प्रेमा तुझा रंग कोणता
प्रेमा तुझा रंग कोणता
पावसाची रिपरिप चालू होती. संध्याकाळचे साडेसहा वाजले होते. अचानक तु ऑफिसमध्ये आलास. अचानक आलास असं म्हणण्यापेक्षा तु येणार आहेस असा मला फोन केला होतास. तेव्हाच मला कळून चुकलं होतं की, तुला मला भेटण्याची खुपच ओढ लागली आहे. पुढच्याच म्हणजे जानेवारीच्या पहील्याच आठवडयात तु ही नोकरी सोडून अमेरीकेला जाणार.. कायमचा वास्तवाला. आता तु हया ऑफिसमध्ये येणार नव्हतास. साहजिकच आपली आता भेट होणार नव्हती. ‘निरोपाचा दिवस’ याचा विचार जरी केला तरी छातीत धडधडायला लागायचे. ऋतुचक्रानुसार अखेर तो दिवस आलाच. आज मी अगदी बैचेन झाले होते. कंपनीच्या वतीने तुझा निरोपाचा कार्यक्रम पार पडला. मला वाटत होते की, तु USA ला जाऊ नये. सतत माझ्याजवळ राहावं. हे माझे मनातले विचार, हुरहूर मनातच ठेवायचे होते. तुला या कशाचीच जाणीव करुन दयायची नव्हती. माझी समजूत घालण्यासाठी तु मला सारखा सांगत होतास की, "दोन वर्षानी तर परत येणार ." असंही म्हणालास की अजून 10 दिवस तु या शहरात राहणार आहे. तेव्हा त्या दहा दिवसात मी तुला रोज भेटत जाईन.
या तुझ्या बोलण्यामुळे मला किती आनंद झाला. दुस-या दिवशी जेव्हा मी ऑॅफीसमध्ये आले; तेव्हा माणसं असूनही सगळं ऑफीस सुनंसूनं वाटत होत. तुझं टेबल, खुर्चीवर बसलेला तू... ती तुझी रुबाबदार छबी डोळयासमोरून जात नव्हती. मी तुला खूप miss करत होते. ‘गौरांग, तु नको ना मला सोडून जाऊस’ ‘‘अहो मॅडम, कुठे हरवलात ?गौरांग आजपासून येणार नाही.’’ दिशा जरा जास्तच मोठया आवाजात बोलली. माझं मन मात्र गौरांगबरोबर घालविलेल्या क्षणांचा आढावा घेत होत. कालचा दिवस जातो न जातो तोच आज तु मला भेटायला चक्क ऑफीसमध्ये आलास. तुला पाहताच मला कोण आनंद झााला सांगू. टेबलावरच्या फाईल मी पटापट आवरुन घेतल्या. खर सांगायचं तर कालच्या रा़त्री तुझ्या आठवणीत मला झोप लागली नव्हती. आणि आज सकाळपासून ऑफीसमध्ये कामाचाही ताण पडला होता. पण आता मला उर्जा मिळाली होती तुझ्या रुपातली, चटचट काम हातावेगळं केलं. मोकळा श्वास घेतला. पर्स खांदयाला लटकवली आणि तुझ्या बरोबर चालू लागले. बाईकवर बसताना अलगत तु माझा हात पकडलास तेव्हा मनात कोवळी लुसलुसीत पालवी फुटत होती. जेव्हा तुला घटट मिठी मारुन बिलगून बसले तेव्हा तुला ते खुपच आवडत होते. कालचक्राची ही वेळ संपूच नये असे दोघांनाही वाटत होते.
हा क्षण आपण आठवणीच्या कुपीत साठवून ठेवणार होतो. मला निसर्गाचे सानिध्य आवडते हे तु जाणून होतास म्हणूनच की काय त्या दिवशी तु मला डोंगराच्या कुशीत नदी किनारी घेऊन गेलास. सकाळपासून कामाचा ताण पडल्याने आज डोक दुखत होत अगदी ठणकत होत. पण आता त्याचा मला जणू विसर पडला होता. तुझ्या बरोबर जास्तीत जास्त वेळ घालविण्यातच मला समाधान वाटत होतं. नदीकिनारी बराच चिखल होता, त्यातून बाईक चालविणे तुला अवघड होत होते. मी बाईकवरुन खाली उतरले व डांबरी रस्त्यापर्यत चालत निघाले माझ्या पांढऱ्या शुभ्र पंजाबी ड्रेसवर मातीचे चांगलेच डाग उमटले होते. आता पुढे चिखलामुळे बाईक चालविणे अवघड हात होते म्हणून गाडी एका साईडला ठेऊन तु माझ्या बरोबर चालत निघालास. चालता‐चालता तु तुझा हात माझ्या खांदयावर ठेवलास. नकळत माझं डोक तुझ्या छातीवर टेकवलं तो आनंद मला शब्दात व्यक्तच करता येणार नव्हता. शरीराला आलेला थकवा केव्हाच नाहीसा झाला होता.आपण आता दूरवर चालत आलो होतो. नदीच्या एका बाजूला गवताचे हिरवेगार गालीचे होते तर दुसऱ्या बाजूला कमळाची आरास होती आणि मधून नदीचे पाणी झुळझूळ वाहत होते. तना‐मनाला गारवा वाटला. बकुळीच्या झाडाखाली आपण बसलो. क्षणांत तु मला जवळ ओढलस, ओठांवर ओठ ठेवलेस आणि पटापट मुके घेत राहीलास. कितीतरी वेळ आपण एकमेकांच्या मिठीत होतो. कोणी पाहील याची आपल्याला पर्वाच नव्हती. जेव्हा आपण भानावर आलो तेव्हा बराच अंधार झाला होता. घरी आई वाट पाहत असेल. बरं आतापर्यंत मी फोन ही स्विचऑफ करुन ठेवला. ‘‘अरे बापरे ! काय वाटलं असेल आईला, तीला संशय तर येणार नाही ना ?
गौरांग, चल लवकर आपल्याला इथे कोणी पाहीले तर प्रॉब्लेम होईल यार..... मला खुप भिती वाटते. ’’ ‘ ये सानिका, तो बघ तिकडून कोणीतरी येतोय ’ ‘‘ गौरांग, कदाचित तो माझा आतेभाऊ असणार तरी मी तुला सांगत होते लवकर घरी जाऊया म्हणून पण ... ’’ असं म्हणून मी रडायला चालू केले. समोर पाहते तर काय कुणीच नव्हते. तु मात्र मिस्किल हसत होतास. माझी मस्करी करत होतास. पुन्हा तु मला जवळ ओढून मिठीत घेतलस. ‘‘ मला जगाची नाही वाटत पर्वा. सत्य हे आहे की, मी तुझ्याशिवाय राहूच शकत नाही. रात्रंदिवस तुझीच आठवण सतावते. तुझ्याशिवाय वेडा होईन गं .’’ ‘‘ राजा, तुझा मनाचा तोल ढळू देऊ नकोस. जेव्हा तुला माझी आठवण येईल तेव्हा तुझे डोळे मिठून घे व शांत रहा. जेव्हा डोळे उघडशील तेव्हा समोर मी असेन.’’ या माझ्या बोलण्यामुळे तुला खूप हसू आलं होत. " राणी तु म्हणजे रडता‐रडता हसवणारी जादू आहेस जणू. ’’ ‘‘आता आपण जादूने क्षणांत घरी पोहचणार नाहीत. त्यासाठी येथून निघावे लागणार कळलं काय. ’’ मी तुझ्या गालावरुन हात फिरवत बोलली. तसा तु लगेच माझा हात तुझ्या हातात घेत म्हणालास,-- ‘‘मला काहीतरी बोलायचे आहे.’’ इतका वेळ आपण बोलतच होतो की मग आता आणखी काय बोलायचे राहिले. मनात काहूर माजले होते. मला घरी लवकर पोहचायचे होते आणि तुलाही सोडून जायला मन तयार नव्हते. पण माझी द्विधा अवस्था तु ओळखलीस आणि तुच म्हणालास चल तुला घरी सोडतो.
त्या रात्री मला झोपच येत नव्ह
ती. डोक मात्र ठणकत होतं. काय सांगायचे होते बरे याला. सारखा तोच विचार रात्रभर मला सतावत होता. विचारांचा गुंता सुटता सुटत नव्हता. आपल्यात जे काही नाजूक रेशमी नाते तयार झाले होते.विसरायचे होते एकमेकांना अगदी कायमचे, तेही कोणलाही कसलाही त्रास न देता. हे अशक्य होते, तरी शक्य करायचे होते कारण तेच वास्तव होते व ते स्विकारणे भाग होते. एक ना एक दिवस एकमेकांपासून दूर व्हायचे तर मग का केलं आपण एकमेकांवर जिवापाड प्रेम? का ? का?????? या का ला उत्तर नव्हतं. रात्र संपून पहाट कधी झाली ते समजलेच नाही. दुसऱ्या दिवशी लवकरच ऑफिसमध्ये आले. आज तु मला भेटायला येशील असे वाटले होते कारण काल तुला काहीतरी सांगायचे होते ते राहून गेले होते. कामात लक्षच कुठे होते, ते तर तुझ्या वाटेकडे लागून होते. डोळयांत प्राण आणून वाट पाहत होते मी. पण तु मात्र त्या दिवशी आलासच नाही. आज १ जानेवारी वर्षाचा पहीला दिवस. सुप्रभाती तु मला शुभेच्छा दयायला येशील असे वाटत होते. नंतर असा विचार केला की, आपणच फोन करुन तुला नविन वर्षाच्या शुभेच्छा दयाव्यात. कॉल केला तर कव्हरेज क्षेत्रााच्या बाहेर असा मेसेज होता. मी निराश झाले तशीच ऑफीसमध्ये निघून आले. पाहते तर काय तुच माझी वाट पाहत ऑफीसमध्ये होतास. मला खुपच प्रसन्न वाटलं. आता तु चांगल बोलशील असे वाटत होते. पण मी येताच तु फक्त हॅपी न्यु इअर इतकं अगदी औपचारीक बोललास. आणि लगेच म्हणालास तुला लवकर जायच आहे. पणत्या दिवशी तर तुला खुप काही सांगायचे होते मग आता काय झाले. तु का मला असे टाळतोस यार. आज मला तुझ्यासोबत पुन्हा एकदा नदीकिनारी जायचे होते. मनातलं सगळं तुझ्यासमोर व्यक्त करायचे होते. शेवटचे तुझ्या मिठीत यायचे होते. मनाच्या कप्प्यात या सगळया आठवणीची साठवण करुन ठेवायची होती. तुला समजावून सांगायचे होते. पण तु तर या क्षणीच मला दूर गेल्यासारखा वाटू लागलास. आपल्यात आता दुरावा येणार त्यामुळे तु हळवा झालास असे मला वाटत असताना आज तु उपरोधाने बोलत होतास. तुझ्या चेह-यावर टेन्शन नव्हते की हूरहूर नव्हती.
माझं मन मात्र उगाच हळवं झालं होतं. तसा तु मला तीन दिवसानंतर भेटत होतास. माझी आज खुप इच्छा होती की, नविन वर्षाच्या शुभेच्छाबरोबर मला जवळ घेशील, माझ्य केसातून हळुवार हात फिरवत आय लव्ह यु म्हणशील. पण तस काहीच झालं नाही आणि होण्याची चिन्ह दिसत नव्हती. तो केवळ माझा भ्रम होता. आज तु जास्तच उपरोधाने का बोलत होतास. आय लव्ह यु ची जागा हे सगळं चुकीचे आहे या वाक्याने घेतली होती. तु असही म्हणालास की हे प्रेम म्हणजे मुर्खपणा आहे. हे सगळं सोडायचच आहे तेही आजपासून आत्तापासूनच..हेही सांगायला विसरला नाहीस की आपला संबध आजपासून कायमचा संपला तेव्हा मला चुकूनही फोन करायचा नाही, किंवा अन्य मार्गाने संपर्क करायचा नाही. धारधार तुझे शब्द माझ्या मनाला रक्तबंबाळ करीत होते. थोडक्यात तुला मैत्री तोडायची होती. प्रेम संपवायचे होते. आठवतं तुला; आपण एकमेंकांना शब्द दिला होता की लाईफपार्टनर झालो नाही तरी मैत्री कायम असेल. मनाच्या कप्प्यात ती कायम चीरतरुण राहील. मग असं का वागलास तु.
माझ्या वयाचा विधवापणाचा विचार न करता निरपेक्षेने प्रेम करणारा गौरांग तूच होतास का तो. तुला कशाची काहीच पर्वा नव्हती आणि आता माझ्याकडे शब्द नव्हते. फक्त अश्रू गालावरुन ओघळत होते. मला मान्य आहे की आपण एकमेकांचे जीवनसाथी कधीच होणार नव्हतो. तु मला सतत आपण लग्न करुया असं म्हणायचास. पण मला मान्य नव्हते का माहीत आहे कारण मी तुझ्यापेक्षा दहा वर्षानी मोठी होते आणि सगळयात महत्वाचे मी विधवा होते. हे समाजाला मान्य नसतं झालं, समाजालाच काय तुझ्या कुटुंबाला मान्य होणार नव्हते. तसं माझं लग्न झाल्यावर एका महिन्यातच कुंकू फुसलं गेलं. नवरा नावाचा आतंगवादी एका चकमकीत मारला गेला आणि संसार सुरु व्हायच्या आधीच संपला. नवरा मेला त्याचे दु:ख करु की एक देशद्रोही मेला याचं समाधान मानू हे समजण्याआधीच मी माझा गाशा गुंडाळून माहेरी पोहचले. शिक्षण एम.बी.ए. असल्याने नोकरी मिळविण्यास फार असा त्रास झाला नाही. गेली आठ वर्ष मी या कंपनीत काम करत असतानाच तु या कंपनीत नोकरीला लागलास. अर्थात मी तुझी बॉस होते त्यामुळे आज्ञाधारकासारखा मी सांगितलेली काम तु करायचास.
मलाही तुझा प्रामाणिकपणा, काम करण्याची पदधत खुप आवडत असे. हळूहळू आपला सहवास आवडू लागला. ऑफिसमधल्या कामाव्यतिरिक्त आपण वैयक्तिक विषय एकमेकांशी बोलू लागलो. माझा भुतकाळ ऐकून तुला वाईट वाटले. माझ्या दु:खी मनावर प्रेमाची फुंकर घालून मला त्या परीस्थितीतून बाहेर काढलं. दिवस जात होते. तुझा सहवास वाढू लागला, आवडू लागला. पण याचवेळी मी तुला सावध केले होते की, आपण लग्न केले तर समाजाला हे मान्य नाही होणार. त्यामुळे आयुष्यभर आपण चांगले मित्र राहणार आहोत. आपल्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले तरी प्रेमाचे रुपांतर लग्न करुन एकत्र राहण्यात नाही होणार. आणि हे आपण मनोमन मान्य केले होते. तुझ्यासाठीच मी हा निर्णय घेतला होता ना. जर आज तु मला मिठीत घेउन निरोप दिला असतास तर त्या आठवणीत आनंदाने आयुष्य काढले असते. मग आज असा का वागलास. ‘आपलं प्रेम चुकीचे आहे, खोटं आहे’. हे तुझे निखा-यासारखे शब्द माझ्या मनात धुमसत राहीले. प्रेमाच्या रंगाने रंगवू पाहत असलेल्या चित्राला माझ्याच डोळयातील अश्रू पुसत होते. आणि ते रंगहीन होत जाणारे चित्र मला खुणावत राहीले ‘प्रेमा तुझा रंग कोणता?'