Shubhankar Malekar

Children Stories Fantasy Children

4.9  

Shubhankar Malekar

Children Stories Fantasy Children

चाळीतल्या गोष्टी...

चाळीतल्या गोष्टी...

5 mins
417


       नुकत्याच वार्षिक परीक्षा संपल्या होत्या.चाळीतल्या सगळ्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टया लागल्या होत्या.चाळीत आता मुलांचा कल्ला होणार होता कारण वर्षभर मुलांना हेच सांगितले जाते की,'आता अभ्यास करा,उन्हाळ्याच्या सुट्टया लागल्या की खेळा आणि तेव्हा तुम्हाला कोणीही ओरडणार नाही.'मात्र चाळीत असे काही लोकं असतात त्यांना नेहमीच लहान मुलांच्या खेळण्याचा त्रास होतो.आता खेळ म्हंटला तर गोंगाट तर होणारच ना!असेच काही लोकं आमच्या चाळीत देखील होते.


         आमच्या चाळीत एक 'देशपांडे' नावाचे काका होते.त्यांना नेहमीच मुलांच्या खेळण्याचा त्रास व्हायचा.त्यांच्या घरात कोणीही लहान मुलं नव्हतं.त्यांचा मुलगा कॉलेज मध्ये होता.तो नेहमी घरातच असायचा.तो कधीही आमच्या सोबत खेळायचा नाही.त्यामुळे चाळीतली सगळी मुलं त्याला 'घरकोंबडा' म्हणुन चिडवायची.सुट्ट्यांमध्ये आम्ही भोवरा,गोत्या,क्रिकेट,मराठी व्यापार,कैरम,लगोरी,लपाछपी अश्या प्रकारचे अनेक खेळ खेळायचो.


            एकदा आम्ही देशपांडे काकांच्या घरा समोर गल्ली क्रिकेट खेळत होतो.खेळता खेळता शौर्यने एक जोरात शॉट मारला आणि बॉल देशपांडे काकांच्या घरा बाहेर लावलेल्या बल्बवर जाऊन बसला.त्या दिवशी देशपांडे काका त्यांच्या घरातल्या मंडळी सोबत बाहेर गेले होते.तो बल्ब फुटल्या वर चाळीतले काही लोकं बाहेर आले.ते येई पर्यंत आम्ही तिथुन धुम ठोकली होती.आजुबाजूचे लोकं बाहेर येऊन ओरडु लागली.आमच्या शेजारच्या काकु म्हणाल्या,"ह्यांना खेळायलाच नाही दिलं पाहिजे.ह्यांना मैदानात जाता नाही येत.आज देशपांडयांचा बल्ब फुटलाय उद्या आपला पण फुटेल.देशपांडे आले की मी त्यांना सांगणार आहे."


             आम्ही हे सगळं लपुन ऐकत होतो.उद्या पासुन आमचा खेळ बंद होऊ शकत होता.खेळ बंद होऊ नये म्हणुन आम्ही एक प्लान बनवला.सगळे घरात गेल्या नंतर आम्ही देशपांडे काकांच्या घरा जवळ गेलो.फ़ुटलेल्या बल्बच्या काचा आम्ही सांभाळुन गोळा केल्या आणि  टाकुन दिल्या.आम्ही आमचे साठवलेले पैसे गोळा केले आणि नविन बल्ब आणला.राजने शौर्यला खांद्यावर घेतले.शौर्यने हळुच तो बल्ब तिथे लावला.तेवढयात रोशनला देशपांडे काका येताना दिसले.रोशन जोरात ओरडला,'पळा! पळा! देशपांडे काका आले.'शौर्य झटक्यात राजच्या खांद्यावरुन उतरला.आम्ही सगळे तिथुन पळून गेलो.


             संध्याकाळी त्यांनी तो बल्ब चालु केला.पण तो बल्ब वेगळ्या रंगाचा होता.त्या वेळी आमच्या लक्षातच नाही आले की बल्बचा रंग कोणता आहे.काही वेळाने देशपांडे काकांच्या ही चुक लक्षात आली.त्यांना काहीच समजले नाही.बोलता बोलता त्यांनी ही गोष्ट आमच्या शेजारच्या काकुंना सांगितली.त्यांनी मग दुपारी घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला.त्या वरुन आमच्या चाळीत खुप मोठं भांडण झालं.देशपांडे काकांनी आमचं खेळणच बंद करुन टाकलं.आम्हाला त्या काकुंचा खुप राग आला होता.त्यांना ही आमच्या खेळण्याचा त्रास होत होता.


            आता आम्हाला गल्लीत क्रिकेट तर खेळता येणार नाही म्हणुन आम्ही लपाछपी खेळायला सुरुवात केली.आमच्या चाळीत एक 'ओंकार' नावाचा मुलगा होता.आम्ही त्याला अनेक वेळा धप्पा द्यायचो. एकदा का त्याच्या वर राज्य आला तर पाच ते सहा डाव झाल्या शिवाय तो सुटायचा नाही.कधी कधी तो आमच्या सोबत खेळायचा पण नाही.खेळता खेळता गोंगाट होत होता.ह्याचा पण त्या देशपांडे काका आणि आमच्या शेजारच्या काकुंना त्रास होत होता,मात्र ते काही बोलत नव्हते.आम्ही लपाछपी खेळायचो तेव्हा ते झोपलेले असायचे.कधी कधी मुद्दाम बाहेर येउन ते रस्त्यावर विनाकारण पाणी ओतायचे.आम्हाला राग येत होता पण आम्ही काही बोलु शकत नव्हतो.


             उन्हाळा म्हंट्ल की वाळवण आलच.उन्हाळ्यात चाळीतल्या सगळ्या बायका उन्हात पापड,कुरडया,साबुदण्याचे पापड,लोणचं बनवण्यासाठी कैरीचे तुकडे सुकत घालायच्या आणि तयार झाल्यावर शेजारच्यांना थोड थोड द्यायच्या.आम्ही खेळता खेळता कैरीचे तुकडे हळुच उचलुन तोंडात टाकायचो.उन्हाळ्यात फ्रिज पेक्षा आमच्या मातीच्या माठातले पाणी अगदी थंड गार असायचे.खेळुण खेळुण दमलो की बाबांकडुन एक रुपया घेऊन दुकानातुन रसना आणायचो आणि माठातल्या पाण्यात मिसळुन प्यायचो.आमचा एक रुपयाचा रसना इतर कोल्ड ड्रिंक पेक्षा चांगला होता.एक रुपयाची पेप्सी ही खुप थंडावा देऊन जायची.कधी कधी बाबा पाच रुपये द्यायचे तेव्हा आमची मज्जाच असायची.आमच्या चाळी मध्ये कधी कधी कुल्फी वाला,गोळा वाला,म्हातारीची केस (sugar candy) वाला यायचा.ते पाच रुपये आम्ही त्या गोष्टी खाण्यासाठी साठवुन ठेवायचो.


              दुपारी सगळे झोपायचे तेव्हा आमच्या चाळी मागे एक कैरीचे झाड होते.तिथुन आम्ही कैरी काढून आणायचो.मित्रांसोबत कैरीला मिठ मसाला लाऊन खाण्यात एक मज्जाच वेगळी असते.रस्त्यातही आमच्या कडुन लोकं कैरी मागायचे.आम्ही गुपचुप त्यांना दुर्लक्ष करुन पुढे निघुन जायचो.घरी आल्यावर आई बाबा आम्हाला ओरडायचे की,'झाडावरून पडलात तर हात पाय मोडुन घ्यालं.'मात्र काही दिवसांनी पुन्हा आम्ही कैरी तोडायला जायचो.भोवरा खेळताना आमचे खुप सारे भोवरे गटारात जायचे.गटार साफ करणारे आले की कधी कधी एक-दोन भोवरे मिळायचे.ते साफसफाई वाले काका ही आमच्या ओळखीचे होते.भोवरा मिळाला की ते पाण्याने धुवुन आमच्या साठी बाजुला काढुन ठेवायचे.


               आमच्या गल्लीत मुल गोट्याचे फार मोठे डाव मांडायचे.आमच्या चाळीतला मन्या गोट्या खेळताना नेहमी जिंकायचा.त्याचा नेम खुप भारी होता.एकाच वेळी तो रिंगणातुन चार-पाच गोट्या बाहेर काढायचा.आम्ही मात्र कधी तरीच जिंकायचो.मात्र खेळायला फार मज्जा यायची.आई आम्हाला जेवण्यासाठी बोलवायला यायची.मात्र आम्ही तिला सापडायचो नाही.कधी कधी आम्हाला खेळायला खुप वेळ लागला की आई यायची आणि मारत मारत घरी जेवायला घेऊन जायची.आमच्या चाळीत फक्त रोशनच्या घरीच कुलर होता.त्याचे आई बाबा कधी घरी नसले की रोशन आम्हाला घरी बोलवायचा.थोड्या वेळासाठी आम्हाला छान अशी थंड हवा मिळायची.


            उन्हाळ्यात कधी कधी लाईट ही जायची.चाळीतल्या बायका लाईट वाल्यांना शिव्या देखील द्यायच्या.कधी कधी तर लाईट रात्रभर देखील जायची.तेव्हा मात्र मुलांची मज्जा असायची.आम्ही संध्याकाळ झाली की बाहेर लपाछपी खेळायचो.काळोखात कोणीही दिसुन यायचं नाही.लोकं आम्हाला खुप ओरडायची,मात्र आम्ही दुर्लक्ष करुन खेळत रहायचो.कधी कधी पाणी ही नाही यायचं आणि तेव्हा रस्ता देखील ओला नसायचा.आम्ही त्या दिवशी कब्बडी खेळायचो.कोणाला लागलं,खरचटलं तर गुपचुप घरी जाऊन हळद लावायचो आणि परत खेळायला यायचो.


            आम्ही पैसे साठवुन मराठी व्यापार,चेस घेऊन यायचो.कधी ग्रुप मधला कोणी बाहेर गेलं तर आम्ही चेस किंवा मराठी व्यापार खेळायचो.देशपांडे काका गावाला गेले की पुन्हा आम्ही खेळायला सुरुवात करायचो मात्र त्या काकु नेहमी आम्हाला ओरडायच्या.एकदा तर मन्याने रात्रीच्या वेळी त्यांच्या ड्रमला खालुन होल पाडला.दोन चार दिवस त्यांना काहीच समजले नाही.त्या नंतर त्यांच्या लक्षात आले की ड्रमला कोणी तरी होल पाडलाय.त्यांनी बाहेर येउन खुप शिव्या घातल्या पण कोणीही मन्याचं नाव फोडल नाही.


         राजने गावावरुन आंबे आणले होते.तो कधी कधी एक दोन आंबे आमच्या साठी गुपचुप घरुन आणायचा.आंबे खाऊन मन एकदम तृप व्हायचे.एकदा राजला त्याच्या आईने आंबे बाहेर घेऊन जाताना पाहिले.त्या दिवशी राजला खुप ओरडा पडला.बोलता बोलता जुन महिना आला.काही दिवसांनी आमच्या शाळा पुन्हा सुरु होणार होत्या.आता आमच्याकडे खेळायला मात्र पंधराच दिवस उरले होते.


       आम्ही एकदा आमच्या जवळच्या गार्डन मध्ये जाण्याचं ठरवलं.अडचण मात्र एकच होती की घरातल्यांनी परवानगी दिली पाहिजे.आम्ही आमच्या आई बाबांना खुप सांगितला.मात्र त्यांनी सुरवातीला नकारच दिला पण शेवटी कंटाळुन आई बाबांनी आम्हाला परवानगी दिलीच.आम्ही संध्याकाळी चारच्या सुमारास चांगले कपडे घालुन बाहेर पडलो.आई कडुन दहा रुपये मागुन घेतले होते.आम्ही गार्डन मध्ये खुप खेळलो.आम्ही गार्डन मध्ये सोनसाखळी खेळत होतो.बघता बघता सहा वाजले.आम्ही जाताना एक एक कुल्फी खाल्ली.आम्ही घरी सात वाजेपर्यंत पोहचलो.आमच्या घरातले आम्हाला खुप ओरडले.त्यांनी आम्हाला सहा वाजताच घरी यायला सांगितलं होतं.एकदा का मित्र सोबत असले की वेळ कसा जातो काही समजतच नाही.बोलता बोलता आमच्या शाळा सुरु झाल्या.आम्ही उन्हाळ्यात फार मज्जा केली होती मात्र आम्हाला आता पुन्हा अभ्यास करावा लागणार होता.पुन्हा दप्तराचं ओझ आम्हाला उचलावं लागणार होतं.


खरचं गेलेले दिवस पुन्हा येत नाही मात्र त्या फक्त आठवणी मनात अगदी कोरून राहतात..........


Rate this content
Log in