Pradnya Ghodke

Inspirational

4.5  

Pradnya Ghodke

Inspirational

मी अनुभवलेला पाऊस

मी अनुभवलेला पाऊस

3 mins
387


  संध्याकाळची वेळ,बाहेर पाऊस सुरू होता तसा तो माझ्या मनातही कोसळत होता.कारण आबा,वयाच्या सत्तरीला आलेले व आतापर्यंत एकही वारी न चुकवलेले माझे सासरे पंढरीच्या वारीला जाऊन दहा दिवस झाले होते ते गेले आणि दुसर्‍याच दिवशी त्यांच्या नातीने म्हणजे माझ्या सहा वर्षाच्या मुलीने 'मिनूने' अंथरूण धरले.दोघांनाही एकमेकांचा खूप लळा होता.त्यामुळे पहिल्या चार दिवसातच,आबा कुठे गेले? कधी येणार? याच प्रश्नांचा भडीमार करत तिने ध्यास घेतला. कशीबशी समजूत घालत दोन दिवस काढले.पण एक दिवस तापाने

सीमा ओलांडलीच! मग आम्ही दोघांनी तिला दवाखान्यात दाखल केलं.पाचव्या दिवशीही ताप जायचे नाव घेईना. त्यातच मिनू बडबडू लागली,"आबा आले का? अजून का नाही आले?" मला रडू फुटले.आता तर तिने हातपायही वाकडे केले! इतक्यात अहो आत आले.तिला पाहताच उलटपावली नर्सकडे धावले.नर्सने लगेच डाॅक्टरांना फोन केला. त्यांनी येऊन पुन्हा औषध व झोपेचे इंजेक्शन दिले.रात्र संपायला खूप वेळ होता.पती जरा घरी आवरायला गेले होते.मी सुन्न होऊन समोर लावलेली विठ्ठलाची मूर्ती मी न्याहाळत बसले होते.पहाटे पहाटे डाॅक्टरांनी मला बोलावले. आता ते काय सांगणार याचा अंदाज घ्यायला मन थार्‍यावर नव्हतं. समोर डाॅक्टर शून्यात नजर लावून बसले होते.

"डाॅक्टर"....मी शांततेचा भंग केला.

"आजोबांना बोलावलंत का?" त्यांनी विचारलं.

"हो,काल दुपारीच माणूस पाठवलाय.आज तो त्यांना घेऊन येईल.

"नातीनं आजोबांचाच धोसरा काढलाय.आज कसेही करून ते आलेच पाहिजेत.नाहीतर ताप वाढून मेंदूत शिरला तर काहीच करता येणार नाही.ती अधू तरी होईल किंवा तिची आशा तरी सोडावी लागेल!" डाॅक्टरांचा एकेक शब्द माझे काळीज कापत होता.त्यांनी एक इंजेक्शन लिहून देत लगेच आणायला सांगितले.मी धावतच बाहेर आले.नर्सला मिनूवर लक्ष ठेवायला सांगून जीना उतरून रस्त्यावर आले. पाऊस अजूनही सुरूच होता.रस्ता पावसाने भिजत होता.मला छत्री घ्यायचंही भान राहिलं नाही.

    समोर पाहिलं अन् माझा माझ्या डोळ्यांवरवि विश्वासच बसेना!..समोर रिक्षा थांबलेली.आबा रिक्षेवाल्याला पैसे देत होते! मी धावतच त्यांच्याजवळ गेले.त्यांना घेऊन क्षणार्धात वर आले.

"पिल्लू ,बघ तरी कोण आलंय!., मी ओरडणारच इतक्यात परिस्थितीचं भान राखत आबांनीच मला सावरलं.ते पुढे झाले.मिनूच्या उशाशी बसले.तिचं डोकं मांडीवर घेतलं.त्यांच्या तोंडून शब्दही फुटेना.त्यांची बोटं फक्त तिच्या केसांतून फिरू लागली.डोळे पावसाची धार लागावी तसे गळू लागले.लाडक्या नातीची ही अवस्था पाहून त्यांना उंचबळून आलं.पुन्हा एकदा त्यांनी तिच्या कपाळावर हात फिरवला आणि तिच्या कानाशीपु टपुटले,"डोळे उघडून बघ तरी गे बाय माझे!.."

    आणि समोरचं दिसणारं दृश्य पाहून आम्हीदो दोघे अवाक् झालो! अत्यानंदाने ओरडावसं वाटलं क्षणभर!! कारण डाॅक्टरांनी झोपेचं इंजेक्शन देऊन झोपवलेल्या नातीने क्षणात जागी होऊन आजोबांच्या शब्दाला जागत डोळे उघडून पाहत त्यांना घट्ट मिठी मारली!..

मागे डाॅक्टर उभे.कुणीतरी त्यांना आजोबा आल्याचा निरोप दिला होता.त्यांनीही डोळे पुसले.आम्हांला खुणावले.त्यांच्या खोलीत गेलो.

"धोका टळला" ते म्हणाले.

"अहो,तुम्ही लिहून दिलेलं इंजेक्शन आणायला मी खाली गेले तर आबा रिक्षातून उतरत होते"!एका दमात मी सांगितले.

"आता काही गरज नाही. तिला थोड्या वेळाने घरी घेऊन जा." डाॅक्टर म्हणाले.

    आम्ही घरी आलो.दोन आठवड्यांनी घरात चैतन्य पसरलं.जेवण बनवलं.सगळे जेवायला बसलो.आबांच्या मांडीवरच मिनू बसली.त्यांनी तिला भरवलं.आबांची एकादशी होती.त्यांनी फराळ केला.नात क्षणभरही आजोबांना दूर करायला तयार नव्हती.काही वेळाने ती झोपी गेल्यावर आबा म्हणाले,"मी जरा बाहेर जाऊन येतो.पिल्लूमुळे वारी अर्धवट राहिली.गावातल्या मंदिरात जाऊन माऊलीचं दर्शन घेतो."

"लवकर या हं आबा" मी म्हटलं.

"हो गं,येतो लगेच आणि चार दिवस नाही आलो तरी पिल्लूला काही होणार नाही आता"!

    दहा-बारा दिवसांच्या धावपळीने दमून आम्ही दुपारी जे झोपलो ते रात्री आठ वाजताच जाग आली.आबा अजून आले नव्हते.काहीशा काळजीतच येतील म्हणून पुन्हा झोपलो.मिनू शांत झोपलेली.

    पहाटेच दाराची बेल वाजली.मी दार उघडलंस समोर आबा.आम्ही आत आलो."का हो एवढा उशीर? खूप मोठी रांग होती का?" मी विचारलं.

"काय सांगू तुला? काल पहाटे रांगेत उभा होतो.

चौदा तासांनी विठूमाऊलीचं दर्शन झालं.लगेचच गाडीत बसलो! जीव नुसता आंबलाय.पिल्लू कुठाय? झोपलीय का अजून? सगळ्या प्रवासात

तिचीच आठवण"!!...आबा बोलत होते.

"म्हणजे"?!! मी आश्चर्याने बघत होते."आबा,अहो,

तुम्ही आत्ता येताय पंढरपूरहून?" कसंबसं मी विचारलंच!

"अगं,गाडी तरी नको का मिळायला? पिल्लूचं कळाल्यापासून विठ्ठलाचं दर्शन काय नि काय,काय..तिच्यासाठी केलेले नवसायास सगळं आठवतंय मला.तुमच्यापेक्षा मला तिची जास्त काळजी आहे.लाघवी आहे पोर!" आबा.

ते अजून काहीतरी बोलत होते पण मला काहीच ऐकू येईनासे झाले.कशीबशी भानावर येत विचार

करू लागले तो दवाखाना,तिथली विठ्ठलाची मूर्ती,पंढरीची वारी,वारकरी,पालखी,श्रध्दाळू असणार्‍या लाखो वारकर्‍यांचं रिंगण,माझ्या भोवती फेर धरू लागलं.थोड्यावेळाने आम्ही दोघेही उठलो.आबांना साष्टांग दंडवत घातला.

   समोर पाहिलं खरेखुरे आमचेच आबा होते!

नातीवर आभाळाएवढी माया करणारे.लळा लावणारे.आणि काल आमच्या घरी फराळ करून गेलेले आबा..म्हणजे विठूमाऊली! दोघांत

काहीच फरक नव्हता! डोळे मिटले. दवाखान्यातली धीर देणारी विठ्ठलमूर्ती उभी राहिली.आजोबांची नातीवर व विठूमाऊलीची भक्तांवर असलेली आभाळमाया पाहून पुन्हा एकदा आम्ही नतमस्तक झालो. त्या आभाळमायेपुढे...! 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational