Shilpa Desai

Children Stories Fantasy Others

3  

Shilpa Desai

Children Stories Fantasy Others

आनंदाच्या डोही आनंद तरंग...

आनंदाच्या डोही आनंद तरंग...

9 mins
211


‘’झुक झुक झुक झुक आगीनगाडी.

धुरांच्या रेषा हवेत काढी.

पळती झाडे पाहू या 

मामाच्या गावाला जाऊ या.

मामाचा गाव मोठा.’’


   उड्या मारत गात असलेला विहांग मध्येच थांबला. आई माझ्या मामाचा गाव किती मोठा आहे ग. मी अजून कधीच पाहिला नाही. नऊ वर्षाचा विहांग विचारत होता. त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत मालविका म्हणाली ‘’विहांग तू आता मित्रांबरोबर खेळून आलास ना, मग हात पाय न धुता तिथेच कां थांबलायस . जा अगोदर आणि हात पाय धुऊन ये. मी तुझ्यासाठी पिझ्झा बनवला.’’ विहांगने धावत जाऊन हात पाय धुतले. हॉलमध्ये येऊन बसला. पिझ्झावर ताव मारत असताना त्याने पुन्हा आईला विचारले."      "आई मामाच्या गावाला आपण जाऊयात का या सुट्टीला?" आता मात्र मालविका त्याच्यावर जोरात ओरडली "काय मगापासून मामाचं गाव लावलय, तुला काय कमी आहे का येथे. मामाचा गाव म्हणे. तुला सुट्टी एन्जॉय करायची आहे ना, मग कुठेतरी पिकनिकला जाऊ या. .....ठीक आहे.!


"नको मी नाही येणार पिकनिकला, दुसऱ्या कुठ्च्या ठिकाणी. माझे सगळे मित्र त्यांच्या-त्यांच्या मामाकडे जाणार. मला पण माझ्या मामाचे गाव पाहायचे आहे. "विहांग तू आता ऐकणार आहेस कि नाही? काय देऊ एक रट्टा, मी सांगितलं ना तुला यावर्षी आपण माथेरान किंवा महाबळेश्वरला जाऊ. तुला आवडतं ठीकाण आहे. चल आता तो पिझ्झा संपव बघू. शहाणं माझं बाळ."


"आई प्लीज आपण मामाच्या गावाला जाऊ या माझ्या क्लासमधला अनय सांगत होता की तो मामाच्या गावाला जाणार आहे. त्याचा मामा म्हणे कोकणात राहतो तेथे खूप झाड असतात. त्याच्या मामाचं कौलारू घर मोठ आहे. घरासमोर खूप मोठ अंगण आहे. आणि कोकोनट ट्री भरपूर आहेत. घरासमोर विहीर आहे आणि ते विहिरीजवळ जाऊन आंघोळ करतात. आंब्या फणसाची झाडे आहेत. अंगणात बसून रात्रीच्या वेळेस स्टार व मून बघतात. एकदा तू मला चित्र काढून दिलं होतंस ना तसच चित्रातल्या सारखं त्याच्या मामाचं घर आहे. किती चांगला आहे त्याचा मामा. माझ्याकडे यातलं काहीच नाही. त्याची आई पण खूप चांगली आहे त्याला मामाकडे नेते. तू वाईट आई आहेस." विहांग रडकुंडीला येऊन म्हणत होता. 


विहांगला कसं समजावं हे मालविकाला समजेनासं झालं. मनातून ती फारच दुःखी झाली. 'तु वाईट आई आहेस. मला मामाच्या गावी नेत नाहीस.' त्याचे शब्द तिच्या कानात घुमत राहिले. स्वतःच्या पिल्लाला मामाच्या गावाला जायची लागलेली ओळ दाबून ठेवताना तिचं काळीज तुटत होतं. या पोराने काय मनात खूळ घेतले आहे आणि त्याला आता कस काय समजावू. हे प्रश्न तिला त्रास देऊ लागले. ती विचारात गुंतून गेली.


भूतकाळाच्या रम्य मोरपीसी सुखद आठवणीनी पुन्हा बहरून आली. लहान असताना तीही अशीच सुट्ट्या लागल्या की मामाच्या गावाला जायची. आयुष्यभर शिदोरी सारखा पुरून उरणाऱ्या आठवणी सारखा मामाचा गाव. प्रेमाचा ओलावा असणारा. नात्याची वीण घट्ट करणारा. कोणत्याही संस्कार वर्गात न जाता कळत-नकळत संस्काराची खाण देणारा. साऱ्यांनां हवा हवा असा वाटणारा मामाचा गाव तीच्या डोळ्यासमोर आला. निसर्गाचा बहर आलेली मायेची आजी. प्रेमाने धाकात ठेवणारे आजोबा रोज गोडाधोडाचे करून घालणारी मामी,मामेभावंडात केलेली मस्ती, दंगा, मज्जा आठवली. दरवर्षी मामाच्या त्याच त्याच गावाला जाताना नवलाई असायची. जांभळ करवंद पोटभर खायची. दुपारच्या टाईमला बर्फाचा रंगीत गोळ्या खाऊन कलरफुल झालेली जीभ एकमेकांना दाखवताना लय भारी वाटायचे. त्यामुळे कधीच सर्दी-खोकला झाला नाही; किंवा पंखे नसलेल्या त्या मामाच्या कौलारू घरात हॉलमध्ये सगळी मावस भावंड एकत्र छान झोपायचो. गरमीचा त्रास कधीच जाणवला नाही.


विहांगला हा आनंद ती देऊ शकली नाही याची तिला खंत वाटून तिचे डोळे भरून आले.राग, भीती मनात ठेवून फक्त एका गोष्टीमुळे तिच्या आई-बाबांनी तोडलेले नाते तिने मनात असूनही पुन्हा जोडण्याचा प्रयत्न केला नव्हता. आठवण तर सतत होती पण ती आठवण मनाच्या कोपऱ्यातून बाहेर व्यक्त झाली नाही; की मायेच्या मिठीत ओथंबली नाही. दोन पावले मागे सरुन आईच्या कुशीत जाऊन का नाही मी व्यक्त झाले.कदाचित बाबांचा राग विहांगला पाहून लोण्याचा गोळा झाला असता. मी चुकले खूप चुकले याची खंत वाटून मालविका चे डोळे भरून टपकू लागले. मालविका पुन्हा एकदा आठवणीत गेली.


जवळपास बारा वर्षापूर्वी (जणू एक तपच झालं) कोकणातल्या ब्राम्हण कुटुंबातल्या मालविकाने जातीबाहेरच्या आनंदशी घरच्यांचा विरोध पत्करून प्रेम विवाह केला. लग्नानंतर वडीलांचा आशीर्वाद घेण्यास ती गेली, तेव्हा बाबांनी त्रागा केला. घरात तर घेतले नाहीच. वर म्हणाले आलीस तशी इथून चालती हो! आजपासून तु आमची कोणी नाहीस. तू आमच्यासाठी मेलीस. तुझ्या नावाने अंघोळ करतो. असं बोलून त्यांनी अंगणासमोर असलेल्या विहिरीचं पाणी काढून अंगावर शिव... शिव.. करत अंगावर ओतुन घेतलं. आनंदला व मालविकाला जवळजवळ त्यांनी हाकलून दिलं. त्यानंतर ती पुन्हा कधी माहेरी गेलीच नाही. बऱ्याचदा आनंदने तिला जाण्यास सांगितले पण तिचा इगो आड आला.


आपल्याला हाकलून दिलं याचा राग तिच्या मनात होता. त्यामुळे तिने कधी बोलण्याचा किंवा माहेरी जाण्याचा प्रयत्न केला नव्हता. पण आज इतक्या वर्षांनंतर विहांगसाठी तिला माहेरची ओढ लागली होती. काही झालं तरी, कोणीही कितीही बोलले तरी विहांगला यावर्षी मामाच्या गावी घेऊन जायचं म्हणजे जायचं. तिने अगदी मनोमन ठरवून निर्णय पक्का केला. लगेच ती विहांगच्या खोलीत गेली. विहांग हिरमुसून झोपी गेला होता. त्याच्या केसावरून गालावरुन हात फिरवत ती त्याला म्हणाली हे पिल्लू चल उठ पाहू आपल्याला मामाच्या गावी जायचंय ना! बॅगा भरायला घे आणि हो आत्ताच मार्केटमध्ये जाऊया मामा कडच्या सगळ्यांसाठी गिफ्ट घ्यायची आहेत. आता मात्र विहांगचा राग कुठच्या कुठे पळून गेला होता. त्याने टुणकन उडी मारून आनंदाने नाचायला चालू केलं.

'जाऊ या जाऊ या मामाच्या गावाला जाऊ या

पाहूया पाहूया मामाचा गाव पाहू या'


त्याचा उत्साह पाहून तिलाही मनोमन नाचावंसं वाटू लागलं. लगेच मालविकाने आनंदला फोन करून तसे सांगितले. ट्रेनची तिकीट बूक करायला सांगितली. ठरलेल्या दिवशी तिघेही ट्रेन मध्ये बसले प्रवास सुरु झाला यापूर्वी अनेक वेळा विहांगने ट्रेनमधून प्रवास केला होता. तरी आजची झुक झुक गाडी त्याला वेगळाच आनंद देत होती खिडकीतून बाहेर पाहताना विहांगला फार मजा येत होती. गाडी कोकणात जाताच  निसर्गाचे सौंदर्य दिसू लागले. उंच उंच डोंगर कितीतरी बोगद्यातून जाणारी गाडी, लांबवर पसरलेली शेती, मध्येच एखादा गुराखी दिसत होता. वेडीवाकडी वळणे घेत चाललेली नदी, तीच स्वच्छ पाणी बघून विहांगला वेगळाच आनंद वाटत होता. आपल्या आई-बाबांना अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडत होता. कुठच्याही कॅम्पला न जाता त्याला सगळ अनुभवता येत होतं.


मळगाव स्टेशनवर उतरल्यावर पुढचा प्रवास बसने केला. 'मामाचा गाव आला बघ', म्हणत मालविकाने विहांगला बस मधून उतरण्यास सांगितले. बसमधून उतरल्या बरोबर सभोवार माडा-पोफळीच्या बागा दिसल्या. बाजूला उंच उंच डोंगर, मधूनच सूर्याची दिसणारी तिरपी किरणे, बागातून पाटाचे झुळझुळ वाहणारे पाणी, पक्षांचा किलबिलाट, मोठी आंब्याची झाडे, त्या झाडावर पिकलेले आंबे खात बसलेली माकडे, काजूच्या झाडावरची घोसांनी लटकून आलेली काजू बोंड, रस्त्यावर पडलेली जांभळाची आरास, एवढेच नाही तर पांधणीतून जाताना कुंपणावरच्या वेलीवर उमलणारा मोगऱ्याचा घमघमाट आसमंतात पसरला होता. आहाहा! विहांगच्या स्वप्नातल्या मामाचा गाव आज सत्यात दिसत होता. बऱ्याच वर्षांनी आलेल्या मालविकालाही या पाहिलेल्या गोष्टींची नवलाई वाटत होती. ते विहंगम दृश्य पाहून तीचे कविमन जागे झाले. नकळत ती गुणगुणू लागली...


"वर आकाश निळे झाकळून डोंगर

सोनेरी किरण रवीचे पडले शिखरावर

हसली फुले वेलीवर ओठ उघडून"


निसर्गाचे देखणे रूप पाहून सुखावलेले ते तिघे मामा च्या घरी कधी पोहोचले ते कळलेच नाही. समोर माहेरघर दिसताच मलविका मनातून थोडी घाबरली. तरी विहांला म्हणाली, "बाळ हे तुझ्या मामाचे घर."


ज्या आनंदाने आपण माहेरच्यांना कोणतीही सूचना न देता आलो आहोत तो आनंद टिकून राहील की नाही अशी मालविकाचा मनात पाल चुकचुकली. सगळा धीर एकटवून तिने अंगणातून हाक दिली. आई बाबा! तशी घरातील सगळी मंडळी बाहेर आली. आई, बाबा, दादा, वहिनी, आत्या, दादाची दोन मुलं, अर्थात अर्जुन व आर्या. अर्जुन पंधरा वर्षाचा तर आर्या बारा वर्षाची. 'माझा लग्नाच्यावेळी आर्या एक वर्षाची पण नव्हती; आता केवढी मोठी झाली किती गोड दिसते'. मालविका मनातल्या मनातच म्हणाली, बाबा सोडून सगळी मंडळी सुरात म्हणाली "मालविका असे अचानक आलात," आईचे तर डोळे भरून आले. विहांगला जवळ घेत ती त्याचे पटापट मुके घेऊ लागली. आत्याने धावतच स्वयंपाक घरातून भाकर-तुकडा आणला तिघांच्या डोक्यावरून फिरवून नजर काढली. पायावर पाणी ओतले आणि घरात प्रवेश करण्यास सांगितलं. आता तिघांनीही सगळ्या मोठ्यांना नमस्कार केला. मालविका तर आईच्या कुशीत शिरून रडू लागली. " आई मला माफ कर, मी माझ्या पिल्लाला मामाचा गाव दाखवायला आणले; प्लीज मला रागावू नका." आईला वाईट वाटलं आणि ती म्हणाली मालू माझा नातू एवढा मोठा झाला आणि त्याला जर मामाकडे यायचे आहे तर कोणी तोडू शकत नाही आणि हे बघ तुझे बाबा आता थकलेत ग. कदाचित तुझी आठवण त्यांना मनोमन येत असेल. पण ते तसे बोलून दाखवत नाही आज मात्र मनातून आनंदी दिसतायेत. बघ कसे विहांग ने त्यांच्या पाया पडतात आशीर्वाद देता देता त्याचे मुके घ्यायला लागले. त्यांचा राग आता निवळेल बघ.


विहांग इतक्यात मामे भावंडात अगदी पूर्वीपासून ओळख असल्यासारखा एकरूप झाला होता. त्याला पाहून मालविका व आनंदला सारखे वाटू लागले की विहांगची इच्छा शक्ती एवढी होती की इतक्या वर्षाचा राग द्वेष केव्हाच गळून पडला. रात्र होतात सगळे एकत्र जेवणाला बसले. जेवणात फणसाच्या गऱ्यांची भाजी, आंबोळ्या, काळ्या वाटण्याची आमटी, कैरीची डाळ घालून केलेली चटणी, आंब्याचे रायते असा सुग्रास जेवणाचा आस्वाद घेऊन तिघेही तृप्त झाले.

"आजोबा चला ना माडीवर हापूस आंबे पिकत ठेवलेत ना तुम्ही, त्यातला एक आंबा मला द्या  ना. प्लीज.."

''तुला कोणी सांगितलं'' बाबा हसत हसत म्हणाले

''अर्जुनदादाने व आर्याताईने सांगितले मला'' असे म्हणून विहांग बाबांना घेऊन माडीवर गेला सुद्धा.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून विहांगने आपली प्राथमिक कामे आपणच आटोपली.

' आई आम्ही आज बैलगाडीने फिरायला जाणार आहोत' टी-शर्ट अंगात घालत असताना विहांग बोलला. 'बैलगाडी कुठे भेटली'

‘अर्जुन दादाला मी तसे सांगितले. त्याने रामू आजोबांना गाडी तयार ठेवायला सांगितली.’

''अरे पट्ट्या म्हणजे अगोदरच नियोजन करून ठेवलं तर'' मालविका म्ह्णाली.


तोपर्यंत गावातील दूरच्या काकांची नातवंडं, आर्याचे मित्र-मैत्रिणी सगळे जमा झाले. खिल्लारी बैलांची जोडी गाडीला जुंपून रामूगडी शेता कडून आला. सगळी चिलीपिली गाडीत बसली. विहांगने हुर्ये........ रे करत आरोळी ठोकली. बैलांच्या गळ्यातले घुंगरू वाजू लागले. आणि विहांगची भटकंती चालू झाली. मालविका आई आत्या वहिनीबरोबर स्वयंपाक करायला मदतीला लागली. कितीतरी वर्षानंतर ती अशी नात्याच्या गोतावळ्यात वावरत होती.


बैलगाडीने सैर करून आल्यावर सगळेजण नदीवर आंघोळीला गेले. सोबत आनंदही गेला. मागच्या वर्षी आनंदने विहांगला स्विमिंग क्लासेस लावला होता. त्यामुळे त्याला पोहता येत होते. पण इथे स्विमिंग ड्रेस घालून नाही तर चड्डी बनियान वर विहांग नदीत उतरून पोहण्याचा आनंद घेत होता. अर्जुन त्याला नदीच्या पाण्यात सूर कसा मारायचा ते शिकवत होता. नदीतले छोटे छोटे मासे पायावर गुदगुल्या करत असताना भारी मजा वाटत होती. तिन्हीसांजेला दिवा लावताना आई व माने भावंडांबरोबर तुळशीजवळ जाऊन शुभंकरोती म्हणताना विहांग शहाण्या मुलासारखा केव्हाच देवासमोर नतमस्तक झाला.


सकाळी सकाळी अंगणात मामी रांगोळी काढताना पाहून विहांग भान हरपून ते पाहायचा. '' मामी मी पण काढू का ग रांगोळी" म्हणत त्याने उभ्या-आडव्या नकाशाच्या का होईनात रेघोट्या काढल्या आणि त्याच्या मामीनेही त्याने काढलेली रांगोळी संपूर्ण दिवस अंगणात तशीच ठेवून दिली.

तिसऱ्या दिवशी जंगल सफारीचा बेत आखला आज मालविकाही मुलांबरोबर निघाली मामा मामी आनंद मालू आणि सगळी छोटी मंडळी जंगलात सफारीला निघाली. जवळ जवळ अर्धा डोंगर मालूच्या वडिलांच्या मालकीचा होता. त्यामुळे पूर्ण राखीव होता. त्यात कोणी जुनी झाडे तोडली नव्हती. करवंदीच्या झुडपातून फिरताना आंबट-गोड करवंदाचा आस्वाद घेत, जांभळं खाऊन काळी जीभ दाखवताना तिघांना खूप मज्जा येत होती. माकड, वेगवेगळे पक्षी पाहून डोळे सुखावले होते.


दुपारपर्यंत हुंदडून झाल्यानंतर मोर्चा घरी गेला तेव्हा आईने थंडगार कैरीचे पन्हे पेश करून गारवा दिला. मामा आज आपण काऊचे घर बघूया हा. विहांगने सकाळीच मामाला सांगितले. रविवार असल्याकारणाने मामालाही सुट्टी होती त्यामुळे मामाने लगेच मान डोलावली. शेतघर थोडं दूर होतं. घराजवळच मोठा गोठा होता. गोठ्यात पाच दुभत्या गाई आणि वासरे पाहून विहांग भान हरपून गेला. कानात वारं शिरलेल्या वासरा सारखा शेतात उड्या मारू लागला. नारळाच्या आणि काजूच्या मोठ-मोठ्या ढीगाकडे पाहून अवाक् झाला. वाॅव् ! मामा किती सारे हे नारळ. ओ गॉड किती सारे कॅशू! असे म्हणताना तोंडावर हात ठेवला. त्याच्या त्या वाव मध्ये काजू फॅक्टरी अपेक्षित होती. गायीची धार धरताना वाटणारी गंमत त्याला आयुष्यभराची ओढ निर्माण करून गेली.


दिवसागणिक बाबांचा राग नातवाला कुशीत घेता घेता कमी होत चालला होता. हे सगळं पाहिल्यावर मालविका ही सुखावत होती. ही सुट्टी संपूच नये असे तिलाही आता मनोमन वाटू लागले. या सुट्टीत विहांगने केलेली धमाल, खाणं-पिणं ,खेळ, गमतीजमती, श्रीमंतांच्या फेरारी पेक्षा रामू गड्याच्या बैलगाडीत बसण्याची आवड, नदीत पोहणे, जंगलाची सफारी, चिंचा बोरं खाणं, या सगळ्यातून आठ वर्षात जेवढे संस्कार विहांगवर झाले नाही ते एका सुट्टीत मामाच्या गावाला आल्यामुळे झाले. याचे मनोमन समाधान मालविका आणि आनंदला वाटत होते.


निरोपाच्या वेळी मालविकाने बाबांना नमस्कार करताच भरून आलेल्या डोळ्यानी बाबांनी आशिर्वादासाठी डोक्यावरती ठेवलेला हात, आईं विहांगच्या खिशात खाऊसाठी ठेवलेले पैसे आणि त्यानंतर आजीच्या आणि मामे भावंडांच्या ओढीने सारखे मागे वळून बघणारा विहांग. मामाच्या मुलीने 'दिवाळीच्या सुट्टीत ये रे विहांग', असं मोठ्याने सांगितल त्याक्षणी विहांगच्या गालावर खुदकन हसू आलं. ते पाहून मालविकालाही आप्तस्वकीयांच्या गोतावळ्यातला आनंदाच्या डोही आनंद तरंग हा सुखाचा नजराणा गवसला.


Rate this content
Log in