किल्ले लोहगड...!
किल्ले लोहगड...!
यार उद्या सुट्टी आहे, काय प्लॅन आहे.
काही नाही रे,
मग चालायच कुठे फिरायला.?
कुठं ?
लोहगड बघायला.
हो जाऊ ना.
मग ठरल चल झोप आता सकाळी लवकर जाऊया.
सकाळी अगदीच लवकर नाही पण 9 वा. शिवाजीनगर पुणे स्टेशन वरून लोणावळा जाणारी लोकल पकडली . सहज चाललो फिरायला म्हणून whatsapp ला स्टेटस टाकले. स्टेटस बघून सरांनी मेसेज केला , लोहगड जाताय तर मध्ये जात असताना भाजे लेण्या आहेत. छान आहेत बघण्यासारख्या.
मळवली स्टेशन आले. उतरल्यानंतर थोड पुढे जाऊन रिक्षा वाल्याला लोहगड च भाडे विचारल तर तो 400 रुपये म्हणाला.कमी केल तर 300 च्या खाली येईना.म्हणून मग ठरवलं आधी सरांनी सांगितलेल्या भाजे लेण्या बघायच्या आणि पुढे लोहगड कस जायच ते नंतर ठरवू. एक दिड किमी चालल्यानंतर आम्ही भाजे लेणी जवळ पायथ्याला पायीच जाऊन पोहचलो. पायी चालून आल्याने भाजे लेणी कडे जाताना लागणार्या पायऱ्या नको वाटत होत्या.पण हळू हळू उठत बसत आम्ही वर चढलो.वरती चढत असताना आम्ही ज्या लोहगड किल्ल्याच्या ओढीने आलो होतो ,तो तिथून दिसत होता.
भाजे लेणी म्हणजे एक उत्कृष्ट स्थापत्याच उदाहरण.अत्यंत सुंदर ठिकाण . काही वेळ लेणी बघून आणि आठवणी साठी फोटोज काढल्यानंतर आम्ही खाली उतरायला सुरूवात केली. अर्थात खाली उतरायला मात्र वेळ लागला नाही.
खाली उतरल्या नंतर पुढच्या प्रवासासाठी पुन्हा रिक्षाची शोधा शोध केली तर एका रिक्षावाल्याने ट्रेकींग पॉईंट पर्यंत दीडशे रूपये घेईल सांगितलें.आम्ही रिक्षाचा नाद सोडला आणि आता हा प्रवास पायीच ट्रेकींग करत सर करायचा ठरवला.खर तर लोहगड ते स्टेशन पर्यंत काही टाटा सुमो,क्रुझर आहेत ज्या फक्त 80 रुपये घेतात पण हे आम्हांला नंतर माहीत झालं.असो,आम्ही आमची अकरा नंबरची गाडी (दोन पाय) धरून रस्ता चालू लागलो.मजल दर मजल करत,उठत बसत चालू लागलो.आम्ही जस जस चालायचो तस तसा किल्ला जवळ आल्याच भासत असे.मग आम्ही कुणाला तरी विचारत अजून किती दुर आहे,तो सांगत हे काय आला जवळ .मग पुन्हा ताकत येई आणि चालयला लागायचो.अस आम्ही चार लोकांना विचारल किती दुर आहे प्रत्येकाच तेच उत्तर असे,हे काय आला जवळ.पण ते पाच ते सहा किमी चे अंतर होते. मग दोन पाणी बाटल संपवीत ,उठत बसत दोन तासात आम्ही जवळ पोहचलो.जवळ गेल्यानंतर मात्र आम्ही थोड गरबडलो.कारण तिथे दोन मोठे डोगर अर्थात किल्ले दिसत होते.यात नेमका लोहगड कोणता आणि दुसरा किल्ला कोणता याची उत्सुकता देखील वाढली.म्हणून मग गावातील एका सज्जनाला माहीती विचारली असता त्यांनी माहीती दिली कि तो विसापुर किल्ला आहे आणि इकडे ही वाट जाते तो लोहगड. आम्हाला आनंद वाटला कि,चला आज दोन्ही किल्ले बघायला मिळेल.पण त्या सज्जनाने सांगितले दोन्ही किल्ले आज बघणं शक्य होणार नाही. कारण आम्ही तिथे पोहचलो च 1 वा. त्यांनी सल्ला दिला आज लोहगड बघा.मुक्काम करा आणि उद्या तो किल्ला बघा.आम्ही हो म्हटलं ,आणि आमच्याच खिश्यात असलेल्या पैशाच्या कंगाल पणा वर हसत पुढे लोहगड चढू लागलो.स्टेशन ते लोहगड पर्यंत ऐवढे पैसे नाही म्हणून पायी ट्रेकींग करत आलेलो आम्ही रूम करून राहू का..? पण पायी आल्याने मात्र आनंदच वाटला काही काळ त्रास झाला पण ती आयुष्यातील पहिली एवढी दुर ट्रेकींग ठरली.लोहगड चढत असताना एक एक गोष्टी बघत आणि आठवणी म्हणून फोटो घेत घेत वर चढत होतो. चढत असताना गणेश दरवाजा,नारायण दरवाजा,हनुमान दरवाजा आणि महादरवाजा या मुख्य दरवाजातून आत गेल्यानंतर एक दर्गा लागतो. शेजारी सदर व लोहार खान्याचे भग्न अवशेष बघायला मिळतात.आम्ही जवळ जवळ 3500 फुट वर चढून आलोय हे वर आल्यानंतर कळाल. दर्ग्याच्या थोड पुढे गेल कि शिवमंदिर आहे.शिवमंदिरात दर्शन घेऊन.पुढे एक अष्टकोनी तळे आहे. जे गडावर पाण्याची स्त्रोत आहे.लक्ष्मीकोठी बघून.एक एक ठिकाण बघत बघत आम्ही विंचु कडा कडे पोहचलो. पाऊस झालेला असल्याने आणि सरकारने पुणे जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे काही कारणास्तव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.म्हणून तिथे असलेल्या गार्ड ने आम्हांला पुढे जाऊ न देता ही माहिती दिली .मग तिथून पुन्हा खाली उतरण्यासाठी आम्ही वापस फिरलो. खाली यायला बराच वेळ गेला.पाय बोलायला लागले होते. म्हणून कधी स्टेशन जाण्यासाठी गाडी आहे का याचा शोध घेतला.एक क्रुझर उभा होती त्याला अजून सिट हवे होते. तोवर आम्ही काही तरी खातो अस सांगून जवळच्या हाटेल मध्ये वडा पाव चा आनंद घेतला. सकाळी निघाल्यापासून आम्ही पाण्याव्यतीरीक्त जर काही खाल्ले असेल तर तो हा वडापाव..
गाडी भरली , त्याने मळवली स्टेशन वर आम्हाला दोघांना दिडशे रूपयांमध्ये सोडलं. काही वेळ लोणावळा कडूंन येणाऱ्या गाडीची वाट बघितली.सर्वच गाड्या पुर्ण भरलेल्या होत्या.कारण एकाच मार्गावर लोणावळा,लोहगड,एकविरा देवी,विसावा किल्ला असे विविध ठिकाण होते आणि सुट्टी असल्याने सर्वच लोक इकडे आलेले.कशी तरी एका गाडीत जागा मिळाली आणि पुन्हा विसापुर किल्ला बघायला यायचा म्हणत मळवली स्टेशन ला बाय बाय केल......
