Shilpa Desai

Comedy Fantasy

3  

Shilpa Desai

Comedy Fantasy

चप.. चपाक..... उम्मा

चप.. चपाक..... उम्मा

5 mins
455


 अचानक खटखट आवाजाने मला जाग आली. गाढ झोपेत असल्याने पहिल्यांदा काय हे समजले नाही. पण नंतर कसलीतरी हालचाल जाणवली. लाईट न लावताच मोबाईल टॉर्च ऑन केला. आजूबाजूला टॉर्चचा प्रकाश टाकला. पाहते तर माझा मुलगा निरागसपणे आपल्या पप्पावर तंगड्या टाकून झोपला होता आणि त्याचा पप्पा चांगलाच घोरत होता. दोघांनाही कशाचीच भ्रांत नव्हती. दोघेही छान झोपेचा आनंद लुटत होते. मग काय, घराची जबाबदारी माझ्यावरच.. कसली हालचाल आहे याचा मागोवा घेण्यासाठी मी कसलाही आवाज न करता चोरपावलांनी किचनच्या दिशेने जाऊ लागले. कदाचित उंदीर आला असेल. माझ्या मनात विचार डोकावून गेला. छे....! उंदीर येणे शक्यच नाही. नक्की झुरळ असेल. पण तेही कस असेल आत्ताच तर मी पेस्टकंट्रोल करून घेतलय. काय बरं असेल? बेडरूम ते किचनपर्यंतच्या प्रवासात माझ्या मनात घर करून बसलेल्या प्रश्नाचे उत्तर किचन मध्ये जाऊनच मिळणार होतं. पण तितकंच अंतर चालत असताना माझ्या मनात अचानक डोकावून गेले. 'कदाचित चोर-बिर असला तर? त्याच्याजवळ तर चाकू, गन, बेशुद्ध पाडणारा स्प्रे यातलं काहीतरी नक्कीच असेल.

चोर माझ्यावर चाकू हल्ला तर नाही ना करणार? आई ग ....! त्यापेक्षा नवरोबाला उठवलेले बरे. तशी मी धारिष्ट आहे. पण रात्रीच्या वेळी मोठी रीस्क नको. सात जन्माची सोबत राहण्याचं वचन दिले मग का बर नवरोबाला उठवू नको? या विचार चक्राबरोबर माझं यू टर्न झाले. घाबरलेली माझी चोर पावले बेडरूमकडे वळली.

पण बेडरुमच्या दरवाज्याजवळ पोहोचतात डोक्यात कोणत्याही परिस्थितीला न डगमगणारी धैर्यवान आधुनिक नारी संचारली. बेडरुमच्या दरवाजाच्या मागे सुरक्षिततेच्या दृष्टीने मीच लपवून ठेवलेला तुटका कर्टनरॉड उचलला. आता पुन्हा एकदा माझ्या चोरपावलाने यू-टर्न घेतला. तडक किचनमध्ये गेली. लाईटचा स्विच ऑन करणार, इतक्यातच जोरात खड.... खळ.... आवाज झाला आणि त्या ध्वनी वेगाबरोबर मी टूणकण उडी मारली.

'चप... चपाक...  उम्मा.' आतून आवाज आला. आता मात्र माझी त्रेधातिरपीट उडाली. पण क्षणात रणरागिनीचे भूत संचारलं. दंडुका हातात उभा धरला. म्हणजे जो कोणी चोर आहे त्याच्या डोक्यात ठण.. धडम.. दुसऱ्या हाताने लाईटचा स्विच ऑन केला. त्या क्षणी मला जे समोर दृश्य दिसले त्याची कल्पना करणे माझ्यातरी आवाक्याबाहेर होते. माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता.

समोर कोणीतरी इसम बसलेले होते आणि संपूर्ण अंगावर म्हणजेच डोक्यापासून पायापर्यंत चादर गुंडाळलेली होती. चादरीच्या आत मध्ये 'उम्मा, उम्म' चाललेलं होतं.

" काय बुवा भानगड?" अशा प्रश्नार्थक नजरेने आणि आश्चर्याचा आ- वासून मी चादर ओढण्यासाठी पुढे सरसावले तर कोणीतरी तिला पकडून ठेवले होते. आता काय करावे? असा विचार डोक्यात घोळू लागला. क्षणात डोक्यात प्रकाश पडला आणि मी लाईटचा स्विच ऑफ केला जणू मला काही दिसलेच नाही. आता माझी खात्री झाली होती. चादरीच्या आतमध्ये गुलाबी प्रेम प्रकरण रंगलय. त्यात व्यत्यय आणणं म्हणजे पुरावा नष्ट करण्यासारख आहे. मी फ्रीजच्या मागे तशीच गुपचूप लपून राहिले. आता मला त्या चादरीमध्ये हालचाल होत असल्याचे जाणवले. मी मागोवा घेण्यासाठी माझे कान टवकारले. 'चुम्मा चुम्मा' गोड किसचा अस्पष्ट आवाज ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी माझे कान आणि डोळे आणखीन ताटाराले. आणखीन फ्रीजजवळ चिटकून अस्पष्ट आवाज ऐकू लागले. आता मात्र मला राहवलं नाही. मी त्या दृश्याच्या दिशेने गेले चादरीला पकडून ओढण्याच प्रयत्न केला.

अरे बापरे! चादर कोणीतरी खेचून धरली होती पण मी माझ्या सर्व ताकदीने चादर ओढली मात्र आणि पुन्हा एकदा हे दृश्य पाहून जो काही मला धक्का बसला. माझं तोंड उघडच राहील. मी माझे दोन्ही जबडे दोन्ही हाताने पकडून कसेबसे माझे तोंड बंद केले. समोर दिसणाऱ्या दृश्यावर माझा विश्वास बसत नव्हता. माझे मामंजी आणि 'ति'..... "बाबा तुम्हाला शोभत का?"( मी माझ्या सासऱ्यांना बाबा म्हणते) तसे त्यांनी हाताच्या खुणेने मला गप्प केल. 'चूप राहा' असा इशारा केला. मी पुन्हा काहीतरी विचारणारच इतक्यात, "अगं बाई, गप्प रहा ना. तुझा नवरा उठला तर मला रागवेल की, त्याला हे असलं नाही बर आवडणार. त्यांच्या बोलण्याने मला गप्प राहणे वाचून पर्याय नव्हता.

"अगं मला आज झोपच येईना. त्यानंतर सारखा खोकला लागला. म्हटलं बघूतरी, हिच्या संगतीने काही चांगलं होतं काय? पण खरं सांगू, मला थोडं बरं वाटू लागलं. म्हणून थांबलोय आणखीन.

तुम्ही दोघे नवरा बायको मला डायबिटीस आहे. हे-ते, अमुक - तमुक टाळायला पाहिजे असे सांगता. तो डॉक्टरचा औषधाचा पाढा वाचून वाचून कंटाळा आला. तुमच्या भितीने इतके दिवस तोंडाला कुलूप लावलं पण आज मी चावी काढली बघ. हिला रात्रीला शोधून काढली मग काय आहाहा.. हिच्या वाचून आज झोपच येईना म्हणून हा खटाटोप बरं का."लहान मूल जसं खाऊ चोरून खाताना चोरी पकडल्यावर आईसमोर दचकून आपली बाजू पटवून सांगतं ना तसेच काहीसे मामंजी मला स्पष्टीकरण देत होते आणि त्यांचं ते बोलणं पाहून मला फार हसू येत होतं. त्यांच्या निरागस चोरीचा मामला मला खूपच आवडला. आणि मी पण मग त्यांच्यात सामील झाले.

"मी तुला पण एक आलावडी देतो" म्हणत त्यांनी माझ्यासमोर एक आलावडी ठेवली.

बाकी काही सांग, पण तू बनवलेली आलावडी नंबर एक असते बरं का आई. (या निरागस बाळाची मी कधीकधी आई होते.)

मग मी आलावडी खाऊ लागले. दोघेही मनसोक्त खात होतो. बाबा त्याच निरागसतेने पुढे बोलू लागले. "अगं, मला तू बनवलेले सगळेच पदार्थ खूप आवडतात बरं. तुझ्या हाताला भारी चव आहे. खरं सांगू का, नवऱ्याचे प्रेम पोटात असत. तू ते चांगलच हेरलस. म्हणून तर तुझा नवरा बायकोचे कौतुक सांगत असतो. बाकी तू जे काही करतेस ते अगदी मनापासून. तुझ्यासारखी आम्हाला सून, हां .. मुलगी म्हणायचे मला बरं का मिळाली हे भाग्य बघ आमचं. पोरी खरच तुझ्या आईने खूप चांगले संस्कार केलेत तुम्हा पोरांवर.

तस तुझी सासू पण स्वयंपाकात सुगरण आहे हो. पण तू मात्र त्यात उजवी ठरते." बाबांच्या या कौतुकाच्या बोलण्याने माझ्या अंगावर चकलीचा काटा आला. "वाव!" गर्वाने मी सारण भरलेल्या करंजी सारखी टम्म फुलले. तोच माझं पिल्लू,"काय करतेस मम्मा" म्हणत किचन मध्ये हजर झालं.

मला झोपवून आजोबा आणि तू चोरून खाता काय ग? असं आम्हाला दरडावत डब्यातील आलावडी घेऊ लागला.

या सगळ्या गडबडीत नवरोबा जागा झाला "अरे एवढ्या रात्रीचे काय करताय. काय नाटक चाललंय. आपणही झोपायचं नाही आणि दुसऱ्याच्या झोपेचा विचका करायचा." त्यांच्या बोलण्याचा आवाज ऐकून आम्ही चिडीचूप झालो. काहीच प्रतिसाद मिळत नाही म्हटल्यावर रागावलेला नवरोबा किचनमध्ये हजर झाला. काहीही चौकशी न करता डब्यातील एक आलावडी तोंडात टाकत म्हणतो कसा, मगासपासून घसा खव खवत होता. आलावडी घ्यायचा विचार करत होतो पण ऊठून यायचा आळस आला. अरे पण तुम्ही सगळे...उठून काय करता आणि बाबा तुम्ही पण...?"

"चप.... चपक... उम्मा आलावडी खायला." एक सुरात सगळे म्हणाले

मग नवरोबाने एक आलावडी घेतली आणि माझ्या तोंडात घातली. त्यातली अर्धी आपण खाल्ली खाताखाता एक तिरपा कटाक्ष माझ्याकडे टाकला हळूच हात आपल्या तोंडाच्या चंबुकडे नेत उम्मा करून फ्लाईंग किस केला. त्याच क्षणी माझ्या दिशेने गोड गुलाबी झुळूक स्पर्शून गेली. माझ्या पोटात पाखरं फडफडायाला लागली.

"आज मैं ऊपर, आसमाँ नीचे

आज मैं आगे, ज़माना है पीछे

Tell Me ओ ख़ुदा, अब मैं क्या करूँ

चलूँ सीधी की उल्टी चलूँ"

असं मनातल्या मनात पोटातली पाखरं गुदगुल्या करत मनातच चप.. चपाक..... उ.. म्मा उडू लागली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy