प्रवास
प्रवास


मी आणि माझी बहीण खुप आनंदात होतो, कारण आम्ही रात्री गावला जाणार होतो.आमचे गाव म्हणजेच कोकण. बाबा आणि आई गावला जाण्याची तयारी करत होते.आजी आम्हाला गोष्टी सांगत होती. आमची सगळी तयारी झाली होती.आम्ही गाडीत बसताच पाऊस सुरु झाला.
आम्ही रात्री 10.00 वाजता प्रवास सुरु केला. बाबा गाडी चालवत होते. मी त्यांच्या बाजुला बसलो. ताई, आजी आणि आई मागे बसले होते. मी गावला जाऊन आंबे खाणार, रानावनात फिरणार, गावच्या ताई आणि दादाशी गप्पा मारणार. घराच्या बाजुलाच नदी असल्यामूळे गावला होडीतून फिरायला, मासे पकडायला, नदीत पोहायला खूप मज्जा येते. गावाला गेल्यावर आईने बनवलेल्या स्वादिष्ट पदार्थांची चव घेणार. मी खूप उत्सुकतेने बाहेर पाहत पावसाचा आनंद घेत होतो. वीजही जोरात कडकडत होती.
अचानक बोलता बोलता आमची गाडी कधी घाटात पोहोचली मला समजलेच नाही. ताई, आजी आणि आई झोपी गेले होते. घाटातले काही अंतर कापताच एक विचित्र प्रकारचा आवज आला. बाबा आणि मी दचकलो. बाबा बोलले ‘आपण येथे थांबू या.’ तेवढ्यात आई झोपेतून उठली. आई म्हणाली ‘येथे थांबणे योग्य नाही, येथे दुसरी कोणतीही गाडी दिसत नाही आहे. आपण येथे नाही थांबलो पाहिजे.’ बाबांनी गाडी न थांबवता प्रवास सुरुच ठेवला. रात्रीचे दीड वाजले होते. आई पुन्हा झोपी गेली. परंतु मला काही झोप लागेना.
काही अंतरावर जाताच आम्हाला रस्त्याच्या कडेला एक बाई दिसली. बाबा बोलले ‘आपण येथे थांबू या.त्यांना मदतीची गरज असावी.’ मी बाबांना म्हणलो ‘बाबा आपण नको थांबू या येथे तुम्ही लवकर ह्या घाटातून गाडी बाहेर काढा.’ बाबांनी गाडी थांबवली नाही. पुढे जाताच
परत एक बाई आम्हाला रस्त्याच्या कडेला उभी दिसली. बाबांनी गाडी थांबवली व मी आणि बाबांनी मागे वळुन पाहिले. बघतो तर काय ! तिथे कोणीच नव्हते. आम्ही घाटात एकटेच होतो. ती बाई त्या घाटातून अचानक अदृश झाली. आम्ही खूप घाबरलो होतो. तिथे कोणतीही दुसरी गाडी नव्हती. आम्हाला पुन्हा तो विचित्र आवज आला. त्यात पाऊसही ओसंडून पडत होता आणि विजांचा ही आवाज खूप येत होता.
बाबांनी पुन्हा गाडी सुरु केली. गाडी चालवता चालवता अचानक एक पक्षी गाडीच्या काचेवर येउन धडकला. आम्ही दचकलो. बाबांनी झटक्यात गाडीचा ब्रेक मारला. ताई, आजी आणि आईही झोपेतून उठले. आम्ही त्यांना सगळी हकीकत सांगितली. आम्ही त्यांना खूप समजावलं परंतु त्यांना आमच्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता. बाबांनी पुन्हा गाडी चालवण्यास सुरुवात केली. ताई, आजी आणि आई पुन्हा झोपी गेले. काही वेळानंतर आम्हाला मागून वाचवा! वाचवा! असा एका बाईचा आवज आला. आम्हाला वाटले त्याच बाईचा आवज असावा. तिला आमच्या मदतीची गरज असावी म्हणून बाबांनी आणि मी मागे वळुन पाहिले. गाडी सुरुच होती.मागे बघितले तर मागे कोणीच नव्हते. पुन्हा ती बाई तेथून अदृश झाली होती.
पुढे लक्ष जाताच ती बाई अचानक आमच्या गाडीच्या समोर आली. बाबांनी तिला वाचवण्यासाठी गाडीची दिशा बदलली परंतु गाडी तिच्या आरपार गेली व गाडी थेट खाईत गेली. आमचा अपघात झाला.
तेवढ्यात एक आवाज आला ‘शुभांकर उठ लवकर क्लासला नाही का जायचे?’ अचानक मी जागा झालो. मी खूप घाबरलो होतो. मी देवाचे आभार मानले की, नशीब हे माझे स्वप्न होते. हे माझ्या आयुष्यातील सगळ्यात भीतीदायक आणि वाईट स्वप्न होते.