STORYMIRROR

Deepali Aradhye

Thriller

3  

Deepali Aradhye

Thriller

प्रवास

प्रवास

3 mins
307

तर, बरं का मंडळी, गाडी त्या चढावर कशीबशी फुरफुर करत चढली आणि मग नवरोबाने प्रयोगशाळा उघडण्याचे ठरवले आणि माझे धाबे दणाणले. कारण प्रयोगात माझी सहाय्यकाची भूमिका जरी असणार होती तरी माझं आणि गाडीचं आयुष्य त्यावर अवलंबून असणार होतं नं! गाडीचं माहीत नाही, पण मला तर माझा जीव प्यारा होताच की! दरदरून घाम फुटला तो वेगळाच. आता तुम्ही म्हणाल मदत मागता येत नव्हती का? कळेल बरं, कळेल. प्रयोग काय होता याची उत्सुकता ताणत नाही हो मी. तर, मी ड्रायविंग सीटला बसून स्टेरिंग सांभाळायचं होतं आणि आता नीटसं आठवत नाही, पण मला वाटतं ब्रेकही सांभाळायचा होता किंवा क्लचतरी आणि नवरा गाडीला धक्का मारणार होता. ही कसरत किंवा सर्कस, एखादं गॅरेज सापडेपर्यंत करायची हे निश्चित.


माणसं दिसतात का? मदत करतील का, याची शोधाशोध झालीच पाहिजे हा माझा घोशा. काही लोकंही तयार झाली होती हे नमूद केले पाहिजे, चार किलोमीटर दूर असणाऱ्या गॅरेजमध्ये गाडीला धक्का मारत जाण्याचे केवळ पाच-सातशे रुपये मागत होते, एवढंच. पण आता खर्च शक्य नव्हता, कारण गाडी दुरुस्तीला किती खर्च येणार याची शक्यताही नोंदवता येत नव्हती म्हणून पैसे देणं परवडणार नव्हतं. मग प्रयोगाचा प्रयत्न करणं भाग होतं.

 नवऱ्याच्या भरवश्यावर स्टेरिंग हातात पकडलं आणि त्याच्या सूचनांनुसार पुढे-पुढे सरकण्याअगोदर मी गाडी ढकलण्याचा प्रयत्न करून झाला होता, पण छोट्याशा चढावरसुद्धा तो अयशस्वी झाला होता. बाजूने जाणारे कार्स, स्कुटर्सवाले एकटक बघत जात होते ही वरात, शक्य असेपर्यंत, पण मदतीचा एकही हात मात्र वाट्याला आला नाही. चार किलोमीटरचं अंतर आता भीती घालू लागलं होतं आणि तेवढ्यात एक छोटा ट्रक थांबला आणि सत्तर-ऐंशी रुपयात गाडीला दोरी बांधून गॅरेजमध्ये सोडण्यास तयार झाला. देवदूतच वाटला हो तो! त्याचे कितीही आभार मानले तरी, मन काही भरलं नाही. पण आता गॅरेजमध्ये सुखरूपपणे आलो होतो.


आता ऐकाल तर मंडळी, हसावं की रडावं की त्या परिस्थितीतून किती सहज बाहेर आलो म्हणून हायसं वाटावं, ते तुमचं तुम्ही ठरवा, बर्र! गॅरेज कशाचं होतं म्हणाल तर टू-व्हीलर रिपेरीचं. आणि फोर-व्हीलरचं थेट मेन शहरात, जे अजूनही पंचवीस किलोमीटर अंतरावर होतं, फक्त. पुन्हा भीतीचा उद्रेक होणार तेवढ्यात मेकॅनिक म्हणाला की मी कमीतकमी बॉनेट उघडून तर बघतो. मग जुजबी ज्ञानाच्या भरवश्यावर नवराही माहिती देण्यासाठी त्याच्यासोबत उभा राहिला आणि मागच्या शहरात काय दुरुस्त्या केल्या गेल्या होत्या त्याची सविस्तर माहिती देत असताना कोणकोणत्या पार्ट्सना प्रॉब्लेम असू शकतो ते ही दाखवत होता. आणि मंडळी, सगळेच पार्ट्स योग्य तऱ्हेने काम करत होते. तेवढ्यात त्या मेकॅनिकने बॅटरीच्या आसपास असणारे, वायर कनेक्ट केलेले दोन बोल्ट टाईट केले. आणि नवऱ्याला सांगितले की एकदा जरा बघता का गाडी स्टार्ट होते का? नाहीच झाली तर मात्र त्या शहरातून कार रिपेरिवाला मेकॅनिक बोलावून घेतो.


नवरा शिस्तीत ड्राइविंग सीटला बसला, इग्निशन फिरवलं आणि चमत्कार मंडळी, गाडी टकाटक चालू झाली, थोडी फिरवून आणली आणि आम्हाला दुसरा देवदूत भेटला, ज्याने रिपेअर केलेली ती गाडी विकेपर्यंत पुन्हा काही खराब झाली नाही. इकडेतिकडे विखरून पडलेला जीव, आनंद, विश्वास आणि काय काय गोळा करून कुडीत भरला आणि आता जरा वेगानेच त्या संकल्पित शहरात पोहचण्याचा आटापिटा केला.


हुश्श झालं का मंडळी? थांबा-थांबा, साहस अजूनही संपलेलं नाही, पण त्याकरिता पुढच्या भागाची प्रतीक्षा करू या!

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller