Shilpa Desai

Fantasy Others

3  

Shilpa Desai

Fantasy Others

आठवणीची कुपी चैतन्याचं वलय.

आठवणीची कुपी चैतन्याचं वलय.

4 mins
182


माझं लग्न झालं आणि मी मुंबई शहरात राहायला आले. लग्न जून महिन्यात झाले. पुढच्या दोन महिन्यातच श्रावण आला. पण शहरातल्या गर्दीत माझ्या माहेरचा श्रावण नक्कीच नव्हता. श्रावणातला आनंद घ्यायला लोकांना इथे वेळच नाही. या शहरात मला डोंगर-दऱ्या पक्षांचा किलबिलाट लोप पावून उंच इमारतीचे पर्वत दिसू लागले. इथे बालकवींचा निसर्ग कोणीतरी लुटला असे वाटू लागले. नकळत माहेरचा आणि तिथे मला गवसलेला श्रावण यांची कुपी आठवणीच्या स्वरूपात खोलावी लागली- 'श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे

क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे'

वा! काय कल्पना आहे. मनाला आल्हाददायक असे हे शब्द खरोखरच तसं स्वप्न श्रावणात देऊन जातात.

श्रावणाची चाहूल लागते ती वातावरणातील सुखद गारव्याने.श्रावण प्रसन्नतेने आपल्या चैतन्यच्या तिजोरीतून सतत काही ना काही देतच असतो. श्रावणात ज्येष्ठ-आषाढ मधला धुवाधार पाऊस खूपच कमी झालेला असतो. आणि ऊन-पावसाचा खेळ चालू असतो.

माझं वय तेव्हा दहा वर्षाचा असेल माझी एक मैत्रीण जी मुस्लिम होती. ती तिचा लहान भाऊ आणि मी ओसरीवर खेळत होतो. श्रावण सोमवार असल्याने आई महादेवाच्या देवळात गेली होती. त्यामुळे आम्हाला पावसात भिजण्याची लहर आली. तसं पाहता आईसुद्धा घरी नव्हती. मग आमचं ठरलं की आज पावसात भिजायचं म्हणजे भिजायचं. अंगणात जाऊन पाहतो तर काय ? पाऊस गायब होऊन हा खट्याळ श्रावण आपले हास्य पिवळ्या उन्हातून दाखवत होता. आम्हाला फार राग आला या पावसाचा "चला तर घरातच खेळूया "असं म्हणून मी घरात आले. तशा सर सर आवाज करत सरी कोसळू लागल्या. आता मात्र आम्हाला रहावलं नाही. आम्ही धावतच अंगणात आलो. उड्या मारत नाचु लागलो, गाऊ लागलो. थोड्याच क्षणात पुन्हा ऊन पडलं, पुन्हा पाऊस. असा पावसाचा खट्याळपणा चालूच राहिला. त्या पावसाच्या सरीत आम्ही भिजत होतो. मोठ्याने गाऊ लागलो.

"ऊन-पाऊस गुंज म्हातारीचे मुंज.......मुंज....."

एव्हाना देवळातून आई आलेली याकडे आमचे लक्ष नव्हते. मी मजेत पावसात भिजत आहे हे पाहून आईला राग आला. पटकन माझ्या हाताला पकडले आणि ओढतच घरात नेले. आईला रागवलेले बघून ते दोघेही घरात आले. आईने माझ्या पाठीत एक धपाटा दिलेला. तितक्याच आवेगाने टॉवेलने ती माझे भिजलेले केस पुसत होती. मला दुखत होते पण तिचं त्याकडे मुळीच लक्ष नव्हतं. तिच्या तोंडाचा पट्टा चालू होता "म्हातारीची मुंज करते, उद्या तुला सर्दी खोकला झाला नाही म्हणजे मिळवलं. आता तुला शिक्षा म्हणून आज संध्याकाळपर्यंत 13 ते 15 पर्यंत पाढे पाठ करायचे आहेत" झाले न आवडणारा 13 चा पाढा माझ्या गळ्यात मारला. आता काही पर्याय नव्हता. आश्चर्य म्हणजे त्या संध्याकाळी तो पाढा मी पाठ केला आणि आईकडून शेंगदाण्याचा लाडू बक्षीस मिळवला होता.

माझं माहेर कोकणात आणि कोकणात श्रावण म्हणजे सणांचा मास मानतात. आईचे सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार असे श्रावणात उपवास असायचे. कधी पोथीवाचन. तर कधी मंगळागौर, कधी संकष्टीला गरमागरम उकडीचे मोदक, तर कधी नागपंचमीला हळदीच्या पानातल्या पातोळ्या आणि जन्माष्टमीला शेवग्याच्या पानाची भाजी.

श्रावणातला पहिला सण म्हणजे नागपंचमी या नागपंचमीच्या आदल्या दिवशी मुली व बायका उपवास करतात त्यादिवशी मी हट्टालाच पेटले की नागाचा उपवास मी पण करणार. आईने खूप समजावून सांगितले की तू अजून लहान आहेस. पुढच्या वर्षीपासून उपवास कर. आता तुला नाही झेपणार. पण मी कशीच ऐकायला तयार नाही हे पाहून शेवटी नाईलाजास्तव मला उपवास करण्याची संधी मिळाली. मी खुप खूश झाले. त्या दिवशी सगळ्या मुली व बायका एका मोठ्या वारुळा जवळ गेलो. मोठ्याने आवाज न करता वारुळाच्या आसपासचा परिसराची साफसफाई केली. त्यानंतर वारुळा जवळ तुपाचा दिवा लावला, फुले, हळदीकुंकू, बेल वाहिला. पूजा केली. लाहयांचा नैवेद्य ठेवला. मग सगळे घरी परतलो. वाटेत एका आजीने आम्हाला सांगितले की मुली व बायकांनी नागाला भाऊ म्हणून पूजा करायची असते. म्हणजे तो नागराज आपले रक्षण करतो. आपल्या शेताचे रक्षण करतो. तो क्षेत्र देवता आहे. दुधाचा व लाह्याचा प्रसाद त्याला खूप आवडतो. आजी खूप माहिती सांगत होत्या.

मला आता सारखं वाटू लागलं की, मी ठेवलेल्या लाह्या व दुध नागोबा नक्कीच खाईल. "त्यांने जर का दूध पिलं तर तो मला नक्की बहीण मानेल व मला मदत करेल" या विचाराने मला समाधान वाटत होतं. पण तो दूध व लाह्या खाईल ना असा विचार मनात येऊन चैन पडेना. दोन तासानंतर काहीस निमित्त करून मी वारुळाजवळ जाऊन पाहिलं तर केळीच्या द्रोण, आतील ते दूध व लाह्या तशाच होत्या. मला फार वाईट वाटले मी वारूळा समोर हात जोडून उभी राहिले. व नागदेवतेला सांगू लागले, "हे नागोबा तू जर माझा भाऊ आहेस, तर ह्या लाह्या व दूध.जे मी केळीच्या द्रोणात ठेवले आहे त्या तू खा. नाही खाल्लस तर माझी तूझाबरोबर कट्टी" असं म्हणून मी रागानेच घरी आले पण घरी आल्यावर नागोबा दूध लाह्या खातो की नाही याची आठवण स्वस्थ बसू देईना. दुपारची इतरांची जेवण आटोपल्यावर सगळ्यांच्या नजरा चुकवून मी वारुळा जवळ आले पाहते तर काय द्रोण रिकामा. मला खूप आनंद झाला. त्या वर्षीपासून मी नागोबाचा उपवास करू लागले. आजही त्या दिवशीच्या घटनेची आठवण झाली की हसू येतं व समाधानही वाटतं.

कदाचित दुध व लाह्या पक्षांनी खाल्ल्या असतील, कदाचित प्राण्यांनी..... . पण काही असेले तरी मला मात्र समाधान मिळालं होतं.


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy