STORYMIRROR

Vaishnavi Kulkarni

Classics

3  

Vaishnavi Kulkarni

Classics

पिवळी प्रफुल्लता

पिवळी प्रफुल्लता

3 mins
123

"आई, ही पिवळी धमक झेंडूची फुलं कसली सुंदर आणि टप्पोरी आहेत ना ग ! प्रत्येक पाकळी कित्ती मस्त खुलली आहे ह्याची , त्याच्याकडे पाहूनच प्रसन्न वाटतं अगदी !"

नवरात्राच्या चौथ्या माळेसाठी झेंडूची माळ बनवता बनवता विशाखा आनंदीताईंना म्हणाली. 


"अगं या सृष्टीत जी काही पानं फुलं आहेत ना ,त्या सगळ्यांनाच बघून मनाची मरगळ झटकली जाते आणि खास आश्विनात उमळणारे हे झेंडू तर खरच खूप सुरेख असतात. रांगोळीची , देव्हाऱ्याची , उंबऱ्याची आणि दाराची शोभा वाढवतात."


विशाखा : आई , हा पिवळा रंग आनंद आणि प्रफुल्लतेचं प्रतीक मानला जातो ना ? 


आनंदीताई : हो तर ! जशी आत्ताच तू ह्या पिवळ्या धमक फुलांना पाहून आनंदी आणि प्रफुल्लित झालीस तशीच. पण त्याच बरोबर पिवळा रंग हा खूप शुभ असतो. म्हणजे बघ ना, लग्नाच्या वेळी वर वधूला हळद लावली जाते ती केवळ एक प्रथा म्हणून नव्हे तर ही पिवळी धमक हळद औषधी आहे म्हणून. लग्नाच्या धावपळीत बऱ्याचदा धड जेवणखाण होत नाही आणि त्यामुळे अंगावर पित्त उठू शकतं. ते होऊ नये म्हणून या बहुगुणी हळदीचा खूप उपयोग होतो. 


विशाखा : आई , सूर्य देखील पिवळा धम्मक आहे की ग आणि त्याचं पिवळं कोवळं ऊन शेतावरची , बांधावरची पिकं किती छान फुलवत असतं ! पावसाळ्यात बेफाम पाऊस झेलून कुडकुडणाऱ्या रोपांना , फुलांना आणि पानांना हे ऊन नवसंजीवनी देतं आणि मग ती सूर्यप्रकाशात कित्ती प्रसन्न हसत उभी असतात ! 


आनंदीताई : हो ना ! ही हसरी डोलती पिकं पाहून आपल्या मनाला आनंद तर होतोच पण आयुष्यात येणाऱ्या प्रश्नांना सामोरं जाऊन कधीतरी कंटाळलेल्या मनाला देखील खूप तरतरी मिळते. 


विशाखा : ए आई , या पिवळ्या रंगावरून मला आठवलं...खंडोबाला हळद का वाहतात ग ? सोन्याची जेजुरी म्हणतात ना तिला...


आनंदीताई अगं त्याची एक आख्यायिका आहे. रात्र असते ना , तर ती कशी असते ? काळी...तर हीच रात्र म्हणे एकदा महादेवांकडे गेली आणि म्हणाली की मला माझा हा काळा रंग अजिबात आवडत नाही तर तुम्ही माझा स्वीकार करा. त्यावर महादेव म्हणाले जेव्हा मी मार्तंड भैरव म्हणून पृथ्वीवर अवतार घेईन तेव्हा तुला माझ्या मस्तकावर धारण करेन. या वरदानामुळे रात्र ही हळद म्हणून पृथ्वीवर आली आणि खंडोबाने तिला आपल्या मस्तकी स्थान दिलं. म्हणून जेजुरीला हळदीचा भंडारा उधळला जातो. असं ऐकलंय बाई मी. 


विशाखा : तू जे म्हणालीस की हळद औषधी आहे त्याचाही मी अनुभव घेतला आहे. कांती उजळण्यासाठी खूप छान आहे हळद. उगाच नाही ती म्हण पडली , पी हळद हो गोरी !


दोघी प्रसन्नतेने हसल्या.


आनंदीताई : हो आणि ही हळद सौभाग्यवती स्त्रियांसाठी तर खूपच महत्वाची आहे. हळदी कुंकवाचा टिळा लावलेली कुठलीही सवाष्ण स्त्री ही रेखीवच दिसते. म्हणून तर देवीच्या चारही शक्तीपीठांमध्ये देवीला हळदीचा मळवट भरून त्यावर कुंकवाची सुंदर नक्षी कोरली जाते. 


विशाखा : हो ना , कित्ती सुंदर दिसतं ते अंबाबाईचं रूप ! आनंद आणि प्रफुल्लता यांचं प्रतीक असावं तर ते म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मीच. ए आई , आपण जाऊया ना ग एकदा कोल्हापूरला , कित्ती वर्ष झाली आपण गेलो नाहिये...


आनंदीताई : तसं मी तुला सांगणार होतेच पण अजून अवकाश आहे म्हणून म्हटलं सांगू नंतर. पण आता तूच बोललीस म्हणून सांगते. दसऱ्यानंतर आपल्याला जायचंच आहे कोल्हापूरला. तुझ्यासाठी दिपू आत्याने कोल्हापूरचं छान स्थळ आणलं आहे. सुसंस्कृत आणि सुस्वभावी माणसं आहेत सगळी. मुलगा देखील छान आहे , महेश. सरकारी नोकरीत आहे. सगळं जुळून आलं की तुला तर मग रोजच महालक्ष्मीची सेवा घडेल...


अतिशय गोड लाजत विशाखा म्हणाली ,

काय ग आई ,तुला बाई फारच माझ्या लग्नाची घाई ! 


तशा आनंदीताई प्रसन्न हसल्या..


बरं आता ही माळ तूच वाहा देवीला आणि प्रार्थना कर.


विशाखाने देवीला पिवळ्या धमक झेंडूची माळ वाहिली आणि भवानीच्या मस्तकावर एक छोटासा झेंडू ठेऊन मनोभावे कल्याणाची प्रार्थना केली. दोघींचे प्रार्थनेसाठी मिटलेले डोळे उघडताच देवीच्या मस्तकावरचं फुलं टपकन खाली पडलं आणि आपलं इप्सित साध्य होणार म्हणून आनंदीताईंनी भरल्या डोळ्यांनी लेकीला कुशीत घेतलं. 



Rate this content
Log in

Similar marathi story from Classics