वीस रुपयाची गोष्ट...!
वीस रुपयाची गोष्ट...!
औरंगाबाद च्या एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत असताना, सकाळी लवकर घरातून निघाव लागत. सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांची रेल्वे धरून औरंगाबाद गाठाव लागत. सकाळी आठ वाजता लेक्चर सुरू होत. मग अशा वेळी आईला एवढ्या लवकर उठून स्वयपाक करण शक्य होत नसे. अर्थात ती सकाळी पाच च्या अगोदर उठायची पण जनावरां शेण पाणी काढणं. गाय दोहण यामुळे तीला ते शक्य होत नसत.म्हणून मग बाप मला वीस रुपये देत. काही तरी खाऊन घे अस सांगत.
काही तरी खाऊन घे सांगत असताना,त्यांच्या मनात एक गोष्ट सलत असत. मी ज्या महाविद्यालयात शिक्षण घेत होतो,तिथेच काही वर्षापुर्वी वडीलांनी देखील पदवीच शिक्षण घेतल होत.त्या महाविद्यालयात कोट्याधीशांची पोर ,लखोपतींची पोर शिक्षण घेत. चहा प्यायला बसले तरी त्यांच बिल शे-दिडशे होत. अशा महाविद्यालयात आपण आपल्या पोराला वीस रुपये देऊन काही तरी खा सांगतोय.त्या वीस रुपयात काय मिळेल याची त्यांना कल्पना होती. माझ्या मागारी आई जवळ ते एकदा रडले देखील होते.
वडीलांनी दिलेल्या त्या वीस रुपयाची किंमत काय होती . ते फक्त मला माहीत. सकाळी 10 वाजता मधली सुट्टी झाली कि, इकडे तिकडे बघायच ,आपल्याला कुणी बघत तर नाही ना. खात्री झाली कि, महाविद्यालयासमोर पंधरा रुपयाला पोहे आणि कढी मिळायची . पोहे कढी खाल्यानंतर एक कटींग चहा घ्यायची कि,झाल आपल 5 वाजेपर्यंत च जेवण. खायला येताना इकडे तिकडे का बघायच तर एखादा मित्र आपल्या सोबत आपल्याला बघून बाहेर आला तर फक्त चहा पिऊन वापस याव लागायच,म्हणजे दिवसभर मग उपाशी.म्हणून मग मित्रांची नजर चुकवून खायच. अशा अवस्थेत शिक्षण पुर्ण केल. पण या गोष्टी च कधीच मला वाईट वाटल नाही. कारण खर सांगायच तर त्या वीस रुपयात माझ पोट भरलच पण मला अजूनही खुप काही मिळालं.
खिशात वीस रुपये असल्याने कधी मुलींच्या भानगडीत पडलो नाही. ज्याचा खिसा गरम,त्याच्या मागे मुली. मी सुदैवाने कंगाल असल्याने माझ्या वाट्याला कधी मुलीचा खर्च उचलण्याची वेळ आली नाही. दुसरी गोष्ट म्हणजे इथे पोट भरायचेच वांधे असल्याने कधी वाईट व्यसन लागले नाही. व्यसन करण मला परवडणारे नव्हते. या दोन गोष्टी ज्या माझ्या आयुष्यात महत्त्वाच्या आहेत त्या फक्त त्या वीस रुपयामुळे.
माझं पोट खरच त्या वीस रुपयात भरायच . आज हजारो कमावत असताना एका एका ठिकाणी खाण्यात शेकडो रूपये उडवून देखील पोट रिकामच वाटत. ऐन तारुण्यात आणि मानसाची वाढ होण्याच्या काळात फक्त वीस रुपयात माझ पोट कस भरल हे जेव्हा विचार करतो ,तेव्हा लक्षात येत कि, ते वीस रुपये बापाने कुठून आणि कसे दिले आहेत. उत्पन्नाच प्रमुख साधन शेती जीचे उत्पन्न मिळतात कधी देणेदारीत संपून जात तेच कळत नाही. मग बाप कुणाकडून तरी 500 रु. उधारी वर घेऊन त्यात रोज वीस रुपये मला देत. याही पेक्षा नवल तेव्हा वाटायच जेव्हा बाप तेच 500 रूपयातले वीस वीस करून पंधरा वीस दिवस मला पैसे द्यायचा.म्हणजे माझा बाप त्यातून एक रुपया ही न खर्च करता कंगाल सारखा फिरायचा. बनीयन फाटली, आतली चड्डी फाटली तरी बाप ती नवी घ्यायची म्हणला नाही.का ??? तर नेवरती (माझ नाव) ला पैसे लागतात. म्हणून त्या वीस रुपयात माझ्या बापाची मेहनत,त्याची sacrifice आणि बरच काही होत म्हणून माझ पोट भरत असाव.
घरी जाताना कुणाच्या तरी गाडीला हात देऊन जायचो.कधी कधी भुक अनावर झाली कि बस ने जाऊ म्हणून विचार करायचो पण अनेक वेळा बस साठी पैसे हसायचे मग जवळच मित्राची चहाची टपरी होती त्याच्याकडून पैसे घ्यायचो असे कित्येक वेळा मी त्याच्या कडून नंतर देतो पैसे म्हणून घेतले .कधी रेल्वेचा पास काढण्यासाठी मित्रांनी पैसे दिले जे आजतागायत कधी परत दिले नाही, त्यांनी देखील कधी मागितले नाही. काल परवा बायको म्हणत होती, अहो त्या तुमच्या मित्राकडे तुमचे एवढे पैसे आहे मागत का नाही ? तिला काय कळणारं त्याने माझी कोणत्या परिस्थिति मध्ये मदत केली ते.
आज बर्यापैकी पैसा हातात खेळू लागला ,पण त्या पैशाने कधीच माझी भुक भागवली नाही. काल परवा बायको सोबत भांडण झालं, आम्ही बाहेर जेवण करून हजार रुपये खर्च करून आलो.पण रात्री पुन्हा भुक लागली यावर बायको बोलताना सहज बोलून गेली, लग्ना अगोदर तर चटणी मिरची खाऊन पोट भरायचं. कधी कधी वीस रुपयात दिवस दिवस रहायचा मग आता काय बकासूर लागला तुम्हाला. तेव्हा मज पामराला त्या वीस रूपयाची आणि आईच्या हातची शेंगदाण्याची चटणी ची आठवण झाली. बायकोला,काय कळणार यासर्व गोष्टी. त्या वीस रूपयाला आणि आईच्या हातच्या चटणी ला आणि मित्रांच्या त्या उधारी ला कोणत्याच पारड्यात तोलता येणार नाही. वीस रुपयाची बरोबरी लाखो रुपये करणार नाही......!
