सरत्या वर्षाला पत्र...
सरत्या वर्षाला पत्र...
'सरत्या वर्षाला पत्र'...!
"वर्षाश्रम"
सदनिका क्रमांक१२/३१
दि.३१/१२/२०२५
प्रिय,
सन '२०२५' यास,
अरेच्चा...! असा दोन दिवस आधीच माझ्या मागे येऊन उभा राहिलास? दचकले ना मी!... किती घाई, गडबड असते रोज माझी! पहातोयस ना! दिवसामागून दिवस,रात्रीमागून रात्र,महिन्यामागून महिने जात आता तुझीही जाण्याची वेळ येऊन ठेपली बघ!.. सगळे कसे अगदी तुला निरोप द्यायला आठवडाभर आधी- पासूनच जय्यत तयारी करतायत.का बरं असं? मला नाही असं वाटत.माझ्या मते,माणसाचं जसं वय सरतं तसंच तुझं सन संपतं इतकंच...नव्या उमेदीने नवे वर्षही येणारच आहे की! या माणसांना फक्त निमित्त हवं असतं समारंभ साजरे करायला हो ना रे? नाही तर काय? तूच सांग ३१डिसेंबरला जो सूर्य उगवणार तोच १जानेवारीलाही उगवणार ना? की,तो वेगळा असणार आहे? नाही म्हणायला प्रत्येक वर्ष महत्वाचं असतं हे मला मान्य आहे.त्यात अनेक घटना घडतात.ज्या आपल्याला कडू-गोड,सुखद-दु:खद आठवणी देऊन जातात.तुझंही असंच आहे.अनेकविध घटनांचा अनुभव देऊन चाललायस!..
हे सरत्या वर्षा,तुला निरोप देताना तूही हवास आणि नव्या येणार्या तुझ्या भावंडाचंही स्वागत करायचं आहे,अशी ही दोन्ही बाजूंनी मला हुरहुर लागलीय बघ!..त्याच्या आणि तुझ्या मधली ही संध्याकाळ म्हणजे ३१ डिसेंबर! केवळ वर्षभरातच नव्हे तर आजपर्यंतच्या आयुष्यातील भूतकाळ मला आठवतो.सुखं-दु:खं चांगले-वाईट घडलेल्या घटना, मिळालेले यश,झालेले अपेक्षाभंग,काही अपेक्षांची झालेली पुर्तता इत्यादी.हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग असतो. कितीही काहीही झालं तरी, भूतकाळात भरलेली ओंजळ थोडी तरी रिकामी करून उद्या येणार्या नवीन वर्षाला जागा करून द्यावीच लागेल तुला! किंबहुना ही सर्वच ओंजळ आपोआप रिकामी होईल.अगदी तुझ्याही नकळत!..तेव्हा या मधल्या उंबरठ्यावर काय सोडायचं आणि काय बरोबर घ्यायचं हे आपण दोघांनीही ठरवारला हवं.ते ठरवण्यासाठी देवानं मला दिलेल्या बुध्दीमुळे मला वाटते की, कित्येकजण दु:खं,सल,वाईट घटनाच जास्त लक्षात ठेवतात आणि मग त्यामध्ये एखाद्या चांगल्या आनंदी घटनेची साखळीच निसटून जाते.माझंही काही अंशी असंच झालं होतं.पण हळूहळू स्वत:च्या मनाला समजावत गेले. मग वाटलं अरे!..मस्तच चाललंय की!..आता कशाला खंत करायची? जगण्यासाठी अजून काय हवंय? एकदा प्रयत्न केला की जमतं. अनावश्यक आलेले विचार निरर्थक वाटतात. हा मुक्त होण्याचा अनुभव काही वेगळाच असतो.तो आपला आपणच घ्यायचा असतो. तो घेता आला की वाटतं व्वा! जमलं की आपल्याला हे नवं स्विकारण्याचं तंत्र! तेव्हापासून आतापर्यंत मी हे करत आले.ते मला जमलेही आहे.म्हणून तर तू असा अचानक माझ्या पाठीशी आलास असं मला वाटलं आज!
खरं तर प्रत्येक दिवस हा माणसाला काही ना काही देण्यासाठीच उगवत असतो.आयुष्य जगताना सुख-दु:खांत,वेगळ्या अनुभवात आपण दोघांनीही आनंदी असावं.तरच तुझ्या सोबतचा माझा प्रवास स्वतंत्र,आनंदी होईल. एकमेकांना वेळ देताना तू मला किंवा मी तुला सोबत आहोत हीच सहृदयता असेल आपल्या दोघांची नाही का? तुला निरोप देताना मनाचा गाभारा तृप्तीने भरलेला असेल तरच ते तुझ्याही प्रती माझं 'सौजन्य' असेल.ह्या सौजन्याने निरोप देता देताच माझं मापही समृध्दीने शिगोशिग भरतेय!.. हीच तू मला पुढच्या प्रवासासाठी दिलेली शिदोरी आहे.केवळ ह्याच जाणिवेने मी तुझी कृतज्ञ आहे.यावरून माझ्या वाचनात आलेल्या चार ओळी आठवल्या.
"जगण्याचे चक्र झाडाकडून शिकावं
कोवळ्या पालवीच्या नवलाईचं,
अखंड खोड असतं...
पिकल्या पानांना अलगद गळून,
मातीला समृध्द करायचं असतं
पुन्हा येणार्या नव्या मोहरासाठी....!!
मग,काय विचार आहे तुझा? येशील ना पुन्हा, नव्याने मला भेटायला?..असंच मला समृध्द करायला.आपण दोघेही पुन्हा नवे होऊ या हं...!
तुझ्याच प्रतिक्षेत,
तुझी सखी,
'प्रतिक्षा'
प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®
