STORYMIRROR

Nagesh S Shewalkar

Comedy

3.4  

Nagesh S Shewalkar

Comedy

पुरस्काराची ऐसीतैशी

पुरस्काराची ऐसीतैशी

14 mins
237


 सकाळचे दहा वाजत होते. शहरालगत असलेले ते मैदान माणसांनी खचाखच भरले होते. आबालवृध्द सारे एका वेगळ्याच त्वेषाने, उत्साहाने तिथे गर्दी करीत होते. प्रत्येकाच्या हातामध्ये काही ना काही वस्तू होती. कुणाजवळ त्यास मिळालेले सन्मानचिन्ह होते. कुणाच्या हातात सन्मानपत्र होते तर अनेकांजवळ सरकारकडून किंवा कोणत्याही संस्थेकडून, मंडळाकडून पुरस्कार स्वरूप मिळालेले बक्षीस होते. अगदी कपाळावर लावायच्या टिकलीपासून ते 'पद्म 'पुरस्कार आणि भारतरत्न या पुरस्कार प्रित्यर्थ मिळालेले सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, महावस्त्र आणि बक्षीस म्हणून प्राप्त झालेल्या रक्कमांचे परतीचे धनादेशही होते. 

"अहो, मला एका संस्थेचा जीवन गौरव हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला होता. सन्मानपत्र नि

सन्मानचिन्ह या स्वरूपात! तेच हे. त्यावर अडगळीत पडलेले सन्मानपत्र, धुळीचे डाग आहेत सारे . रोख रक्कम तर काहीच मिळाली नाही परंतु त्यावेळी पुरस्कार जाहीर करण्यापूर्वी सर्व लोकांकडून म्हणजे ज्यांनी पुरस्कारार्थ पंजिका दाखल केल्या होत्या त्यांच्याकडून संस्थेच्या सामाजिक कार्यास मदत म्हणून पाच-पाच हजार घेतले. सन्मानचिन्ह मोठे होते. ते परत करावयाचे होते म्हणून रात्री सर्वत्र शोधाशोध सुरू केली परंतु सापडले नव्हते. बायकोला विचारले तर ती निर्विकार चेहऱ्याने म्हणाली, एवढी शोधाशोध का करता? तो कप चुलीत घातला तर चहाही उकळणार नाही म्हणून कालच मी भंगारवाल्यास विकून टाकला.."

"मला सांगा, पैसे देऊन तुम्ही हा पुरस्कार मिळवला म्हणजे विकतच घेतला की. तुमच्याप्रमाणे शेकडो लोक आहेत, त्यांनी लाच म्हणून दिलेली रक्कम कोण परत करणार?" ती व्यक्ती विचारत असताना त्यांच्याजवळ एक व्यक्ती आली. त्यांच्या डोक्यावर पट्टी बांधलेली होती, उजवा हात गळ्यात बांधलेला होता. त्या व्यक्तिने विचारले,

"का हो 'पुरस्कार योजनेचा बट्ट्याबोळ.. सॉरी ! शुभारंभ झाला का? मलाही माझे बक्षीस परत करायचे होते."

"अजून झाला नाही. परंतु तुम्हाला हे काय झाले?"

"ही योजना अशी अचानक जाहीर झाली आणि माझी धांदल उडाली. मला चार पुरस्कार मिळाले आहेत. सारे पुरस्कार कागदी म्हणजे सन्मानपत्रवाले मात्र एका पुरस्कारार्थ एक ट्रॉफी मिळाली होती. ती बायकोने कुठे तरी अडगळीत टाकली होती म्हणून आज सकाळी तिचा म्हणजे ट्रॉफीचा शोध घेत माळयावर चढलो. तिथल्या पसाऱ्यात ती कुंकवाच्या करंड्याच्या आकाराचे ते 'करंडक' शोधत असताना अचानक एका उंदराने माझ्या अंगावर उडी मारली. उंदराचा नि माझा छत्तीसचा आकडा ! लहानपणी ताप देणाऱ्या एका उंदराला हुसकावताना त्यास हातातली पेन फेकून मारली आणि तो उंदीर हे जग सोडून गेला तेंव्हापासून त्या मृत उंदराचे वारस बदला घेण्यासाठी हल्ला करतील ही भीती माझ्या मनात कायम घर करून असते. त्यामुळे सकाळी माळ्यावर मुषक दर्शन होताच माझी पाचावर धारण बसली. मी घामाने डबडबलो, माझी बोबडी वळली, अंग थरथर कापू लागले. त्या अवस्थेमुळे शिडीवरून पाय घसरला आणि ही अवस्था झाली. या सन्मानपत्रावर जे डाग आहेत, ते चहाचे डाग आहेत.."

"म्हणजे चहा पाजून तुम्ही हा पुरस्कार मिळवला?"

"नाही हो. पुरस्कार मिळाला तेव्हा मी आणि माझी बायको ज्याला त्याला ते सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र दाखवत सुटलो. सोबत प्रत्येकाला चहासुध्दा पाजत होतो. मी घरी नसतांना पत्नीने गल्लीतल्या काही बायकांना चहाला बोलावले. बायकांना काय हो निमित्तच पाहिजे एकत्र येऊन गप्पा मारायला तर गप्पांचा फड रंगलेला असताना कुणी तरी अवधानाने किंवा अनवधानाने चहाचा कप टेबलावरील या सन्मानपत्रावर ठेवला. ते पाहून इतर बायकांनीही तसेच केले आणि हे डाग.."

"म्हणजे माकडवाल्या माणसाने डोक्यावरची टोपी काढून फेकताच झाडावरील माकडांनी डोक्यावरच्या टोप्या फेकाव्यात त्याप्रमाणे!" 

"अहो, हे पुरस्कार वापसी म्हणजे अस्साच प्रकार आहे ना. एकाने पुरस्कार परत करताच सर्वांनी परत करावेत त्याप्रमाणे !" ही चर्चा सुरू असताना त्यांच्या जवळ दोन मुले आली. काही क्षण तिथे रेंगाळून एक जण म्हणाला,

"काका, पुरस्कार परत करायचे आहेत का?"

"हो, पण गर्दी पाहून थांबलो. गर्दी पुरस्कार परतीचीच आहे ना?"

"होय. तुम्ही फॉर्म घेतलाय का?" 

"कशाचा फॉर्म? पुरस्कार परत करण्यासाठी ?" त्यांच्याजवळ आलेल्या एका व्यक्तिने विचारले.

"येस! या फॉर्मसोबत प्राप्त पुरस्कारार्थ मिळालेले साहित्य परत करून या फॉर्मच्या शेवटी असलेली पावती ही घ्यावी लागते."

"हे फॉर्म कुठे मिळतात ?"

"अहो, काका फॉर्म संपलेसुध्दा. त्या तिकडे स्टेडियमच्या प्रवेशव्दाराजवळ ४-५ खिडक्यांवर पन्नास रूपयाला एक फॉर्म विक्रीसाठी उपलब्ध होता. अवघ्या दहा मिनिटात लाखभर फॉर्म विकल्या गेले. आहात कुठे?" 

"का ऽ य? एक लाख? बाप रे ! आता हो कसं? आपल्याला फॉर्म मिळाले नाही तर?"

"काका, टेंन्शन घेऊ नका. हम है ना ! तुम्हाला फॉर्म देऊ, तो भरून देऊ, कोणत्या टेबलावर तुमचा पुरस्कार परत करायचा तिथे घेऊन जाऊ. तुम्ही पुरस्कार वापस केल्याची तुमच्या फोटोसह झणझणीत बातमी येईल अशी व्यवस्थाही करू.."एक मुलगा म्हणाला.

"तुमची तयारी असेल तर विविध वाहिन्यांवर तुमची मुलाखत येईल ही व्यवस्था सुध्दा करू..." दुसरा मुलगा म्हणाला.

"विचार का करता? काका, पुरस्कार मिळाला तेव्हा जेवढी प्रसिध्दी मिळाली नसेल त्यापेक्षा शंभरपट प्रसिध्दी आम्ही पुरस्कार परतीच्या निमित्ताने मिळवून देऊ.. शंभर टक्के !"

"पण हे सारे करण्यासाठी खर्च?"

"काय काका? पाच हजार रुपये.."

"हे घे पाच हजार रूपये. प्रत्येक वाहिनीवर झणझणीत मुलाखत झाली पाहिजेत.." असे म्हणत एका व्यक्तिने त्या मुलास पाच हजार रूपये देताच इतर दोघा -तिघांनी त्यांचे अनुकरण केले.तितक्यात एक जोडपे अत्यंत घाईघाईने त्या घोळक्याजवळ आले. श्वास वर झालेल्या, घामाने चिंब झालेल्या अवस्थेत त्या स्त्रीने विचारले,

“का हो, पुरस्कार कुठे परत करायचा?"

"कुणाला मिळालाय ?" एका मुलाने विचारले.

"ह्यांना.. म्हणे आदर्श नवरा.. कालच ह्यांना आदर्श नवरा हा पुरस्कार मिळालाय.." 

"व्वा अभिनंदन !"

"अहो, कशाचे बोडक्याचे आलेय अभिनंदन ! आदर्श कशाशी खातात.. मोडून खातात, भाजून खातात, फोडणी देऊन खातात की नुसते चघळतात हेही ह्यांना माहिती नाही आणि यांना पुरस्कार? वा ! अजब, हे सरकार ! दिवसरात्र मर मर मरणाऱ्या स्त्री ला म्हणजे मला 'आदर्श बायको' हा पुरस्कार दिला असता तर त्या पुरस्काराची आणि पुरस्कार देणाऱ्यांची शान वाढली असती. बरे, यांना हे बक्षीस मिळवण्याची एवढी खाज होती ना, की यांनी चक्क सात हजार रूपये दिले हो. संक्रांतीला.. माझ्या हक्काच्या सणाला साडी घ्यायची म्हटलं तर नाक वाकडे करतात, आधीच आठ्या असलेल्या कपाळावरील आठ्यांचे जाळे अधिक घट्ट होते. बरे, कुठे जमा करायचे ह्यांना.. म्हणजे यांनी मिळालेल्या पुरस्काराला. चला हो, पुढे पाहू..." असे बडबडत ती स्त्री आणि पाठोपाठ तिचा आदर्श नवरा निघाले...

    एक स्त्री दुसऱ्या बाईला म्हणाली,"तुला तर माहितीच आहे, आमच्या ह्यांना लेखनाचं वेडं आहे. अग, काल ह्यांना म्हणाले, की तुमचा पुरस्कार परत करा. थोडी बहूत प्रसिध्दी मिळेल. लेखन करून करून आयुष्याची माती झाली, पण तुम्ही लेखक आहात हे कुणालाच समजले नाही. मी असे म्हणताच हे तणतणत गेले आणि पुरस्कार म्हणून मिळालेला नवा कोरा मिक्सर भंगारात विकून आले." 

"मजेशीर आहे, सारे. अहो, एका गृहस्थास चार-पाच कप.. सन्मान चिन्ह मिळाले होते. काल ती व्यक्ती ते सारे पुरस्कार परत करायला निघाली असताना त्याची पत्नी ओरडली, अहो ते कप ठेवा जाग्यावर. ते जर परत केले तर आलेल्या लोकांना चहा कशात देऊ ? या कपांमध्ये चहा दिला ना की सर्वांनाच चहा आणि कप दोन्ही आवडते. राहुद्यात. फुकटात मिळालेले कप ते वर्तमानपत्राची रद्दी विकून चार रूपये तरी मिळतील पण तुमच्या कपांना कुणी भंगारातही घेणार नाही..."

    "हे बघा काका, तुमचे सर्वांचे फॉर्म भरून झाले आहेत. आम्ही सोबत आहोत. पण तुम्हाला इथली सारी व्यवस्था माहिती असावी म्हणून सांगतो.. इथे अनेक टेबल टाकलेले आहेत. प्रत्येक टेबलावर पुरस्कार वापस घेताहेत, त्यांची रचना समजून घ्या. टेबल क्रमांक १ आहे ना, तिथे हे फॉर्म फक्त तपासण्याचे काम सुरू आहे. तुम्ही भरलेल्या फॉर्ममध्ये काही त्रुटी राहिल्या नाहीत ना याची तपासणी होईल. आपण तिथे जायची गरज नाही" 

"का ? फॉर्ममध्ये काही चुका राहिल्या तर आमचे फॉर्म रद्द होतील ना त्यापेक्षा इथे त्रुटी दुरूस्त.."

"काका, फॉर्म आम्ही भरले म्हटल्यावर चुका राहतील कशा ? एक अर्ज तपासायला अर्धा तास लागेल. बघा केवढी मोठी रांग आहे. आपण प्रथम टेबल क्रमांक दोन वर जाऊ तिथे आपणास सन्मानपत्रं आणि सन्मानचिन्ह जमा करावयाची.."

"आणि पुरस्काराची रक्कम कुठे भरायची?"

"बाजूच्या टेबलवर. ज्यांना केंद्र सरकार, राज्य सरकारचा किंवा जिल्हा पुरस्कार परत करावयाचा आहे त्यांच्यासाठी एक स्वतंत्र टेबल आहे," एक मुलगा म्हणाला. 

"ज्यांना महानगर पालिका, नगर पालिका, पंचायत समितीचा पुरस्कार परत करायचा आहे त्यांनी त्या टेबलवर जायचे आहे." दुसरा मुलगा म्हणाला.

"तुमच्यापैकी कुणास ग्राम पंचायत, गणपती मंडळ, दुर्गामंडळ यांच्याकडून मिळालेले बक्षीस परत करावयाचे असल्यास त्यांच्यासाठीही वेगळे टेबल आहे..." तो मुलगा समजावून सांगत असताना एक व्यक्ति म्हणाली, 

"अरे आमच्या बायकोस आणले असते तर बरे झाले असते. तिला परवाच रांगोळी स्पर्धेत प्रमाणपत्र मिळाले आहे."

"काळजी नको काका. हा कार्यक्रम चार-पाच दिवस चालेल. तेव्हा उद्या आणा काकूला आपण वापस करू या.."

“का ऽय ? काकू ला वापस..."

"काका, सॉरी ! त्यांना मिळालेले प्रमाणपत्र परत करूया. अजून एक, विद्यार्थ्यांना मिळालेली पारितोषिके परत घेण्याची वेगळी व्यवस्था आहे."

"त्याच्या बाजूला एक टेबल दिसतोय. तिथे कुणीही म्हणजे, अगदी काळे कुत्रे दिसत नाही..." 

"ज्यांना पुरस्कार परत करायचे नाहीत अशा व्यक्तिंनी तिथे केवळ नोंद करायची आहे. म्हणजे 'पुरस्कार वापसी' या अभियानास त्यांचा विरोध आहे हे सरकारला समजेल." 

"याचा अर्थ अशा व्यक्तिंवर भविष्यात दंडात्मक कार्यवाही होण्याची शक्यता नाकारता येत नाही." "ते आत्ताच कसे सांगणार ? परंतु तिथे अजून एकही नोंद झाली नाही." 

"कशी होईल ? हे म्हणजे एखाद्या कर्मठ, नास्तिक गल्लीमध्ये मटन शॉप उघडण्यासारखे आहे. त्या दुकानाची बोहणीच होणार नाही ना." 

"अरे वा ! बढिया ! परवाच्या दिवशीची गोष्ट आहे, आमचे एक नातेवाईक आहेत त्यांनी त्यांच्या लग्नाची पत्रिका स्पीड पोस्टाने सासऱ्यास परत केली."

"का ? लग्नपत्रिका म्हणजे सन्मानपत्र आणि लग्न म्हणजे काय पुरस्कार सोहळा वाटला की काय त्यांना ?"

"होय! त्यांचे म्हणणे होते, लग्न हा एक प्रकारचा पुरस्कार सोहळा असतो आणि पत्नी म्हणजे पुरस्कार स्वरूप मिळालेले सन्मान चिन्ह ! वास्तविक त्यांना बायकोरूपी प्राप्त झालेले सन्मानचिन्हच परत करायचे होते परंतु पत्नीला परत पाठवावे तर एक म्हणजे भरमसाठ मिळालेला सासऱ्यांनी परत मागितला असता आणि दुसरे म्हणजे पत्नीला परत पाठवून खाण्यापिण्याचे हाल होतील ते वेगळेच म्हणून त्यांनी प्रतिकात्मक निषेध म्हणून लग्नपत्रिकाच दिली पाठवून!"

"मजेशीर आहे. माझ्याशेजारी शंभरी गाठलेले तरतरीत गृहस्थ आहेत. ते दररोज आमच्या अपार्टमेंटला असलेल्या पन्नास पायऱ्यांची चढ-उतार दिवसातून किमान दोन वेळा करतात. या त्यांच्या निरोगी आरोग्याची दखल घेऊन आम्ही त्यांना 'म्हातारे अर्क' हा पुरस्कार दिला आणि हा पठ्ठ्या आज सकाळी इथपर्यंत दहा किलोमीटर अंतर चालत आला आणि तो पुरस्कार परत करून गेला."

"बरे, मुलांनो, एक सांगा, खूप वेळापासून विचारीन... विचारीन म्हणतोय, सांगू शकाल, ह्या जमलेल्या साहित्याचं सरकार काय करणार आहे ?" 

"काका, ती अंदर की बात है... कुणाला सांगू नका परंतु अत्यंत गोपनीय माहितीनुसार या सर्व साहित्याचा जाहिर लिलाव करण्याची योजना तयार आहे." 

"पण ह्यास घेणार कोण?..."

"काका, समजा त्या चाळसुंदरीच्या महावस्त्राचा लिलाव येथे झाला तर..." 

"वाट्टेल ती किंमत देऊन मी ते घेऊन..." खिशातली कवळी काढून ती तोंडात बसवत ते गृहस्थ म्हणाले. 

"अशीच माणसे सरकार हवी आहेत ना. टेबलाखालून पैसे देऊन अनेकांनी पुरस्कार मिळवले होते.

सरकार आता तेच पुरस्कार परत विक्री करून करोडो रूपये शासकीय

तिजोरीत भरण्याच्या विचारात आहे." 

"काय डोके आहे सरकारचे? एकीकडे आपण सरकारचा निषेध म्हणून पुरस्कार वापस करीत आहोत आणि?शासन त्यातून प्रचंड पैसा जमा करण्याच्या विचारात आहे.. "

   "निषेध ? कशाचा ? कुणाचा ? मोर्चा काढायचा आहे की उपोषण करायचे आहे ? आमची कंपनी अशाच कामांसाठी वाट्टेल तेवढी माणसं अल्पदरात पुरवते. कसे आहे, हे असे शांततेच्या मार्गाने पुरस्कार परत करून ना सरकारला जाग येते, ना तुम्हाला प्रसिद्धी मिळते. ह्या कुंभकर्णी असहिष्णू सरकारला जागे करायचे असेल ना तर मोर्चा, घोषणा यामधून शासनाच्या, राजकारण्यांच्या कानठळ्या बसल्या पाहिजे..." तिथे रेंगाळणाऱ्या माणसांपैकी एक व्यक्ति म्हणाली. मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करून एकाने त्या मुलांना विचारले, 

"बाबांनो, तुम्ही एवढी मेहनत घेताहेत, त्याचा मेहनताना आम्ही देत आहोत ही बाब निराळी पण सरकार तुमच्या या कार्याची दखल घेणार आहे का नाही ?"

"काका, ज्या स्वयंसेवकांकडून अधिकाअधिक लोकांना पुरस्कार वापसीसाठी प्रवृत्त केले जाईल त्यांना म्हणजे आमच्यापैकी काही जणांना 'पुरस्कार वापस करणार नाही !' या अटीवर शासन पुरस्कार देणार आहे. त्यासाठी जे लोक पुरस्कार वापस करणार नाहीत अशा लोकांना प्रत्यक्ष भेटले, त्यांचे मन वळवून त्यांना पुरस्कार वापसीसाठी प्रवृत्त करण्याची मोहीम आमच्या संघटनेमार्फत लवकरच सुरू होणार आहे. राहता राहिला मानधनाचा प्रश्न, तर त्यासाठी आम्ही न्यायालयाचा दरवाजा खटखटणार आहोत..." तो मुलगा सांगत असताना त्या जत्थ्यातील एक गृहस्थाचे लक्ष दूरवर असणाऱ्या माणसाकडे जाताच तो ओरडला, 

"अण्णासाहेब, ओ... अण्णासाहेब..." काही क्षणात अण्णांचे लक्ष तिकडे गेले आणि ते लगबगीने तिथे येत म्हणाले,

"अरे, नानासाहेब, केला का पुरस्कार परत ? " 

“हो, केला. ही काय पावती, तुम्ही ?" 

"केला बाबा. तो स्वयंसेवक भेटला म्हणून जमले सारे. नाही तर एवढ्या गर्दीत आपला काही लाग नव्हता. बरे, रावसाहेब दिसले का?"

"नाही बुवा. तुम्हाला काही म्हणाले का? पुरस्कार वापस..."

"ते कशाचे पुरस्कार वापस करताहेत. तत्त्ववादी आहेत."

"चला. जाऊ या का त्यांच्याकडे?" 

“जाऊ या. पण इथे बातम्या, मुलाखतीचे काय..."

"काका, टेन्शन नको, इथले सारे आटोपले, की आम्ही ते नियोजन करतो. तुम्हाला फोनवर कळवतो..." एक मुलगा म्हणाला तसे अण्णा नि नाना ही जोडी रावसाहेबांकडे निघाली...

  दहा-बारा मिनिटात ते दोघे रावसाहेबांच्या घरी पोहचले. त्यांना पाहताच रावसाहेब म्हणाले, “अण्णा-नाना असे एकदम... अचानक ? या या."

"सहजच. तुमचे काय चालले आहे?" 

"लेखन एके लेखन! सेवानिवृत्तीनंतर लेखनास वाहून घेतलेय."

"खरे आहे तुमचे. तुमच्या सारखे लेखनात कुणाचेही सातत्य नाही. परीश्रमपूर्वक, अभ्यासपूर्ण आणि प्रामाणिक लेखनात आपला हात धरणारे कुणी नाही."

“ह्याच बाबी माझ्या लेखनाचा श्वास नि आत्मा आहेत. तुम्हाला सांगतो, सध्या 'दादा' ही माझी कादंबरी प्रचंड गाजतेय. आजपर्यंत तिच्या पंचवीस आवृत्त्या निघाल्या. दादा, लिहित असताना मी दोन वर्ष तुरुंगात... थांबा गैरसमज नको. एक कैदी म्हणून नाही तर गुंडांचे जीवन जवळून पाहावे, समजून घ्यावे, त्यातले धगधगते वास्तव आपल्या कथानकात यावे म्हणून अगदी बिनपगारी सुट्टी घेऊन ती कादंबरी पूर्ण केली."

“धन्य आहे तुमची रावसाहेब ! तुम्ही त्यात एवढा जीव ओतला म्हणूनच ते कथानक तेवढे जिवंत झालेय. वाचकांनी तिला डोक्यावर घेतलयं आणि म्हणूनच राज्य शासनाचा पुरस्कार तुम्हाला मिळाला." 

"त्याचं काही नवल नाही. तो मिळणारच होता. आपण पुरस्काराच्या मागे न जाता पुरस्काराने आपला शोध घेत यावे हा माझा सिध्दान्त आहे आणि त्याच निश्चयाने माझी वाटचाल सुरू आहे." "रावसाहेब, तुम्हाला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला, मिळतो आहे पण कसे आहे, त्या काळात वाहिन्यांचे हे असे जाळे नव्हते. तुमचे साहित्य वाचकांपर्यंत जरूर पोहचले. परंतु तुमचे समाजोपयोगी उत्तुंग विचार समाजात पोहचले नाहीत. आज कसे आहे, वाहिन्यांच्या जाळ्याला ज्याने छेद दिला..."

"तुम्हास काय म्हणायचे आहे नानासाहेब?" 

“कसे आहे रावसाहेब, सध्या जे पुरस्कार वापसीचे सत्र चालू... मला एकच म्हणायचे आहे, की तुमचे प्रामाणिक, ज्वलंत विचार समाजापर्यंत पोहचायचे असतील तर तुम्ही तुम्हाला मिळालेले पुरस्कार सरकारला परत..." 

"ना ऽ ना ! हे असे बोलण्याची तुमची हिंमतच कशी झाली ? तुम्हाला काय वाटते, परत करायला हे पुरस्कार मी विकत घेतले आहेत? एखादी वस्तू आपण बाजारातून घेऊन येतो. पण ती वस्तू जर आपल्या बायकोस आवडली नाही तर ती वस्तू आपण दुकानदारास परत करतो. त्याप्रमाणे पुरस्कार काय अशी बाजारातून आणलेली वस्तू आहे ? तो एक सन्मान आहे. केलेल्या कार्याची पावती आहे. त्यामागे प्रचंड मेहनत, हालअपेष्टा आहेत. अहो, साहित्यिकाची प्रत्येक साहित्यकृती हे त्याचे अपत्य असते. एखादे अपत्य अपंग, कुरूप निपजले म्हणून का कुणी त्यास फेकून देते? अहो, भगिनींना ज्या प्रसववेदना होतात ना तेवढ्या नसतील परंतु त्या वेदनांची जाणीव करून देणारा त्रास साहित्य प्रसवताना होतो किंबहूना तसा त्रास व्हायलाच पाहिजे."

"रावसाहेब, बरोबर आहे तुमचे पण आज बघा ना, स्टेडियमवर अनेक जिल्ह्यातून लाखभर लोक आले होते. पुरस्कार सरकारच्या नाकावर..."

"फेकत असतील! पण कसे आहे, आजकाल आपण पाहतो आहोत, मुलींचे भ्रुण किंवा विवाहबाह्य संबंधातून राहिलेला गर्भ पाडायला कुणी मागे -पुढे पाहात नाहीत तसेच काहीसे पुरस्कार वापसीचे आहे. लग्गेबाजीने, कुणाच्या हाता-पाया पडून घेतलेले, विकत घेतलेले पुरस्कार परत करण्यात कोणते आले आहे शौर्य ? देशात, राज्यात सहिष्णुता नांदते आहे म्हणूनच पुरस्कार वापसीचा तमाशा चालू आहे. सरकार असहिष्णू असते ना तर पुरस्कार परत करणारे असे मोकळे हिंडले नसते, तुरूंगात डांबले असते. सरकारचा निषेध करण्याचे धाडसही सहिष्णुता नांदते म्हणून करता येते... "रावसाहेब तावातावाने बोलू असताना त्यांच्या घरासमोर एक मोटार सायकल थांबली. नेत्यांचा पोशाख परिधान करणाऱ्या दोन व्यक्ति दारासमोर येताच एकाने विचारले,

"रावसाहेब, आहेत का ?'

"मीच. या-ना-या." रावसाहेब म्हणाले आणि ते दोघेही आत येऊन सोफ्यावर बसताच एक जण म्हणाला,

"नमस्कार आम्ही माजी राज्यमंत्री तात्यासाहेब यांचा आपल्यासाठी एक निरोप घेऊन आलो... "

"तात्यासाहेब ? काय म्हणतात?" 

"देशात सध्या सहिष्णुता नावाची गोष्ट उरलेली नाही. म्हणून तात्यासाहेबांनी आपल्या विभागातील जिल्ह्यात ज्यांना ज्यांना लहान मोठे, शासकीय अशासकीय पुरस्कार मिळाले आहेत त्यांनी ते सरकारच्या तोंडावर फेकण्याचे... म्हणजे पुरस्कार वापसीचे प्रायोजकत्व..."

"प्रायोजकत्व ? पुरस्कार परतीचे ?" 

"कसे आहे, रावसाहेब, तुमच्यासारख्या बोटावर मोजणाऱ्या व्यक्ती सोडल्या तर सर्वांना मिळालेले पुरस्कार गुणवत्तेऐवजी सौदा करून मिळवलेले आहेत. अर्थात् पैसे देऊनही शिफारसही घेतलेली आहेच की. राज्यमंत्री असताना तात्यासाहेबांकडे रोज कुठल्या ना कुठल्या पुरस्कारासाठी शिफारसपत्र मिळावे म्हणून रांग लागलेली असायची. तात्यांनीही कुणालाही नाराज केले नाही. त्यामुळे मुख्य काम म्हणजे रावसाहेब, तात्यांची अशी इच्छा आहे, की आपणही आपले..."

"एक मिनिट..." त्या व्यक्तिस थांबवून नानासाहेब म्हणाले, "रावसाहेब, माफ करा हं. तर साहेब, आपण आत्ताच म्हणालात, की तात्यासाहेब या पुरस्कार वापसीचे प्रायोजक आहेत. म्हणजे नक्की काय ?"

"कसे आहे, तात्यांचे कोणतेही काम अंधारात नसते रावसाहेबांनी होकार दिल्यास तात्यासाहेब पत्रकार परिषदेचे आयोजन करतील. देशातील लहान थोर वर्तमानपत्रांचे, वाहिन्यांचे पत्रकार उपस्थित असतील.रावसाहेबांची पुरस्कार वापसीची घोषणा आणि त्यांचे असहिष्णुबाबतचे मत साऱ्या देशात पोहचेल. आत्तापर्यंत तात्यांच्या इच्छेला मान देऊन ज्यांनी कुणी पुरस्कार वापस केले आहेत, त्यांना न भुतो न भविष्यती अशी भली मोठी रक्कम दिली ..."

"मी पुरस्कार वापस केले तर... म्हणजे मला आत्तापर्यंत पन्नासपेक्षा अधिक पुरस्कार मिळाले आहेत ते सारे वापस केले तर ?" रावसाहेबांचा बदललेला स्वर नि अंदाज पाहून नाना अण्णा आश्चर्यात पडलेले असताना त्या माणसाने खिशातून भ्रमणध्वनी काढला. तो सुरू करून म्हणाला,

"तात्यासाहेब, मी रावसाहेबाशी चर्चा केलीय. पण कसे आहे एक मोठ्ठा मासा.. सॉरी ! मोठ्ठा माणूस आपल्या अभियानास मिळालाय. त्यांच्या घरातील कपाट पुरस्कार चिन्हांनी ओवर फ्लो झालंय. मला वाटते, आपणच त्यांच्याशी अंतीम चर्चा करावी."

"ठीक आहे. तू ठेव. मी बोलतो रावसाहेबांशी...." म्हणत तात्यांनी फोन बंद केला.. काही क्षणात रावसाहेबांचा भ्रमणध्वनी वाजला त्यावर अनोळखी क्रमांक होता. समोर बसलेल्या तात्यांच्या

माणसांकडे पाहत रावसाहेबांनी तो उचलला. 

"रावसाहेब, मी माजी राज्यमंत्री तात्या बोलतोय. माझ्या लोकांनी तुम्हाला पूर्वकल्पना दिलीच असणार.." 

"पण तात्यासाहेब..."

"आले लक्षात. रावसाहेब, तुम्हाला आजपर्यंत एकूण साऱ्या आमदनीतून मिळाली नसेल एवढी रक्कम आम्ही तुम्हाला तुमचे सारे पुरस्कार सरकारच्या तोंडावर..."

"पण तात्यासाहेब..." 

"पण परंतु किंतु सोडा. ठीक आहे. नावच ठेवायचे असेल तर तुमचे सारे पुरस्कार परत करण्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला पंधरा लाख रूपये देऊ. आज सायंकाळी तुमच्या घरी पत्रकार परिषद घेऊ. जमलेल्या पत्रकारांसमोर तुम्ही पुरस्कार वापसीची घोषणा करून सरकारच्या असहिष्णुतेबाबत कडाडून टीका करा. पत्रकार परिषद संपताक्षणी तुम्हास तिथेच सारी रक्कम मिळेल. तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही घोषणा करण्यापूर्वीही आम्ही सारा पैसा तुम्हाला देण्यास तयार आहोत. बोला..."

"तसे नाही तात्यासाहेब, विचार करतोय. सरकारी नोकरी आणि साहित्य क्षेत्रात लेखणी घासून जेवढा मुआवजा मिळाला नाही तेवढा पैसा कलम गिरवी टाकून मिळतोय. नाही, नाही मी सहज बोललो. विनोद केला हो. कसे आहे तात्या, तुमची सहिष्णूवादी ओळख आहे म्हणून बोललो." "ठीक आहे. आज सायंकाळी बरोबर पाच वाजता आम्ही तुमच्या घरी पोहचतो आहोत. दणक्यात बार उडवून देऊ..."असे म्हणत तात्यासाहेबांनी फोन बंद करताच त्यांच्या माणसांनी रावसाहेबांचा निरोप घेतला. अण्णांना उठत असल्याचे पाहून रावसाहेब म्हणाले, 

"तुम्ही कुठे जाताय? दोन वाजताहेत. मस्तपैकी बासुंदी-पुरीवर ताव मारून आमच्या पुरस्कार वापसीचे दणक्यात सेलीब्रेशन करू या. आता पत्रकार परिषद झाल्यावरच जा."

    सर्वांची जेवणे होतात न होतात तोच रावसाहेबांच्या दारासमोर एक टेंपो येऊन थांबला. उतरलेल्या लोकांनी काही मिनिटात रावसाहेबांच्या घरासमोर एक सुंदर व्यासपीठ आणि त्यापुढे एक छानसा मांडव उभारून खुर्च्या टाकल्या. पाच वाजल्यापासून एक-एक पत्रकार रावसाहेबांच्या घरासमोर येऊन मांडवात स्थानापन्न होऊ लागला. बरोबर सहाच्या ठोक्याला माजी मंत्री तात्यासाहेबांचे आगमन होताच रावसाहेबांनी त्यांचे स्वागत केले. व्यासपीठावर येताच तात्यांनी माइकचा ताबा घेतला आणि ते म्हणाले,

"आज देशातल्या स्थितीबाबत बोलण्यासारखी गोष्टच राहिली नाही. कायदा- सुवस्थेबाबत म्या पामराने काय बोलावे? आजपर्यंत देशातील अनेक महत्त्वाच्या लोकांनी त्यांना मिळालेले पुरस्कार सरकारला परत करून शासनाचा निषेध केला आहे. आपल्या शहरात रावसाहेबांसारखे नामवंत आणि सिध्दहस्त असलेले व्यक्तिमत्त्व स्वतःला मिळालेले शेकडो पुरस्कार सरकारचा निषेध म्हणून लाथाडत आहेत. सरकारला परत करीत आहे. तेव्हा आम्हास राहवले नाही. वाटले, अशा महत्त्वाच्या प्रसंगी आपण तिथे जातीने उपस्थित रहावे म्हणून आलो आहे. चांगल्या कामास आमचा सदैव पाठिंबा असतोच असतो. मी रावसाहेबांना विनंती करतो, की त्यांनी त्यांच्या पुरस्कार वापसीची घोषणा करावी, या रावसाहेब..."

"कोणतीही कृती करण्यापूर्वी किंवा तुम्हा सर्वांना अपेक्षित घोषणा करण्याआधी मी तुम्हाला काही ऐकवणार आहे. ऐका.." म्हणत रावसाहेबांनी खिशातला भ्रमणध्वनी काढला आणि माइकसमोर धरून सुरू केला. लागोलग एक संवाद उपस्थितांना ऐकावयास मिळाला. तो संवाद होता.... दुपारी रावसाहेब आणि माजी मंत्री तात्यासाहेब यांच्या दरम्यान पुरस्कार वापसीच्या संदर्भात झालेल्या चर्चेचा! तात्यांनी दिलेल्या ऑफरचा! तो संवाद पूर्ण होण्याआधीच तात्यासाहेबांनी तिथून तणतणत, लालबुंद होत, रावसाहेबांकडे खाऊ का गिळू या नजरेने पाहात काढता पाय घेतला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy