Nagesh S Shewalkar

Comedy

3  

Nagesh S Shewalkar

Comedy

सच्चे सेवक

सच्चे सेवक

7 mins
219


    पांढरे शुभ्र धोतर, गुडघ्यापर्यंत पांढरा शुभ्र शर्ट, त्यावर नीळचा प्रमाणशीर मारा, डोक्यावर पांढरी शुभ्र टोपी वर पुन्हा कडक इस्त्री! तोंडात तबाखु सुपारीचा बकणा. पाहता क्षणी कुणी ही या

व्यक्तीला राजकारणी समजेल. परंतू टोपीखालील भव्य कपाळावर तसाच दांडगा गंधाचा उभा टिळा पाहून कुणी वारकरी म्हणेन कारण गळ्यात माळाही असत. परंतू ते आमचे सिंगारे गुरूजी! दचकलात? अशा राजकारणी थाटाच्या वर्णनाच्या माणसाला मी शिक्षक म्हटल म्हणून! ही वल्ली नुसती शिक्षक नव्हती. तर ते शिक्षकांच्या शिक्षकांचे शिक्षक अध्यापक महाविद्यालातील शिक्षक (प्राध्यापक) होते. या कलीयुगात काहीही शक्य आहे. जवळ विद्वत्ता, इच्छाशक्ती असली म्हणजे मानव कुठेही पोहचतो. पदवी, मान सन्मान अशा विद्वानापुढे नतमस्कत होतात. अध्यापक महाविद्यालयांचे प्राध्यापक म्हटल्यांनतर त्यांचा थाट तो काय वर्णावा! परंतु सिंगारे गुरूजींची राहणीच अगदी साधी थेट गांधी समाजजीवनाशी नातं सांगणारी. स्वातंत्र्य पूर्व काळात केलेल्या कामगिरीचा सिंगारेना फार अभिमान! योगायोगाने त्यांचा विषयही इतिहास! आठवडा-पंधरवाड्यातून सिंगारे एकदा वर्गात शिरले, की इतर प्राध्यापकाना आरामच. कारण चुकून वर्गात शिरले आणि रिकाम्या टेबलावर मांडा ठोकून बसले, की विद्यार्थ्यांना स्वराज्यकालीन वीरांची आठवण येई. वेळ आणि तास व वर्ग यांच्याशी सिंगारेंना काही सोयरसुतक नसायचे. अगोदर ते स्टाफरूम मधून उठतच नसत. उठले तेव्हा जो वर्ग रिकामा दिसे त्या वर्गावर ते शिरत. कॉलेजच्या वेळापत्रकाने शिंगारेंना कधीच अडवल नाही. वेळा पत्रकाप्रमाणे चालतो तो प्राध्यापक आणि वेळापत्रकाचा विचार न करता काम करतो तो शिक्षक. हे ब्रीद वाक्य अर्थात आमच्या सिंगारेसरांचे!

   टेबलावर मांडा ठोकून, डोक्यावरची टोपी काढताच त्याखालचे भव्य रणांगण विद्यार्थ्यांना दिसताच त्यानी ओळखावं... आता स्वातंत्र्य लढ्याचा... इतिहासाचा तास! ज्या प्रमाणे त्यांना वेळापत्रकाचं बंधन नव्हतं. तद्वत त्यांना अभ्यासक्रमाचंही बंधन नव्हतं. इतिहास शिकवायचा ना, मग ठरलेलाच कशाला? पुस्तकातले मेलेले मुडदे उखडण्यापेक्षा स्वतः केलेली लढाई, पराक्रम ऐकवला तर त्यास स्वानुभवाची जोड असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गळी तो लवकर आणि जास्त उतरेल. अशा धारणेने जेव्हा ते त्यांच्या पराक्रमाची गाथा ऐकवायला सुरुवात करत. त्यावेळी ते अत्यंत आवेशात बोलत. समोरच्या विद्यार्थ्यांना ते शत्रू समजून शब्दरूपी हत्यारे चालवताना त्यांच्या तोंडातून उडणाऱ्या फवाऱ्याने अनेक विद्यार्थिनीच्या मेकअपमध्ये भर पडे. कुणी त्यांना त्या फवाऱ्यांबद्दल डिवचल तर त्याच त्वेषात ते उत्तर देत,

"पहा देशाचे आधारस्तंभ घडविणारे तुम्ही! अरे, तुम्ही साधा फवारा सहन करु शकत नाहीत? पहा.. थोड आमच्याकडे पहा. आम्ही त्यावेळी शत्रूच्या काठया झेलल्या, गोळ्या अंगावर घेतल्या, फेकलेल्या नळकाड्यांच्या धुरातही जिवंत राहिलो. म्हणून तुम्हाला हा इतिहास ऐकायला मिळतोय आणि तुम्हाला एक फवारा..." एवढं सारं भलं मोठं वाक्य जोडण्यासाठी आम्हाला त्यांचे पाच लागत कारण बोलताना तोंडातल्या सामग्रीमुळे ते काय बोलले ते फार थोड्यांना समजायचे. त्यांच्या चेहऱ्याकडे, विशेषतः तोंडाकडे पाहत कुणी तरी विचारायचं, 

"सर, तुमचे दात?" 

"दात ना ? ते पडले स्वातंत्र्य लढयात. दाँत गये लेकीन जान बची!"

सिंगारे वर्गाकडे येत आहेत, म्हटल की पुढच्या बाकावरचे विद्यार्थी मागच्या बाकाकडे धाव घेत. त्यांच्यासमोर बसून त्यांच्या पिचकाऱ्या अंगावर घेण्यापेक्षा होळीचा रंग अंगावर घेणे परवडले असा आमचा प्रामाणिक समज! सर, वर्गात येईपर्यंत आम्ही आपापल्या जागा घेऊन मावळ्याप्रमाणे सज्ज! सिंगारेसर वर्गाजवळ येत हे त्यांच्या बुटावरून समजायचं. बुटाचा आवाज जसजस वर्गाजवळ येई तसतसे आम्ही चिडीचूप. येतांना त्याच्या तोंडातून, 'शिव.. शिव... राम...' हा धावा सदोदित चालू असायचा.

   वर्गात आल्यानंतर एक नजर टाकून ते म्हणत, "वा! वा! सारे उपस्थित? तास कोणताही असो, वर्गात विद्यार्थी असले म्हणजे शिकवावं वाटतं, देवच देवळात नसला तर कुणी देवळात जाईल का? त्या देवळात करमेल का?" अशा स्वतः केलेल्या विनोदावर त्यांच ते सात मजली हास्य म्हणजे विद्यार्थी वर्गाला सजाच कारण त्यांच्या हसण्यातून बाहेर पडलेली सारी तंबाखू थेट शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत! एखादी इमारत कोसळताना जसं विटा, माती आजूबाजूचे क्षेत्र व्यापते आणि अनेकांना घायाळ करते. त्या प्रमाणे ती तंबाखू वर्गाच्या कोपऱ्यात न् कोपऱ्यात जाऊन विद्यार्थ्यांना आपलसं करी. तशा प्रकाराने विद्यार्थ्यांना अवधान आपल्याकडे आहे. ते पाहताच ते म्हणत, 

"अरे, भ्याड्यांनो, असे पळता, कोपऱ्यात का बसता? हिंमत असेल तर पुढे बसून इतिहास शिका. मी ज्या भागात जात असे, त्या भागातल्या शत्रूच्या तलवारी म्यान होत. त्यांच्या बदुकी मला सॅल्युट मारत.."एखाद्या योद्याच्या आवेशात बोलताना स्वातंत्र्य युध्दातला एखादा प्रसंग वर्णन करून सांगत, त्यापुढे इतिहासकाराने काय लिहावे? एकदा कॉलेजला येताना सिंगारे सर्वांच्या मागे लागलेला कुत्रा अनेकांनी पाहिला. काही विद्यार्थी मौन राहिले परंतु सरांची खिल्ली उडवावी म्हणून काही व्रात्य विद्यार्थी म्हणाले, 

"सर, तुम्ही एवढे मोठे योध्दे शत्रुना पळविणारे परंतु एका कुत्र्याने तुम्हाला पळविले. तुमचं सामर्थ्य ते हेच का?" 

"अरे, माझं सामर्थ्य का कुत्र्यासाठी आहे? ते शत्रुसाठी आहे. अरे, सामर्थ्य वापरायलाही समोरच्याची पात्रता लक्षात घ्यावी लागते. ती पात्रता तुमच्यातही नाही." निवृत्तीकडे झुकलेल्या, वय वर्षे अठ्ठावन्न गाठत असलेल्या प्रा. सिंगारेंना कुणी विचारलं, 

"सर, तुमची निवृत्ती, पेंशन?" 

"अरे, वयाचं, निवृत्तीचं सोड. मानवाच्या जीवनातले ते एक स्टेशन! अठ्ठावन्न वर्षे हा आकडा धरुन जो प्रवास करतो तो खरा प्रवासी, खरा कर्मचारी होऊच शकत नाही. शिक्षकाला तस वयच नसतं. समोर मुलं दिसली, की त्याने शिकवायला सुरु करावी. जणु का तो त्याच्या नोकरीचा पहिला दिवस आहे. खरा शिक्षक कधी थकत नाही. विद्यार्थी समोर येताच त्याच्या वृत्ती उल्हासीत होतात. वय, काळाचं भान विसरून तो विद्यार्थ्यांमध्ये तल्लीन होतो, समरस होतो. अशानेच स्वतःला शिक्षक म्हणून घ्यावं. नाही तर पहा टोलांकडे, तासांकडे, एक तारखेकडे आणि परिक्षांकडे असा हा खरा शिक्षक होऊ शकत नाही. शिक्षक हा समाजसेवक असावा."

स्टाफरूममध्ये सिंगारे असले म्हणजे स्टाफरूममध्ये हास्याचा लाव्हा नुसता खदखदायचा. एरव्ही स्टाफरूम आणि तेही प्राध्यापकांची म्हटली, की चित्र वेगळे असते. कुणी नाकावरचा चष्मा सावरत पुस्तक शोधण्यात दंग, कुणी पुस्तक वाचताना आवश्यक त्या नोंदी हातातल्या कागदावर उतरवण्यात दंग, कुणी पेपर्स, प्रॅक्टिकल च्या वह्या शोधण्यात दंग, नि मग्न! कुणाला कुणाशी बोलायची फुरसत नाही. कुणी नवागताने अभिवादन केलं तर उत्तर देण्याच्या पध्दतीही ठरलेल्याच. कुणी हातातल पेन वर करेल, कुणी डोळ्यावरचा चष्मा नाकावर घसरवेल, कुणी मान झुकवेल तर कुणी नजर हातातल्या पुस्तकावर ठेवून अंगठा दाखवेल. सिंगारे स्टाफ रूममध्ये असले तरी त्यांच्या अपन असा पुस्तकाचा, नोंदीचा फापटपसारा नसायचा. कुणी विचारलं,

"सर, आराम दिसतो, काही नोंदी वगैरे?"

"कशाच्या नोंदी ? प्राध्यापक म्हणजे संगणक असावा. ज्या विषयात त्याने पदवी आणि शिक्षणाची पदवी प्राप्त केलेय त्या विषयावर त्याची मास्टरी असावी. चोवीस तास प्रवासानंतर प्राध्यापकाला वर्गात जाव लागल आणि त्याच्या विषयाच पुस्तक हातात पडून ते उघडल्याबरोबर जो टॉपीक पुढे येईल तो तात्काळ शिकविणारा खरा प्राध्यापक! नाही तर स्टाफरूममध्ये बसून नोंदी काढायच्या, घरी नोंदी काढायच्या... अहो, वर्गाच्या बाहेर पडलं की विसरा सारे. स्टाफरूममध्ये वेगळच चिंतन सुरु असावं, इतरांच्या सुखा दुःखात सामील व्हावं, इतराना सामील करावं. विचारांची देवाण-घेवाण व्हावी. पण हल्ली हे नोटस्च भलतच प्रस्थ माजलय. एकच एक विषय आपण वर्षानुवर्षे शिकवतो ना? मग त्यांचं वारंवार वाचन, नोंदी हव्यातच कशाला?" अशा प्रश्नांना हास्यांची कड लागली म्हणजे समोरचे गर्भगळीत होणे जात असत...

   कॉलेजचे डीनपद नाकारलेल्या या वल्लीला कुणी नोकरी, वेळेचं, अभ्यासक्रमाचे बंधन घालायचं धाडस करीत नसे. अगदी महाविद्यालयाचे डीन सुध्दा! कारण शब्दांची फिरवा फिरवी करून त्यांचे शब्दात त्यांच्यावर उलटवण्यात सिंगारेचा हातखंडा. त्यामुळे कुणी बोलून अवलक्षण करीत नसे. पुन्हा समोर सिंगारे असले म्हणजे समोरच्याने ऐकणे आणि ऐकतच राहणे, मध्येमध्ये बोलणे न लगे! अशा वल्लीला स्टाफरुममध्ये कुणी तरी विचारलं, 

"सर, तुमची स्वातंत्र्यसैनिक. मग तुम्हाला केंद्र सरकार राज्य सरकारची पेंशन..."

"अरे, इथं पेंशन हवीच कुणाला? चार पैसे मिळावे म्हणून का आम्ही जीव धोक्यात घातला? ते चार रूपये स्वीकारणे म्हणजे त्या काळी केलेल्या महान कार्याला स्वार्थाने गालबोट लावल्याप्रमाणे! अरे, आम्ही सच्चे सेवक होतो, भाडोत्री नव्हतो. ते चार पैसे घेण्यापेक्षा स्वातंत्र्यसैनिक ही अक्षरे प्रिय वाटतात. पाच वर्षांपूर्वी मला पत्र आलं होत, तुमची माहिती पाठवा. मी उत्तर दिलं, माझी माहिती पाठवून मी त्याचा बाजार मांडणार नाही. बाजार नाही तर काय हो? अहो, कुणी काय काम केलं त्याची सारी नोंद दप्तराला आहे. ती काढावी ना? परंतु आजकाल भारी कामकंटाळा. आज पाठवलेली माहिती उद्या विचारली तरी पुन्हा कागदांची जमवाजमव करतील. हा कारकुनी अभिशाप! मी नाही माहिती पाठवली. वर्षापुर्वी पुन्हा पत्र आलं. तुमची स्वातंत्र्यसैनिक म्हणून निवड झालेय. तुम्हाला सारे शासकीय लाभ... आता हसावं की रडावं? स्वातंत्र्यसैनिक म्हणून मान्यता देणारे हे शहाणे कोण? आम्ही त्यावेळी कुणाच्या आदेशाची वाट पाहिली नाही. धरती मातेला आमची गरज आहे हे लक्षात येताच आम्ही उडी मारली. शिव.. शिव.. किती हा अपमान? सच्चा सैनिकाचा!"

सरांचा ज्या दिवशी मूड नसेल त्या दिवशी वल्ली एक तर घरीच रहायची किंवा स्टाफरूममध्ये चक्क टेबलावर पाय टाकून ताणून द्यायची. अशा वेळी वर्गावर जायच काम पडलं तरी सिगारेंची समाधी कुणीही भंग करत नव्हते.

  संसार, सुख -दुःखे कुणाला चुकली आहेत? ती सिगारेंनाही होती. परंतु त्यानी कधी बाहेर काढली नाही. त्याचं भांडवल केलं नाही, फारच कुणी विचारल तर म्हणत, 

"अहो, काय सांगू? एक पोरग आणि एक पोरगी आहे..."

"अहो, मग तुम्हाला कमी काय आहे?" 

"कमी नाही हो. पण ही आजकालची पोरे कुणाच ऐकतील तर..."

"काय झाल सर ?"

"व्हायचे काय? आमच्या चिरंजीवाला नोकरीत इंटरेस्ट नाही. व्यापार करायचाय."

"अहो, मग बिघडलं काय?"

"हेच ते! अहो, काय आहे त्या व्यापारात? नोकरीत म्हणे पगारासाठी हात पसरावा लागतो. व्यापारात तरी काय अनेकांपुढे हात पसरावाच लागतो की तो ही क्षणाक्षणाला! मग नोकरी काय वाईट आहे?"

एखाद्या दिवशी सिंगारे म्हणत, "आजकाल लग्नाचेही फार बिघडल बाबा."

"काय झालं हो?"

"अहो, काय सांगावं? पोराचा बाप झाला म्हणजे काय त्यांना ब्रम्हदेव झालं अस वाटत की काय? काय थाट त्यांचा? काय मानपान त्यांचे? प्रत्यक्ष पंतप्रधानांची कुणी करणार नाही अशी सरबराईस करुन आठ दिवस खेटे घातल्यानंतर त्याच उतवतर ठरलेलं. काय तर म्हणे, योग नाही! आता काय डोकं फोडाव?"

   तशातच बी.एड. चा एक वर्षाचा कालावधी केव्हा संपला ते समजलंच नाही. वर्ष जरी संपलं तरी सिंगारेसर मात्र मनात कायम घर करून राहिले. आम्ही त्यांचा निरोप घ्यायला त्यांच्याकडे गेलो तेव्हा ते म्हणाले,

"अरे, वर्ष संपत आलं? स्वातंत्र्य संग्रामही असाच संपला. नुकतीच कुठे स्वातंत्र्याची लढाई पूर्ण जोशात असताना अचानक गोऱ्यांनी तोंड काळ केलं. तसेच हे वर्षही संपले. अरे, परंतु आणखी इतिहासाची सुरुवात करायची राहूनच गेली रे. ठीक आहे. इतिहासाचा अभ्यास घरी करा. तुम्हीही शिक्षकच होणार ना! पुस्तकातला अभ्यासक्रम तुम्हाला काय शिकवावा! त्यावर तुम्ही एक नजर टाकली तरी खूप आहे जा. यशस्वी व्हा! खूप खूप नाव कमवा! हे क्षेत्रच असं आहे, त्यात तुम्हाला खूप काही करता येईल..."

   अभ्यासक्रम राहूनच गेला. त्याला हात लागता नाही अशी स्वच्छ कबुली द्यायचं धैर्य फक्त सिंगारेंजवळ होते...

               ००००                       


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy