नवलाई जांभळ्याची
नवलाई जांभळ्याची
काय सतत जांभळ्या रंगाचे कपडे घालत असतेस तू श्रध्दा ? दुसरे पण रंग वापरत जा की जरा..
नुकतंच लग्न ठरलेल्या आपल्या लाडक्या लेकीला नीलिमाताई प्रेमाने दटावत होत्या.
श्रद्धा : आई , अगं जांभळा रंग हा लाल आणि निळा रंग मिळून बनतो आणि म्हणूनच तो चैतन्याचं प्रतीक आहे. मला प्रचंड आवडतो हा रंग. हा रंग परिधान केला ना की कशी निराळीच ऊर्जा मिळते आणि आयुष्य जगायला निराळाच उत्साह मिळतो...ए आई , मला ना माझ्या लग्नाचा शालू सुद्धा जांभळाच घ्यायचा आहे आणि जांभळ्या शेड मधल्या साड्या ड्रेसेस घेणार आहे मी..
सतीशराव : ते गृहीत धरुनच आहोत राणी आम्ही आणि म्हणूनच आम्ही ठरवलं आहे की तुझ्या लग्नाला येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांसाठी जांभळी थीम ठेवायची.
श्रद्धा : अय्या , खरंच !
तितक्यात श्रद्धाची धाकटी बहीण श्रुती म्हणाली ,
हो ताई...आणि मी एवढं इंटेरियर डेकोरेशन शिकले आहे ते कधी कामाला येणार ? तुझ्यासाठी मी एक सरप्राइज प्लॅन केलं आहे. तू बघच आता..
श्रद्धा : म्हणजे नक्की काय करणार आहेस तू बार्बी ?
श्रुती : ते आताच सांगितलं तर त्यात नवल काय राहणार ? सो... जस्ट वेट...बाबा ,आपण लग्नाच्या शॉपिंगला कधी जायचं सांगा ना...
सतीशराव : हो मी उद्या आणि परवा सुट्टी टाकली आहे. हे दोन दिवस आणि शनिवार रविवार असे चार दिवस मिळणार आहेत आपल्याला. उद्या आपल्या आणि व्याही - पाहुणे मंडळींच्या कपड्यांची ,वस्तूंची खरेदी करू.
नीलिमाताई : आणि बाकीचे तीन दिवस ?
सतीशराव : परवा आपण लोणावळ्याला जातोय सगळे. श्रद्धा तिच्या घरी जाण्याआधी तिच्यासोबत मला भरपूर वेळ घालवायचा आहे. मग माझी चिमणी तिच्या संसारात काडी काडी जमवायला सुरुवात करेल मग या बापाला कधी वेळ देणार माझी छकुली ? म्हणून मी तिच्या आवडीचं पर्पल लगुन रिसॉर्ट बुक केलं आहे.
बाबांचं बोलणं ऐकून हळवी झालेली श्रद्धा ओल्या डोळ्यांनी त्यांना येऊन बिलगली. कितीतरी वेळ मग बापलेक मुक होऊन डोळ्यांनीच एकमेकांशी संवाद साधत होते.
बघता बघता तीन महिने निघून गेले आणि श्रद्धाची लग्नघटिका समीप आली. श्रुतीने सांगितल्याप्रमाणे खास आपल्या ताईची जांभळ्या रंगाची आवड लक्षात घेऊन लग्नाच्या हॉलसाठी तिने जांभळे पडदे निवडले होते. त्यावर कृत्रिम व्हायलेट फुलांच्या आणि जांभळा प्रकाश पसरवणाऱ्या विद्युत रोषणाईच्या माळा सोडल्या होत्या. हॉलच्या प्रवेशद्वारापासुन ते स्टेजपर्यंत येणाऱ्या वाटेवर सगळीकडे विदेशी जांभळ्या फुलांच्या छोट्या छोट्या आकर्षक कुंड्या सजवल्या होत्या. लग्नाची सगळी वर्हाडी मंडळी जांभळ्या रंगाच्या अनेक छटांचे कपडे परिधान करून आली होती.
आधीच श्रद्धा आणि सुकृतचा शुभविवाह असल्याने मांगल्यमय वातावरण होतेच त्यात सर्वत्र जांभळ्या रंगाची झालेली उधळण चैतन्याचा एक झोतच घेऊन आली होती. जो तो श्रुतीच्या या अनोख्या कल्पकतेचं कौतुक करत होता. काही वेळातच एकमेकांच्या हातात हात घेतलेल्या श्रद्धा आणि सुकृतचे हॉलमध्ये आगमन झाले. जांभळ्या रंगाच्या रेशमी ओढणीखाली एकमेकांच्या प्रेमरंगात रंगलेले , चैतन्यमय मनाने आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करणाऱ्या श्रद्धा - सुकृतच्या जोडीला पाहून सगळ्यांनाच खूप कौतुक वाटत होतं.
मनाने कधीच एक झालेल्या श्रद्धा आणि सुकृतने ठरवून लग्नासाठी मॅचिंग कपड्यांची निवड केली होती. श्रद्धाचं जांभूळ प्रेम चांगलंच ठाऊक असल्याने सुकृतने स्वतः जांभळी शेरवानी आणि त्यावर जांभळी पुणेरी पगडी परिधान केली होती. देखणा,उंचपुरा सुकृत अगदी राजकुमारच भासत होता. जांभळ्या रंगाचा भरजरी शालू , त्याला साजेसा कुंदनचा जांभळा नेकलेस , सोन्याचे अलंकार आणि हातांवर रंगलेली सुकृतच्या नावाची मेहंदी या सगळ्यांमुळे श्रद्धा चं रूप अतिशय खुलून आलं होतं. अतिशय लावण्यवती दिसत होती ती.
श्रुतीने आपल्याला सांगितलेलं सरप्राइज आणि आपली आवड लक्षात घेऊन तिने केलेली हॉलची सजावट पाहून श्रध्दाच्या आनंदाला पारावारच उरला नव्हता. अत्यानंदाने आणि भरल्या डोळ्यांनी दोघी बहिणी एकमेकींच्या गळ्यात पडल्या. देवा ब्राह्मणाच्या , नातेवाईकांच्या आणि आपल्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य जनांच्या साक्षीने अखेर श्रद्धा आणि सुकृत एकमेकांचे झाले. नवचैतन्य आणि नवसंकल्पना याचं प्रतीक असणारा जांभळा रंग आता श्रद्धा आणि सुकृतच्या नवजीवनात रोजच चैतन्याचे वारे घेऊन येणार होता.
