कॅलेंडर
कॅलेंडर
मावळत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत आपण जल्लोषात करतो. पण २०२०-२१ मधील कोरोनाच्या संकटाने यंदाच्या स्वागताचा वेग थोडा मंदावला. तरीदेखील दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपल्या घरात एक नवीन पाहुणा सदस्य दाखल झाला असेलच. माझ्या घरात हा पाहुणा आला आणि त्याची स्वयंपाक घरात त्याच फ्रीज जवळच्या भिंतीवर प्रतिष्ठापना झाली सुद्धा. तुमच्या घरात पण आला असेल हो. एव्हाना तुम्हाला समजलेच असेल की हा नवीन सदस्य कोणता. विचारता काय ? तुमचे-आमचे लाडके कॅलेंडर! अर्थात दिनदर्शिका.
सध्याच्या टेक्नॉलॉजी आणि डिजिटल युगात सुद्धा दिनदर्शिका आपले स्थान अबाधित राखून आहे. मोबाईल मध्ये जरी कॅलेंडर उपलब्ध होत असले तरी भिंतीवरील दिनदर्शिकेचा साज हा वेगळाच असतो. त्यामुळे तर लोक दिनदर्शिकेला महत्व देतात. तारीख, वार पाहण्यासाठी आजही आपण सवयीप्रमाणे भिंतीकडे पाहतो. बर्याच महिला कितीही मॉर्डन किचन असले, जुन्या घराचे मेकओव्हर केले किंवा नवीन वास्तूत प्रवेश केला.अशावेळी हमखास घरातील बऱ्याच जुन्या वस्तू कमी केल्या जातात. हे जरी खरे असले तरी आपण महिला कॅलेंडरची जागा कायम ठेवण्याचा प्रयत्न करतो. घराच्या किचन मध्ये किंवा ठरलेल्या भिंतीवरून त्या कॅलेंडरचे स्थान कोणी कमी करू शकत नाही. असे हे कॅलेंडर आपल्या जिवाभावाचा सखा असते. केवळ दिनांक किंवा दिवस,वार पाहण्यासाठी फक्त आपण कॅलेंडरचा वापर करतो असे नाही तर या कॅलेंडरमध्ये बरीच उपयुक्त माहिती असते. सणवारा पासून आरोग्य पर्यंत सर्व माहितीची पोतडी यात सापडते.अन् कधी आपल्या बाळाच्या पोटात दुखण्याने घाबरलेल्या मातांना आजीबाईच्या बटव्यातील औषधी हलकेच गुटी उगाळून देण्याचे सुचवते.
कोरोनाच्या संकटामुळे २०२० हे वर्ष कसे आले?कसे गेले? किंवा किती वाईट गेले? याचा लेखाजोखा पाहता आणि सततच्या मास्कच्या वापरामुळे कंटाळलेला जीव आणि कामाचा व्याप यामुळे कॅलेंडर यावर्षी वेळेत आणायला मिळाले नाही. तसे मला डिसेंबर मध्ये कॅलेंडर आणायची सवय पण या वर्षी ३०डिसेंबर उजाडला तरी आमच्या घरात काही नवीन कॅलेंडर आले नाही. तसे दोन-चार वेळा नवरोबाला सांगून बघितले. पण ठरलेले उत्तर
"अगं अजून वेळ आहे."
३१ डिसेंबर आला,तरी नवरोबाने कॅलेंडर काही आणले नाही त्यामुळे माझी खूप चिडचिड होत होती. "आज मात्र नक्की कॅलेंडर घेऊन या" मी थोडेसे वरच्या स्वरात म्हणाले. तसे म्हणतात कसे, "अगं कॅलेंडर आता मोबाईल मध्ये उपलब्ध असते. ॲप डाऊनलोड कर. भिंतीवरचे कॅलेंडर हवे हा अट्टहास कशासाठी?" "आणि हवेच असेल तर उद्या आणू या. नक्की आणतो, उद्या." पण नवऱ्याच्या नक्कीवर माझा आता मुळीच विश्वास नव्हता. तु-तू-मी-मी न करता मास्क, सानिटीझर सोहळे करून डोक्यावर हेल्मेट चडविले व स्कुटीला स्टार्ट मारले. नेहमी प्रमाणे स्टेशनजवळच्या त्या बुक स्टॉल कडे माझी नजर वळली आणि तिथे असलेल्या रंगीबेरंगी फोटोनियुक्त अशा अनेक कॅलेंडर वरून माझे हात फिरले. अनेक ग्लॉसी गुळगुळीत कॅलेंडरवर हात फिरवताना भारी वाटत होतं. कॅलेंडर वरील निसर्गचित्र मी मनाच्या कॅमेऱ्यात बंदिस्त करत होते. पण अखेर नजर स्थिरावली ती कालनिर्णय कॅलेंडर वर. दरवर्षीचेच झाले. मला सगळीच कॅलेंडर घ्यावीशी वाटतात. पण भविष्य, मेनू ,पंचांग, आरोग्य हे सगळे ज्यात एकत्र मिळते, ते माझे लाडके कालनिर्णय कॅलेंडरच घेऊन येते. लहान असतानाही मी बाबांजवळ कालनिर्णय आणण्यासाठीच हट्ट करायचे. डिसेंबर सुरू झाला की माझी बाबांच्या मागून भुणभुण असायची.कालनिर्णय कॅलेंडर आणण्यासाठी. मला खरच खूप आवडायचे हे कॅलेंडर कारण का तर जाहिरातीचा परिणाम. दिलीप प्रभावळकर यांची, नंतर रेणुका शहाणे यांची भविष्य, मेनू आरोग्य, ज्ञान, उपयुक्त साहित्य प्रत्येक पान, पंचांग शोभे सुमंगल सुभावे,भिंतीवरी कॅलेंडर असावे’.
नवीन वर्षाची चाहूल लागताच ओठी येणा-या या ओळी तेव्हापासून कालनिर्णय विषयीची गोडी तयार झाली ती आजही ही अबाधित राखून आहे. घरी आल्यावर सुरळी करून गुंडाळून आणलेले कॅलेंडर मी उलट-सुलट परतून पुन्हा पुन्हा नीट केले. मागच्या वर्षीच्या कॅलेंडरला निरोप देत. नवीन कॅलेंडर किचनच्या त्याच उजव्या कोपर्यातील भिंतीवर अडकवले. मग त्याला हळद कुंकू वाहिले आणि नमस्कार केला. "येणारे वर्ष सगळ्यांना सुख समृद्धीचे जावो" (माझ्या आईने दिलेली शिकवण) मग त्यातील बारीकसारीक गोष्टी वरून नजर फिरवली. मन आनंदी झाले.
आम्ही लहान होतो तेव्हा माझे वडील नवीन कॅलेंडर हॉलमधल्या भिंतीवर मारलेल्या त्याच खिळयावर लावायचे. तसे आजही ही परंपरा चालू आहे बरं. बरीच माहिती त्यात असल्याने त्याचा उपयोग सगळ्यांना होतो. नवीन कॅलेंडर आणले की प्रथम जुने कॅलेंडर काढून व्यवस्थित करून अगोदर साठवून ठेवलेल्या जुन्या कॅलेंडरमध्ये व्यवस्थित बांधून ठेवतात. मग नवीन कॅलेंडरची वर्णी लागते. पुस्तकांना गुरु म्हणणारे माझे बाबा कॅलेंडरला ही तसेच जपून व्यवस्थित ठेवतात. जवळ-जवळ 1975 पासूनची सर्व कॅलेंडर आजही माझ्या माहेरी आहेत. ती जुनी कॅलेंडर पाहिली की आपल्या जन्मापूर्वीची संस्कृती आणि परंपरा, याची यादी जणू माझ्या नयन पटावर चित्र कोरते. सहज तरलतेने तेव्हाचे उत्सव मग मी कल्पनेच्या कुंचल्याने रंगवते.
एक एक वर्ष पालटत असताना कॅलेंडरचे बदलते स्वरूप लक्षात येते. बरं या सगळ्या कॅलेंडरच्या पोतडीत मला कालनिर्णय कॅलेंडर जास्त प्रमाणात आढळते. पण त्याच बरोबरच भाग्योदय, रविकिरण ही कॅलेंडरही सापडली. तासन तास बसून बरीच कॅलेंडर चाळत असताना या कॅलेंडरमध्ये बराच खजिना सापडला बरं का! त्यामध्ये आईने केलेल्या अनेक नोंदी बाबांनी लिहिलेल्या नोट आणि आजीच्या टिक मार्क. सर्वकाही आईने तर रेशन कधी भरले, आर डी चे पैसे केव्हा दिले, दुधाचे बिल, दूधवाल्याने खाडा केला तो दिवस, पेपराचे बिल, सगळे काही बारीक अक्षरात लिहिलेले आहे. तर बाबांनी कॅलेंडर वर फोन नंबर, त्यांच्या मिटिंग च्या तारखा, महत्त्वाच्या ठिकाणी केलेल्या प्रवासाची तारीख. वगैरे नोंदी सापडतात. हे सगळं वाचत असताना मला सापडलेली या पुढची गंमत म्हणजे, आजीनी केलेल्या खुणा.माझी आजी आज नाही आहे. पण तिच्या थरथरत्या हाताने कॅलेंडरवर केलेल्या खुणा दिसल्या की मी कधीच लहान होऊन जाते. माझी प्रिय आजी माझ्या डोक्यावरून हात फिरवत गोड गालगुच्चे घेते असा मला भास होतो. तिने केलेल्या या खुणा कसल्या? तर गडी माणसांना द्यावयाचा बोनस. म्हणजेच दिवाळीला उठणे, खाऊ, साबण द्यायचा तर ती तशीच चित्रे व खुणा करून ठेवायची. किंवा किती दिवस किती माणसे कामाला आली तर तेवढ्या उभ्या रेषा काढायची व किती माणसे आली हे दर्शवण्यासाठी वारली कलेतील माणसांची संख्या काढायची.
कालनिर्णय हाती लागले की मी प्रथम आपला वाढदिवस कोणत्या दिवशी येतो हे पहिले पाहत असे.जसजसं वय वाढत गेलं तसं आम्हा भावंडांच्या नोंदी कॅलेंडरमध्ये होऊ लागल्या. मग त्यात परीक्षांची तारीख, स्पर्धांच्या तारखा, क्लास चुकवल्याची तारीख, स्कूल चुकल्याची तारीख, ड्रॉइंग काढून पुर्ण कधी करायचे त्याची तारीख आणि असं बरंच काही लिहिलेलं असायचं. मला आजही आठवते नवीन कॅलेंडर आले की त्याच्या पाठीमागे असणारे राशिभविष्य माझे बाबा त्या त्या महिन्यात प्रत्येकाच्या राशीनुसार वाचून दाखवायचे. आजही अंगारकीला चंद्रोदय कधी ते फोनवर सांगतात. आणि आईला तर काय मेनू पाहण्याची भारी आवड. कॅलेंडर मधील मेनू पाहून छान छान पदार्थ बनवते. तेव्हा फार मजा वाटायची आणि आजी, होळी ,पाडवा, दिवाळी अशा सणाने कॅलेंडरच्या मागे पुराणकथा यायच्या त्या आवर्जून आमच्याकडून त्या त्या सणाला वाचून घ्यायची आणि त्याबद्दल अधिक माहिती द्यायची. त्यामुळे कोणता सण कसा साजरा करायचा याची आपसूकच माहिती होत गेली. कालनिर्णय दिनदर्शिकेच्या मागे तर रोजचे पंचांग,सौंदर्य टिप्स, महत्वाचे दिनविशेष,स्वयंपाक,गाड्यांचे वेळापत्रक, राशिभविष्य असे बरेच काही वाचणे उपयोगी असते. त्यामुळे हे कॅलेंडर कितीतरी वर्षे बाजारात राज्य करत आहे. आणि मुख्य म्हणजे ते सात भाषांमध्ये उपलब्ध आहे. असे हे कॅलेंडर किचनच्या त्या उजव्या बाजूच्या भिंतीवर लावल्याने मला वाटणारा आनंद अवर्णनीय असतो. घरातील इतरांना लाल रंगाच्या तारखा बघण्यात आणि सुट्याचे नियोजन करण्यास या कॅलेंडरचा नक्कीच उपयोग होतो. म्हणून तर कॅलेंडर वर्षभर स्वप्नांना जागे ठेवते, ती पूर्ण करण्याची उमेद देते आणि नविन वर्षात नवीन स्वप्न घेऊन येते.
