STORYMIRROR

Shobha Wagle

Classics Fantasy Inspirational

4  

Shobha Wagle

Classics Fantasy Inspirational

रम्य ते बालपण

रम्य ते बालपण

7 mins
316

रम्य ते बालपण

या बालांनो या रे या

लवकर भरभर सारे या

मजा करा रे मजा करा

आज दिवस तुमचा समजा

ही भा.रा. तांबेंची कविता वाचली की नकळत मन बाळपणात डोकावते. खरंच बालपण मजा मस्ती करायचेच दिवस. प्रत्येक जण आपल्या बालपणातूनच मोठा झालेला असतो. ते मग गरिबीत असू दे अथवा श्रीमंतीत. खेळ जरी वेगवेगळे असले तरी त्यातला आनंद, उत्साह, मजा, मस्ती सगळ्यांचे सारखेच. 'रम्य ते बालपण', म्हटलंय ते काही खोटं नाही. बालपण सुंदरच!

वय वाढत असलं तरी मन कधी कधी बालपणाच्या आठवणीत रमून जाते. मन आनंदी, उत्साही होते व किती आल्हाददायक वाटतं! खरोखरच बालपणाचा काळ परम सुखाचा होता. बाल्यअव्यस्था, निरागस वृती, साधा भोळेपणा, "हम सब एक हैं" ही भावना. जात-पात नाही, फक्त समभाव. कुणाच्याही घरी जाणं येणं, खाणं पिणं, समता, एकोपा व आपुलकी होती. सगळ्यांच्या आयांना सुद्धा सगळी आपलीच मुलं वाटायची व मुलांना सुद्धा तशीच त्यांची ओढ होती.

बालपणातले खेळ सुध्दा भारीच असायचे . आताच्या मुलांना ते खेळ माहीत तर नाहीतच पण त्यांची साधी नावेही माहीत नाहीत. लगोरी, विटीदांडू, आट्या पाट्या, सात गोल वर्तुळात खपराचा तुकडा टाकून लंगडी खेळणं, सारीपाट (टाबुल फणा), जमिनीत खड्डा घालून सागर गोट्यांनी खेळणं, पकडा पकडी, चोर पोलिस, भातुकली, शाळा शाळा, सोंगट्या उडवुन उचलुन घेणे, पोहणे, झाडावर माकडासारखे चढणे व लोंबकळणे.

मुलामुलींचे वेगळे खेळ असले तरी सगळी भावंड व शेजाऱ्या पाजाऱ्यांची मुलं सगळेच खेळ खेळत होतो. त्यामुळे वेगळेपणा काही वाटलाच नाही.

सर्वात मोठा व सगळ्यांचा सहभाग असलेला खेळ म्हणजे भातुकली. "भातुकलीच्या खेळा मधली राजा आणि राणी....." हा खेळ मी दोन्ही वर्गांमध्ये खेळलेले आहे. मघ्यम वर्गाच्या व गरीब वर्गाच्या मुलां बरोबर. खेळ एकच, पण भातुकलीतल्या वस्तू कमी जास्त किंमतीच्या असायच्या. म्हणजे एकाची बाहुला बाहुली भारी वाली, मोठी व रब्बरची, तर दुसऱ्यांची साध्या प्लस्टीकची. तसेच त्यांचे बहुल्यांना दागिने, माळा, जरीचे कपडे, जेवणाकरता बिस्किट, चाँकलेट, लिम्लेटच्या गोळ्या वगैरे तर इकडे चणे, कुररमुरे, दाणे, कैरी, पेरू, चिंचा, बोरे हे

असायचं. एक मुलगा बाहुला पकडायचा तर एक मुलगी बाहुली धरून बसायची. खरोखरच लग्न करतात, तसाच उत्साह बँडबाजा, जेवणाच्या पंगती. शेवटी पाठवणी व खोट खोट रडणं सुध्दा. किती किती मजा असायची त्यात!

शाळेतली एक गमंत आठवते. त्या काळच्या सर्व मुलांनी ती केलेली असेलच! शाळा सुटायच्या आधी गुरुजी परवचा-पाढे म्हणायला सांगत. म्हणजे एका मुलाने बोलून दाखवायचे, व बाकीच्यांनी ते परत म्हणायचे. अशा वेळी बाराखडी म्हणताना जाम धमाल व्हायची. खु खू, गु गू, तु तू, दु दू, क्षि क्षी हे म्हणत असताना तसे आवाज काढत असू की आमची हसून हसून पूरी वाट लागायची . ते ही गुरूजींना न कळता. पाढे अशा रितिने म्हणत असल्याने चांगले पाठ व्हायचे. आता सुध्दा तोंडपाठ आहेत.

मी आणि बकुळीची फुले आमचे अतुट नाते. मंगेश पाडगावकरांच्या "टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले", तशी बकुळीची फुले आम्ही वेचत असताना आमच्या अंगावर पडायची. आमचं घर मोठं. वेगवेगळ्या बिऱ्हाडांचं. मे महिन्याच्या सुट्टीत सगळी मुलं एकत्र असायची. आम्ही सगळी भावंड पहाटे रस्त्यावर असलेल्या बकुळीची फुले गोळा करायला जात असू. आमच घर मोठं असल्या कारणाने दरवाज्याला अडसर लावलेला असायचा. आम्ही लहान असल्याने कुणालाच तो दरवाजा उघडता येत नसे. घरातल्या कोणी मोठ्या माणसाने तो उघडला की आमची धावायची स्पर्धा लागायची.

रस्ता थोड्या उंचावर होता. मी, माझा मोठा भाऊ आणि माझ्या दोन चुलत बहिणी व एक भाऊ अशी आमची टिम भर भर बकुळीची फुले वेचत असू व वाऱ्याच्या झुळके बरोबर ती टप टप आमच्या अंगावर पडत असत. कोण जास्त फुले गोळा करतोय याची आमच्यात चढाओढ लागे. मग आम्ही ती गुंफत असू. माळा बनवून आम्ही देवाला व सगळ्यां बायकांना देत असू. आता आमच्या घरी श्री मंगेशाचा प्रसाद येतो त्यात सुकलेली सुगंधित बकुळी असतात व ती बघितल्यावर माझी बालपणची आठवण ताजी होते.

बालपणचे असे बरेच सारे खेळ आहेत. त्यांची एक एक आठवण अशी काही मनात रुतलेल्या आहे की आता सुध्दा मन त्या बालपणात जातं व एवढा आनंद होतो की काय सांगू, "आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे." एखादे वेळी मन नाराज झालेले असेल तर ह्या आठवणीने प्रफुल्लीत होते. लगोरीत तर धमाल व्हायची. लगोरी फोडल्या नतंर एकावर एक लगोऱ्या लावतांना एवढी तारांबळ व्हायची की तोपर्यंत पोरं येऊन पाठीवर जोरात धम्मक लाडू द्यायचे. त्या आठवणीने आता सुध्दा पाठीतून गोड कळ येते. 

लपाछपीच्या खेळात आम्ही एक गाणं म्हणत असू. ते मी माझ्या कोकणी भाषेतच लिहीते. एक मुलगी दुसरीला आपल्या समोर बसवून तिचे डोळे आपल्या हातानी झाकायची व गाणं संपल की तिला पाठून ढकलून तिच्या नवऱ्याला शोधायला पाठवायची. ते गाणं "आपा-लिपा, छाय-लिपा छायच्या गुणा शोधून ये, चल घोवाक शोधी" 

श्रावण महिन्यात पत्री फुले गोळा करताना, झाडावर चढून पेरू-आवळे खाताना, तसेच दगड मारून काढताना मारलेला दगड कुठच्या कुठे जायचा. तर कधी कुणाच्या टाळक्यात बसायचा. मग बोंबाबोंब. घरच्यांकडून ही बोलणी आणि मार मिळायचा. मग चार दिवस सगळ्या उचापत्या बंद. पण काही दिवसांनी " ये रे माझ्या मागल्या".

अशा बालपणीच्या आठवणींना काही तोटा नाही. पण एक मात्र खरे, त्याकाळी एकत्र कुंटुब पद्धती असायची. त्यामुळे सख्खे-चुलते सगळे एकत्र राहायचे. प्रत्येकाला भावंडे ही जास्त असायची. एक घर म्हणजे एक गोकुळ, नंदनवनच असायचे. एक वेगळाच आनंद वाटायचा. खेळायला कोणी नाही असं आजच्या सारखा प्रश्न त्याकाळी नव्हता. माझी घरातली एवढी भावंड होती की एका मैदानातली मुलेच!

अभ्यास, खेळ झाला की संध्याकाळी दिवे ल़गणीच्या वेळी हात पाय धुवून सगळेजण देवा समोर बसून शुभं करोती, मनाचे श्लोक, पाढे, परवचा म्हणत असू व त्याच कारणाने आज सगळं तोंड पाठ आहे.

एकत्र कुंटुब असल्या कारणाने संस्कार आपोआप होत गेले. मोठी भावंड, चुलते, आत्या ज्या प्रमाणे मोठ्याचा आदर ठेवत त्याच प्रमाणे लहान भावंडे सुध्दा त्यांचे अनुकरण करत गेली. संस्कार कुणी वेगळे शिकवले नाहीत तर ते आपोआप मनात रुजले गेले. मोठ्यांचे अनुकरण केलं व तेच अंगवळणी पडलं व आज पर्यंत त्यांची जोपासना ही केलेली आहे.

मोठ्यांचा आदर करणे, सणासूदीला मोठ्याच्या पाया पडणे व त्यांचे आशिर्वाद घेणे, आपल्या खाऊची विभागणी करून दुसऱ्यास देणे, जर कमी किंवा एकच असेल तर चिमणीच्या दातांनी एकमेकांना वाटून खाणे हे सगळं त्याच वेळी शिकलो.

सर्वांनी एकत्र बसून जेवणे. "वदनी कवळ घेता, नाम घ्या श्रीहरीचे" म्हणून जेवणे व झाल्यानंतर ताटाला नमस्कार करणे ही आपली भारतीय संस्कृती. आपल्या पारंपारीक पद्धती जोपासणे व त्यांचे पालन करणे हे सर्व आपण एकत्र कुंटुबातच चांगल्या तऱ्हेने शिकू शकतो.

आता ह्या एकवीसाव्या शतकात सगळच बदललंय. शहरीकरण वाढत चाललयं. टेक्नॉलॉजीचा वापर ही खूप झालायं आणि फार महत्वाची गोष्ट म्हणजे विभक्त कुंटुब पद्धती सगळीकडे फोफावलीय. तसेच पूर्वी प्रत्येकाला दोन चार भावंडे असायची. आता तसे नाही. सरसकट आजकल प्रत्येकाला एकच मुल असतं तर फारच कमी जणानां दोन ते तीन. त्यामुळे आजची बहुतेक मुले एकटी पडतात.

आमच्यावेळी मुलांच्या आया जास्त करून गृहलक्ष्मीच असायच्या. आता आई वडील दोघंही कामावर जातात. आजी आजोबा पण सर्वाचे सोबत रहातातच असे नाही. एक तर ते गावी असतात किंवा वृद्धाश्रमात. याला काही अपवादही आहेत पण फार कमी.

एकुलतं एक मूल पगारावर ठेवलेल्या आयाच्या खाद्यांवर वाढते. आजी आजोबांचे प्रेम हरवलेले. तर काही जणांना तर आई बाबाचा सुध्दा पूर्ण वेळ मिळत नसतो. ही मुलं पाळणा घर, शाळा व सांभाळायला ठेवलेल्या आया बरोबर असतात. त्यामुळे ह्या मुलांची वागायची पध्द्त फार वेगळी असते. ही एकलकोंडी असतात. सहसा कुणाशी मिसळत नसतात. यात ह्या मुलांचा काहीही दोष नसतो. तसे मी त्यांच्या पालकांना ही दोष देत नाही.

आज एकटा कमावणारा असेल तर संसार करताना त्याच्या नाकी नऊ येत, कारण महागाईच एवढी आहे की त्यांचा नाईलाज होतो. एकुलता एक जरी असला तरी त्याची शाळा, पुस्तके, कपडे, खेळणी, खाणे पिणे सुध्दा एकट्या कमावणाऱ्या माणसाला फार जड जातं. तसेच आज मुली ही खूप शिकल्यात. काही तर पुरूषांपेक्षा वरचढ आहेत. त्या आपल्या करियर सांभाळतात. अपवादाने कही जणी नवऱ्या पेक्षाही जास्त कमवतात. पैशांची आवक भरपूर असते, नसतो तो फक्त वेळ. पैसे फेकुन त्यांना सगळं मिळवता येतं.

वाडवडिलांबरोबर राहत नसल्याने संस्कारी वळण असतं तेही त्यांना मिळत नाही. आजच्या मुलांना खेळ मोजकेच माहीत असतात. बाकीचे खेळ खेळण्यास जागा नाही तर बरोबर सवंगडी ही कमीच. आज मोबाईल, लॅपटॉप, दूरदर्शन यांचा भरमसाट वापर होत आहे. कामा करता ठीक पण यांचा प्रसार एवढा झालायं की ह्या लोकांना वेड लागलयं की काय अशी शंका येते.

मोठी माणसे त्याच्यावरच काम काज करत असतात म्हणा, पण ही आताची मुले सरसकट मोबाईल घेऊन तासन् तास गपचूप त्याच्यावर व्यस्थ असतात. आई बाबांचा मोबाईल तर ती घेतात तर काही पालक स्वतः त्यांना वेगळा घेऊन देतात. जी लहानपणी एक एक पैशाचा हिशेब ठेवत होती तिच आजची युवा पिढी स्वतःच्या मुलांना मला नाही मिळाले त्याची भरपाई म्हणून मुलांना भरमसाठ देतात. आणि ईथेच मोठा अनर्थ होतो.

आजच्या मुलांना घरी आजी आजोबांचे मायेचे पांघरूण कमी आहेच त्याच प्रमाणे आजची शिक्षण पध्द्त ही पूर्वी सारखी नाही. आमच्या वेळी शिक्षकांची भिती व त्याच बरोबर शिक्षकां विषयी आदराची भावना होती. पालकांचा शिक्षकांवर पूर्ण भरवसा होता. शिक्षक म्हणेल ती पूर्व दिशा असायची. सरस्वती पूजा करूनच, शिक्षकाला गुरु मानून त्या मुलांच्या शिक्षणाचा "श्री गणेशा" त्या शिक्षका कडून व्हायचा आणि त्या काळी शिक्षकही खरोखरच हाडाचे शिक्षक होते.

पण आता तस काही नाही. शिक्षकही तसे नाहीत की पालकही. आणि मुलं तर काही विचारूच नका. आज काही अपवाद सोडले तर शिक्षकच मुलांना व पालकांना वचकून असतात, हे जरी काही असलं तरी आजच्या मुलांच बालपण खूपच हरवलंय. त्यांचा अभ्यास, गृहपाठ, प्रकल्प,क्लासेस, शिकवणी इत्यादीने त्यांना अक्षरशः जखडून ठेवलयं. हे एवढच नसून त्यानां वेगवेगळ्या स्पर्धेत, टेलेंट स्पर्धेत, भाग घ्यायला लावतात. मला वाटते मुलांपेक्षा त्याच्या पालकांनाच ह्या चढाओढीत जास्त रस असतो.

सर्वानी एक लक्षात घ्यायचं. दिवस, वर्षे सरत जातात. बालपणाचा ही एक काळ असतो. प्रत्येक मुलाचा त्यावर हक्क असतो. बऱ्याच मुलांना गरिबीमुळे लहान वयातही काम करावं लागतं. जरी सरकारने कायदा काढला की चौदा वर्षा खालील मुलांनी काम करायचे नाहीत, कायदेशीर कारवाई केली जाईल, तरी गरिबीमुळे काही मुलांना ती करावी लागतात. पण मग आजकाल चाललेल्या रियालीटी कार्यक्रमा मध्ये काय चाललंय. एवढी एवढी चिमुकली पोरे शाळा खेळ सर्वं सोडून त्या कार्यक्रमात असतात, त्यानां कोण पाठवतं? ह्या बाल कामगाराचे उत्तर दायित्व कुणाकडे? सर्वच प्रश्न अधांतरी आहेत.

हे जरी काही असलं तरी 'जुने ते सोने ' म्हटल्याप्रमाणे आमचे

बालपण खरंच रम्य होते आज ही आठवण येताच यध त्यात रमून जाते.

     


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics