करडी नजर
करडी नजर
".....तर अशा प्रकारे अतिशय कमी खर्चात आपण आपल्या तालुक्याच्या प्रत्येक गावी नळ कनेक्शन पोचवू शकतो म्हणजे महिलांना बारा महिने चोवीस तास घरातच पाणी मिळेल. हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकत राहावं लागणार नाही त्यांना. "
कॉटनची करड्या रंगाची साडी नेसून प्रेझेंटेशन देणाऱ्या नवनियुक्त तरुण, तडफदार तहसीलदार ऋतुजा बर्वेचं तिथे उपस्थित सगळ्यांनाच खूप कौतुक वाटत होतं. अवघे ३ महिने झाले होते तिला रुजू होऊन पण आपल्या प्रामाणिकपणामुळे आणि झोकून देऊन काम करण्यामुळे लवकरच ती लोकप्रिय झाली होती.
तालुक्यात कायदा सुव्यवस्था राखणे , गुन्हेगारीवर वचक बसवणे , योग्य न्याय करणे याकामी तिचा हातखंडा होता. जनसेवेचा वसा घेतला असला तरी ठकास महाठक या वृत्तीने आणि स्वभावातल्या करडेपणामुळे कितीही बदमाश मनुष्य असू देत , ऋतुजा समोर त्याची शेळी झालीच म्हणून समजा. पण सर्वसामान्य नागरिकांचा आधार होती ऋतुजा आणि म्हणूनच जीवनावश्यक पाण्यासाठी मैलोनमैल वाट तुडवत जाणाऱ्या लेकीबाळी पाहून तिला वाईट वाटायचे. म्हणूनच तिने वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करून तालुक्याच्या प्रत्येक घरात नळ कनेक्शन देण्याचा ध्यास घेतला होता.
ज्यादिवशी प्रत्येक घरात नळ आला तेव्हा गावातल्या कित्येक स्त्रियांनी तिच्यावरून कडाकडा बोटं मोडत तिची दृष्ट काढली होती. त्याच संध्याकाळी ऋतुजाच्या या धडाडीबद्दल जिल्हाधिकार्यांकडून तिचा भव्य सत्कार देखील केला गेला. या समारंभासाठी तिचे आई वडील देखील आले होते. चार चौघांनी उपदेशाचे डोस पाजले तरी लेकीला शिकवून तहसीलदार बनवल्याचा प्रचंड आनंद आज ऋतुजाच्या आईबाबांना होत होता.
समारंभ आटोपून घरी यायला रात्र झाली. ऋतुजा घरी येत नाही तोच तिच्या मागोमाग तिच्या ऑफिसची गाडी तिच्या घरापर्यंत आली.
मॅडम , मॅडम.....
ऋतुजा : दिनकर , काय रे तू इतक्या रात्री ? आणि इतका घाबरलायेस का असा ?
दिनकर : मॅडम , अहो नदीपात्रातुन रेती , वाळूचा उपसा केला जातोय अवैधरित्या..
ऋतुजा : काय ?? तुला कुणी सांगितलं हे ? आणि कोण आहेत ती लोकं ? पोलिस बंदोबस्त नाहीये का तिथे ?
दिनकर : कसला बंदोबस्त मॅडम ? सगळे विकले गेले आहेत पैशाला..दारू पिऊन लोळत पडले आहेत सगळे हवालदार....गावातला श्रीपत त्या बाजूने येत होता तेव्हा त्याने पाहिलं आणि मला सांगत आला घरी तो..
ऋतुजा : बरं....तू....तू थांब , मी आलेच दहा मिनिटांत...
आई : ऋतुजा अगं इतक्या रात्री तू एकटी कुठे जातेस ? पोलिसांना फोन करून पाठव ना तिकडे...
ऋतुजा : आई , आत्ताच ऐकलं ना तू की हवालदार पैसे घेऊन आणि दारू पिऊन लोळत पडले आहेत...मग कशावरून त्या पैशांचा हफ्ता वर पोचला नसेल ? तू काळजी करू नको मी डिपार्टमेंटची माणसं घेऊन जाते.
बाबा : ऋतू , बाळा मी येऊ का तुझ्यासोबत ?
दिनकर : काका अहो तुम्ही टेन्शन नका घेऊ. मी आहे ना मॅडम सोबत. मॅडम मला माझ्या मोठ्या बहिणीच्या जागी आहेत. तुम्ही मावशींजवळ थांबा..
ऋतुजा आत गेली आणि पुढच्या दहाच मिनिटांत आपला ज्युडो कराटेचा ड्रेस घालून आली. तहसीलदार होण्याआधी ती राज्यस्तरीय ज्युडो कराटे चॅम्पियन होती आणि आज आपल्या त्याच कौशल्याचा उपयोग ती अवैध कामं थांबवण्यासाठी करणार होती.
डिपार्टमेंटची काही माणसं घेऊन दिनकर सोबत ती वाळू उपसा होत असलेल्या ठिकाणी दबक्या पावलांनी पोचली. सहा सात जण होते ते आणि भल्यामोठ्या कंदिलांच्या उजेडात हा गोरखधंदा सुरू होता त्यांचा. एका बेसावध क्षणी ऋतुजा त्यांच्या समोर जाऊन उभी राहिली. तिला अशी अचानक आलेली पाहून काही क्षण गुन्हेगार गोंधळून गेले. मग त्यांच्या म्होरक्याकडे वळून ती म्हणाली ,
दाद द्यावी लागेल तुमच्या सगळ्यांच्या हिंमतीची ! खरंच कित्ती पराक्रमी आहात तुम्ही सगळेच. तुम्हाला स्वतःच्या आयुष्याची,जीवाची काही भीती नाही असंच दिसतंय यावरून. नाहीतर माझ्याच गावात माझ्याच नाकाखालून असले काळे धंदे करण्याची हिंमत झालीच नसती तुमची नाही का ? मुकाट्याने वाळू पुन्हा जागच्या जागी ठेवा...आणि निघा इथून...नाहीतर जागच्या जागी तुम्हाला कसं ठेचायचं ह्याची चांगली कल्पना आहे मला...
यावर तो म्होरक्या गडगडाटी हसला आणि म्हणाला ,
बाई,तुम्ही ठेचनार व्हय आम्हाला ? आवो बाईच्या जातीनं कसं घर सांभाळावं , चार भिंतीत राहावं... आमच्या सारख्यांच्या नादाला तर चुकून लागू नये...तुम्ही एवढ्या नाजूक नार, तुमच्यात शक्ती ती किती असनार ? आनी अशी बी बाई दुबळीच अस्ती बघा...जावा , घरला जावा...
ए शंकर्या....हेच नाव आहे ना तुझं ? काय रे ? तुझ्या घरात काय फक्त सगळे पुरुषच आहेत का ? तुला जिने जन्माला घातलं त्या स्त्री मध्ये केवढी शक्ती आहे हे ठाऊक आहे का तुला ? आणि काय रे हरामखोरा , रात्री अंगाखाली झोपायला बाईच लागते ना ,की पुरुषावर काम भागवतोस ?
असं म्हणत तिने एक जोरदार ठोसा त्याच्या नाकावर लगावला. रक्ताची चिळकांडी उडाली त्याच्या नाकातून.
" पाहिलीस बाईची ताकद काय असते ते ?"
अचानक झालेल्या या हल्ल्याने गांगरून गेलेल्या त्याची माणसं हत्यारं घेऊन ऋतुजाकडे धावत निघाली तशी त्या जागेला वेढा घातलेल्या डिपार्टमेंटच्या माणसांनी त्यांच्यावर झडप घातली आणि त्यांना पकडले. ऋतुजाने मात्र समस्त स्त्री जातीचा अपमान करणाऱ्या त्या म्होरक्याला स्वतः एक बाई कायकाय करू शकते हे दाखवायचं ठरवून आणि आपले ज्युडो कराटेचे नैपुण्य वापरून अगदी मेटाकुटीला आणले.
" बाई , आवो बाई... सोडा मला....मला माफी करा...पुन्यांदा न्हाय बोलनार मी असं आन तुमच्या या गावातली वाळू बी नको मला....मी आत्ताच निघून जातो ट्रॅक्टर घेऊन "
" अरे...इतक्यातच थकला ? सरकारी पाहुणचार घेतल्याशिवाय कशी सोडेन मी तुला ?घ्या रे ह्याला आत..."
दुसऱ्या दिवशी ऋतुजाच्या पराक्रमाचे किस्से प्रत्येक वर्तमानपत्रात छापून आले. यावेळी खुद्द आमदार साहेबांनी ऋतुजाचा जिल्ह्याच्या ठिकाणी भव्य सत्कार केला आणि तिच्या या धाडसाचे कौतुक केले. अशी करड्या स्वभावाची , दुष्ट शक्तींना नष्ट करणारी आणि सज्जनांचे रक्षण करणारी लेक आपल्या पोटी जन्माला आली म्हणून ऋतुजाचे आई बाबा भरून पावले होते.
