हिरवं झाड...कोवळं मन..!
हिरवं झाड...कोवळं मन..!


कधीकधी काही सूचत नाही.किंवा काहीतरी हुरहुर लागून राहते.तसंच आज मला झालं होतं.सकाळची सर्व कामेही जरा लवकर आटोपली.नाष्टा झाल्यावर सहजच पंचांग पहायला घेतलं.पुढच्या महिन्यात काय आहे हे उत्सुकतेने पहात असताना पंचवीस तारखेवर नजर गेली.श्री.भैरवनाथ रथयात्रा..! आणि मला लहानपणीच्या आठवणी येऊ लागल्या.ज्या गावात मी लहानाची मोठी झाले त्या गावची म्हणजे म्हासुर्णे,ता.खटाव.जि.सातारा येथील श्री.भैरवनाथ रथयात्रा असा उल्लेख होता.या सर्व आठवणींना उजाळा देत असताना मला चार-सहा महिन्यापूर्वीची आठवण आली.आम्ही कुटुंबिय श्रेत्र गोंदवले येथे गेलो होतो.त्यावेळी एक दिवस मुक्काम करून दुसरे दिवशी सकाळी लवकर उठून, आवरून आरती व प्रसाद घ्यायला मुख्य मंडपात गेलो.आम्ही प्रसाद घेऊन निघणार एवढ्यातच मला कोणी तरी रेखा...रेखा...अशी हाक मारत होतं.मी वळून पहाताच एक ऐशी-पंच्याऐंशी वयाच्या काकू 'अगं, "मी म्हासुर्ण्याची...श्याम व सुंदरीची आई"...असं म्हणाल्या व मला जवळ येऊन चक्क मिठीच मारली.मी काहीशी गोंधळले...
परंतु प्रसंगावधान राखत माझे पतीच म्हणाले अगं,तू तर सतत म्हासुर्ण्याची आठवण काढत असतेस ना..बघ तरी त्या काय म्हणतायत.. सांगतायत...पण माझ्या स्मृतीची पाटी कोरीच!
त्यावेळी...मला आतून असं काहीच वाटत नव्हतं.आणि वाटणार तरी कसं मी तेव्हा खूप लहान होते.म्हणजे त्यांच्या वाड्यात असताना चार-पाच वर्षाची असेन.ही भेट जवळ जवळ पन्नास वर्षांनी झालेली.मला पाहून त्यांना खूपच आनंद झाला होता. त्यांचे वयही आता बरेच झाले असेल.तरीही सगळ्या जुन्या घटना, आठवणी त्या भरभरून सांगत होत्या. बोलत होत्या.माझा गोंधळ पाहून त्या मला एकेका प्रसंगाची आठवण करून देत होत्या. माझा मोठा भाऊ म्हणजे एकनाथ उर्फ हरी हा त्यांचा मुलगा श्यामबरोबरचा,माझी बहीण सुमती ही त्यांची मुलगी सुंदरीबरोबरची,त्या दोघांबरोबर तू आमच्या घरी यायचीस.माझ्या हातंचं भाजणीचं थालिपीठ,शेंगदाण्याची चटणी तुला खूप आवडायची.मी केलेलं मेतकूट तू घरी घेऊन जायचीस व वाटी द्यायला विसरायचीस. मी पुन्हा काही केलंय का बघायला यायचीस. आपल्या गावात नृसिंह जयंतीला आपण गव्हाची खीर करायचो.मोठ्या पारावर पंगती वाढायचो इत्यादी.
पण माझ्यादृष्टीने जुन्या खुणा आठवत नव्हत्या.त्या पुर्ण धुसर झाल्या होत्या.आज सर्व हळूहळू आठवत होतं.पण...
आता खंत वाटू लागली की,काकू एवढ्या वयस्कर झाल्या तरी त्यांच्या स्मृतीचं हिरवं झाड अजूनही तसंच टवटवीत होतं. त्यांच्या घरात मी खेळले होते.बागडले होते.कधी काळी त्यांनी मला दिवसभर सांभाळले होते. मायेने,प्रेमाने खाऊ-पिऊ घातले होते.त्यावेळी माझा त्यांना लळा लागला होता.तो त्यांनी आजतागायत मनाच्या कोपर्यात साठवून ठेवला होता.कारण त्या त्या वळणावर माझेही सूर त्यांच्याशी जुळले असतील.मी तेव्हा त्यांची लाडकी असेन.त्यांनी माझं बालपण अजूनही मनात साठवून ठेवलं..! मला भेटण्याची आस त्यांना लागली असेल. म्हणून तर गोंदवलेकर महाराजांनी आमची भेट घडवून आणली होती.
आत्ता मला हळू-हळू ते गाव,त्याचं वेड,तिथली मंदिरे,ओढा,शाळा,पाणंद,घाणेपट्टी, आजूबाजूचा सर्व परिसर असं सारं सारं आठवलं....पण...त्या भेटीमध्येच..नेमक्या काकूच कशा आठवेनाश्या झाल्या हा गोंधळ मनात चैन पडू देईना.कालांतराने शिक्षण,संसार,नोकरी निमित्ताने गाव सुटले. आपापल्या धावपळीच्या जीवनात त्या सर्व आठवणी धुसर होत गेल्या.खुणा मिटत गेल्या.गावापासून खूप दूर झालो.पण काकूंच्या त्या पन्नास-बावन्न वर्षाच्या भेटीनंतरही आज ते अंतर संपलं..! त्यांनी मला बरोबर ओळखलं होतं..इतक्या वर्षात भेटीगाठी नसताना,संवाद नसताना मागच्या पानावरून पुढे चालू...इतक्या सहजपणे काकूंनी मला ओळखलं,याचं मला नवल वाटलं.
आम्हां सर्वांची चौकशी केली होती.माई, भाऊ म्हणजे माझे आई-बाबा कसे आहेत हेही विचारलं पण ते आता हयात नाहीत हे ऐकून खूप हळहळल्या होत्या.वय वाढलं तसे नवीन अनुभव येत गेले.जुन्या अनुभवाबद्दल नव्याने विचार करायला लागल्यावर आता वाटू लागलं की, मी काकूंशी असं वागायला नको होतं. निदान त्यावेळेपुरतं तरी...त्यांच्या समाधानासाठी तरी... पण माझी तरी काय चूक? घटना,प्रसंगांना अर्धशतकाचा काळ लोटला होता.आता परत त्यांची भेट होईल की नाही...काही गोष्टी,व्यक्ती मात्र जुने हिरवेपण अंगावर लेवून वावरत असतात.जिव्हाळा असतो.प्रेम असतं.ते चिरंतन असतं.खरंच... मनाच्या रहस्याची उकल होत नाही.
आई-वडिल शिक्षकी पेशातील असल्याने अनेक गावे फिरले.घरं बदलली.सगळंच कसं लक्षात राहणार..? जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासूनच आठवत होतं.मी काकूंच्या मनाची वेळीच दखल घ्यायला हवी होती.तसा मी प्रयत्न केलाही...काकूंचं वय बरंच झालं होतं, पण...त्यांच्या मनाचं झाड अजूनही वठलेले नव्हते. मी हसण्याचा प्रयत्न तरी केला होता. तेव्हा निघताना काकूंनी म्हासुर्ण्याला आवर्जून वेळ काढून येच.तिथे आता तुझे कोणी नाही असं म्हणू नकोस गं..वाडा,घर,तुझेच आहे.चार दिवस रहायलाच ये.
मी यांना म्हणाले,काकूंसाठी वेळ द्यायला हवा.त्यांच्या मनाचं हिरवेपण टिकावं म्हणून तरी माझ्या त्यावेळच्या कोवळ्या मनाला मी काकूंच्या आनंदासाठी विसरायला काय हरकत आहे?
त्या हिरव्या झाडामुळेच, मी आज इथे आहे....त्या नात्यातला गर्दपणा काकूंनी अजूनही टिकवून ठेवला आहे...मी ही प्रयत्न करेन... नक्कीच...! सर्व व्यापातून वेळ काढून त्या हिरव्या झाडाजवळ....माझं त्याचवेळचं कोवळं मन पुन्हा घेऊन जाईन....!
तुम्हांलाही सांगेन हं परत आल्यावर...नक्की!