मनी नाचती मोरपंखी मोर
मनी नाचती मोरपंखी मोर
" मयुरी, तुझ्या यादीप्रमाणे सगळं सामान आलं का नवरात्राचं ? नाहीतर हे राहिलं ते राहिलं करत मला परत गाडी काढायला लावशील. आत्ताच काय ते बघून घे आणि सांग "
"हो रे शिरीष , सगळं सामान बरोबर घेतलं आहे आपण. आता फक्त जाताजाता मस्त ताजी झेंडूची फुलं आणि गजरे घ्यायचे आहेत आपल्याला."
हं...आणि हे बघ,नवरात्र आलंय म्हणून अंगात देवी संचारल्यासारखी सटासट कामं उपसू नकोस. मागच्या वर्षी तुझंच बीपी लो झालं होतं. त्यामुळे हळूहळू जमेल तशी कामं करायची. देवी काही म्हणत नाही हे असंच कर आणि तसंच कर.. श्रध्देने जे करू आपण ते देवी स्वीकारते....कळलं का ?
शिरीषने बाजूला पाहिलं तर मयुरी कुठेच नाही ! घाबरलाच तो !
"अरे ही कुठे गेली आता ? म्हणजे केव्हापासून मी एकटाच बडबडतोय ? अरे यार , आता एवढ्या गर्दीत कुठे शोधू हिला , फोन पण घरीच विसरली वेंधळी..."
असं बोलून शिरीष आला त्याच रस्त्याने पुन्हा हळूहळू मागे जाऊ लागला. बरीच पावलं पुढे चालल्यावर त्याला मयुरी एका दुकानासमोर उभी दिसली. तिला पाहताच त्याच्या जिवात जीव आला.
" काय ग ए ?? असं रस्त्यातच थांबायचं असतं का ? किती घाबरलो होतो मी ! काय करतेस इथे तू ?"
"शिरीष , ती मोरपंखी पैठणी बघ ना,कसली सुंदर आहे ना ! मला मोरपंखी रंग जाम आवडतो. तो नेसला की जणू मनात थुईथुई आनंदाचे मोरच नाचतात तिच्यावर केलेली कलाकुसर,तिचा पदर आणि सुंदर भरीव काठ कसले मस्त दिसतायेत आणि ते बघ,साडी सोबत मॅचींग ज्वेलरी पण ते फ्री देतायत....."
"तुला आवडली आहे ना , मग चल घेऊन टाकू..."
"अरे...ती....१५०००/- ची आहे...."
१५००० ऐकताच शिरीष जरा थबकला.
"पं.... पंधरा हजार ??? बापरे ! एवढं तर आपल्या फ्लॅटचा हफ्ता जातो. अं.....पण आपण एखादी कमी रेटची दुसरी मोरपंखी साडी घेऊ तुझ्याकरता..."
" अरे , नको अरे....मी फक्त तुला दाखवली साडी...घ्यायची थोडीच आहे मला....चल , घरी जाऊ आपण उशीर होतोय आणि परत सगळी तयारी करायची आहे ,चल चल....."
मयुरी घरी यायला निघाली खरी पण तिच्या मनात ती मोरपंखी पैठणी खरंच भरली होती. नवरात्रीचा बाजार करायला जाताना अखंड बडबडत असलेली ती घरी येताना मात्र अगदीच शांत झाली होती. मनातल्या मनात तिने आतापर्यंत कितीतरी वेळेस ती पैठणी नेसून स्वतःला आरशात पाहिले होते आणि स्वतःचीच दृष्ट काढली होती. घरी आल्यावर शिरीष तिला म्हणाला ,
मयु ,तुला खरंच ती पैठणी आवडली आहे ना ? गाडीवर पण तू त्याचाच विचार करत होतीस माहितीये मला....
ह्यावर चिन्मय , म्हणजे शिरीष आणि मयूरीचा मॅनेजमेंट शिकत असलेला लेक म्हणाला ,
"पैठणी ? कुठे ग आई ? घ्यायची ना मग ! "
"अरे ते लावण्य दुकान नाही का मारुती चौकात, तिथे बाहेर लावली होती त्यांनी. खूप छान पैठणी होती. पण चिनू,अरे...एखादी गोष्ट आवडणं आणि प्रत्यक्षात ती मिळणं ह्यात खूप अंतर आहे रे...आपले खर्च काय कमी आहेत का ? फ्लॅटचा हफ्ता,तुझं शिक्षण, सणवार सगळंच पाहावं लागतं आपल्याला. आणि १५००० ची पैठणी नेसून मी जाऊ कुठे ? आता आपल्या जवळची लग्नकार्य पण राहिली नाहीत. नाही म्हणायला माझ्या बुटिकमधून बऱ्यापैकी पैसे मिळतात पण तेही घरखर्चाला वापरतो आपण...जाऊ दे...नंतर घेऊ कधीतरी पैठणी. सध्या तुझं शिक्षण महत्वाचं."
मयुरी नको म्हणत असली तरी तिच्या देहबोलीतून मात्र शिरीषला तिला वाटत असणारी पैठणीची आस दिसत होती,जाणवत होती. पूजेसाठी आणलेल्या मोरपंखांवरून मयुरी येताजाता हात फिरवत होती. पण शिरीषचा हात सध्या आखडता असल्याने त्याची लाख इच्छा असून देखील तो मयुरीसाठी पैठणी घेऊ शकत नव्हता.
अशातच घटस्थापनेचा दिवस उजाडला. पूजेच्या तयारीत मयुरीला पैठणीचा पूर्णपणे विसर पडला. फुलं,हार,नैवेद्य,प्रसाद हे सगळं एकत्र आणून ठेवत असताना तिच्या चेहऱ्यावर कुठेही कालचा मागमूस नव्हता.
"शिरीष , अरे गुरुजी किती वाजता येतायेत ? आणि चिन्मय कुठे आहे केव्हापासून दिसला नाही मला.."
"मलाही ठाऊक नाही ग...मीही कामाच्या नादात त्याच्याकडे लक्षच दिलं नाही..असू दे, येईल तो, आपण बाकीची तयारी करून घेऊ. आज सकाळी वैधृती योग असल्यामुळे गुरुजी दुपारी १२ वाजता येतो असं म्हणाले."
तितक्यात चिन्मय देखील आलाच.
"चिन्मय अरे कुठे गेला होतास तू सकाळपासून ? सगळी तयारी मी आणि आईनेच केली शेवटी..."
सॉरी सॉरी बाबा , मी सांगतो कुठे गेलो होतो ते आणि यापुढची सगळी तयारी मी करेन... आई, मारुती चौकातलं लावण्य दुकान माझ्या मित्राचंच आहे , आयुष देशमुखचं. खुप चांगला मुलगा आहे. आम्ही दोघांनी मिळून कॉम्प्युटरवर काही ट्यून बनवल्या होत्या आणि त्या स्वरानंद म्युझिक क्लासचे कुळकर्णी सर आहेत ना त्यांना ऐकवल्या. त्यांना त्या बेफाम आवडल्या आणि आमच्या सगळ्या धून त्यांनी चक्क २००००/- ला विकत घेतल्या....
शिरीष : काय सांगतोस काय चिनू ? तू संगीत क्षेत्रात कधीपासून काम करायला लागला ?
बाबा , मी आजच्या मुहूर्तावर तुम्हा दोघांना सांगणार होतोच पण परवा पैठणीचा विषय निघाला म्हणून आज हे सांगावं लागलं मला. अहो ,सहजच खेळत बसलो एक दिवस कॉम्युटरवर आणि हे सुचलं मला. आई ,माझ्या पहिल्या कमाईतून तुझ्यासाठी मी तुला आवडलेली मोरपंखी पैठणी घेऊन आलो आहे.
मयुरी : २००००/-??? चिनू , खूप मोठा झालास रे बाळा...अरे पण तुझी पहिली कमाई तुझ्यासाठीच ठेवायचीस ना , तुझ्याच कामाला आली असती ती...
आई , मी असंही माझ्या पहिल्या कमाईतून तुम्हा दोघांसाठी काही घेतलं असतंच की नाही ? आणि माझ्या वाट्याला जे १००००/- आले होते ना त्यातून आयुषने पैठणीचे फक्त ७००० घेतले आणि बाबांसाठी हा मोरपंखी कुर्ता पायजमा त्याच्याकडून भेट म्हणून दिला आहे..
शिरीष - क्या बात है | मॅडम , आता तरी खुश आहात ना ! दुप्पट आनंदाच्या लहरी आल्या आहेत आज आपल्या घरात.. लेकाने बनवली गाणी आणि घरात आली पैठणी
मयुरी : वा वा कवी महोदय ! अरे पण तुझ्यासाठी काय घेतलं तू ??
" मी माझ्यासाठी एक गिटार पसंत करून ठेवली आहे. बाबा , मला ती गिटार सप्तमीला घेऊन द्या म्हणजे त्या गिटारीच्या सप्तसुरांमध्ये मला माझ्याही आयुष्याचे सुर गवसतील."
शिरीष : डन
सर्वत्र उधळला गेलेला हा मोरपंखी रंग प्रत्येकाच्या मनात मग थुईथुई मोर नाचवत राहिला.
