Nagesh S Shewalkar

Others Comedy

1  

Nagesh S Shewalkar

Others Comedy

सभा की भास

सभा की भास

11 mins
1.1K


              तारापूर या गावची संध्याकाळ! काय वर्णावा तिचा थाट! सूर्यदेवांनी परतीचा प्रवास सुरु केला होता. जाताना मनमोहक छटा पसरली होती. त्या मनमोही प्रकाशात तारापुरची धावपळ सुरू झाली होती. गुरेढोरे, गाडीबैल, शेतकरी, मजूर सारे आपापल्या घरी परतत होते. तालुक्याच्या गावी सकाळी नोकरीनिमित्त गेलेली मंडळी गावी परतत असताना तारापूर गावात काम करणारे कर्मचारी तारापुरहून निघाले होते. गावातील घराघरातून कारभारनीची भाकरी बडविण्याची धावपळ सुरू होती. काही बायका पाणी भरत होत्या. गावाच्या वेशीत समोरासमोर दोन-तीन हॉटेल होते. हॉटेलसमोर टाकलेल्या बाकड्यावर नेहमीची रिकामटेकडी माणसं बसली होती. प्रत्येक जण राजकारणातील फार मोठा जाणकार असल्याप्रमाणे पंतप्रधान, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधक यांच्या चुका दाखवून त्यांच्यावर टीका करीत होते. तारापुरात असलेल्या एकमेव गुत्त्याकडे जाणारांची संख्याही भरपूर होती. गुत्त्यावर जाताना मांजराच्या पावलाने जाणारी मंडळी परत येताना मात्र शेर बनून परतत होते. धोंडबाची वाट पाहणाऱ्या कोंडबाला धोंडबा भेटला आणि दोघे मिळून नित्यनेम असल्याप्रमाणे गुत्त्याकडे निघाले.

"काय बी म्हण धोंड्या, पर लाला पैल्यावाणी माल देत न्हाई."

"हां यार. पैले कशी एका गिलासात तब्येत खुश व्हायची. सांच्यापारी चढलेली नशा पार फाटेपस्तोर उतरायची न्हाई. दिसभर कसं ईमानात बसल्यावाणी वाटायचं"

"पर आता चार पाच गिलास घशाखाली उतरले तरच नशा चढते पर घंट्या दोन घंट्यात नशा पार उतरून जाते."

"कसं हाय या लालाला या गावात प्रतिस्पर्धी न्हाई. त्ये म्हणतात ना, सवत आली की, कारभारीन नीट ऱ्हाते तसं या गावात दुसरा एखांदा गुत्ता आल्याबगर चांगला माल मिळणार न्हाई."

"आरं, धोंडबा, कोंडबा तुम्ही इकडं फिरता राव! माणसानं हुडकावं तरी किती आन् कोठकोठ?" ग्रामपंचायतचा नोकर त्या दोघाजवळ येत म्हणाला.

"आबे, काय काम हाय ते तर सांग. उगाच बडबड लावलीस."

"काय तरी काम आसल तवाच धुंडत आसल ना? चला पैलै सरपंचाने बलीवल हाय. आस्सेल तसे बलीवलय. जेवान करीत आसाल तर हात सरपंचाच्या घरी धुवा म्हणं."

"च्या मायला त्या सरपंचाच्या! येड तर लागल न्हाई. काही काळ येळ हाय का न्हाई? पैले जरा आमचं काम आटीपतो आन मंग लगुलग येतो."

"काम आन तुमचं? कहाला आन कोणला सांगता? तुमचं काम मला चांगलं ठाव हाय. त्यो काय समोरच अड्डा हाय की..."

"आरं, आता येथवर आलुच हावोत तर मारु दे की दोन चार घोट..."

"अरे, बाबांनो, दोन घोट सोडा. आख्खी बोटल ती बी इंग्लिश.... सरपंचान स्पेशल आणून ठेवलीय तुमच्यासाठी. हाय का ठाव?"

"काय इंगरजी बोटल? च्यामारी! काय म्हण्ता कोंडबाराव? आज फाटे फाटे कोणाच त्वांड फायल?"

"पर धोंडबा, सरपंच इंग्रजी देणार तवा काम बी तसच आसणार की."

"काम कंच बी आसना, आपलं काम काय? सरपंच दाखवल त्या कागुदावर आंगुठा लावायचा. म्या तर निवडून आलेला मेंबर, तू मैयला राखीव मेंबराचा नौरा. आंगुठा लावायचा आन् पेग वर पेग मारायचे. कस?"

"हां. तसाच. चल तर मंग."

   काही क्षणातच तिघेही सरपंचाच्या बैठकीत शिरले. सरपंच त्यांचीच वाट पाहात होते. शरीराने धष्टपुष्ट असलेले सरपंच लुंगी नेसून उघड्या अंगाने कराकरा डोके खाजवत बसले होते. विझत चाललेल्या बिडीमध्ये जीव फुंकत सरपंच म्हणाले,

"मामू, जाव. सब मेंबरकू बुलाव. भागो...."

"जी.." असे म्हणत मामू तिथून निघाला. तसे सरपंच कोंडबा-धोंडबा कडे पाहात म्हणाले,

"काय म्हण्ता हऱ्या-नाऱ्या? सांच्यापारी कोरडेठाक? कोन्ही मिळालं न्हाई का? "

"तस न्हाई, पर आज मुड जरा येगळाच हाय."

"म्हंजी?" सरपंचाने सहेतुक विचारले.

"तस न्हाई पर या टायमाला तुम्ही बलीवल म्हंजी महत्त्वाचं काम आसणार. तवा म्हन्ल..."

"इंगरजी पेवावी आन मंगच...." 

"भले भाद्दर मातर. आर ताकाला जाऊनशानी भांडं कावून लपवता?"

"ते काय तुमाला सांगायची गरज हाय का मालक?"

"बर..बर. घ्या. मारा येक येक पेग...."

"तुम्ही पैले बाटली तर ठिवा मंग फाऊ?" कोंडबा म्हणाला.

"घ्या रं घ्या..." असे म्हणत सरपंचानी बाटली आणि दोन ग्लास त्या दोघांच्या स्वाधीन केले. ओठांवरुन जीभ फिरवत अधाशी नजरेने बाटलीकडे पाहत कोंडबाने बाटली उघडली. दोन्ही ग्लास सांडेपर्यंत भरून घेतले. तोंड वेडेवाकडे करत, ठसका लागण्याच्या अवस्थेत एका दमात दोघांनीही ग्लास रिकामे केले. दोघांनाही जोराचा ठसका लागला. ठसक्याचा जोर एवढा जोरात होता की, डोळ्यातले, नाकातले, तोंडातले पाणी एकच झाले.

"आर, आर जरा दमाने घ्या. फोकटाची हाय म्हणून किती बी पेवू नगा. हावरट बेटे." सरपंचाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत कोंडबाने पुन्हा दोन्ही ग्लास भरले. तोपर्यंत मामूने सारे मेंबर जमवले. सर्वांना भरलेले ग्लास देत सरपंच म्हणाले,

"मेंबरानो, आज एका महत्त्वाच्या कामासाठी बलीवल हाय."

"तर मंग म्हत्वाचे काम आसल तव्हाच तर इंग्लिश देली हाय की."

"तर काम आस हाय की ,आज हाय पाच तारीख.पंद्रा तारकेला तालुक्याला मुख्यमंत्री येणार हायेत."

"मुख्यमंत्री येणार हायेत? मंग आपून काय हार घालायचे का?"

"हार घालाय म्या हाय. आपलं गाव तालुक्याच्या जवळ हाय. तव्हा जमल तर सम्द गाव नेवाव..."

"पर त्यो काय काडून देणार हाय? उगाच पैश्याचा चुराडा करायचा."

"आबे, गधड्या, गावातून येक टरक न्येयाचा हाय. पैक्याची काळजी नग. जेवाय बी मिळल..."

"आस म्हण्ता व्हय, मंग येकच कावून धा-बारा टर्रक."

"दोन म्हैन्यात जिला परषदेच्या निवडणुका हायेता. तव्हा तिकटं आपल्याला...."

"ये धोंड्या, ही जिला परिषद कोठं ऱ्हाती रे?"

"ती ऱ्हाती म्हण बंबईला. दिसायला लै नादर हाय हिरोणीवाणी.."

"हं. तरीच तिचं तिकीट काढायच म्हण्त्यात सरपंच. बर..बर, सरपंच तुम्ही लागा तयारीला. म्या आण्तो बंबईच्या ईमानाच तिकीट. मजा मारा मंग त्या हिरोणीसंग...जिलापरषदेसंग.."

"आरे कांदेहो, जिला परिषदेच्या निवडणुका हाईता. मी निवडणुकीला उबा ऱ्हाणार हाय. तव्हा मुख्यमंत्र्यांच्या भासणाला लै मोठ्ठी जन्ता आसली म्हंजी त्येंच्यावर दबाब येतो आन मंग त्ये ...."

"मंग तस्स म्हणा की च्यामारी! आँ...आँ.. जिला परषदेचं तिकीट म्हंजी काय एखांद्या बड्या हिरोणीच्या डान्सचं तिकीट हाय व्हय...न मिळाया या हाउसफुल्ल व्हायला."

"आन् समजा हाउसफुल्ल झालं तरी बी आपून बिल्याकमध्ये घेऊ की दस का पंद्रामंदी."

"तव्हा समद्या मेंबरांनी आपापल्या वारडातले सम्दे लोक टरकात भरून आणायचे. आजुक एक..."

"आता आणिक काय? दोन घोट इंग्रजीचे पाजले न्हाईत तर....."

"मालक, जेवण तैयार हाय."

"मामू, जरा ठेहरो."

"काय? जेवण बी हाय? काय काम हाय ते पैले सांगा..."

"तर मेंबरानो, आपल्या गावात येक साळा हाय...."

"कोंड्या, साळा हाय का रं?"

"आर हाय की, देवळामांग पत्तुरं उडालेली...."

"आस्स व्हय का? तू म्हण्तोस तर मंग आसल. मला काय ठावं न्हाई. बर सरपंच, येक सांगा, ती साळा ईकून तुमच्या संडासावर पत्तर टाकायचे हाईत की, सलाब टाकायचा हाय का?"

"चूप बईस बे. पिदक्कड साला! त्या साळेला पंचायत समितीने येक खोली मंजूर केली हाय. त्याचं बांधकाम झालं...."

"बांधकाम झालं? पर कव्हा? म्या तर रोज राती साळंकडं जातो पर मला तर दिसलं न्हाई."

"मला बी ठाव न्हाई."

"त्याचं आस हाय, खोली मंजूर झाली हाय पर बांधली न्हाई."

"मंग बांधू की. आम्ही रिकामेच हावोत की. कव्हा यायच ते सांगा. दोनेक टोपले बी घावतील ....."

"साळा आत्ताच बांधायची न्हाई. पैले साळा बांधून झाली आस लेवून पाठवावं लागत्ये तव्हा पैका मिळतो. पैका मिळाला म्हंजी मंग बांधू खोली. त्या रिपोर्टरावर सया आन् आंगुठे लावायचे हाईत."

"हात्तीच्या मारी! खी..खी...खी...खोदा फाहाड निकला उंदीर! येक आंगुठा घ्येयाचा न्हाई तर इंग्लिश काय जेवाण काय? काय बी म्हणा सरपंच म्हंजी लै उदार."

"न्हाई तर काय? अव्हो, सरपंच, तुम्ही येक काय धा ठिकाणी आंगुठे घ्या की कोन्ही बी न्हाई म्हणणार न्हाई. एवढे वळसे घालून जायाचं म्हण्जी? आना ते रजिस्टर आन प्याड. ह्यो आंगुठा तैयारच हाय त्या रजिष्टारचा मुका घ्येयाला." कोंडबा म्हणाला. ठरावाचे रजिस्टर, पॅड, कागद प्रत्येकाकडे करत सरपंचाने दाखविलेल्या जागेवर कुणी सह्या मारत गेले तर कुणी अंगठे लावत गेले. कुणी काय लिहिले आहे ते पाहण्याची तसदी घेतली नाही. सह्या-अंगठे झाले. जेवणे झाली. मामूने तोल जाणाऱ्या सगळ्या सभासदांना त्यांच्या घरी पोहचवले.....

   दुसऱ्या दिवशी सकाळी धोंडबा आणि कोंडबा दोघे एकमेकांना नेहमीच्या हॉटेलमध्ये भेटले. तिथे गावातील अनेक माणसे बसलेली होती. त्यापैकी एक जण म्हणाला,

"काय मेंबरानो, काय खबर हाय? न्हाई म्हण्लं, राती सरपंचाच्या बैठकीत काय गुफ्तंगू चालली व्हती? लय येळ सम्दे बसले व्हते?"

"हां ... हां.. मिटिंगच व्हती. पंद्रा तारखेला तालुक्याला मुख्यमंत्री येणार हायेत. तवा समद्यांना जायाचं हाय." आपण काही तरी नव्याने सांगतो या थाटात कोंडबा म्हणाला.

"मुख्यमंत्री काही देणार आहेत का?"

"आता आनिक त्येंनी काय देवावं? समदं तर हाय की." धोंडबा म्हणाला.

"हे फायलेत का गावाचे मेंबर म्हणं समदं तर हाय की. गावाला काय फायजेत हे बी ह्येंच्या गावी न्हाई. हसाव की रडाव?"

"त्येच आस हाय, काय बी माघायचं काम जन्तेचे. लिडरायचं न्हाई. तुम्ही सांगा काय फायजेत ते. आम्ही सांगतो की मुख्यमंत्र्याला." एका वेगळ्याच थाटात धोंडबा म्हणाला.

"तुमास्नी जमतेच काय? सरपंचाने देलेल पाणी पियाचं आन् हाडकं मोडून त्याच्याच तंगड्या दाबायच्या. त्यानं दावलेल्या कागदावर आंगुठे लावायचे."

"ह्ये मातर लै व्हते व्हय. आता खात-पेत कोण न्हाई? आम्ही काही सरपंचाच्या ताटाखालचं मांजर न्हाई हावोत."

"मांज्र तरी बरे रे. गावात रस्ते न्हाईत, दिवे न्हाईत, पियाचं पाणी न्हाई, पोऱ्हांना बसायला साळा न्हाई आन् म्हणं काय फायजेत?"

"ह्येंची रात टाइट झाली म्हंजी मिळाल सम्द..."

"रस्ते झाले, पाइपलाइन झाली, साळा बांधुन ह्यांनी दिवे लावले की...समद काही कागदावर..."

एक एक माणूस काही तरी बोलत असताना धोंडबा, कोंडबा तिथून हळूच सटकले. गावालगतच्या

विहिरीवर येऊन बसले. दोघांचेही चेहरे थोबाडीत मारल्यासारखे झाले होते.

"धोंड्या, काय बी म्हण, पर आपलबी चुकते रे."

"हां यार, आपून गावचे लीडर मेंबर. आपून का म्हून गुमान आंगुठे लावावं? साली ती परदेशी दिसली की मस्तकात वळवळ सुरू होते आन् जीभेवर लाळ जमा व्हते."

"न्हाई तर काय दिमाखात कीडा वळवळू लागला की..."

"पर आता आपल्याला जाग व्हायला फायजेत. गावाचं भलं कराया फायजेत."

"पर सालं त्या सरपंचासमूर बोलती बंद व्हती."

"न्हाई तर काय. बर ते जाऊ दे. आपली चंगळ व्हती ना मंग झाले. गाव, जनता आन् ईकास जाऊ दे खड्ड्यात."

"आर पर म्होरच्या निवडणुकीत कसं व्हावं?"

"आरे, जाऊ दे. ही जन्ता बी येडी आन् गमतीची हाय. आपल्याम्होरं समदे बोंबलतात पर त्या सरपंचासमूर समदं गाव दावणीला बांधलेल्या बैलावाणी गपगार ऱ्हाते."

"मंग आपूनबी गुपचाप ऱ्हायाचं. सरपंच हायेत ना मंग गुमान फायाचं. इलक्सन आलं की सरपंच कोणाम्होरं काय तर कोणाम्होरं काय फेकतो आन मंग जनता बी ....."

"आपल्याला मतदान करते. पाच वरीस हायेच मंग इंग्लिस आन तंगडी...."

"न्हाई तर आशीच जनता समद्या खेड्यात हाय."

"आन आपल्यावाणी मेंबरं, आन सरपंचबी हाईत की.."

"आन म्हणून देसाची काय म्हन्त्यात ती पा..क..सा...न्हाई बा..द..सा..ही...न्हाई.. न्हाई बालुशाही..सालं दोन घोटाबिगर काय आठवत बी न्हाई. हां..हां..आठीवलं...घोट म्हणल्याबराबर आठीवलं...लोकशाही जित्ती हाय."

सभेला दोन दिवस बाकी असताना सरपंचाने ग्रामपंचायतचे सदस्य, पोलीस पाटील आणि इतर काही लोक सोबत घेऊन गावात फेरी मारून साऱ्या गावाला सभेला यायचे आमंत्रण दिले. सभेला जाण्यासाठी ट्रकची व्यवस्था असल्याचेही आवर्जून सांगितले. गावात सभामय वातावरण निर्माण झाले. मनात नसतानाही सभेला जायला तयार होऊ लागले. कोंडबा-धोंडबा या जोडगोळीची तयारी जोरात सुरु होती. सभेच्या अगोदरच्या दिवशी सरपंचाकडून साबण नेऊन कपडे धुतले. पांढऱ्या कपड्यांना नीळ असली म्हणजे मोठा पुढारी दिसतो या विचाराने दोघांनीही भरपूर नीळ पाण्यात सोडून त्यात आपापले कपडे भिजवले. कपड्यांना कडक इस्त्री केली. त्या सायंकाळी पुन्हा सरपंचाने कोतवाल, ग्रामपंचायतचे सभासद यांना घरोघरी पाठवून सकाळी नऊ वाजता तयार राहावे असा निरोप पोहचवला.                                                                 

 त्या दिवशी संध्याकाळी धोंडबा-कोंडबासह सारे कार्यकर्ते सरपंचाच्या बैठकीत जमले. सर्वांना भरलेले ग्लास देताना मामूची तारांबळ उडत होती. सरपंच मामूला वारंवार बजावत होते,

"मामू, कुछ बी व्हईल पर किसिको कुछ कम नही पडने का. खानेका देखो..."

"जी अच्छा!" मामू म्हणाला.

"तर मेंबरानो, उद्या कुठं जायाचं हाय?"

"आपले पंतपरधान येणार..."

"ये चूप. तुला ठाव न्हाई, उंद्या की न्हाई होमहवन मिनिष्टर येणार ..."

"आरे मेंबरानो, कमी प्या रे. उद्या मुख्यमंत्री येणार आहेत."

"म्या म्हन्लो होतो ना, पर तुमास्नी मह्यापरीस सरपंचाच ग्वाड लागते."

"फाटे समद्यांनी बराबर नवाला येयाचं. वारडातल्या लोकांना घिऊन."

"तुम्ही नगा काळजी करु. आम्ही सांगल्यावर वारडातले लोक येत न्हाईत म्हंजी काय? पर मह्या घरी घड्याळ न्हाई हो."

"आर, रेडू तर आसल की."

"हाय. पर खराब हाय. तसा लागतो कंदीमंदी."

"मंग त्येच्या भरवशावर ऱ्हाऊ नगस. कोंड्या, रेडू बिघडला म्हंजी त्यातल घड्याळ बी बिगडल आसणार बघ."

"हां आता मला घावलं बघ. रेडू बिगडायच्या पैले म्या परसाकडून आल्यावर बातम्या लागायच्या पर रेडू बिगडला आन आता परसाकडला जायाच्या आधीच बातम्या लागत्यात. बराबर हाय. रेडू बिघडला म्हंजी त्यातली घडी बी बिघडली आसणार."

   सभेच्या दिवशी सरपंच, सभासद आणि विशेषतः धोंडबा-कोंडबा यांची घाईगडबड चालली होती. सकाळी लवकर उठून ते दाढीच्या दुकानात गेले. तीनतीनदा वस्तरा फिरवायला लावून दाढी घोटू- घोटू करून घेतली. दोनदोन वेळा पावडर फासून नीळ लावलेले, कडक इस्त्री केलेले कपडे घालून तयार झाले आणि लग्नाला निघण्याची वेळ झाल्याप्रमाणे ते वॉर्डातल्या लोकांना बोलावून आणत होते.आपापल्या वार्डातील शेवटचा माणूस घराबाहेर काढून ते सरपंचाच्या बैठकीत आले. सारा गाव तिथे जमा झाला होता. त्या दोघांना पाहताच सरपंच म्हणाले,

"हऱ्या, नाऱ्या, इकडे या."

तसे ते दोघेही लगबगीने बैठकीच्या मागे असलेल्या खोली पोहोचले.त्यांना पाहताच सरपंच म्हणाले,

"का रं, आली का समदी माणसे?"

"तर मग, मालक, समदा गाव जमा केला?" सरपंच काढत असलेल्या बाटलीकडे पाहात धोंडबा म्हणाला.

"कोंडू-पांडू, मारा येक येक पेग आणि येक काम करायचं आहे..."

"येकच काय धा कामबी सांगा की."

"गावातील माणसं टरकात बसली आन् तालुक्याचं गाव आलं की, जोरजोरात घोसना देयाच्या..."

"कोन्त्या घो....घो...घोसना..."

"त्याच आपल्या.. मुख्यमंत्र्यांचा...इजय आसो. तारापुरचे सरपंच झिंदाबाद! तारापुरच्या सरपंचाला जिला परिषदेचे तिकीट मिळालच फायजेत. आपल्या गावातील समदी माणसं स्टेजच्या म्होरी घिऊन बसायचे आन् मुख्यमंत्री स्टेजवर आले रे आले की, समदे मिळून बेंबीच्या देठापासून बोंबलायचे. काय ऱ्हाईल का ध्यानात?"

"सरपंच, तुम्ही बिनधास्त ऱ्हावा. आसं वरडतो ना की, मुख्यमंत्र्याला तेथल्या तेथ तिकीट फाडून तुमास्नी देवाव लागल."

   बरोबर नऊ वाजता ट्रक येऊन उभा राहिला. जमलेले सारे माणसं आत बसली. सरपंचांनी जीप काढली. त्यांच्यासोबत जीपमध्ये दहा-बारा लोक बसले. घोषणा देण्यासाठी सरपंचाच्या सांगण्यानुसार धोंडबा-कोंडबा ट्रकमध्ये बसले. सरपंचाने जोडगोळीला खुणावले आणि ते जीपमध्ये बसले. तसा धोंडबा बेंबीच्या देठापासून ओरडला,

"तारापुरचे सरपंच....." परंतु घोषणा द्यायच्या आहेत हे कुणालाही माहिती नसल्यामुळे त्याला साथ मिळाली नाही. त्यामुळे केवळ कोंडबाच जोरात म्हणाला,"विजयी असो..."

ते ऐकून दुसऱ्या वेळी मात्र लोकांनी चांगली साथ दिली. गावाच्या बाहेर येईपर्यंत जोरदार घोषणा सुरु होत्या. ट्रक गावाबाहेर येताच घोषणा मंदावल्या. सरपंचाची जीप पुढे निघून गेली. तशी ट्रकमध्ये बसलेल्या लोकांची आपसात चर्चा सुरू झाली.....

"आपला सरपंच म्हणजे बस. कमालीचा माणूस आहे. येळ जाऊ देत न्हाई. बोंबलणार आपून आन् तिकीट मिळणार सरपंचाला."

"आर, सरपंच कुणाचा ? आपलाच की." कोंडबा म्हणाला.

"आपला न्हाई रे, तुमचा. तुम्हाला दारु आन् कोंबडा देणारा..." कुणी तरी कोंडबाला खडसावत असताना शहर दोन तीन किलोमीटर अंतरावर असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या मैदानावर पन्नास-साठ पोलीस आणि शे-दीडशे खादी कपडे घातलेले पुढारी जमलेले पाहून एका जणाने विचारले,

"इथं कावून जमलेत हे लोक? इथं तर सभा न्हाई की?"

"इथे हेलीपॅड तयार केले आहे. मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने आधी इथे उतरतील आणि मग कारमधून तिकडे येतील." ट्रकमध्ये बसलेला एक कॉलेजकुमार म्हणाला.....

   ट्रक सभास्थळी पोहोचला. तारापुरकरांना व्यासपीठाच्या एकदम समोर बसवून सरपंच स्वतः व्यासपीठावर बसले. सरपंचाने खुणावले तसा धोंडबा ओरडला,  "मुख्यमंत्र्याला जिला परिषदेचं तिकीट....."

"मिळालच फायजेत." त्याला जोरदार साथ मिळाली. व्यासपीठावर बसलेल्या व्यक्तींनी चमकून, दचकून त्या आवाजाच्या दिशेने पाहिले. त्यांना काही अर्थबोध होत नव्हता. जो तो एकमेकांच्या कानात काही तरी बोलू लागला. घोषणा देत असताना कोंडबा-धोंडबा सरपंचाकडे पाहात होते. ते खुण करून काही तरी सांगत होते. गावकरी जोरजोरात ओरडत होते.......

"मुख्यमंत्र्याला जिला परिषदेचं तिकीट........ मिळालच फायजेत...."

तारापुरकरांच्या घोषणा ऐकून इतर गावातील लोकही घोषणा देऊ लागले. त्यामुळे उडालेल्या गोंधळात कोण काय घोषणा देत आहे ते काहीही समजत नव्हते. वेळ जात होता. मुख्यमंत्र्यांचे आगमन होत नव्हते. त्यामुळे घोषणाबाजीचा जोर, जोम, जोश कमी होत असतानाच एक, दोघे उठून सभेच्या ठिकाणापासून काही अंतरावर असलेल्या गुत्त्यावर जाऊन देशीचा स्वाद घेऊन येताच त्यांचे देशप्रेम उफाळून येत होते. घोषणांचा जोर वाढत होता. काही वेळाने सरपंच व्यासपीठावरुन खाली आले. ते धोंडबाला म्हणाले,

"काय म्हणताय बे मुर्खांनो?"

"मुख्यमंत्र्याला..."

"तसं न्हाई बे. मुख्यमंत्र्याला न्हाई रे. तारापुरच्या सरपंचाला...जिला परषदेचं तिकीट मिळालच फायजेत अस म्हणा."

"आर तिच्या मायला अस हाय न्हव. म्हणा रे....."

   मुख्यमंत्र्यांची वाट पाहता पाहता सायंकाळही झाली परंतु मुख्यमंत्र्यांचे आगमन होत नव्हते. तितक्यात दहा-बारा कार व्यासपीठाच्या दिशेने येत असलेल्या पाहून लोकांमध्ये अचानक जोर चढला. पांगलेले लोक मुख्यमंत्री आले असे समजून धावत आले. कारमधून उतरलेले लोक व्यासपीठावर पोहोचले. खुर्च्यांवर बसले. परंतु टीव्हीवर दिसणारा मुख्यमंत्र्यांचा चेहरा दिसत नव्हता. त्यातला एक जण माइकवर येऊन म्हणाला,

"जमलेल्या बंधूंनो, आपण सकाळपासून माननीय मुख्यमंत्री साहेबांची वाट पाहात आहोत. आत्ताच त्यांच्या सचिवांचा फोन आला आहे. ते म्हणतात, वातावरणात हवा जास्त सुटली आहे. तसेच हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री महोदयांना सर्दीचा त्रास होत असल्यामुळे त्यांनी आजचा दौरा रद्द केला आहे. ते आपल्याला भेटायला, आपल्याशी संवाद साधायला नक्कीच येणार आहेत. तेव्हा सर्वांनी पुन्हा आजच्याप्रमाणे यावे. ही विनंती.."

ते ऐकून सारे परत जाण्यासाठी ट्रककडे धावले परंतु तिथे ट्रक किंवा इतर कोणतेही वाहन नव्हते. सभा रद्द झाली असल्याची कुणकुण आधीच लागल्यामुळे वाहनांनी पोबारा केला होता. तितक्यात तारापुरच्या सरपंचाची जीप धुरळा उडवत कोंडबा-धोंडबाच्या समोरून निघून गेली......                                         


Rate this content
Log in