शीर्षक:- एक गाव...माझं गाव...!
शीर्षक:- एक गाव...माझं गाव...!
एक गाव माझं गाव...
खरं तर माझा जन्म कुठे झाला हेही मला नक्की सांगता येत नाही.आई-वडिल प्राथमिक शिक्षक होते. आईला आम्ही एकुण आठ मुले.पैकी चार बहिणी व चार भाऊ. आईला 'माई' व वडिलांना 'भाऊ' असे म्हणत असू. वडिलांचे मूळ गाव वडगाव जयराम स्वामी.ता.खटाव,जि. सातारा हे होते.त्यांचे तीन भाऊ व एक बहिण.वडिलच त्यांच्या भावंडात मोठे असल्याने त्यांना 'भाऊ' म्हणत असत. त्यामुळे लहानपणापासूनच ते ऐकून ऐकून आम्हीही त्यांना 'भाऊ'च म्हणू लागलो.आईला 'माई' का ते माहित नाही.पण सगळे म्हणतात म्हणून मीही माईच म्हणू लागले.
माई त्यावेळी इ.७ वी पास होऊन जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षिका म्हणून लागली होती व वडिलही. ते दोघेही कधी एका गावात एकत्र असे राहिलेले मला आठवत नाही.
भाऊ अंगाने उंच,बारीक पण काटक असे होते.ते रागीट मात्र खूप होते.एकदा राग आला की तो लवकर आवरायचा नाही.खूप करारी होते.त्यांचा पोशाख म्हणजे नेहमी पांढरा शुभ्र सदरा,धोतर,काळा कोट व डोक्यावर गांधी टोपी.रांगोळी काढण्यात हातखंडा असे. दिवाळी,१५ आॅगस्ट, २६ जानेवारी या दिवशी तर पुर्ण गावात रस्त्याच्या कडेने ते मुक्तहस्त रांगोळी सरसरा काढायचे.
सुरुवातीला माईला नोकरी लागली तेव्हा ती करायची नाही असं सासरच्यांनी ठामपणे सांगितलं होतं पण घरात एवढी माणसं होती. काका,काकू,आजी, आजोबा,आम्ही आठ मुले तशीच प्रत्येक काकांचीही.त्यामुळे माईने नोकरी करण्याचा निर्णय ठामपणे घेतला व तो अंमलातही आणला.एकत्र मोठं कुटुंब असल्याने थोडं अवघड झालं. सुरुवातीपासूनच घरात सर्वांचा नकार असल्याने ती आम्हां मुलांना घेऊनच बाहेर पडली.
माझा जन्म 'हिंगणगाव' येथे झाला असं मोठ्या बहिणी सांगतात.त्यानंतर मी सात वर्षांची असल्यापासूनचे आठवते. 'म्हासुर्णे' या गावी होते.या गावात माझे बरेचसे बालपण गेले.माई सांगते ते आठवते.म्हणजे माझ्या जन्मानंतर 'म्हासुर्णे' या गावी तिची बदली झाली.मी खूप लहान म्हणजे बाळच होते. होते.त्यावेळी मला कुठं ठेवायचं हा मोठा प्रश्न माई मला शाळेजवळ असलेल्या मंदिरात दुपट्यात लपेटून ठेवून जायची.मधल्या सुटीत येऊन दूध पाजून पुन्हा शाळेत जायची. शाळेच्या जवळच एक रामाचे मंदिर होते. त्याच्यापुढे ग्रामपंचायतीचे कार्यालय व मारुतीचे मंदिर.ही दोन्ही मंदिरे खूप मोठी होती.राममंदिरात मोठ्या मोठ्या मूर्ती असलेली अनेक छोटी मंदिरे होती.प्रवेशदारातून आत गेल्यावर समोरच राम, लक्ष्मण सिता यांच्या मूर्ती.बाजूला शंकराची पिंड व त्याचा गाभारा होता.तिथे खूप अंधार असायचा.माई सांगे ती मला सकाळी शाळेत जाताना या शंकराच्या गाभार्यात ठेवून जात असे.दुपारच्या सुटीत येऊन तेथून जवळ असलेल्या मारुतीच्या मंदिरात ठेवायची.मंदिरात येणारे-जाणारे गावकरी मला खेळवायचे.बराच वेळ मी झोपलेलीच असे. मंदिराचे पुजारीही चांगले होते.ते काहीच बोलत नसत.सर्व देवांची पूजा करून निघून जात.कधी कधी मी रडत असल्यास खेळवत बसत असे माई सांगायची.
'म्हासुर्णे' हे गाव खूप छोटं असं म्हणता येणार नाही पण छान होतं.तिथे अठरापगड जातीचे लोक गुण्यागोविंदाने रहात.अगदी मला समजायला लागलं तसं एस.टी.स्टँडपासून गावाची जातीप्रमाणे गल्ल्यांची,आळींची नावे पडली होती.एस.टी.स्टँड संपलं की वाण्याची दुकानं,त्यांच्यासमोर मगर,गुजर खाली ब्राह्मण आळी असायची.डाव्या बाजूला शेवटी महार, मांग यांची तर उजव्या बाजूला गावशिवेला लागून बेरड,रामोशी अशी सगळ्या जातीची वस्ती होती.पण सगळे गाव सगळ्यांचे सणवार जपत असे. बारा बलुते असणारं हे गाव एकमेकांना मान देऊन गुण्यागोविंदाने नांदत असलेले लोक खरोखरच त्या गावाची आठवण जरी आली तरी संपुर्ण जीवनपट अगदी घटनाक्रमाने समोर येतो.
फार पैसा कोणाकडे नव्हता तरी वस्तूंच्या देवघेवीने एकमेकांच्या गरजा भागवल्या जायच्या.जसे की अगदी महार,मांग,बुरुड जे वस्तू बनवायचे ते पुरवायचे.मराठा समाज शेती करी ते धान्य पुरवायचे. ज्यांच्याकडे दुभती जनावरे असत ते गवळी दुध पुरवायचे. वाणी, गुजर किराणा,वाण सामान पुरवायचे. खूप छान वाटायचं त्या गावात.एकटं असून कधी एकटेपण जाणवायचं नाही.संध्याकाळी सगळ्यांची पोरं वाड्याबाहेर एकत्र खेळायची, ब्राह्मण आळीत शेवटच्या टोकाला एक म्हसोबाचं देऊळ होतं.त्याला मोठा गोल पार होता.राममंदिरातील पहाटेच्या घंटानादापासून ते रात्रीच्या शेजारतीपर्यंतचा आवाज कानात अजूनही कायम घुमतोय.राममंदिराचा भला मोठा दगडी नंदादीप होता.त्यामध्ये सायंकाळी दिवट्या ठेवण्यासाठी आम्ही चार-पाच मैत्रीणी नित्यनेमाने जायचो.वर चढून खालच्या पणतीपर्यंत तेल घालत यायचो.दिवल्या पेटवल्या की त्यांचा उजेड रात्रभर रहायचा
अगदी गाववेशीपासून गाव लखलखायचा. त्याला लागून एक मोठं पिंपळाचं झाड होतं.त्याचा पार एवढा मोठा होता की सगळे गावकरी जमले तरी ऐसपैस बसू शकतील. पारावर मोठी माणसं गप्पा मारत व भोवताली आम्ही लहान मुलं खेळत असू.अगदी दुपारपासून दिवेलागणीपर्यंत सर्वाँच्या शिळोप्याच्या गप्पा चालत अन रंगतही..!
माई-भाऊ दिवसभर शाळेत असायचे. भाऊ जवळपासच्या गावात पण ती गावे कोसोदूर असल्याने ते आठ-पंधरा दिवस नाही तर कधी कधी एक महिन्यानेच घरी येत असत. तोपर्यंत एकटी माई आम्हां सर्वांना कसरतीने सांभाळायची. या गावाने मात्र आम्हाला खूप साथ दिली.शिक्षकी पेशा असल्याने माई-भाऊंना तालुक्याच्या गावीही जावे लागे.आम्ही मुले इकडे-तिकडे भटकत असू. संध्याकाळी मोठी बहिण शाळेतून आली की आम्हां लहान भावंडांना गोळा करून घरात नेई.घरात असेल ते खायला देई.वाड्यातील लोकही खूप प्रेमळ होते. आम्ही भुकेलो असू म्हणून कोण-कोण काय-काय खायला आणून देई.त्यावेळी एस.टी.फक्त सकाळी व संध्याकाळी दोनदाच असे.ठराविक वेळी माई यायची. शेजारी चौकशी करून मग घरकामाला लागायची.
असं ते गाव...गाव कसलं एक कुटुंबच होतं म्हणावं असं "एक गाव..माझं गाव".. इतकं ते माझ्या मनात,हृदयात वसलं आहे. या गावची आठवण खूप येते.सन २०१६ मध्ये सहजच मी या गावचे वर्णन करणारी एक कविता केली होती व तिला दैनिक सकाळ या वृत्तपत्राच्या रविवारच्या 'सप्तरंग' पुरवणीमधून प्रसिध्दीही मिळाली होती.इतकी की आता मला एक 'कवयित्री' म्हणून लोक ओळखू लागलेत.ही प्रसिध्दी केवळ त्या गावामुळेच! ते त्याचेच दातृत्व अन् मातृत्वही म्हणायला हरकत नाही.म्हणून ती वाचकांसाठी मुद्दाम येथे देत आहे.
"एक गाव...माझं गाव"...!
गजबज नसलेलं एक गाव
आपल्याच नादात असलेलं..
सण-वार जपणार
बारा बलुते असणारं...
घर कधी गावात..कधी बाहेर,
हळूहळू सरकलेलं...!
राब-राब राबून,कष्ट करून,
आई-बाबांचं तन-मन दमलेलं..
त्यांचं पोर मात्र बोट सोडून
इकडं-तिकडं रमलेलं...!
कधी आज इकडं,कधी उद्या तिकडं,
पण...रोजच्या आशेवर जगणार..!
तिथं कितीतरी घडलेलं,घडणारं,
म्हणूनच माझं म्हणावंसं वाटणारं...गाव
हे गाव आताशा कितीतरी दूर दूर वाटतं
पण तसं तर म्हणण्यापुरतंच दूर दूर..
पण माझ्या मनाच्या कितीतरी जवळ,
एक गाव.....माझं गाव............!!!
प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®
