मिशन रेड
मिशन रेड
सलील, काय सारखं त्या मोबाईल आणि लॅपटॉप मध्ये डोकं घालून बसलेला असतोस रे ? कधीतरी अभ्यास पण करावा , घरातल्या लोकांशी बोलावं ते नाहीच.
आपल्या ११ वी मध्ये शिकणाऱ्या लेकाला अजितराव ओरडत होते.
सलील : बाबा , अहो मागच्या वर्षी केली ना मी भरपूर मेहनत आणि मिळवले ना ९०% ? मग आता जरा मी रिलॅक्स झालो ११ वी मध्ये तर काय हरकत आहे ? आणि मी माझ्या एका प्रोजेक्ट वर काम करतो आहे म्हणून सारखं मला मोबाईल लॅपटॉप बघावा लागतो.
अजितराव : प्रोजेक्ट ? कसला प्रोजेक्ट ?
सलील : मी एक शॉर्टफिल्म बनवतो आहे आणि त्याचीच स्क्रिप्ट लिहितो आहे.
अजितराव : शॉर्टफिल्म ??? आणि तू ? ऐकलंस का मेधा ??
हाक ऐकून मेधा म्हणजेच सलीलची आई लगबगीने बाहेर आली.
मेधाताई : काय हो , काय झालं ?
अजितराव : अगं आपला लेक म्हणे एक शॉर्टफिल्म बनवतो आहे..
मेधा : अगं बाई , खरंच?
सलील : हो आई मीच बनवतो आहे आणि स्क्रिप्टही माझीच आहे.
मेधा : तरीच हा रोज पहाटे ५ वाजताच उठून बसतो आणि झपाटल्या सारखा सतत त्या मोबाईल आणि लॅपटॉपवर काम करत बसतो.
अजितराव : पण तुला हे सुचलं कसं ? आणि फायनान्सचं काय ? तुझ्या शिक्षणासाठी ठेवलेले पैसे मी या फिल्म मध्ये नाही खर्च करणार हं सलील
सलील : बाबा , तुम्ही कशाला टेन्शन घेताय एवढं ? तुम्ही मला जो पॉकेटमनी देता तो साठवला आहे मी आणि इतका काही खर्च नाहीये माझ्या शॉर्टफिल्म साठी...
मेधा : अरे पण विषय काय आहे ते तर सांग ,नाव काय ठरवलं आहेस फिल्मचं ?
सलील : आई , पुढचा आठवड्यात आम्ही शूटिंग सुरू करतोय आणि शॉर्टफिल्म असल्याने दोन दिवसांत पूर्ण होईल शूटिंग. मग अनंत चतुर्दशीचा मुहूर्त घेतला आहे आम्ही. सोशल मीडियावर आणि यूट्यूबवर रिलीज होईल आमची फिल्म तेव्हा तुम्ही बघा.. आता मला काम करू द्या बरं तुम्ही दोघे....प्लीज...
अजितराव : बरं बाबा आम्ही जातो आमच्या खोलीत...
आणि अनंत चतुर्दशीला सलीलची शॉर्टफिल्म त्याच्या अपेक्षेप्रमाणे सोशल मीडियावर सर्वत्र प्रदर्शित झाली. सलीलच्या शॉर्टफिल्मचं नाव होतं ' मिशन रेड. ' रेडलाईट एरियामधील म्हणजेच वेश्यांच्या मुलामुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करणाऱ्या नायकाची ती कथा होती. त्यासाठी स्वतः सलीलने ' त्या ' वस्तीत जाऊन शूटिंग केलं होतं आणि मुख्य म्हणजे लघुपटाचा नायक तो स्वतः होता. लाल रंग ज्याला आपण क्रोध , ध्यास आणि अग्नीचं प्रतीक मानतो तोच लाल रंग लेवून ज्या वस्तीत असंख्य स्त्रिया आपल्या आणि आपल्या पोटी जन्मलेल्या लेकरांच्या जिवंत राहण्याचा ध्यास घेऊन, आपल्या लेकींवर कुदृष्टी टाकणाऱ्यावर क्रोधाग्नी बसवून नशिबाचे फासे आयुष्यभर नेटाने खेळत राहतात त्यांच्या मुलांच्या पुनर्वसनाचा ध्यास घेतलेला ' कैवल्य ' सलीलने उत्तम रंगवला होता. इतक्या लहान वयात लेकाची ही धडाडी आणि हिम्मत पाहून मुग्धा - अजितरावांना आभाळ ठेंगणे झाले होते. सर्वत्र सलीलच्या ' मिशन रेड ' ची खूप प्रशंसा झाली. अगदी ' त्या ' स्त्रियांचे देखील, आपली ही व्यथा लघुपटातून मांडली म्हणून सलीलला कौतुकाचे आणि भरभरून आशिर्वादाचे फोन येऊन गेले. कौतुकाचे हे हार तुरे आनंदाने पेलून सलील आता आपल्या अभ्यासात गुंतून गेला.
दिवस भराभर सरले. मोठ्या उत्साहात अजितराव आणि मुग्धाताईंनी आपल्या घरात घटस्थापना केली होती. आज दुसरा दिवस लाल रंग म्हणून जास्वंदीच्या फुलांची माळ करत मुग्धाताई बैठकीत बसल्या होत्या. तितक्यात सलीलचा फोन वाजला.
सलील : हॅलो...हो मी सलील देशपांडेच बोलतोय....नमस्कार सर.....हो हो माझीच शॉर्टफिल्म आहे ती..... काsssय ??? खरंच ???? सर.... थँक्यू वेरी मच सर.....अं..हो हो मी..मी मी सगळे डॉक्युमेंट घेऊन येतो उद्या मंत्रालयात.....थँक्यू , थँक्यू सो मच सर.... बाबा...बाबा...
मुग्धा ताई : अरे सलील काय झालं ? काय किंचाळतोस काय असा ?
तेवढ्यात अजितराव आले...
सलील : आई बाबा , एक अतिशय मोठ्ठी गुड न्युज आहे....आताच मला सांस्कृतिक मंत्रालयातून फोन आला होता. आई, अगं माझ्या मिशन रेड या शॉर्टफिल्मला राज्य सरकारचा सगळ्यात उत्कृष्ट लघुपट म्हणून विशेष पुरस्कार मिळाला आहे. ५०,००० /- रुपये रोख आणि प्रमाणपत्र...मला माझे डॉक्युमेंट घेऊन बोलावलं आहे त्यांनी उद्या.
अजितराव : काय सांगतोस काय सलील ? खरंच ? अरे केवढा मोठा पल्ला गाठलास रे आत्ताच ?
मुग्धाताई : जगदंबे , तुझे उपकार कसे मानू गं आई ? तुझ्या आशीर्वादामुळेच हे घडून आलं आहे. आज दुसऱ्या माळेला, ध्यासाचा प्रतीक लाल रंग असताना माझ्या लेकाच्या ध्यासाला तू सर्वमान्यता मिळवून दिलीस....घे , सलील, आज ही लाल जास्वंदीची माळ तूच अर्पण कर देवीला....
आपलं पॅशन, आपला ध्यास प्रत्यक्षात उतरवणाऱ्या मिशन रेड द्वारे जनजागृती करणाऱ्या सलीलला आता आपला मार्ग अचूक सापडला होता.
