Pradnya Ghodke

Classics

3  

Pradnya Ghodke

Classics

रंग जीवनाचे

रंग जीवनाचे

3 mins
148    लहानपणी मी व माझा भाऊ दिवाळी व मे महिन्याच्या सुट्टीत आजोळी 'चाफळ' या गावी जायचो.मला दिवाळीत आजीकडे रहायला खूप आवडायचे.आजीचा चौसोपी वाडा होता. दिवाळीत वाड्यात खूपच धामधूम असे. वाड्यात मोठ्ठे अंगण.प्रत्येक भाडेकरू म्हणजे सख्खे शेजारी! एकमेकांशी जीव मिसळून रहाणारे.सुखं-दु:खांत धावून येणारे.सर्व सण, उत्सव एकत्रच साजरे करणारे असे होते.

    मला सहा मावश्या होत्या.त्यांची मुले व हे सर्व शेजारी यांच्यामुळे दिवाळीचा उत्साह द्विगुणीत व्हायचा.साधारणपणे सत्तर-ऐशींच्या दशकातील आठवणी आजही मनात रूंजी घालतात.डोळ्यासमोर भूतकाळातील ती दिवाळी येते.दिवाळी येण्यापूर्वीच दारासमोरील अंगणं सारवून,झाडून स्वच्छ केली जायची. संध्याकाळ झाली की अंगणात रांगोळी काढण्याची लगबग सुरू.माझे बाबा डाव्या हातात रांगोळीचा डबा व उजव्या हाताने असे भराभर पान,फुले,वेलबुट्टी इतक्या सहजपणे

चालत-चालत गावाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत काढून त्यात रंग भरायचे.त्यामुळे ती रांगोळी वेगळी अशी खुलून दिसायची.सारा गाव यासाठी त्यांची वाट पहायचा.


    माझी एक मावशी विधवा होती.ती सर्वांत मोठी म्हणून तिचे नाव 'आक्का मावशी' ती माझे खूप लाड करायची.कारण मी सर्वांत लहान होते व माझी आई जिला आम्ही 'माई' म्हणायचो तिची सर्वांत लहान बहिण शिक्षिका असल्याने मला पुरेसा वेळ देऊ शकत नव्हती. तिलाही माझे करण्यात वेळ कसा जायचा कळायचे नाही. कारण ती सतत दु:खी असायची.घरातले सगळेजण तिला सतत समजवायचे पण काकांना लवकर देवाज्ञा झाल्याने व सासरी कोणी नसल्याने ती एक मुलगा घेऊन कायमचे आजीकडे रहायची.याच विचारांनी तिला नैराश्य येत असे.ती सतत स्वत:ला कामात गुरफटून घ्यायची.पण कोणात मनमोकळी मिसळायची नाही.घरकाम झाले की शिवणकामात गुंतवून घ्यायची.एका दिवाळीत आम्ही सगळे उत्साहात व ही एकटी दुर्मुखलेली पाहून माझ्या बाबांनी तिला या रांगोळीचे वेड लावायचे ठरवले.पण ते लावताना तिला न दुखावता समजावू लागले की,

"आक्काताई,चला यावर्षी मी तुम्हाला रांगोळी काढायला शिकवतो.मला दरवर्षी दिवाळीला येणे जमेलच असे नाही'.आणि मी आलो नाही तर काय आपले एवढे मोठे अंगण असेच रांगोळीविना ठेवणार का? या प्रश्नाला मात्र सर्वांनी 'हो ना तेच की! म्हणून उत्तर दिले'.

आजीनेही लांबूनच खुणावले व तिला समजवा

म्हणून आग्रहाची खूण केली.भाऊंनी मग आपल्या शिक्षकाच्या भूमिकेत शिरून मावशीला

समजवण्याचा वर्गच सुरू केला.


'अहो,आक्काताई,दिवाळी वर्षातून एकदाच येते.आणि ही निवांतपणे रांगोळी काढण्याची संधीही आपल्याला एकदाच मिळते.रांगोळीच्या रंगात आपल्याला रंगवून

जाते. तसं पाहिलं तर आपल्याकडचा प्रत्येक सण हा कुठल्या ना कुठल्या रंगात न्हायलेला असतो. म्हणून तर सण उत्सव आपल्या जीवनात रंग भरतात रंगच नसते तर आपले जीवन किती नीरस झाले याची कल्पनाच करवत नाही.


उन्हाळ्यातही निसर्गात वसंत नावाचा एक रंग सोहळा सुरु होतो. हा वसंतोत्सव मनमोहक असतो. झाडावरची जुनी पानं गळून पडलेली असतात.जणू आम्ही आता आमच्या जीवनातील शेवटचा उत्सव साजरा करतो आहोत असंच त्यांच्या मनात असावं. म्हणून सन्याशाचं पीत वस्त्र ते धारण करतात. पिवळ्या रंगात रंगतात. आणि आपल्या शेवटच्या निजधामी निघून जातात. पण त्यांचं जाणंही किती सुंदर ..! येताना सुंदर कोमल गुलाबी रंग लेऊन येतात. आणि मग हळूहळू मनमोहक अशा हिरव्या रंगात परावर्तीत होतात. जणू येतानाच सोबत हिरव्या रंगाचे स्वप्न घेऊन येतात.बहुतेक निसर्ग हिरव्या रंगाचं स्वप्न पेरत असावा धरित्रीच्या कुशीत. आणि मग ते स्वप्न सत्य होऊन धरित्रीच्या कुशीतून हिरव्या रंगात उमलतं सोबत सौख्य,समृद्धी आणि आनंद घेऊन.


पूर्वेच्या पटलावर तर अप्रतिम रंगोत्सव सुरु असतो. विविध रंगांनी ते नभोमंडल रंगलेलं असतं .रंग उगवतीचे असो की मावळतीचे,वा रांगोळीचे ते मनोहरच असतात.फक्त आपल्या दृष्टीवर ते अवलंबून असतात.जशी भावना,तसा मनाचा रंग. सगळ्यात चांगला म्हणजे 'प्रेम' रंग.तो अर्थातच व्यापक अर्थाने.या सृष्टीवर, माणसांवर,स्वत:वर, चराचरावर प्रेम करणं म्हणजे जीवनात रंग भरणं.असे जीवनाचे रंग

ऐकताना मावशीही मोकळी होत म्हणाली,

"खरं आहे भावोजी तुमचं.चला आजपासूनच मी

तुमच्याकडून फक्त रांगोळीच नाही तर माझ्या

जीवनातही रंग भरायला शिकणार आहे".


हुश्श! भाऊकडे पाहत आजीने छान अशी हाताने खूण करत सुस्कारा सोडरा.आम्ही सुट्टी संपवून जाताना मावशीने भाऊंच्या हाती रंगीत रांगोळ्यांचे डबे देत म्हणाली "भाऊजी ही तुमची दिवाळी भेट"!Rate this content
Log in

Similar marathi story from Classics