सद्याचा मध्या..!
सद्याचा मध्या..!


खरं तर मी गोंधळून गेलेय तुम्हांला मध्याची ओळख कशी करून द्यायची..तरी देते.नाव सरळ घ्यायची आमच्या गावात पध्दत नव्हती.उदा.दामोदरला 'दाम्या',अनंतला 'अंत्या', प्रकाशला 'पक्या', श्रीपादला 'शिर्प्या' असं म्हणायची पध्दत! म्हणून मी गोंधळले हो बाकी काही नाही.आता तुम्हांला खरी नीट ओळख करून देते हं...
'मधुकर सदाशिव कुलकर्णी' असं सुंदर नाव असलेला. दिसायला गोरा.उंची सहा फूट.अंगात साधा सदरा-पायजमा असा मध्या! म्हणजे आम्ही "म्हासुर्णे,ता.खटाव,जि.सातारा" या गावी असतानाची ही आसामी! तो गावभर हिंडायचा. मला त्याच्या उंचीमुळे तेव्हा खूप भिती वाटायची.पण तो मला एकदा घरातून घेऊन गेला की,परत घरी येईपर्यंत खालीच सोडायचा नाही. त्याच्या चेहर्यावर सतत मंद हसू असे. गावाबाहेर स्टॅण्डवर एस.टी.येण्या-जाण्याच्यावेळी,शाळेबाहेर शाळा भरण्या-सुटण्याच्या वेळी तसेच बामण आळीत ज्यांना जास्त सोवळे- ओवळेलागत नसे त्यांच्या घरासमोर पाणी भरण्यासाठी,कोणी बाहेरगावाहून अपरिचित आले आणि त्यांनी मधूला पत्ता विचारला की,सरळ न सांगता बामन आळीतून गुजर आळीत जा..मग तेली आळीतून सरळ पुढे..मग उजव्या हाताला,डाव्या बाजूने तिसरा वाडा..कोपर्यातलं चौथं घर...! असा पत्ता सांगायचा..सगळेजण त्याला थापाड्या म्हणायचे.
'मधुकर सदाशिव कुलकर्णी' हे त्याचं पुर्ण नाव.म्हासुर्णे या गावी ब्राह्मण आळीत उजव्या कोपर्यात शेवटचं घर...नव्हे चांगला ऐसपैस वाडा आहे त्याचा..एक भाऊ आहे.त्याचं नाव 'कुमार' गावात त्याला 'कुम्या' म्हणायचे. आता गाव सोडून मला पंचेचाळीस वर्षे झाली. तरी अजूनही त्या गावच्या आठवणी घटनेनुसार नजरेसमोर येतात.त्याला एक भावजय,एक भाचा.ते तिघेही खूप शांत होते.भाऊ वडिलोपार्जित थोडी शेती होती ती करी.बाकी भिक्षुकी करत असे.असा त्यांचा संसार व त्यात घरासाठी काहीही न करणारा हा भाऊ 'मधुकर उर्फ मध्या'!
खरंच तो काय करतो ते परमेश्वरालाच ठाऊक! पण भाऊ,भावजय किंवा गावातले कोणी त्याला काही बोलत नसत. विचारत नसत सकाळी घरातील सछळी कामे आटोपली की,तो बरोबर आमच्या वाड्यासमोर येई.ज्यांच्या कळशा घरासमोर ठेवल्या असतील त्या घेऊन आडावर जाई.नंतर काहीही न बोलता भरून आणून हाका मारून उंबर्याच्या आत ठेवून जाई.त्यानंतर प्रत्येक मंदिरात जाऊन देवदर्शन घेई.दिवसभर चकाट्या पिटणार.एकाच्या चार बातम्या पसरवणार.कोणी काहीही म्हटलं तरी त्याला 'अपमान' हा शब्द ठाऊक नसे. तो कधीही कोणावर रागावलेला मी पाहिले नाही. त्याच्या बोलण्यात नेहमी मोठेपणा.थापा! खोटेपणा जाणवायचा पण कोणी त्याला त्याबद्दल जाब विचारत नाही.विचारायचेही नाही. गावात सगळायांची सगळी कामे तो करून देणार.पैसा किंवा माधुकरी कोणी देवो अगर न देवो,तो तसाच वागणार.त्याच्या तोंडून कधीही कोणत्या कामासाठी नकार म्हणून यायचा नाही.कुठे नोकरी नाही.त्याच्या घरी काम करणार नाही.शेतातही जायचा नाही. कुठला व्यवसाय नाही.तरीही तो सतत गावभर परोपकार करण्यातच व्यग्र असे.
त्याच्या डोक्यात जेव्हा जे काम येईल तेच तो करायचा.त्यामुळे कधी-कधी दारात आलेला मधू परत निघालेला पाहून कोणी म्हटलं, "काय रे?, कुठे चाललास?" तर फक्त हसून म्हणे, "महत्त्वाचं काम आठवलंय ते करून येतो.तुमचं काम नंतर.पण,हां तुम्ही ते करू नका बरं.मी हा गेलो आणि हा आलो.तुमचं काम मीच करणार!" वगैरे.
आम्ही मुलं शाळेत जायचो तेव्हा तो आमच्या दारात मला खांद्यावर व दप्तरही त्याच्याच हातात असायचं.बाईंची मुलगी वेळेत शाळेत पोचली पाहिजे."तुम्ही या रे माझ्या मागे.." असं बाकी मुलांना म्हणायचा. प्रत्येक गोष्टींचं वर्णन करून सांगायचा. राईचा पर्वत व पराचा कावळा करण्यात मधूचा हातखंडा! आम्हाला तरी तसाच अनुभव आला.त्याच्या शेतात एक विहीर होती. ती सतत भरलेली असे. अचानक त्याला लहर यायची. त्यातूनही उन्हाळ्याची सुट्टी असेल तर गावातल्या पिंपळाच्या पारावर सगळ्या मुलांना गोळा करून तो घोषणा करायचा 'चला पोहायला' सगळ्यांना उत्साहानं न्यायचा पण त्याला स्वत:ला मात्र पोहता येत नव्हते. मग प्रत्येकाला काठावर बसवुन बादलीने पाणी काढून आंघोळ घालायचा... मग परत आणायचा. येताना चिंचेच्या किंवा आंब्याच्या झाडाखाली कथांचं जग निर्माण करायचा.त्यात रंगवुन गोष्टी सांगायचा. तो आमच्याकडूनही गोष्टी सांगून घ्यायचा. त्याला गोष्ट आवडली की , चिंचा,पेरू,कैरी जे झाडाला असेल ते पाडून द्यायचा.घरी यायला उशीर झाला की घरातले ओरडायचे.मोठ्याने म्हणायचे, "त्या मध्याला काही काम नाही,धंदा नाही.भर दुपारी उन्हांतान्हांत घेऊन जातो.थापा मारत बसतो.ही मुलंही वेडी..ऐकत बसतात" तो ऐकूनही मुकाट जाई.
त्याला संसार नव्हता. तो ब्रह्मचारी होता.तसं पाहिलं तर मधू आमच्या नात्याचा ना गोत्याचा.पण आमच्यादृष्टीने तो आमचा मोठा भाऊच झाला होता! इतकी वर्षे गेली.पण त्याच्यात काही बदल नाही.कमळाच्या पानावरील पाण्याच्या थेंबासारखा 'मधू' स्थितप्रज्ञ! संसाराचा कुठलाही त्रास त्याला छळत नाही.
त्याच्या चेहर्यावरचं मंद हास्य कधी ढळत नाही.त्याच्या या तत्वज्ञानामागे कुठला अभ्यास नाही.तो फक्त इयत्ता चौथीपर्यंत शिकलाय असं म्हणतो तेही खरं-खोटं माहित नाही. त्या गावात आमचं घर ना शेती पण असे माणसांचे ऋणानुबंध बांधले आहेत.खूप आठवण आली म्हणून परवा दोन बहिणी, भाऊ व भावजय मुद्दाम त्या गावी जाऊन आले.ते सांगत होते.गावातल्या पिंपळाच्या पारावर नेहमीसारखाच मध्या एकटा बसला होता. आता खूप म्हातारा झालाय.माझ्या बहिणीने विचारलं "कसा आहेस"? तेव्हा तो एकटाच असल्याचं कळलं.तरीही तो मंद हसतच होता.तिने विचारलं, "अरे,तुला आता कोणी नाही.दु:ख वाटत नाही का? कसा जगतोस? सगळे गावात चेष्टा करतात रे तुझी.तुला काही वाटत नाही का रे?" त्यानंतर...
एकच क्षण! केवळ एकच क्षण मधू गंभीर झाला.म्हणाला, "अगं, वासंती,मी माझं आतलं मन कधीच चेहर्यावर आणलं नाही.अगं, जीवन म्हणजे आरामच कसा असेल? आणि नेहमी दु:खच कसं असेल? कडुनिंब आणि गुळ यांच मिश्रण म्हणजे आयुष्य! त्यातून माझं विचारशील तर माझ्यासारख्याचं जीवन म्हणजे रंग नसलेलं चित्र! गावातल्या प्रत्येकाने आपापल्या मनाप्रमाणे त्यात रंग भरले! कोणी मडक्यासह 'पाणक्या' भरला तर कोणी काय..! किरकिरणार्या माणसांनी किरकिरणारे रंग भरले. तुमच्यासारखी माणसं येऊन कधी-कधी आनंदी रंग भरतात.मला आयुष्यातले छान आनंदी रंग आवडतात.त्यामुळे मी नेहमी छान रंगच त्यात भरतो न रडता,न किरकिरता.जीवनाचा मार्ग कोणताही असो,त्याला सामोरं जावंच लागतं ना.त्याला सोडून पळून जाता येत नाही.प्रत्येकाचे मार्ग वेगळे पण देवाने दिलेल्या आपल्या मार्गावरूनच जावं लागतं..माझा हाच मार्ग!"
अशिक्षित मध्याचं हे तत्त्वज्ञान आपल्यासारख्या सुशिक्षितांना कधी कळणार कोण जाणे? बहिणीचे डोळे पाणावले.कारण... मधूने माझी आठवण काढली होती....बाप रे.., म्हणजे मला मध्यादादा विसरला नव्हता...! त्याच दिवशी त्याला माझी खूपच आठवण येत होती,ज्या दिवशी मी ही कथा लिहायला घेतली होती..!
काय म्हणायचा..की,...ऋणानुबंध...!!