शांती शांती शांती:
शांती शांती शांती:
" निता, आज नवरात्राची दुसरी माळ आहे. देवीला आज आपण पांढरा शुभ्र मोगरा अर्पण करू आणि शेवंतीची माळ वाहू. तू आपल्या अंगणातली फुलं आणतेस का तोडून ? मी हार करून देते तिला बसल्या
बसल्या "
निता : हो आई , आणते मी तोडून.
आज्जी , काल आईने देवीला ऑरेंज कलरच्या फुलांची माळ घातली होती. मग आज व्हाईट का ?
७ वर्षांची स्नेहा आपल्या आजीला मंगलाताईंना विचारत होती
निता : आई , मी फुलं घेऊन येते तोपर्यंत तुम्ही स्नेहाला पांढऱ्या रंगाचं महत्त्व सांगा. असं म्हणून निता बागेत फुलं आणायला गेली.
स्नेहा : आज्जी , काय महत्त्व आहे ग पांढऱ्या रंगाचं ?
मंगलाताई : स्नेहा , अगं पांढरा रंग हा शांततेचं, तुमच्या भाषेत पीसचं प्रतीक म्हणजे सिम्बॉल आहे. कारण आपण व्हाईट कलर पाहिला ना की कसं आपल्या डोळ्यांना शांत वाटतं. पांढरे ढग , पांढरा कॅनव्हास पांढरी रांगोळी हे कसे बघायला छान वाटतात !
स्नेहा : पण आज्जी , पांढरा रंग शांतता देतो म्हणजे नक्की काय करतो ?
मंगलाताई : स्नेहा , पूर्वीच्या काळी किनई आपल्या देशात खूप मोठेमोठे राजे महाराजे म्हणजे किंग यांचं राज्य होतं. आपण कसं आपल्या घरात राहतो तसे हे राजेदेखील त्यांच्या महालात राहायचे. खुप मोठ्ठे मोठ्ठे राजवाडे होते त्यांचे आणि भरपूर संपत्ती सुद्धा !
स्नेहा : संपत्ती ??
मंगलाताई : अं....संपत्ती म्हणजे...वेल्थ... जसं की सोनं, चांदी, हिरे... डायमंड, खूप कॉस्टली कपडे असायचे त्यांचे..त्यामुळे दुसऱ्या राजांना वाटायचं की आता ह्यांच्या राज्यावर आपण कब्जा करायला पाहिजे. मग एक राजा दुसऱ्या राजावर अटॅक करायचा आणि खूप दिवस त्यांचं युद्ध चालत राहायचं.
स्नेहा : युद्ध म्हणजे फायटिंग ना ?
मंगलाताई : हो ग माझी राणी...तर ही फायटिंग करून करून दोन्ही राजांचे सैनिक थकले की मग दोन्ही राजे आपापल्या बाजूने पांढरा झेंडा फडकवायचे.
स्नेहा : मींस ?
मंगलाताई : मींस....दोन्ही राजांना आता युध्य थांबवून शांतता हवी आहे. कारण युध्दात अनेक सैनिक जखमी व्हायचे ,काही मारले जायचे आणि म्हणून हे सगळं बंद करू याचं प्रतीक म्हणून पांढरा रंग...
स्नेहा : ओके ! आज्जी , हे तर मला माहितीच नव्हतं ग ....
मंगलाताई : अजून एक गंमत आहे बघ ! आपल्या इंडियाचा जो तिरंगा आहे ना , म्हणजे फ्लॅग, त्यात पण पांढरा रंग आहे. त्याचं कारण असं की ब्रिटिश लोकांविरुद्ध आपली जी फ्रीडम फाईट होती ना ,तू संपल्यानंतर सगळीकडे शांतता झाली म्हणून हा पांढरा रंग आपल्या तिरंग्यात आहे.
स्नेहा : आणि आज्जी , आमच्या स्कूल मध्ये जो गॉडेस सरस्वतीचा फोटो आहे ती सुद्धा पांढरी साडी नेसलेली आहे.
मंगलाताई : कारण सरस्वती ही बुद्धीची देवता आहे , आपल्याला बुद्धी देणारी आहे. स्नेहा , जो बुद्धिमान असतो ना, तो मनुष्य शांत असतो. तो उगाच कुणालाही त्रास देत नाही.
स्नेहा : आज्जी , तू सुद्धा कुणालाही त्रास देत नाहीस. म्हणजे तू पण बुद्धिमान आहे ना ! आणि म्हणून तू नेहमी पांढरी साडी नेसते का ?
मंगलाताई : (कौतुकाने हसून) पिल्लू ,तुझे आजोबा देवबाप्पा कडे गेले ना आणि ज्या बाईचा नवरा देवबाप्पा कडे जातो तिने आता इथून पुढे आपलं लाईफ शांतपणे जगावं म्हणून तिने व्हाईट साडी नेसायची असते. विधवा स्त्रीचं आयुष्य हे पांढऱ्या रांगोळी सारखं असतं...भकास....
" पण त्या भकास आयुष्यात आपल्या प्रेमाचे वेगवेगळे रंग भरायला त्यांच्या मायेची माणसं असतात की जवळ... लेकी सारखी सुन आणि चिवचिवाट करत फिरणारी तुमची लाडकी कोकिळा स्नेहा "
पांढर्याशुभ्र हसऱ्या फुलांची परडी घेऊन दारात उभ्या असलेल्या निताचं बोलणं ऐकून मंगलाताईंनी समाधानाने डोळे टिपले. भरल्या घरात नांदत असलेली ही शांती बघून आणि सुगंधी मोगरा लेवून आज जगदंबा देखील प्रसन्न हसत होती.
