Pradnya Ghodke

Tragedy

4.2  

Pradnya Ghodke

Tragedy

अस्तित्व

अस्तित्व

3 mins
447


    आज रविवारची सुट्टी असल्याने मी माॅलमध्ये खरेदीसाठी गेले. खरेदी करून बाहेर पडत असताना अचानक एक २४-२५ वर्षाचा तरूण समोर आला.मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले आणि पहातच राहिले! तसाच चेहरा,केसातही तशीच रूपेरी चमक,डोळ्यांतही तीच उत्सुकता.हुबेहुब अनिकेतची दुसरी छबीच! हा आभास असावा म्हणून झटकन रस्त्यावर येऊन रिक्षा करून घरी आले ते मनाच्या कोपर्‍यातल्या बंद आठवणींचा पसारा घेऊनच! हाॅलमध्ये बसले. पाणी प्यायले. समोर मोरपिस दिसलं. त्याच्यातला हिरवट-निळ्या रंगाचा गर्दपणा मला भूतकाळात घेऊन गेला.मनात आलेल्या सगळ्याच आठवणी गोड नसतात.काही आबंट,कडूही असतात.पण त्या जुन्या झाल्या की त्यांची अशी मोरपिसं होतात मनात.आणि मन सैलावलं की हळूच त्यांचा आभास होतो.मग भासात येऊन त्यांचा धांडोळा घ्यायचा... इतकच उरत हातात!


काही भासच कधी आभास होऊन मन तजेलदार करतात तर कधी छळतातही असे समोर येऊन! आत्ता माझ्या मनात अनिकेतच्या आठवणींचं मोरपीस आलं.त्याच्याच विचारात सगळी कामे पटपट आटोपली.रात्र जशी होऊ लागली तशी मनाची सैरभैरता वाढू लागली.मनात अनेक विचारांचं वादळ उठलं.जणू स्वअस्तित्वच झाकाळून चाललंय असं वाटू लागलं.सगळीकडे सामसूम होऊन मध्यरात्रही झाली.अंधार वाढत होता.माझे मात्र क्षणक्षण पाझरत होते.काही केल्या झोप येईना म्हणून बाहेर गच्चीत येऊन उभी राहिले.

   

अचानक माझ्याच घराबाहेर रिक्षा थांबली.एवढ्या रात्री कोण आलं असावं याचा विचार करत समोर पाहिलं...तर...तो! तो खाली उतरला.रस्त्यावरील दिव्याच्या प्रकाशात मी डोळे विस्फारून बघितले! माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना.हा आभास की स्वप्न तर नाही ना! तोपर्यंत अनिकेत फाटकाबाहेर उभा! माझा पहिला प्रियकर! माझं पहिलं प्रेम! जे माणसानं कधीच करू नये.सफल झालं तर ठीक अन्यथा जगणंच बोथट होतं. क्षणभरात त्याला बघून मी मोहरले! असंख्य प्राजक्तफुलांचा सडा अंगावर पडल्याचा भास झाला!

   'अनि,तू? इथे कसा? इतक्या वर्षांनी? आता का आलास? माझा पत्ता कुणी दिला तुला?....

अनामिक भितीनं मी विचारत होते.

'किती प्रश्न विचारशील एकावेळी? अगदी होतीस

तशीच आहेस अजूनही... अधिर,हळवी'...

'म्हणूनच सांग लवकर' मी.

पहायला आलो तुला.त्या अपघातानंतर तुझं काहीच कळलं नाही.तो माझ्या डोळ्यात बघत बोलत होता.मीही त्याच्याकडेच बघत होते.तेच डोळे,तीच धाटणी,तेच नवल,तीच जीवघेणी ओढ!

सारं काही तेच! अडीच तपापूर्वी अनुभवलेलं.तो बोलत होता.मी ऐकत होते.आठवणी नसत्या तर माणसाचं आयुष्य वैराण वाळवंट झालं असतं.आठवणी!,

क्षणात भिजून क्षणात कोरडं करणार्‍या, क्षणात काळीज पोखरणार्‍या,हुरहुर वाढवणार्‍या व्यर्थ आठवणी! सारं आयुष्य

जगलो तुझ्या आठवणींच्या

पसार्‍यात.मरणही आलं ते तुझ्यासमोर! तुझ्या आठवणींना

उराशी कवटाळून.तुला वाचवण्यासाठी खिडकीबाहेर ढकलून दिलं.सांग कोणती आठवण देऊ तुला?...


   आता मात्र माझं डोकं गरगरायला लागलं.हा खरंच आलाय की मला आभास होतोय!...एवढ्यात हे चहा घेऊन बाहेर आले.आता आराम करा.सकाळ आपलीच आहे. म्हणून त्याची सोय केली. मी माझ्या खोलीत जाऊन पडले पण विचारांचे मोहोळ झोपू देईना.

'झोप येत नाही ना?' यांनी विचारले.

'अनिकेतला कसे ओळखता तुम्ही?' मी धाडस करून विचारलं.तसे हे स्वभावाने हळवे,प्रेमळ,शांत.मी सैरभैर

झाले की मला शांत करण्याची जादू बरोबर असायची यांच्याकडे.

'अनिकेतला नाही पण तुझ्या बोलण्यातून त्या अपघाताचं ऐकलं तेव्हा त्याचं तुझ्या काळजातलं स्थान त्याच दिवशी

कळालं होतं मला'...तूही खूप लिहायचीस ना लेख,कथा,कविता ज्या प्रसिध्दही व्हायच्या.मी वाचायचो बरं..त्याचीच तर प्रेरणा ही.तुम्ही लग्न का केलं नाही?'

 'तुम्हाला कसं सांगू माझ्या मनात तसं काही नव्हतं.मित्र- मैत्रिणींच्या आठवणींवर लिहिते इतकच! त्याचं माझ्यावर प्रेम असेलही पण ते एकतर्फी... माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले... आणि हो,कारण विचाराल तर उत्तरासाठी स्त्रीचाच जन्म घ्यावा लागेल

 तुम्हाला!' मी.

'त्यानं अगोदरच तुझ्या आयुष्यात यायला हवं होतं.' यांच्या बोलण्यानं मी थबकून गेले. अनुत्तरीत होऊन कधी डोळा लागला कळले नाही.


   सकाळी दारात पत्ता विचारत एक मुलगा आला. मी त्याला पाहिले मात्र... तेच डोळे, तीच छबी,तसेच केस,डोळ्यात तीच उत्सुकता... त्याला पाहून माझं डोक गरगरायला लागलं.हातात असलेला कागद दाखवून पत्ता विचारत होता अन मी सैरभैर होऊन घरभर अनिकेतला शोधून बाहेर आले!.

'तुला कुणी दिला हा पत्ता?'

'मॅडम,आई लहानपणीच वारली.वडिल एका अपघातात गेले.आता नोकरीशिवाय काही नाही माझ्याकडे.ज्या ठिकाणी नोकरीसाठी बोलावणे आलेय तिथे तुम्हीच मुलाखत घेणार आहात असे आणि हा पत्ता लिहिलेला कागद बाबांच्या फोटोजवळ ठेवलेला दिसला म्हणून आलो शोधत.आजच मुलाखत आहे.

'नाव काय रे तुझं?'मी विचारले.

'सुमीत'...ऐकताच माझी सारी मतीच खुंटली! (माझे जुने नाव सुरेखातला 'सु' अनिकेत मधला शेवटचा 'त'..मध्ये मी..!)

सारं काही समजलं...रात्रभर छळत होता तो आभास हा....!

'मॅडम,मला नोकरी मिळेल का हो?' त्याच्या प्रश्नानं भानावर येत मी म्हणाले,'नक्की मिळेल बेटा' असे म्हणताच तो लगेच निघून गेलाही.

मी आत आले तर अहो माझ्याकडे पाहून हसे लागले.. मी क्षणभर गोंधळले.पुन्हा गच्चीत आले आणि पाहिलं आकाशात एक तारा चमकून गेला! आणि मला झालेला आभास छळू लागला...

  अनिकेतचं माझ्या जीवनातलं अस्तित्व या आठवणीतल्या क्षणांनीच जाणवलं पहिल्यांदा.....! 


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy