STORYMIRROR

Vaishnavi Kulkarni

Classics Inspirational

3  

Vaishnavi Kulkarni

Classics Inspirational

हिरवाई आली जीवनी

हिरवाई आली जीवनी

3 mins
78

घटस्थापनेची पूजा सुरू झाली तेव्हा खूप आनंदात असणारी माधवी आणि श्रीरंगची लेक शिवांगी काही वेळानंतर मात्र एकदम गप्प बसली होती. केवळ मूकपणे सगळं बघत होती ती. एरवी घरात चिवचिवाट करणारी , श्रावणी आत्तूच्या मागेमागे फिरणारी शिवांगी एकाएकी  शांत झाली होती आणि तिला तिच्या आजीसोबत बोलायचे होते. पण घरात पाहुणे मंडळीही असल्याने तिची आजी शैलजाताई तिच्याशी धड काही बोलूही शकत नव्हत्या. मग ती एकटीच आईबाबांच्या खोलीत जाऊन रडत बसली. 

तितक्यात शैलजाताई तिला खोलीत जेवायला बोलावण्यासाठी आल्या. 


शैलजाताई : शिवांगी..अगं ए बाळा, अगं काय झालं ग ? तू रडतेस का अशी ? सकाळी तर तू किती खुश होतीस आणि मग आता एकदम गप्प झालीस...कुणी काही बोललं का तुला ? 


शिवांगी : आजी...मी....म्हणजे.... कसं सांगू तुला....


शैलजाताई : घाबरु नकोस बाळा, सांग काय झालं ? 


शिवांगीने आजीच्या कानात सांगितलं आणि शैलजाताईंची चर्या हळूहळू बदलत गेली. अत्यानंदाने तिला घेऊन त्या बाहेर आल्या आणि म्हणाल्या ,


अगं माधवी , श्रावणी, सगळ्यांनी ऐका....आज घटस्थापनेचा इतका पावन दिवस आहे,आपण सगळ्या इतक्या हिरव्यागार दिसतो आहोत आणि आजच आपल्या चिमणीच्या आयुष्यात पण हिरवाई आली आहे... अगं माधवी , आपली शिवांगी आज मोठी झाली आहे. 


हे ऐकलं आणि माधवीच्या डोळ्यांना आनंदाच्या अश्रुधारा लागल्या. सगळीकडे आनंदाची एकच लहर पसरली. सगळ्यात जास्त आनंद झाला असेल तर तो श्रीरंगला. कौतुकाने त्याने आपल्या लेकीला उचलून तिचे पटापट मुके घेतले. 


श्रीरंग : अगं माझी राणी, कित्ती लवकर मोठी झालीस ग तू ! आई , या लेकी इतक्या लवकर का मोठ्या होतात ग ? 


शैलजाताई : कारण श्री, आम्हा बायकांना या सृष्टीकडून सगळीकडे प्रसन्न हिरवाई पसरण्याची जबाबदारी मिळालेली असते आणि ही खूप मोठी जबाबदारी असल्याने लेकी लवकर मोठ्या होतात.


माधवी : पिल्लू ,आज देवीला स्थापन करण्याच्या नादात तुझ्याकडे लक्षच गेलं नाही ग...आता दर महिन्याला तुला हे होणार पण घाबरायच नाही. मी , आत्तु आणि आजी आहोत ना???


शिवांगी आईला बिलगुन रडु लागली...


श्रावणी : शिवू , डोळे पुस बरं...आता मी ना तुला मस्त हिरवा फ्रॉक , हिरव्या बांगड्या घेऊन येईन. आई , पंचमीला आपण आपल्या घरच्या या कुमारिकेची, अय्या आता कुमारिका कसली ? मोठ्ठी झाली ना आमची परी , मग हिच्या ऋतू प्राप्तीचा छान सोहळा करूया आपण. 


शिवांगी : आत्तू पण हिरवाच रंग का ग ?


श्रावणी : अगं हिरवा रंग म्हणजे समृद्धीचं  सृजनशीलतेचं म्हणजे क्रियेटीव्हीटीचं प्रतीक आहे. प्रत्येक शुभ कार्यात हिरव्या रंगाचा वापर केला जातो. हिरव्या पानांना ,हिरव्या गवताला पाहून आपल्याला कित्ती मस्त वाटतं ना तसंच आपल्या आयुष्यात आलेल्या आनंदाच्या हिरवाईला बघून आपल्याला प्रसन्न वाटतं. लग्नात नव्या नवरीला हिरवा शालू नेसवतात, हिरवा चुडा भरतात, देवीची ओटी भरताना तिला देखील हिरवी साडी,हिरव्या बांगड्या अर्पण करतात.


शैलजाताई : आणि शिवू , पाळी सुरू होणं म्हणजे कळीचं रूपांतर फुलात होणं. कळी छोटीशी असते पण फुल कसं मोठ्ठं असतं , तशीच एखाद्या मुलीला मासिक पाळी आली की ती जबाबदार होते , स्वतःच्या शरीराची काळजी घेऊ लागते आणि पुढे जाऊन तिचं लग्न झाल्यानंतर ती बाळाला जन्म देण्यासाठी सक्षम होते. खरं पाहिलं तर पाळी येणं म्हणजे स्त्री पूर्ण होणं आणि याच पूर्णत्वाचा रंग आहे हिरवा.


माधवी : आणि ही सगळ्या सुखांची हिरवी समृद्धी तिला मिळावी म्हणून तिला हिरव्या रंगाचे कपडे , बांगड्या घालतात आणि तिची पाच फळांनी ओटी भरतात. आपल्या फ्लॅग मध्ये जो हिरवा रंग आहे तो आपल्या इंडियातल्या याच समृद्धी आणि आनंदाचा प्रतीक आहे. 


       सगळ्यांनी हिरव्या रंगाचं महत्त्व शिवांगीला समजावून सांगितल्यामुळे आता आपण लहान नाही तर मोठे झालो या विचारांची हिरवाई शिवांगीच्या मनातही हळूहळू उमलू लागली आणि इकडे हिरव्या पानांच्या रांगोळी आडून ती जगदंबा प्रसन्न हसली. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics