नीलवर्ण
नीलवर्ण
"अरे योगेश , उद्या जरा बाजारातून केळीचे खांब घेऊन येशील आठवणीने.. परवा घटस्थापना आणि सत्यनारायण आहे ना आपल्याकडे !
"बाबा, कशाला नसता घाट घातलाय तुम्ही हा घटस्थापना आणि सत्यनारायणाचा ? कृष्ण आपलं दैवत म्हणून मलाही तुम्ही त्याचं नाव दिलं पण त्याने मला काय दिलं आजपर्यंत ? स्वतः सोळा हजार एकशे आठ बायका केल्या पण मला एकही मिळू नये ? कसला योगेश मी ? "
तिशीला पोचत आलेला योगेश त्राग्याने विवेकरावांना बोलत होता. तितक्यात आतून त्याची आई सुमनताई आल्या..
" असं बोलू नये रे योगु....अरे प्रत्येकाचे योग असतात हे आणि कृष्णाच्या फक्त ८ पत्नी होत्या सोळा हजार एकशे आठ वगैरे नाही. सोळा हजार एकशे आठ स्त्रियांचं पालकत्व घेतलं होतं त्याने त्या बंदिवसातून मुक्त झाल्यानंतर."
योगेश : जे काय असेल ते , मला इंटरेस्ट नाही त्यात..
खास घटस्थापनेसाठी माहेरी आलेली योगेशची थोरली बहीण योगिता म्हणाली ,
"अरे, योगेश , असा हातपाय गाळू नकोस , तुलाही समजून घेणारी,तुला जपणारी तुझी जीवनसाथी नक्की मिळेल. हां आता तुझ्या बरोबरीच्या सगळ्या मित्रांची लग्न झाली कबूल आहे पण आई म्हणते ते ही बरोबर आहे. तुझा योग उशिरा असेल.
सुमनताई : परवा नवरात्राची पहिली माळ आणि बालाजी नवरात्राचा देखील पहिला दिवस आहे. परवा जगन्माता आणि जगतपिता दोघेही निळ्या रंगांत न्हाऊन निघतील. कृष्ण तर असाही नीलवर्ण आहेच... योगेश , यंदा तू बसायचं आहेस पूजेला आणि तेही निळ्या रंगाचं सोवळं नेसून...
योगेश : ए आई..मला नको घेऊस हं यात...मला कामं आहेत ऑफिसची...
सुमनताई : अरे घे की सुट्टी एक दिवस , लगेच काही तुमची कंपनी बंद नाही होणार. देवाच्या कामाला कुणीही अडवत नाही. मी तर म्हणते तुमच्या सगळ्या स्टाफला देखील बोलाव संध्याकाळी प्रसादाला...
योगेश : बरं ठीक...बोलतो मी बॉससोबत...
रात्री जेवण झाल्यानंतर योगिताची ५ वर्षांची लेक तृप्ती आपल्या आज्जीला म्हणाली ,
" ए आज्जी , कृष्ण बाप्पाला नीलवर्ण का ग म्हणतात ? आणि बायका म्हणजे ? संध्याकाळी मामा काय म्हणत होता ?"
आपल्या नातीची कृष्णाबद्दल चाळवलेली उस्तुकता पाहून सुमनताईंना तिचे खूप कौतुक वाटले. खुदकन हसल्या त्या...
" अगं पिल्लू , कृष्ण म्हणजे कीनई आपले विष्णू बाप्पा आहेत ना त्यांचा अवतार आहेत आणि विष्णू बाप्पा राहतात समुद्रात ,आणि....
" पण आज्जी , आपलं मुंबईचं घर तर समुद्रापासून कित्ती जवळ आहे ! मला कधीच दिसले नाही विष्णू बाप्पा...
तिच्या निरागसतेचं सगळ्यांनाच खूप हसू आलं.
विवेकराव : अगं मनू, विष्णू बाप्पा समुद्राच्या खूप खोल तळाशी राहतात. सगळ्यांनाच नाही दिसत ते. आणि बायका म्हणजे....माझी बायको कोण आहे तर आज्जी आणि तुझ्या बाबांची बायको कोण तर..
तृप्ती : माझी आई...अच्छा , म्हणजे वाइफ...
सुमनताई ( हसून ) हो वाइफ... कृष्णाच्या लाडक्या ८ मुख्य वाईवस होत्या. समुद्राचं पाणी कसं असतं ? निळशार,हो ना ? म्हणूनच विष्णू बाप्पांचा रंग निळा आहे आणि म्हणून त्यांचा अंश असलेला कृष्णही निळा.
तृप्ती : पण पाणी निळंच का असतं ?
सुमनताई : हे बघ. निळा रंग म्हणजे एनर्जीचं प्रतीक आहे. आपण जेव्हा उन्हातून थकून येतो तेव्हा सगळ्यात आधी पाणी पितो कारण उन्हामुळे आपली एनर्जी खर्च झालेली असते आणि पाणी पिऊन आपल्याला ती परत मिळते.
योगेश : पण मग आई , या कृष्णाचं काय ?
विवेकराव : योगेश, आपण जेव्हा संसाराचे ताप झेलून थकतो, प्रॉब्लेम्सना तोंड देऊन थकतो ना , तेव्हा त्या निळ्या कृष्णाकडे पाहून नव्या आव्हानांना झेलायला आपल्याला नवी ऊर्जा मिळते. "कर्मण्ये वा धिकारस्ते मां फलेषु कदाचन " असं कृष्णाने जे गीतेत सांगितलं आहे त्याचंच पालन आपण करायचं.
योगिता : आणि जगदंबा तर साक्षात ऊर्जेचा भलामोठा ऊर्जेचा स्रोतच आहे. तुझा देवावर विश्वास नाही म्हणून तुला या गोष्टी पटणार नाहीत पण एकदा या ऊर्जेच्या निळ्या स्त्रोताला मनोभावे पुजून तर बघ,तुझा फायदाच होईल.
सगळ्यांच्या आग्रहाखातर योगेशने मनोभावे देवीची आणि बालाजीची पूजा आरती केली आणि निळी गोकर्ण माला देवीला अर्पण केली. संध्याकाळी त्याच्या ऑफिसची सगळी मंडळी दर्शनाला आली त्यात त्याचे वरिष्ठ साने साहेब देखील होते. ओळख परीचय झाल्यावर ते विवेकरावांना म्हणाले ,
साने साहेब : आपटे साहेब , गेल्या दोन महिन्यांपासून माझ्या मनात एक गोष्ट होती आणि आजच्या मुहूर्तावर तुम्हाला ती सांगायची असं मी ठरवलं होतं. आमच्या निलाक्षीला तुम्ही तुमची सून करून घ्यावं ही माझी मनापासून इच्छा आहे. आमची एकुलती एक नीलू खूप शांत आणि समजूतदार आहे. खुप प्रेम देईल सगळ्यांना ती..
योगेश तर आ वासून बघतच राहिला. निळ्या पैठणी मधल्या रेखीव निलाक्षीला पाहताक्षणीच योगेशनेच काय पण सगळ्यांनीच तिला योगेशची योगिनी म्हणून पसंत केले. इतकी वर्ष जिची प्रतीक्षा करत होतो ती अशी आपसूक येईल याची पुसटशीही कल्पना नसलेल्या आपटे कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. निळ्या योगेशाला मनोभावे पुजलेल्या योगेशला बालाजीच्या तसबिरी मधून सर्वत्र पसरणाऱ्या ऊर्जेची अनुभूती मिळत होती.
