पूर्णत्व तिचं
पूर्णत्व तिचं
यंदाचं हे पाचवं वर्ष होतं सुजाताचं नवरात्र घटस्थापना करण्याचं. पाच वर्षांपूर्वी फडक्यांची ही लेक केळकरांकडे सून बनून आली आणि पाकात साखर विरघळते तशी अंतर्बाह्य विरघळून गेली. घरी नवरा अभय, सासू सासरे आणि शेंडेफळ नणंद अस्मिता असं पंचकोनी कुटुंब. काही कमी नव्हती तिच्या संसाराला शिवाय कुटुंबाच्या पंचकोनाला षटकोनात बदलणाऱ्या चिमुकल्या पाखराच्या...
गेली ३ वर्ष अनेक डॉक्टर,मंदिरं, अंगारे धूपारे, नवस सायास सगळं करून झालं होतं परंतु सुजताच्या स्त्री असण्याला अजूनही पूर्णत्व मिळत नव्हतं. बरं सगळ्या टेस्ट देखील करून झाल्या होत्या. दोघांमध्येही काहीही दोष नव्हता. त्यामुळे तर सुजाता अजूनच दुःखी होती. पण म्हणतात ना दुखऱ्या मनावर अध्यात्मिक शांततेची चादर तसंच सुजाता सणवार आले की त्यात हरवून जायची. आज देखील घरात घटस्थापना होती म्हणून पहाटे पासून ती तयारीला लागली होती.
सुजाता , कसली सुंदर दिसतेस ग या गुलाबी पैठणीमध्ये !
अस्मिता : हं...वहिनी , आज तर काय ब्वा , दादाची पुन्हा एकदा विकेट जाईल...
सुजाता : काय हो वन्स !!!!!
जयंतीताई : कुणाची दृष्ट नको लागायला बाई तुला...
जयंतीताईंनी आपल्या सुने वरून बोटं मोडून टाकली
सुजाता : आई,खरं तर कुणाची दृष्ट लागलीय आमच्या संसाराला कुणास ठाऊक...रोज आस लागते मला की आज चाहूल लागेल त्याची जो मला आई म्हणून हाक मारेल, जो आपल्या अंगणात दुडूदुडू धावेल....
जयंतीताई : हो ग....खरंय तुझं..जगदंबेच्या कृपेने सगळं घर भरलं आहे आपलं पण....
सुजाता : पण आई, बाहेर असं कुणी म्हणत नाही हो की तुमच्या घरात खोल्या किती आहेत किंवा किती करोडची संपत्ती आहे तुमची... आधी विचारतात किती मुलं आहेत तुम्हाला...
सासूसुनेचे हे बोलणे सुरू असतानाच तिथे विनयराव म्हणजेच सुजाताचे सासरे आले.
" सुजाता,तुझी पिडा समजू शकतो आम्ही सगळे..पण आपल्या हातात केवळ प्रतीक्षा करणे आणि स्वतःला आनंदी ठेवणे इतकेच आहे बेटा.. तू इतक्या मनोभावे देवीची दरवर्षी घटस्थापना करतेस , तिची नऊ दिवस सेवा करते, तुला नक्की फळ मिळेल त्याचं ,नको उदास होऊ."
अस्मिता : हो वहिनी , तू नको नाराज होऊ. हेही दिवस जातील अगं आणि तुझ्या असण्याला नक्की एक दिवस अर्थ मिळेल.
विनयराव : चला , आता भराभर आवरा. अभय कुठे आहे ? गुरुजी येतीलच थोड्या वेळात..
अभय : आलो ,आलो...आतमध्ये तयार होताना सगळं ऐकत होतो मी... सुजाता , नको विचार करुस. अगं जी गोष्ट आपल्या हातातच नाही तिच्याबद्दल विचार करून का स्वतःची मन:शांती आणि सणाचा आनंद घालवून बसायचं ? ए अस्मी, चल बरं बागेत...माझे आणि तुझ्या वहिनीचे मस्त गुलाबी गुलाबी फोटो काढ गुरुजी यायच्या आत...
अस्मिता : येस बॉस
आणि अस्मिताने मग आपल्या दादा वहिनीचे वेगवेगळ्या पोझेस मधले भरपूर फोटो काढले. गुलाबी पैठणी नेसून गुलाबांमध्ये हरवलेली सुजाता खूप सुंदर भासत होती. अभय आणि सुजाताने खूप भक्तिभावाने घटरुपी देवीला आपल्या घराच्या ईशान्य कोणात बसवले. देवीच्या आगमनाने घरात आलेलं चैतन्य सगळ्यांनाच एक सुखद अनुभुती देत होतं.
गुरुजींनी दरवर्षी प्रमाणे सप्तशती पाठ वाचन केलं आणि नैवेद्य दाखवून दुपारी ३ च्या सुमारास आरती झाली. सगळ्यांना प्रसाद वाटत असतानाच सुजाता अचानक घेरी येऊन खाली कोसळली. आतापर्यंत हसतमुख असणारी सुजाता अशी कोसळलेली पाहून सगळेच घाबरले.
अभय : सुजाता , सुजाता उठ....आई , हिने नाश्ता नव्हता केला का सकाळी ?
जयंतीताई : अरे पूजा करायची म्हणून फक्त ग्लासभर दूध घेतलं तिने. खाल्लं काहीच नाही...
अभय : अस्मि, तू त्या अर्चनाताईंना बोलावं बरं , लवकर या म्हणा...कशाला शरीराचे हाल करायचे असतात हिला ? आधीच.....
कॉलनीत राहणाऱ्या डॉक्टर अर्चना बापट लगबगीने अस्मिता सोबत घरी आल्या आणि सुजाताला त्यांनी तपासले , तिचे बीपी घेतले.
अर्चना : काकू....सुजाता आणि अभयचं पाच वर्षांचं नवरात्र व्रत पूर्ण झालं आहे. आता त्याचं फळ चाखायची वेळ आली आहे...
जयंतीताई काय समजायचं ते समजल्या आणि मोठ्ठ्याने त्यांनी गजर केला : बोला अंबाबाईचा उदो उदो.....
आधीच देवीचे शुभ आगमन आणि त्यासोबतच अंगणात बहरू पाहणाऱ्या नव्या सुगंधाची लागलेली चाहूल यामुळे सर्वत्र आनंदी आनंद पसरला.
गुरुजी : अभय, आज खऱ्या अर्थाने तुला आणि सुनबाईंना देवी पावली..अभिनंदन.....
थोड्या वेळाने सुजाता शुद्धीत आली आणि तिला अभयने सगळं सांगितलं.
विनयराव : सुजाता , मी सकाळीच तुला म्हटलं होतं ना की तुला देवीच्या सेवेचं नक्की फळ मिळेल , बघ देवीने माझा शब्द खरा केला..
अस्मिता : अभिनंदन वहिनी आता तुझे सुखाचे क्षण आले आहेत...मस्त खायचं , स्वस्थ राहायचं आणि हसत बसायचं आणि ती जबाबदारी माझी...
दोघी नणंदा भावजया गळ्यात पडून सुखनैव हसत होत्या.
जयंतीताई : सुजाता , तुझी इतक्या वर्षांची तपश्चर्या फळाला आली बघ ! आता तुझ्या स्त्रित्वावर पूर्णत्वाची मोहोर लागणार , अजून दोन छोटे छोटे पाय आता ह्या घरात येणार आणि ज्या सुखाला तुझं आसुसलेलं मन दिवसरात्र देवीला भजायचे त्या मनाला आता बाळाच्या स्पर्शाचा शीतल आनंद मिळणार आहे.
अभय : मिसेस ज्युनिअर केळकर , आम्हाला तुमच्या सारखीच एक गोड हसरी आणि प्रेमळ लेक हवीय बरं का !
मातृत्वाच्या गोड फळाने सुजाताच्या गाली नव्याने गुलाब फुलले होते आणि देवीच्या मस्तकावर वाहिलेले टपोरे गुलाबाचे फुल कौल म्हणून खाली पडले होते.
