गड आला ,पण सिंह गेला
गड आला ,पण सिंह गेला
खर तर आपला मराठवाडा म्हणजे पर्यटनाची राजधानी.मराठवाड्यातील जवळ जवळ सर्वच ठिकाणी भेटी दिल्या. यावर देखील खर तर विस्तृतपणे लिहणारच आहे.पण काही महिने पुणे शहरात राहण्याचा योग आला.अनेकांना पुणे शहर खुणावत.तसच काहीस आयटी क्षेत्रात करिअर करायच म्हणून आणि हिंजेवाडी, बाणेर किंवा मग मगरपट्टयात एखादी नोकरी मिळवून स्थायिक होऊ म्हणून मला देखील पुणे शहराने बोलावल. या कारणापेक्षा देखील एक महत्त्वाचें पुणे येण्यासाठी कारण माझ्याकडे होत.मला भटकंती करायला आवडतं. विशेषत: या महाराष्ट्राला छ.शिवाजी महाराजांच्या रुपाने एक असा राजा मिळाला ज्यांचे उपकार विसरता येणार नाही. त्या शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेले गडकिल्ले बघण्यासाठी मी पुण्यात तळ ठोकला.
शनिवार वाड्या शेजारीच शनिवार पेठेत सिध्दिविनायक बॉइज् हॉस्टेल मध्ये तिसऱ्या मजल्यावर शेवटच्या रूम मध्ये एक कॉट मिळाला.पुढची चार महिने मी तिथेच काढले.रविवार माझा भटकंतीचा दिवस आणि जोडीला देखील रवीच असायचा.
रविवारी सकाळीच मी आणि रवी बाहेर पडलो शनिवार वाड्यापासून 50 नंबर ची गाडी सिंहगडला जाते ही माहीती आम्ही काढली.तिथं गेल्यानंतर समजल कि,तिथून सिंहगड गाडी जाणार नाही. त्यांनी स्वारगेट जायला सांगितले. स्वारगेट वरून थोड्या थोड्या वेळाने कित्येक गाड्या सिंहगड साठी अगदी गच्च भरून जातात.पुणे पासून 30-35 किमी अंतर असेल सिंहगड.प्रवास करत असताना गाडीमधूनच खडकवासला धरण सुध्दा बघितलं.एक दीड तासात बसने आम्हाला सिंहगडाच्या पायथ्याला डोणजे गावात सोडले. सिंहगडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहे. एक सिंहगडाच्या पायऱ्या पर्यंत गाडीने जाणे किंवा मग छ.शिवाजी महाराजांचा मावळा बनून ट्रेकींग करत जाणे. मस्करीचा भाग सोडा पण सिंहगड बघण्याची आणि अनुभवण्याची खरी मजा ट्रेकींग करत जाण्यात आहे.पायथ्याला थोडा नास्ता केला आणि वर सिंहगडाकडे बघत शिवछत्रपती चे नाव घेऊन किल्ल्याच्या दिसेने निघालो. इतिहास जाणून घेण्यासाठी तर कोणत्याही ऋतू मध्ये किल्ल्यावर आल तरी हरकत नाही. पण इतिहासाबरोबर सिंहगडाचे सौंदर्य डोळ्यात भरून न्यायचे असेल तर पावसाळा उत्तम आहे. सिंहगडाची चढण जरा जिवावर येणारी आहे.खुप थकायला होत.म्हणून सोबत पाणी बॉटल आणि एक काठी सोबत असू द्या.पाणी पिल्यानंतर बॉटल कचरा पेटी मधेच टाका.ट्रेकींग करत असताना कित्येक शिवभक्त दिसत होते. लवकर किल्ला गाठायचा म्हणून मी आधी आधी जोरात पळत वर जायचो पण पुन्हा थकून कित्येक वेळ बसून रहायचो.रवी मात्र त्यांनी ठरवलेली कासवाच्या स्पीडने चालत होता.रस्त्यात पाणी , कच्ची कैरी विकणारे असतात. रवी पाण्यावर ताव मारत आणि मी कैरी वर.हिरव्यागार कापलेल्या कैरीवर मिठ आणि मिरची टाकलेली आणि ती एका द्रोण मध्ये ठेवलेली,बघूनच तोंडाला पाणी सुटायचं. खाणं झाल्यानंतर काही वेळ चालल्यावर थकलो.पण किल्ला आणि छ.शिवाजी महाराजांसाठी जीवाची पर्वा न करता लढणारे वीर तानाजी मालूसरे यांच्या दर्शनाची ओढ बसू देत नव्हती. मागे वळून बघितलं तेव्हा समजल आमच्या दोघांचा आश्रय घेत दोन मुली आमच्या मागून येत आहे.आम्ही थांबलो कि,त्या देखील थांबायच्या.म्हणून मग त्यांना सुरक्षीत वाटावं म्हणून आम्ही शांत आणि वायफळ गप्पा न करता गडाबद्दल बोलत चालू लागलो. खर तर किल्ला चढत असताना हिरवाई ने नटलेला तो प्रदेश बघून फोटो काढण्याचा मोह न होईल तर नवल.मग अनेक फोटो घेत घेत आम्ही पायऱ्या पाशी येऊन पोहचलो. हळू हळू पायऱ्या चढून वर गेल्यानंतर किल्ल्यावर दारुचे कोठार,कोंढाणेश्वर महादेव मंदीर,देवटाके,उद्यभानाचे स्मारक,राजाराम महाराज यांच स्मारक,तानाजी कडा आणि सर्वात महत्वाच आणि ज्यांच्या रक्ताने इथली माती पवित्र झाली त्या नरवीर तानाजी मालुसरे यांच स्मारक.अशा सर्वच ठिकाणांना बघितल्यानंतर आम्ही नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मारकाचे दर्शन घेतले.त्या क्षणी इयत्ता चौथी च्या इतिहासाच्या पुस्तकातील "गड आला,पण सिंह गेला"या धड्याची आठवण आली.इयत्ता चौथी मध्ये ज्या सिंहाचा इतिहास वाचला त्या सिंहाच्या समाधीचे दर्शन होण्यासाठी आणि त्यांच्या रक्तांने घडवलेला इतिहासातील कोढाणा किल्ल्याला भेटण्यासाठी वयाचे सत्तावीस वर्ष वाट बघावी लागली. डोळ भरून नरवीर तानाजी मालुसरे यांच स्मारक नेहाळल,त्यांचा इतिहास आठवला आणि परतीच्या प्रवासाला निघालो.सिंहगड किल्ल्यावर आजही अनेक लोक राहतात आणि त्यांचा उदरनिर्वाह भेट देणाऱ्या शिवभक्तांवर चालतो.परत जाताना किल्ल्यावर मांडी घालून तीस रूपयात झुणका भाकर आणि बेसन यांचा आस्वाद घेतला.किल्ल्याच्या पायऱ्या पासून डोणजे गावांपर्यंत गाडीने आलो येताना मात्र गडाचा इतिहास, पाहीलेले सर्व ठिकाण आणि ट्रेकींग करताना आलेली मजा आणि फजिती आठवत रुम कडे निघालो.
