडली होती . पण का कुणास ठाऊक त्याच मन मात्र आता लागत नव्हत.पम्या रात्र रात्र विचारात असायचा . अनेक रात्री जागे राहून काढल्या. सर्व सुख पायाशी लोळण घेत असताना मनात अशी अस्वस्थता का वाटावी..? काही सुटतय का आपल्या कडून...? काही चुकतय का आपल्या कडून...? अशा असंख्य प्रश्नांची भडीमार डोक्यावर होत होती. खर तर पम्या प्रगती आणि करिअर बनवण्याच्या मोहात आपलं सर्वस्व सोडुन घरापासून दूर आला होता. रोज काम करत असताना अनेकांच्या बोलण्यात ऐकायला येणारी गावाकडची ओढ,त्यांनी जागवलेल्या आठवणी आणि आता कायमची झालेली ताटातुट या सर्व गोष्टी ऐकून पम्या अस्वस्थ व्हायचा.त्याला घराची आठवण आली कि,बापाची ती फाटकी बनियान , शेतात राबराब राबताना बापाला लागणारी धाप आणि बापाच्या खांद्याला खांदा लावुन ऐव्हाना बापापेक्षाही ज्यास्त काम करणारी माय आठवायची.ज्या गोष्टी चा तिटकारा येऊन पम्या गावापासुन दुर गेला ,आज त्याच गोष्टी त्याला गावाकडे बोलावत होत्या. अनेकांनी लक्षावधी रुपये कमावले पण गाव सोडावा लागला.आई बाप आणि माती सोडावी लागली .पैशाने या गोष्टी कधीच मिळत नाही कदाचित याच गोष्टी ने पम्या अस्वस्थ होत होता.पम्या ला गावाची ओढ लागली होती.पण शहरातली नोकरी सोडून घरी पळून जाण त्याला पटत नव्हत. जगात प्रत्येकाला भिडसावणारा प्रश्न म्हणजे, लोक काय म्हणतील..? हाच प्रश्न पम्या ला देखील भिडसावत होता म्हणून तो कसे तरी शहरात दिवस काढत होता.
पुणे सोडायच पण कसं..? हा विचार डोक्यात असताना पम्या ची साथ दैवाने दिली असच म्हणता येईल. बायकोला सरकारी नोकरी मिळाली. अर्थात ती गावी नव्हती पण पुणे सोडण्यसाठी ही नामी संधी मिळाली होती आणि ती पम्या जाऊ देणार नव्हता.विदर्भात एके खेडे गावात पोस्टाची नोकरी मिळाली होती. एक दोन वर्ष तिथे काढून गावाच्या जवळ बदली करता येईल याच उद्देशाने पम्या पुणे सोडून विदर्भात आला. पम्याची मातीशी असलेली नाळ त्याला गावी खेचत आहे.पोस्टात नोकरी करतानी बायकोला मदत आणि खेड्यातील लोकांना मदत करावी म्हणून पम्या देखील पोस्टात काम करत होता. लोकांशी संपर्क वाढत गेल्याने आता गाव ची आठवण आणखीच प्रकर्षांने जाणवत आहे. आज पम्या सारखे कित्येक जण गावाकडे येण्यासाठी झटत आहे पण त्यांना ते शक्य होत नाही. उमेदीच्या काळात नक्कीच खुप कमवाव पण कमावलेला पैसा जर परिवारासोबत राहून खर्च करता येत नसेल तर त्या पैशाला कवडीमोल अर्थ नाही. माझ्या कथेतील पम्या ने गावाकडची वाट धरत एक पाऊल टाकलं आहे...लवकरच पम्या आई वडील आणि गावच्या काळ्या मातीत पुन्हा जाईल ही... पण गावातून शहराकडे जाणार्या कित्येक मुलांना पम्याची कथा प्रेरणा देईल.
