अनोळखी
अनोळखी
नयन एका छोट्या झोपडपट्टीत राहणारा मुलगा होता.नयन शहरातल्या एका नामवंत कॉलेज मध्ये शिकत होता.तो सध्या अकरावीत शिकत होता.त्याचे बाबा रंगकाम करायचे आणि त्याची आई घरकाम करायची.त्याचे आई बाबा त्याचे शिक्षण खुप चांगल्या रितीने व्हावे म्हणुन खुप मेहनत करायचे.त्याच्या कॉलेजच्या फी चाच इतका खर्च झाला होता की त्याला चैनीच्या गोष्टी देणं त्यांना शक्य नव्हतं.ह्याच कारणामुळे नयन घरा पासुन खुप लांब निघुन जातो.नयनला त्याच्या चैनीच्या गोष्टी त्याच्या घरात मिळत नव्हत्या.ह्याचा त्याला खुप राग आला होता म्हणुन तो कॉलेज सुटल्यावर घरी न जाता दुसरीकडेच निघुन जातो.
रात्रीचे अकरा वाजले होते.त्याच्या आई बाबांना त्याची फार चिंता वाटु लागली होती.त्याचे बाबा त्याला शोधण्यासाठी सगळी कडे फिरत होते.नयन मात्र त्या शहरा पासुन लांब निघुन गेला होता.नयन विचार करत करत एका रस्त्यावरुन चालत असतो.तिथे एक कचरा पेटी असते.नयन त्या कचरा पेटीच्या बाजुने जात असताना त्याला तिथे 10-12 वर्षाचा एक लहान मुलगा दिसतो.त्याने अंगावर फक्त एक फाटकी बनियान आणि एक हाफ़ पँट घातलेली असते.तो तिथे पडलेल्या कचऱ्या मध्ये खाण्यासाठी काही तरी शोधत असतो.नयनला हे पाहुन खुप विचित्र वाटतं.नयन तिथे ऊभं राहुन हे सगळं पाहत असतो.शेवटी त्या मुलाच्या हाती काही लागत नाही.तो कंटाळुन तिथे असलेल्या एका बाका वर जाऊन बसतो.नयन ही त्याच्या बाजुला जाऊन बसतो.
"काय रे,काय शोधत होतास त्या कचरा पेटीत?"
"काही नाही दादा,काही खाण्यासाठी मिळतय का शोधत होतो."
"का? तुझ्या आई बाबांनी दिले नाही का खायला?"
"नाही दादा,मी अनाथ आहे.माझे आई बाबा मी लहान असतानाच देवा घरी गेले."
"सॉरी......मग तुझे कोणी नातेवाईक नाही का?"
"आहेत ना.माझे काका."
"मग तु त्यांच्या कडे का नाही जात राहायला?"
"माझे आई बाबा गेल्या नंतर मी त्यांच्या कडेच राहायचो पण ते मला खुप मारायचे,माझ्या कडुन खुप काम करुन घ्यायचे,काम केलं नाही तर मला जेवनही नाही द्यायचे.म्हणुन मी तिथुन पळून आलो."
"मग तु आता कुठे राहतोस?काय खातोस?"
"इथेच रस्त्यावर आणि कधी कोणी काही दिलं तर खायचं,नाहीतर उपाशीच.दादा तु इथला दिसत नाहीस कुठे राहतोस."
"मी मुलुंडला राहतो."
"मग तु इथे काय करतोयस ते ही इतक्या रात्री?तुझे कोणी नातेवाईक इथे राहतात का?"
"नाही रे माझे कोणीही नातेवाईक इथे नाही राहत."
"मग....?"
"तुला काय सांगू.....माझे आई बाबा माझी कोणतीच इच्छा पुर्ण नाही करत.माझ्या कॉलेजचे सगळे मित्र असे ब्रँडेड कपडे घालुन येतात आणि मी असाच आपल्या साध्या कपड्यांवर कॉलेजला जातो.ते नेहमी कॅटिंन मध्ये जाऊन काहीही खातात,मी मात्र माझ्या आईने दिलेला डब्बा खातच वर्गात बसल
ेलो असतो.सगळ्यांकडे स्मार्ट फोन आहे आणि माझ्या कडे हा बटणांचा.सगळे मुलं माझ्या वर हसतात.मी आई बाबांना हे नेहमी सांगतो मला हे घेऊन द्या ते घेऊन द्या.पण ह्यावर त्यांच एकच उत्तर असतं पुढच्या महिन्यात घेऊया आणि त्यांचा पुढचा महिना कधी येतच नाही."
"दादा,मला माहीत नाही आई बाबा नक्की कसे असतात.पण मला माहिती आहे,माझे आई बाबा जर आज माझ्या सोबत असते ना,तर त्यांनी मला कधीही उपाशी राहुन दिलं नसतं.तु खुप भाग्यवान आहेस की तुझे आई बाबा तुझ्या सोबत आहेत आणि मला खात्री आहे ते स्वत: उपाशी राहत असतील पण तुला कधी उपाशी ठेवत नसतील."
(बोलता बोलता नयनला तो दिवस आठवतो जेव्हा त्याच्या आईचे काम सुटले असते आणि त्याचे बाबा ही घरीच असतात.त्यांनाही कुठे काम मिळत नसते.त्या दिवशी घरातले सगळे पैशे आणि धान्य संपले होते.मात्र एक वाटीच पिठ त्यांच्या घरात उरलेले असते.तरीही ते स्वत: न जेवता नयनला भाकरी करुन देतात.)
"दादा,तु कधी आजारी पडला अशील ना?"
"हो"
"तेव्हा तुझ्या आई आणि बाबांनी तुझी नक्कीच काळजी घेतलेली असेल ना!"
(नयनला तो दिवस आठवु लागतो जेव्हा तो तापाने फणफणत होता.तेव्हा त्याची आई दिवस भर त्याच्या जवळच बसुन होती.त्याचे बाबा दर दहा मिनीटांनी त्याचा ताप कमी झाला की नाही हे तपासत होते.)
"पण दादा,मी आज मेलो जरी ना तरी माझ्या साठी कोणी रडणार नाही."
(हे सगळं ऐकुन नयनच्या डोळ्यात अश्रु येत होते.त्याला त्याच्या आई बाबां सोबत घालवलेले क्षण आठवु लागले.)
"दादा,तु कधी तरी तुझ्या आईच्या कुशीत शांत पणे झोपला अशीलच ना!"
(हे ऐकुन नयनला तो दिवस आठवतो जेव्हा घरात पाणी शिरले होते आणि त्याची आई त्याला मांडीवर घेऊन बेड वर बसली असते.)
"दादा,पण मला उन असो किंवा वारा मला तर इथे ह्या बाकड्यावरच झोपावं लागतं.दादा तु खुप मोठ व्हावं ह्या साठी ते खुप मेहनत करत असतील.पण जर तु फक्त हिऱ्या सारख्या आकर्षक दिसणाऱ्या गोष्टींकडेच आकर्षित झालास तर तु तुझ्या आयुष्यातला सगळ्यांत मौल्यवान हिरा गमावशील."
हे ऐकुन नयनला त्याची चुक लक्षात येते.तो रडु लागतो.
"दादा,रडु नकोस.तु नशीबवान आहेस की तुझे आई बाबा तुझ्या सोबत आहेत.तु परत त्यांच्या कडे जा आणि त्यांची माफी माग.ते तुझ्या काळजीत असतील."
"हो,मी जातो."
नयन बॅग उचलतो आणि घरी जायला निघतो.तो काही अंतरावर जातो आणि मागे वळुन बघतो.तिथे त्या बाकावर कोणीच नसतं.नयन मागे जाऊन त्याला शोधतो पण त्याला कोणच नाही दिसत.नयन धावत धावत जातो आणि रेल्वे स्टेशनला येउन पोहचतो.त्याच्या शहरात जाणारी शेवटची ट्रेन तिथे उभी असते.नयन धावत जातो आणि ती ट्रेन पकडतो.नयन ट्रेन मध्ये बसताच त्याच्या बाबांना फोन करतो.
"बाबा,सॉरी.........मी येतोय आता घरी....."
इतकं बोलुन तो फोन ठेवतो आणि घरी निघुन जातो...