चैतन्याचा नारंग
चैतन्याचा नारंग
आज बावडेकरांच्या घरात पहाटेपासूनच सनईचे मंगल सुर निनादत होते. अंगणात रेखलेली मनोरम रांगोळी , दार - खिडक्यांना लावलेली आंबा - झेंडूची तोरणे , उदबत्त्यांचा घमघमाट या सगळ्यांमुळे जणू स्वर्गलोक भूमीवर अवतरला आहे की काय असेच वाटत होते. या सगळ्या सोपस्कारांचे निमित्त होते आज बावडेकरांच्या घरी होणाऱ्या घटस्थापनेचे.
दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्र , कुमारिका पूजन - भोजन , अष्टमी होम आणि दसरा साजरे करणारे बावडेकर कुटुंबीय यंदा मात्र म्हणाव्या तेवढ्या उत्साहात नव्हते आणि त्याला कारण म्हणजे बावडेकर कुटुंबाचा एकुलता एक लेक स्वप्नील आज त्यांच्यासोबत नव्हता.
पुष्करराव : " उर्मिला , झाली का सगळी तयारी ? गुरुजी येतीलच थोड्या वेळात आणि हो , तुलाही माझ्यासोबत पुण्याहवाचनाला बसायचं आहे म्हटलं , लक्षात आहे ना ?
"उर्मिलाताई : इतकी वर्ष घट बसवतो आहोत आपण , मला नवीन आहे का ते ? सगळी तयारी झाली आहे पूजेची. मीही तयार आहे....पण....
पुष्करराव : पण काय ???
उर्मिला : पण मन तयार नाहीये हो....माझा....माझा स्वप्नील घरातून निघून गेल्याला आज ६ महिने झाले आहेत. पण इतक्या महिन्यांत त्याचा काहीच संपर्क नाही...
पुष्करराव : हं....संपर्क करायला तोंड पाहिजे ना त्याला...एक साधी परीक्षा पास होता येत नाही त्याला ? त्याचाच मित्र तो राघव , तो पासही झाला आणि चांगल्या पोस्टवर जॉईन देखील झाला आणि हा बसलाय अजून आहे तिथेच. कुठे गेले महाशय कुणास ठाऊक !
सई : अहो बाबा ,एमपीएससीची परीक्षा आहे ती , शाळेची सोपी परीक्षा आहे का लगेच पास व्हायला ? दादाने तीन वर्षापासून केवढी मेहनत केली आहे ही परीक्षा क्रॅक करण्यासाठी ? आणि प्रत्येकाची बुद्धी आणि भाग्य वेगळं असतं. त्यामुळे राघवला यश मिळालं.
उर्मिला : सलग दोन वर्षे एमपीएससीची परीक्षा अनुत्तीर्ण होत आला होता तो..त्याला समजून घेण्याचं सोडून त्याच्या अपयशावरुन त्याला ताडताड बोलून घेतलं तुम्ही. म्हणूनच तो घर सोडून गेला. त्यालाही मिळालंच असतं ना यश ?
पुष्करराव : कधी ? तो म्हातारा झाल्यानंतर....
" नाही......तुमचं म्हातारपण येण्याआधीच ....."
तिघांच्याही नजरा दाराकडे वळल्या. नारंगी रंगाचा कडक इस्त्रीचा शर्ट , पांढरी शुभ्र जीन्स , पायात चकाकत असलेले बुट आणि डोळ्यांना बारीक फ्रेमचा चष्मा असलेला , बावडेकर कुटुंबाचा श्वास असलेला स्वप्नील दारात उभा होता. त्याला असा अचानक आलेला पाहून तिघेही आश्चर्यचकित झाले. तसा स्वप्नील बुट काढून आत आला.
पुष्करराव : स्वप्नील, तू.....असा.....अचानक.....???
स्वप्नील : बाबा , त्यादिवशी आपलं भांडण झालं आणि माझ्या मनात अंगार पेटला... वाटलं , एम कॉम फर्स्ट क्लासमध्ये पास होणाऱ्या मला एमपीएससी परीक्षा पास होता येत नाही ? किती दिवस आपण कुटुंबावर भार म्हणून जगायचं ? आणि म्हणूनच मी दुसऱ्या दिवशी घर सोडून नागपुरला गेलो. तिथे नोकरी धरली. आग ओकणाऱ्या सूर्याचा मारा आणि गोठवणारी थंडी सहन केली , रात्रभर अभ्यास करत असताना मनात केवळ एकच प्रार्थना होती की माझ्या यशाची चमक पाहून माझ्या आईबाबांच्या आणि माझ्या सईच्या डोळ्यात अभिमानाची चमक यायला हवी....आई ,बाबा, सई...मी...मी एमपीएससीची परीक्षा पास झालो आहे मागच्याच महिन्यात आणि या इथेच माझी पोस्टिंग झाली आहे.
पुष्करराव : काय ? खरंच तू परीक्षा पास झालास ? माझ्या कानांवर माझा विश्वासच नाही...स्वप्नील.....काय सांगू तुला मला कित्ती आनंद झाला आहे ते !
सई : पण दादा , तू इतके दिवस का काँटॅक्ट केला नाहीस आम्हाला ?
स्वप्नील : चिमणे , मी ठरवलं होतं की काहीतरी बनून दाखवल्याशिवाय कुणाशीही बोलायचं नाही आणि आजच्या घटस्थापनेच्या मुहूर्तावर ही आनंदाची बातमी मला सगळ्यांना द्यायची होती म्हणून मी हा दिवस निवडला घरी यायला.
हे ऐकलं आणि आतापर्यंत दाटून आलेले नैराश्याचे मळभ दूर होऊन जणू चैतन्याने भरलेला सूर्यप्रकाश सर्वत्र पसरला आहे या भावनेने प्रत्येकाची कांती उजळून निघाली...
उर्मिला : बघा...मी म्हणत नव्हते , माझ्या स्वप्नीलला नक्कीच यश मिळणार , तो नक्कीच मोठ्ठा होणार ? आई जगदंबे , तुझीच सगळी कृपा ग बाई , माझ्या लेकाला परत घरी आणलंस आणि त्याला यश दिलंस...
सई : काँग्रेच्युलेशन्स दादा , आय एम सो प्राउड ऑफ यू...बघा बाबा ,मी म्हटलं होतं ना की दादाने खूप मेहनत केली आहे परीक्षेसाठी म्हणून ?
पुष्करराव : स्वप्नील.....आज माझं एक खूप मोठं स्वप्नं पूर्ण झालं आहे , तुला अधिकारी झालेलं बघायचं...अरे , मी तुला बोलायचो ते काय माझ्या फायद्यासाठी ? तुझं ज्ञान तुला योग्यजागी वापरता यायला हवं ,तुला यश मिळावं म्हणूनच ना ? तुझं कर्तृत्व सिद्ध व्हावं म्हणूनच ना ? पण त्यादिवशी माझ्याकडून जरा जास्तच बोललं गेलं...सॉरी...
स्वप्नील : बाबा , अहो... सॉरी काय ? तुमच्या रागवण्यामुळेच तर आज मी इथपर्यंत येऊन पोचलो आहे....आज मी जे काही आहे ते केवळ तुमच्यामुळेच...आता तुमचं दोघांचं म्हातारपण अगदी सुखात जाईल आणि आपल्या या नकट्या चिमणीचं लग्न अगदी धूमधडाक्यात होईल हा शब्द आहे माझा तुम्हाला...
उर्मिला : आज नवरात्राच्या पहिल्या माळेलाच माझा लेक यशस्वी होऊन घरी आला..आजचा पहिला रंग नारंगी आणि त्या नारंगी रंगाप्रमाणेच स्वप्नील चैतन्य आणि ऊर्जा घेऊन आला म्हणून आज मी जगदंबेला आपल्या अंगणातील अबोलीची माळ अर्पण करणार आहे.
पुष्करराव : आणि मीही तू मला वाढदिवसाला दिलेलं नारंगी सोवळ नेसणार आहे. जेणेकरून आपला लेक घरी परत आला आणि तुझ्यासोबत अजून एकदा घटस्थापना करताना मलाही तीच ऊर्जा मिळावी म्हणून....
बावडेकरांच्या घरात यंदा जगदंबा यशाची एक नवी ऊर्जा , आनंदाची एक नवी चमक आणि अलोट प्रेमाचं नवीन ज्ञान घेऊन विराजमान झाली होती.
