मी संस्कार विसरलो...!
मी संस्कार विसरलो...!
पिढी जात आमच्यावर संस्कार होते,बाईने घर संभाळाव आणि बाप्याने पैसा कमवावा.स्त्री ने चुल आणि मुल संभाळाव आणि बाप्याने नोकरी करावी.मी शिवराय,फुले,शाहू ,आंबेडकर वाचले अन् पिढीजात संस्कार विसरलो. तिला तिच्या शिक्षणाचा उपयोग व्हावा,तिला समाजात मान सन्मान मिळावा म्हणून मी नोकरी सोडून तिला नोकरी करायला दिली.खरच मी संस्कार विसरलो च.
बाई म्हणजे पायातील पायतान अस नेहमी ऐकत आलो, खर तर एकीकडं बाई ला पायतान म्हणायच आणि दुसरी कडे तिची पुजा करायची. हा दुटप्पी पणा मी दुर सारला.मी कधी तिला साधं पायाला दर्शनासाठी हात लावू दिला नाही,तिला पायतान न समजता गळ्यातला मोतीहार समजलो. खरच मी पुर्वापार मिळालेले संस्कार विसरलो.
पतीची सेवा हिच बाईसाठी सर्वात महत्वाची असते हे संस्कृती शिकवते. पण मी हे देखील विसरलो,कधी तिला माझी सेवा करायची संधीच दिली नाही. वेळप्रसंगी तिच्या दुखात मी तिचे पाय चेपून दिले,भांडे-धुणे केली पण तिला माझ्या सेवेत राबवल नाही. खरच मी पुर्वापार चालत आलेले संस्कार विसरलो.
बहीणीने सासू सासरे ,नवरा यांची सेवा करावी.त्यांच ऐकवं,भांडण करू नये म्हणून तिला समजून सांगत असताना तिला मारल सुध्दा, पण बायकोच्या सुखासाठी गाव सोडलं,घर सोडल. खरच मी संस्कार विसरलो. माझ्या आई-बापाला साधा फोनही न करणार्या बायकोला मी दुसर्या ची लेक म्हणून कधी एक झापड देखील मारताना हजार वेळा विचार केला. तिच्या आईच्या प्रत्येक वाक्यात जी हुजुरी केली .खरच मी संस्कार विसरलो.
बाप आईला( सासु-सुनेच्या झगड्यामुळे) बेदम मारायचा हे डोळ्याने अनेकदा बघितलं. म्हणून बायकोला कधी मारावं वाटल नाही, कधी एखादी चापट मारलीच तर तिचा देखील भरभरून मार खाल्ला.पण कधी तिला सोडून देतो असा विचार आला नाही.नाते वाईकांमध्ये छोट्या छोट्या कारणांवरून एखादा कपडा टाकावा तशा बायका टाकून दिल्या, पण मी अशातही तिची साथ सोडली नाही, खरच मी संस्कार विसरलो.
आजही गावात भोंगा लावून जरी विचारणा केली कि, मी किती जणांना शिव्या दिल्या तर एक दोन लोक सोडली तर यावर लोक मिळणार नाही. पण तिच्या सोबत लग्न झाल्यापासून मी बोलायच कस विसरलो. बोलताना शब्दांपेक्षा शिव्या जास्त येतात.तिला मारू शकत नाही, स्वतः च्या जीवाच काही बर वाईट करू शकत नाही, कारण कधीही फोन न करणारी माझी बायको माझ्या पश्चात माझ्या आई बापाला किती जीव लावेल हा प्रश्न मला सतावतो. मी पण माणूस आहे,तिच्या साठी घरदार ,आईबाप,मित्र परिवार सगळ-सगळ सोडलं. कधी राग आलाच तर कुणाकडे व्यक्त होणार कारण माझ्या सोबत आता फक्त तिच तर आहे. कुणाच्या मुलीला मारायच मला जमत नाही, मग तो राग शिव्यांमधून कधी तरी बाहेर निघतो.अर्थात ते चुकच म्हणून तर म्हणतोय मी संस्कार विसरलो.
सकाळी आईने स्वयंपाक नाही केला तर,तिला काही काही बोलणारा मी. आता बायकोला ड्युटीवर जावं लागत म्हणून एखाद्या वेळी नाही होत स्वयंपाक समजून घ्यायला लागलो. कधी कधी स्वतः भाजी ,खिचडी करायला लागलो. आई कपडे धुवायची ,बहीण कपडे धुवायची तेव्हा रोज एक तरी ड्रेस धुवायला असायचाच,बहीण किंवा आई उलट कधी बोलल्या नाही.पण आता काहीही न बोलता बायकोला खुप काम असत म्हणून माझे बादली भर कपडे मी स्वतः धुवायला शिकलो. आई सकाळ पासून तर रात्री झोपेपर्यंत कामच करायची पण तिला दिलेला त्रास मी बायकोला देत नाही. आईने ऐक हंडाभर पाणी आणायला सांगितलं तरी तिच कधी ऐकलं नाही, पण आता बायकोच्या घरच्या कामात तर मदत करतोच.घरात झाडून घेण्यापासून तर तिच्या office मध्ये पण झाडून घेतो.तिच्या कामात मदत करतो.खरच मी किती नालायक झालोय सारे सारे संस्कार विसरलो.
मला ऐखादी भाजी आवडत नसेल तर दोन दोन भाज्या कराव्या लागत होत्या.पण आता एक कारले सोडल तर सर्वच भाज्या खायला शिकलो. खरच आईला दिलेला त्रास मी बायकोला देत नाही.खरच मी संस्कार विसरलो.
आई बापाने शिकून मोठ केलं,ते आता थकले . त्यांना संभाळण्याच्या वयात मी आजही त्यांच्याकडून पैसा घेतोय आणि संसारला लावतोय, खरच मी संस्कार विसरलो. मी ना एक चांगला मुलगा झालो,ना एक चांगला नातू झालो,ना मी चांगला बाप झालो.....मी एक चांगला नवरा तर नाहीच अस बायको नेहमीच सांगते.आई बापाची गरीबी बघून कधी कोणत व्यसन केल नाही.आजोबा दारू पित होते,पण कधी त्यांच अनुकरण कराव अस वाटलं नाही. एक पैसा देखील कधी बाहेर खर्च केला नाही.कधी कोणत्या धाब्यावर पार्टी नाही कि, कधी कोणत्या मुलींसोबत फिरण नाही. पण आता हप्ता दोन हप्त्यातून एकदा तरी बाहेर खाणं होतच.खरच मी संस्कार विसरलो.
लहानापासून स्वाध्याय परिवाराच्या बालसंस्कार केंद्रात संस्कार मिळवलेला मी. हिंदू धर्मातील भगवद्गीतेचा बालपणीच अभ्यास केलेला मी. "कर्मण्ये वाधिकारस्थू,माफलेषू कदाचन" हे लहानपणीच मनावर बिंबवलेला मी. कर्म करायच फळाची अपेक्षा करायची नाही. मुर्तीपुजेपेक्षा व्यक्ती पुजा करणारा मी. भागवत धर्माला माणनारे आजी आजोबा प्रचंड विठ्ठल भक्त त्यांचेच संस्कार माझ्यावर झालेले. आई आणि वडीलांची महादेवावर निश्शिम श्रध्दा म्हणून मी तेवढाच मोठा शिवभक्त.पण लग्न झाल्यावर बायकोला कधी उपवास करायला लावला नाही.कुठल्या पोथ्या पुराणात अडकवलं नाही. तुला हवं तस आयुष्य जग हे स्वातंत्र दिलं. तु स्वतः ला सिध्द कर हवी ती मदत मी करत गेलो. कदाचित देव धर्मात अडकलो असतो तर ती जे यश अनुभवत आहे ते तिला अनुभवता आलं नसत.पण मी मात्र ते बालसंस्कार केंद्रात मिळालेले,वारकरी पंथातील सर्व संतानी सांगितलेले , आईने शिकवलेली महादेवाची भक्ती सर्वच विसरलो.खरच मी संस्कार विसरलो.
माझी भाची लहान असताना कुठे पण मुतायची,अगदी जेवन करताना जेवणाच्या ताटाजवळ ,घरात ,गादीवर मग मी बहीणीवर रागवायचो तेव्हा ती सहज बोलायची तुला लेकर झाले कि मग बघू. मी तिला म्हणायचो अस माझ्या लेकरांनी केलं तरी मी बायकोवर ओरडेल.पण खरच आता माझ्या पोरीच ढुंगण पण धुवायच शिकलोय.तीने जिथं संडास केली ती जागा स्वच्छ करून पुन्हा तिथंच जेवायला जाऊन बसतो . खरच किती संस्कार विसरलो मी. नालायक झालोय.
एवढा संस्कारहीन का झालो मी....? एवढा संस्कारहीन कुणासाठी झालो मी...? हे सर्व करून अपमाना शिवाय काय मिळवलं मी...?
माझ्या संस्कारहीनतेच्या अशा खुप गोष्टी आहेत पण तुर्तास एवढंच.
