कामातच राम
कामातच राम
संगिता ताई- नमस्कार मॅडम
मॅडम - नमस्कार.
संगीत ताई- मह्या पोरीची पालिसी पुरी झालीय. ते पैसे भेटायले काय काय लागते?
मॅडम- जास्त काही नाही पाॅलीसी काढल्यानंतर एक बाॅंड मिळत असतो, तो कागद लागेल. फार्म भरावा लागेल मग दहा पंधरा दिवसांत पैसे मिळतील.
संगीत ताई- बांड, आजी बांड तर नायजी.
मॅडम- असेल घरात, एकदा शोध घ्या. सर्व व्यवस्थित बघा घरी. आणि ते पैसे जमा करण्यासाठी सेविंग च खात उघडून घ्या.
संगीत ताई- बरं, बघतो जी.
( दुसऱ्या दिवशी सर्व शोधा शोध करून देखील बाॅंड मिळत नाही बघून आणि एवढी वर्षे कष्टाने विमा भरलेला तो मिळतो कि नाही या चिंतेत पुन्हा संगीत ताई आली.)
संगीत ताई- आजी, मॅडम म्या सार घर बघल पण नाही मिळला जी बांड, आता काय करूजी. महेवाले पैसे मिळतील ना जी.
मॅडम- तुम्ही जवळच्या तहसील कार्यालयात जा आणि तिथून 500 चा बाॅंड बनवून नोटरी करून घ्या. पैसे कुठेच जाणार नाही फक्त आहे ती प्रोसेस पुर्ण करा.
( दोन दिवसांनी बाॅंड करून आणून दिला. ऑफिस ला जमा केला आणि पंधरा दिवसात पैसे जमा झाले)
संगीत ताई- आजी, मॅडम खरचं तुमच स्वभाव देवा सारखा हाय. कोण एवढ समजून सांगत का जी. आम्हाले काय कळते बप्पा पण तुमी समंद समजून सांगितल. पोरीच्या लग्नाले लय आधार झाला या पैशाचा.
( जवळ जवळ दहा पंधरा मिनिटे संगीत ताई- तोंड भरून कौतुक करत होती.)
वरचा प्रसंग सांगायच कारण कि, प्रकाश वाटा या डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच पुस्तक वाचून मनातून खूप इच्छा होती कि, समाजासाठी काही तरी करायचं. कधी तरी वाटायचं लोकबिरादरी प्रकल्पात जाऊन आदिवासी समाज जो समाज प्रवाहापासून दुरावला त्याला समाज प्रवाहात आणण्यासाठी काही तरी करावं.
नशीबाने साथ दिली. लोकबिरादरी प्रकल्पात नाही, पण विदर्भातीलच भंडारा जिल्ह्यात पोस्टात काम करण्याची संधी मिळाली. मिळालेल्या संधीचा सोन करत असताना संगीत ताई सारख्या अनेक जणांना मदत करता येते आहे. सरकारी काम अन् सहा महिने थांब, या जनसामान्यांच्या मनातील भावनेला नष्ट करण्याची संधी मिळाली. अनेक लोक आशेने येतात, वेगवेगळ्या योजनांबद्दल विचारतात. शासनाच्या पोस्टाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या कित्येक योजना त्या अशिक्षित, मागास पण मनाने मोठ्या असलेल्या लोकांमध्ये जाऊन सांगतांना कुठे तरी समाजसेवेची इच्छा पूर्ण झाल्यासारख वाटतं. सुकन्या समृध्दी योजना जी मुलांसाठी राबवली जाते ती माझ्या कार्यक्षेत्रात 100℅ टक्के राबवलेली आहे याचा अभिमान वाटतो. प्रधानमंत्री किसान योजनेची कित्येक खाते सुरू करून योजनेचा लाभ त्यांना मिळवून देता येतो आहे. वेगवेगळ्या महिला, मुलीं साठी च्या समाजोपयोगी योजना राबवत आहे.
देश सेवेच कार्य माझ्या हातून घडाव खूप वाटायचं. माझ्या मते पोस्टासारख दुसर आणखी चांगल माध्यम होऊ शकत नाही. इतरत्र सर्वच विभाग हे भ्रष्टाचार आणि काम कुचराई साठी ओळखले जात असताना. पोस्टात मात्र एक रूपयाचाही भ्रष्टाचार न करता समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहचता येत आहे. असे खूप सारे अनुभव आले पण तुर्तास थांबते....
