Pradnya Ghodke

Classics

3.4  

Pradnya Ghodke

Classics

माझ्या आठवणीतील गुरूजी

माझ्या आठवणीतील गुरूजी

2 mins
205


माझ्या आयुष्यातील गुरूंना म्हणजे प्रथम माझे आई,बाबा जे स्वत: व्यवसायाने शिक्षक होते.ज्यांनी मला घडवलं,जगणं शिकवलं,माझं

मन घडवलं असे..! दुसरे म्हणजे विशेषत: मी ज्यांच्यामुळे आज एवढी शारिरीकदृष्ट्या अक्षम असूनही मानसिकदृष्ट्या सक्षम राहू शकले, असे माझे शालेय शिक्षक मा.श्री.कोरे गुरूजी! आता त्यांचे पुर्ण नाव मला आठवत नाही पण आडनाव मात्र पक्के लक्षात आहे.सातवीच्या शिष्यवृत्तीपासून ते दहावीच्या निकालापर्यंत अभ्यासाच्या,विशेषत: गणिताच्या सरावासाठी खाल्लेल्या मारावरून! त्यांच्या गणिताच्या तासाला एरंडाची ओली फोकच घेऊन ते वर्गात यायचे. त्याचबरोबर एक जाडजूड काळा लाकडाचा रूळ तेल लावून आणायचे! मी एकदा एरंडाच्या फोकेचा मार खाल्ला होता.घरी कळले तरी माझेही बाबा हाडाचे शिक्षक असल्याने विचारणा दूरच उलट चांगली शिक्षा करा हिला...असाच निरोप गेला त्यांना..!

   गणित विज्ञानाबरोबरच इतरही विषय ते अधून मधून शिकवत असत.स्वत: एक विद्यार्थी असल्यासारखे कुतूहलाने विज्ञानाचे प्रयोग शिकवत.बैजिक राशी आणि भूमितीची प्रमेये ते चुटकीसरशी सोडवायचे.इतिहास तर मंत्रमुग्ध होऊन सांगायचे.मराठीचे व्याकरण आणि संस्कृतातील सुभाषिते तर त्यांची तोंडपाठ असायचीच पण ती आमच्याकडूनही करवून घ्यायचे.रोज एका विद्यार्थ्याला फळ्यावर मराठी सुविचार,संस्कृत सुभाषित लिहायला लावायचे. ज्याचे पाठ नसेल त्याला वर्गाबाहेर उभे करून तेच दुसर्‍या दिवशी पानभर लिहून आणायची शिक्षा देत.खेळाच्या तासाला मनसोक्त खेळू देत. शारिरीक शिक्षणाच्या तासाला कबड्डी,खो-खो, गोळा फेक,लांब उडी,उंच उडी हे सगळं करवून घेत.वाचनासाठी वेळ देऊन शाळेच्या ग्रंथालयात पुस्तके वाचायला लावत.प्रत्येकाला पुस्तक वाचायला लावून नंतर त्याबद्दल माहिती विचारत.काय समजलं तेही विचारत.

   स्वातंत्र्य दिन,प्रजासत्ताक दिन या दिवसांची तयारी पंधरा दिवस अगोदरच सुरू करत.स्वच्छ गणवेषापासून ते कोणी कोणतं भाषण करायचं ते स्वत: ठरवून देत.वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायला लावत.अर्थात मला त्यांच्या मारामुळे भिती,अन भितीमुळे वक्तृत्व जमले नाही...ते अजूनही! ही गोष्ट वेगळी! मात्र गाव पातळी ते तालुका पातळी पर्यंत होणार्‍या निबंध स्पर्धेत मीच पहिला नंबर मिळवायचा आणि नाट्य वाचनाचे बक्षिसही मीच आणायचे या दोन अटींवर माझी वक्तृत्व स्पर्धेतून सुटका व्हायची!विज्ञान प्रदर्शने जिथे भरतील तिथेच हे कोरे गुरूजी सहल काढणार..त्यानंतर काय ती धम्माल करायची.

   परीक्षेच्या अगोदर मात्र खूप सारा अभ्यास,गृहपाठ म्हणून देणारच.वार्षिक परीक्षेत मी उत्तरपत्रिकेला किती पुरवण्या लावते याकडे त्यांचे बारीक लक्ष असे.तसेच निकालाच्या वेळी ही माझा कितवा नंबर येतोय याकडेही..मी शिक्षकाची मुलगी म्हणून ते माझा पेपर जरा जास्तच कडक तपासत.चुका असतील तर नंतर समजावूनही सांगत.तसा त्यांचा माझ्यावर लोभही असे.कधी कधी माझ्याबाबतीत हळवेही होत असत.कारण माझी तब्येत सतत नाजूक असे.अशा कितीतरी आठवणी आहेत.माझ्या आई,बाबांच्या शिक्षक म्हणून जेवढ्या आठवणी असतील त्याहीपेक्षा कितीतरी जास्तपटीने कोरे गुरूजींच्या आठवणी माझ्याकडे आहेत.

   खरोखरच त्यांच्या कडक शिस्तीतील ते दिवस माझ्या मनात कोरलेले आहेत.त्यामुळेच आज मला हे सोन्यासारखे दिवस पहायला मिळताहेत.कितीही संकटे आली,दु:खे झाली तरी त्यांनी शिकवलेल्या कणखरपणामुळेच माझ्यात सहनशीलता,संयम,सचोटी हे गुण भिनले.त्यांची किंमत करता येणार नाही.याची मला जाणीव आहे.त्यांच्यामुळे आयुष्यातील मिळालेले मूल्यशिक्षण आणि मौल्यवान क्षण परत मिळणार नाहीत.

   या आधुनिक विश्वात,अथांग आकाशात झेप घेण्यासाठी माझ्या पंखात बळ देणार्‍या,माझ्या अंगी नितीमूल्यांचा अविष्कार घडवणार्‍या आणि ...आज माझ्यात जे काही चांगलं आहे ते त्यांच्याच संस्कारांचं देणं आहे..आणि केवळ याच करिता मी त्यांची सदैव कृतज्ञच नव्हे तर ऋणाईतच राहिन.माझ्या जीवनात मिळणार्‍या प्रत्येक यशामागे याच माझ्या गुरूचे नाव उंचावण्याचा प्रयत्न करीन.



Rate this content
Log in

Similar marathi story from Classics