Pradnya Ghodke

Drama Others

3  

Pradnya Ghodke

Drama Others

आजीची आठवण

आजीची आठवण

4 mins
507


प्रत्येकाची आपल्या आजोळची एक खास अशी आठवण असते. माझीही एक आठवण आजही डोळ्यात पाणी आणते. आम्ही एकूण आठ भावंडे. चार बहिणी व चार भाऊ. मी सर्व भावंडात लहान. आईवडिल शिक्षक असल्याने सतत दर दोन-तीन वर्षांनी बदल्या ठरलेल्याच असायच्या. मोठी भावंडं हळूहळू शिक्षणाच्या, नोकरीच्या निमित्ताने एकेक करून कोणी नातेवाईकांकडे तर कोणी मावशीकडे अशी हळू हळू दुरावली. मलाच सर्वात जास्त म्हणजे इ.८ वी.पर्यंतचा सहवास आईबरोबर मिळाला. त्यातही आई मला दिवाळी व मे महिन्याच्या सुटीत आजीकडे सोडून यायची. माझं आजोळ म्हणजे सुप्रसिद्ध असलेले श्रीरामाचे चाफळ. मला खरं तर आईबरोबरच राहायला आवडायचं.पण परिस्थितीमुळे म्हणा किंवा तिच्या शिक्षकीपेशामुळे म्हणा ते शक्य व्हायचं नाही. मी व माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा असलेला भाऊ दोघेही आजीकडे राहायचो. अगदी सुट्टी संपेपर्यंत.

अाजीची थोडी शेती होती. त्यामुळे मे महिन्यात आंबे भरपूर खायला मिळायचे.


इतरवेळी भाज्या व कडधान्ये थोड्या प्रमाणात व्हायची.माझी एक विधवा मावशी व तिचा मुलगा दोघे आजीकडेच राहत व शेती बघत.

आजी उन्हाळ्यात उन्हाळी कामेही करत असे.तिच्या चारही मुलींची नातवंडे उन्हाळ्यात तिच्याकडे यायची व ती सर्वांचे हट्ट पुरवण्याचा आटोकाट प्रयत्न करायची.खूप काटकसर करायची. पहाटेपासून रात्रीपर्यंत सतत कामात असायची.स्वतःच्या पाचही मुलींची लग्ने सुयोग्य स्थळी करून दिली. आजोबा लवकर देवाघरी गेले तेव्हापासून आजीने न डगमगता संसाराचा सर्व भार एकटीने उचलला. सर्व संकटांना मोठ्या धीराने सामोरी गेली. सर्व नातवंडाचे शक्य तितके लाड पुरवायची.


एका दिवाळीच्या सुट्टीतील आठवण मला आजही अस्वस्थ करते. ती म्हणजे त्या वेळी दिवाळीत मी नवीन फ्राॅक हवा म्हणून आजीकडे हट्टच धरला.ती स्वभावाने फार कडक होती.आजीकडे राहत असलेली मावशी कपडे शिवून देण्याची कामे करीत असे. त्याकाळी आतासारखे फॅशनेबल कपडे नव्हते. साधेचिट, खादी, ठराविक रंग असत.आजी काही बोलली नाही पण तिने एक युक्ती काढली.


एका दुपारी मावशीकडून कापड कापून उरलेल्या चिंध्या गोळा करून ठेवायला सांगितल्या. त्यातून मोठे तुकडे, छोटे तुकडे, ज्या आकारात उरले होते त्यातच थोडासा बदल करून कापून ते एकमेकांना जोडून एक अखंड तुकडा बनवला.त्याचा मला फ्राॅक शिवायला मावशीला सांगितले. हा सगळा उपद्व्याप ती गुपचूप करत होती.मला माहीत नव्हते.वरचा ब्लाऊजचा भाग एका रंगाचा व खालचा घेर रंगीबेरंगी व मध्यभागी छोट्या फुलांचे पट्टे, असा तो फ्राॅक तयार झाला.त्याला तिने आठवड्याच्या बाजारातून रंगीत रिबीन आणून हाताला व खालच्या घेराला बारीक चुण्यांची झालर लावली व मला काही कळू न देता ठेवून दिला.


दोन दिवसांनी माझी आई मला न्यायला आली.मी मनातून खूप खट्टू झाले होते अस्वस्थ झाले होते कारण आजीने मला फ्राॅक घेतला नाही.दर सुट्टीतून परत जाताना ती काहीतरी घेत असे आणि यावेळी मी मला काय पाहिजे ते सांगून, मागूनही तिने ते घेतले नाही. आम्ही अगदी एस.टी.स्टॅण्डवर पोहोचलो.तेव्हा आज्जी मागून आली व तिने एक पिशवी माझ्या हातात दिली.मला कळेचना काय,मी रूसलेलीच तेव्हा ती म्हणाली, अगं उघडून तर बघ. मी हळूच पिशवी उघडली,तर आतमध्ये रंगीबेरंगी फ्राॅक....! मला अक्षरशः खूप रडू आले.मी लगेच आजीचा हात हातात घट्ट धरला व म्हणाले, मला आईबरोबर जायचं नाही...आजीनेही मला फ्राॅकसह घरी नेले.तो अंगात घातला.खूप छान शिवला होता.मग मी मावशीच्याही कुशीत शिरून खूप रडले.मला त्या रात्री एक क्षणही आजीला सोडावेसे वाटले नाही आणि मावशीलाही.मावशीने तर घरकाम,शेतीकाम व गावात एकमेव कपडे शिवून देणारी असा सगळा व्याप सांभाळून माझ्यासाठी,रंगीबेरंगी कापड जमवून तो फ्राॅक शिवला होता.


पुढे कितीतरी वर्षे मी तो जपून ठेवला होता.सुटीच्या काळात तरी आईवडिलांची कमी आजीने कधीच भासू दिली नाही.खूप छान संस्कार केले.खरं तर ती स्वतः तेव्हा ६०-६५ वर्षांची होती. तरीही आमच्याबरोबर आमच्याच वयाची होऊन खेळायची.त्यावेळी करमणूकीची कोणतीही साधने नसताना कशाची उणीव भासू दिली नाही. पहाटे मला राममंदिरात काकड आरतीपासून शेजारतीपर्यत जमेल तसं घेऊन जायची.त्यामुळेच आज श्रीरामाच्या कृपेने मला वयाच्या पन्नाशीनंतरही आईपेक्षाही आजीच्या आठवणीने जास्त अस्वस्थ व्हायला होतं.

परवा सहज चिंचवड गावातल्या जत्रेत गेले होते, तेव्हा तेथे अचानक समोर एक फ्राॅकवाला दिसला,आणि अचानक पाऊसही आला अगदी चाफळला असताना आला होता तसाच! त्या पावसाने आजीच्या आठवणी पुन्हा ताज्या केल्या अगदी जशाच्या तशा.आजीला जाऊन आता बरीच बर्ष झाली.काहीतरी हरवल्यासारखं वाटतं.आता नेमकं काय हवं ते कळत नाही.आताच्या नातवंडांना भोवताली श्रीमंती आहे पण आतून दारिद्र्य.राहून राहून वाटतं आजीचा काळ व तसा जगण्यातला, नात्यातला ओलावा पुन्हा येईल का?

आता माझाच संसार तीस वर्षांचा झालाय.मीही आजी झालेय.तेव्हा आजी म्हणायची ते आता पटतय.जसं की....


रांधण्यात, सांधण्यात, झगडण्यात

अनुभवाने जीवन घडतं,

आजी म्हणायची,

गर्दीत, पसार्‍यात, राबत्या घरात

आयुष्य खूपसं आकळतं......

अशी आजीच्या आठवणीने मी आता आजी झालेली असताना, मीच डोळे मिटून घेते,आणि त्या आठवणी मनात घट्ट मिटवून हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवते...... कारण आजीला विसरता येत नाही.दिवस येतात,जातात पण आजीची आठवण येत नाही असं कधी झालंच नाही.आठवणीसाठी विसरावं लागतं,पण मायची मायच ती तिला विसरता मात्र आलंच नाही,येणारही नाही कारण तिच्याच दुधावरची साय मी!!!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama