प्रयत्ने वाळूचे कण रगडिता...
प्रयत्ने वाळूचे कण रगडिता...
दुपारची वेळ होती आणि अचानक वळीवाचा पाऊस चालू झाला. त्या पावसात "भाजी घ्या भाजी" असा आवाज करत भाजीची टोपली डोक्यावर घेऊन रखमा चालली होती. तिच्या मागून तिची दोन लेकरं आपल्या भाजीची लवकर विक्री व्हावी म्हणून आपणही मोठ्याने ओरडत होती. "भाजी भाजी......". तिघेही पावसात भिजले होते. समोरच्या घरातील जामकर तलाठी कर्मचाऱ्याच्या बायकोने भाजी घेण्याच्या हेतूने तिला बोलावले. आणि रखमाकडची चवळीची भाजी तिने खरेदी केली. बाहेर पाऊस पडत असल्याने जामकर बाईने तिला बसण्यास सांगितले तशी ती आपल्या दोन्ही लेकरांना जवळ घेऊन पडवीत बाकावर बसली मग जामकर बाईने गरमागरम चहा बनवला रखमाला दिला. पोरांच्या हातावर दोन-दोन बिस्कीट ठेवली. चहाचे गरमगरम घोट पोटात गेल्यावर रखमाच्या गारठलेल्याअंगाला ऊब मिळाली. इकडची तिकडची विचारपूस करत असताना जामकर बाई रखमाला म्हणाल्या "तु स्वतः भाजीचा व्यवसाय करतेस मग तुझ्याकडे काही पैसे असतील त्यातले थोडे पैसे बचतगटात टाकत जा म्हणजे तुझ्या पैशाची बचत होईल." पैशांची बचत होईल’ हा शब्द ऐकून रखमा खुलली. बचत गटाविषयी वगैरे तिला अगोदर काहीच माहित नव्हतं किंवा त्याविषयी देणंघेणं नव्हत. आपले पैसे काही प्रमाणात का होईना साठले जातील इतकच तिला त्यावेळी कळलं. तिने लगेच तिथल्या तिथे फॉर्म भरला. आणि गटाची सदस्य झाली. दर महिन्याला आपले पन्नास रुपये कसे बाजूला होतील याचा विचार करू लागली. ठरल्याप्रमाणे भाजी विकून आलेल्या तुटपुंज्या पैशातून पन्नास रुपये दर महिन्याला ती बचत गटात ठेवू लागली. असे तिने दोन महिने बचत केले.
जुलै महिना चालू झालेला. संध्याकाळची वेळ बाहेर पावसामुळे ढग दाटून काळोखी झाली होती. त्यामुळे रखमा तिचा नवराआणि तिची दोन लेकरं घरीच होती. क्षणात वारा बेभान झाला. वावटळ याव तसंच काहीतरी झालं. रखमाच्या घराचे पत्र्याचे छप्पर कागदा प्रमाणे उडाले. घराचे दगड खाली कोसळले. दोन्ही मुलं घाबरून घराबाहेर पळाली. दैव बलवत्तर म्हणून दुर्घटना होता होता टळली. जीवित हानी झाली नाही. परंतु घराचे प्रचंड नुकसान झाले. पुन्हा एकदा रखमा बेघर झाली. मग काय पावसात भिजत नवऱ्याने आणि तिने काटया टाकून त्यावर प्लास्टिक कापड टाकला व कशीबशी मुलांना घेऊन रात्र काढली. त्या रात्री रखमेचा डोळ्याला डोळा लागला नाही. पुन्हा एकदा संकट आलं. एक लेकरू नवऱ्याच्या मांडीवर तर दुसरं लेकरू तिच्या कुशीत घाबरून झोपी गेलं. मात्र रात्रभर रखमा विचारांच्या दरीत कोसळलेल्या सारखी झाली.
मागच्या आठ वर्षातील आठवणीने रखमा अधिकच अस्वस्थ झाली. दहावीची परीक्षा दिली. परीक्षेचा रिझल्ट हाती यायच्या अगोदरच घरच्यांनी तिचं सुधीरशी लग्न लावून दिलं. खूप माणसांनी भरलेलं घर, मुलगा पदवीधर, जमीन जागा, फक्त मुलाला नोकरी नव्हती पण त्याच काय लग्न झाल्यानंतर सुद्धा मिळू शकते. अशा विश्वासाने वडिलांनी सुधीरशी लग्न लावून दिलं. त्या अल्लड वयातच रखमाला जबाबदारीने वागाव लागलं. कारण एकवीस माणसाचं कुटुंब, त्यात आपण नवीन, चुका झाल्या तर कुटुंबातील जाणती माणसं नाव ठेवतील अशी सतत भीती असायची.
लग्न होऊन एक-दीड वर्ष झालं तरी सुधीरला नोकरी मिळेना. एवढ्या मोठ्या कुटुंबात पैशाची कमतरता. कशासाठी पैसा हवा असेल तर तो सासूकडे नाहीतर सासर्याकडे मागावा लागायचा. मग त्यांचं ओरडणं चालायचं. पैसा काय झाडाला लागतो. असं ऐकून घ्यावं लागायचं. त्यात नवर्यालाही मोटरसायकल हवी झाली. मग काय रखमाला माहेरून पैसे आण असा त्याने तगादा लावला. रखमाने वडिलांना सांगून कसेबसे पैसे जमवून आणले व मोटरसायकल घेतली.
थोड्या दिवसानंतर सुधीरला व्यवसाय करायच सुचलं. ही एक चांगलीच गोष्ट होती पण त्यासाठी लागणारे भांडवल मात्र रखमाच्या बापाकडून पाहिजे होतं. माहेरची परिस्थिती जेमतेम त्यात आणखीन पैसा कुठून मिळणार होता. रखमा माहेरून पैसे आणत नाही. म्हणून एक दिवस सुधीर दारू पिऊन आला वाईट साईट बोलू लागला. बापाकडून पैसे आणत नाही तर घरात राहू नको.. अस म्हणाला. बापाला पण शिव्या द्यायला लागला. आपल्या वडिलांना अपशब्द बोलतो हे ऐकून रखमाला आता मात्र राग आला. "माझ्या बापाची परिस्थिती एवढी मोठी नाहीये. मागे चार भावंड आहेत तेव्हा आणखीन पैसे मी मागणार नाही तुम्हाला हवं ते करा" .शब्दाला शब्द वाढला त्याचं रूपांतर मोठ्या भांडणात झालं. सुधीरने रागाच्या भरात रखमाला घराबाहेर काढलं. ती मात्र बाहेर तशीच बसून राहिली. असेच दिवस जात होते.
कालांतराने रखमाने दोन वर्षाच्या अंतराने दोन मुलांना जन्म दिला. आता तर पैशाची चणचण जास्तच भासू लागली. एकीकडे सुधीरला नोकरी नव्हती त्यामुळे पैसा नाही. शेतात काम करण्याचा त्याला आळस होता. त्यात दोन लेकरांचा खर्च या सगळ्याचा परिणाम म्हणून सुधीर व्यसनाकडे जास्त झुकायला लागला. दारू पिऊन आला की रखमा त्याच्याशी भांडायची. त्याला दारू पिऊ नको म्हणून सांगायची. पण काहीच उपयोग नव्हता रात्रीच्या वेळी सुधीर दारू पिऊन येऊ लागला. घरात येऊन बायकोशी भांडण करायचं हे आता रोजचंच झालं होतं. कितीतरी वेळा तो रखमाला घराबाहेर काढत असे. रखमा मात्र हे सगळं सहन करून रात्रभर ओसरीवर बसून राहायची. माहेरून आईचा फोन आला तर मजेत आहे असच सांगायची. सहा महिन्यापूर्वी वडील वारले चार भावंडांची जबाबदारी आईवर आलेली आणखीन आपली जबाबदारी आईवर का म्हणून टाकायाची. या भावनेने आपल्या आईला आपलं दुखणं कधी सांगायची नाही.
काही काळ असाच लोटला. सुधीर पूर्णपणे व्यसनाच्या आहारी गेला. तो आता घरातील सगळ्या लोकांना त्रास देऊ लागला. त्याचा परिणाम असा झाला की घरच्या माणसांनी संपत्तीची वाटणी केली. सुधीरला काही जमिनीचा भाग दिला व दोन बैल दिले आणि सुधीर व रखमाला त्यांच्या दोन लेकरांसह घराबाहेर काढले. आता हिमतीने काहीतरी करायलाच पाहिजे हे त्या क्षणी रखमाने ठरवले. दिलेल्या शेतजमिनीत स्वतः राबून पत्र्याचे घर उभारलं. राहिलेल्या जमिनीच्या तुकड्यात झेंडूची फुले आणि भाजीपाला लावला. काहीच दिवसात शेताला बहर आला. रखमा तयार झालेली फळे व भाजीपाला विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागली.
पण नवऱ्याचं व्यसन सुटेना. मग तिने ठरवलं त्याचं व्यसन सुटण्यासाठी काहीना काही उपाय करावा लागेल. गावातील एका शिक्षकाकडून तिला व्यसनमुक्ती केंद्राची माहिती मिळाली होती. त्यानुसार तिने सुधीरला एक दिवस मनवलं व चंदगडच व्यसनमुक्ती केंद्र गाठलं. या सगळ्यासाठी पैसा हवा होता. तो उभा करण्यासाठी स्वतःचा मंगळसूत्र विकलं व सुधीरला उपचार करू लागली. दोन महिने व्यसनमुक्ती केंद्रात राहिल्याने सुधीर मध्ये खूपच सुधारणा झाली. आता मात्र तिने घेतलेल्या त्रासाचे चीज झाले होते. पण येणाऱ्या उद्यासाठी हातात काहीच पैसा शिल्लक नव्हता. मुलांना खाऊ साठी देखील पैसा नव्हता. एक दिवस तर हद्दच झाली. छोट्या मुलाने केक साठी हट्ट केला. तिच्याकडे पैसा नव्हता. मग ज्वारीच्या शिळ्या भाकरीला कुस्करून त्यात गुळ घालून केक म्हणून मुलाला दिला.
पुन्हा ती भाजी तयार करून विकू लागली पण आलेला पैसा रोजकच्या पोटाची खळगी भरण्यासाठी जात होता. एक दिवस सुधीरने ठरवलं गावात राहून काम मिळणार नाही त्यासाठी त्याने मुंबई गाठली. एका कंपनीत तीन हजार रुपये प्रति महिना पगारावर नोकरीला लागला. पण यातून त्याचा खर्च, घरभाडे आणि रखमाला पाठवणं त्याला शक्य होत नव्हते . काहीच ताळमेळ बसत नव्हता. रखमाच्या सांगण्यावरून तो पुन्हा गावी आला. आता दोघेही शेतात राबू लागले. सगळं काही स्थिरावत असताना आज निसर्गाने घाला घातला. पुन्हा तिच्या वाट्याला अस्थिरता आली. या सगळ्या आठवणीने तिचे डोळे भरून आले. लेकराला मांडीवर घेऊन ती एकटक तंबूत शिरलेल्या पाण्याकडे बघत राहिली.
दुसऱ्या दिवशी सकाळ होताच रखमा पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे नव्याने उठली पुन्हा पंखात बळ आणलं. बचत गटाच्या जामकर मॅडम कडे गेली. बचत गटाच्या माध्यमातून काही कर्ज मिळेल का विचारलं. तेव्हा तिला सात हजार रुपयापर्यंत कर्ज मिळू शकते हे कळालं. तिने ते सात हजार रुपये घेतले. खूप खुश झाली. ते 7000 म्हणजे सत्तर हजारा सारखे तिला वाटत होते. रखमाने पुन्हा दगड विटा जमवल्या. सिमेंटच पावसात टिकाव धरणार मजबूत घर स्वतः कष्टाने राबत उभं केलं.
पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात नवी सुरुवात झाली होती. भाजीपाल्यातून मिळणारा पैसा फारच कमी आहे. हे जेव्हा तिला समजलं तेव्हा ती बचत गटामार्फत स्वयम् प्रशिक्षण घेऊ लागली. त्यामुळे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय चालू केला. हळूहळू बरकत आली. दोन गाईंच्या ठिकाणी दहा गाई झाल्या. शेताच्या बांधावर लिंब, चिंचा यांची झाडं लावली. काही भागात आंब्याची झाडे लावली. या सगळ्या झाडांना शेणखताचा वापर करण्यात आला. आता तिने पुन्हा प्रशिक्षण घेतल आणि गांडूळखत बनवू लागली. जोडीला कंपोस्ट खत, शेणखत होतच. या खताची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाल्याने रखमाने ठरवले की याची आत्ता विक्री करायची. ती जेव्हा सगळं खत चाळतअसे व पोती भरून पॅक करून ठेवत असे. गावातील लोक हे सगळं पाहत तेव्हा त्यांना हे सगळं विचित्र वाटायचं. तिच्याकडे पाहून ते हसत. रिकामटेकडे पणाचा खेळ म्हणून हिणवत. या बाईला वेड लागले गांडूळ काय ठेवते, खड्डा खणते, शेण काय त्यात ओतते, पालापाचोळा कचरा काय गोळा करते, त्यावर शेण काय टाकते. त्यावर माती काय टाकते. मग वेड्यासारखं चाळून काय घेते, पोती काय भरते असं काय खत कोणी बनवतात का? असं उलट-सुलट तिच्याबद्दल बोललं जात होत. पण या सगळ्याकडे रख्माने कानाडोळा केला. आपलं काम भलं की आपण. या दृष्टिकोनातून वागत गेली. तिला माहीत होतं की गावात असा प्रयोग आजपर्यंत कोणीही केलेला नाही. आणि आपण करतो त्याचा चांगला उपयोग होणार आहे. हे लोक किती हसले तरी त्यांच्याकडे लक्ष देऊन उपयोग नाही. म्हणून ती काम करत राहिली.
प्रथम तिने या खताचा उपयोग आपण लावलेल्या आपल्या झाडांसाठी केला. त्याचा परिणाम चांगला झाला. थोड्याच कालावधीत या झाडांपासून तिला उत्पन्नही मिळू लागलं. गावातील लोक चकित झाले. ही बाई काहीतरी वेगळं करते याची त्यांना जाणीव झाली. तालुक्याच्या ठिकाणी कुठे प्रशिक्षण लागलं की ती आवर्जून जात असे. आपल्या ज्ञानात भर पाडत असे. गुरांना चारा कमी पडू नये म्हणून हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तिने चारा निर्मिती केली. लोकांना वाटे की माळरानात, शेतात भरपूर गुरांचे खाद्य उपलब्ध असताना हा छोट्या छोट्या ट्रेन मधला चारा म्हणजे बिनकामाचा उद्योग. त्यानंतर पुढच्याच वर्षी दुष्काळ पडला शेतकऱ्यांची कितीतरी जनावरे चारा व पाण्याअभावी मरू लागली. उभी शेत करपू लागली. बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झाले. दुष्काळाला सामोरे जावे लागले.
या सगळ्या परिस्थितीत रखमा मात्र पाय रोवून घट्ट राहिली. ती, तिचा परिवार, गांडूळ निर्मिती, खत, कंपोस्ट खत, हायड्रोपोनिक तंत्रज्ञान या सगळ्यामुळे तिला दुष्काळाची झळ पोहोचली नाही आणि आपल्या गुरांनाही वाचवू शकली. यानंतर मात्र अनेक शेतकरी तिला भेटी देऊ लागले. तिच्याकडून प्रशिक्षण घेऊ लागले सगळ्या गोष्टींची माहिती घेऊ लागले. तिचं बहरलेलं शेत बघून प्रेरणा घेऊ लागले.
आज रखमा आपल्या या व्यवसायातून वर्षाला आठ लाख रुपये उत्पन्न मिळवते. गावातील गरजू बायकांना बचतगटामार्फत प्रशिक्षण देते. कृषी संस्था मार्फत अनेक ठिकाणी प्रशिक्षण देण्यासाठी तिला बोलावलं जातं. ज्या बाईकडे मुलांच्या खाऊ साठी दहा रुपये नव्हते. ती रखमा अनेक आव्हाने पेलत आज लाखोंची उलाढाल करते. अशाप्रकारे संकटाला न घाबरता सामोरं जाऊन रखमाने स्वतःच्या मेहनतीच्या बळावर उत्तुंग भरारी घेतली.
(सत्य घटनेवर आधारित)
