प्रिय वाहिनी...
प्रिय वाहिनी...
प्रिय वाहिन्यांनो....
घरातील वहिन्या गेल्या वाहिन्या आल्या. पूर्वी वहिनी ने घरात संस्कार पेरले. आता वाहिन्या घरात विकार पेरत आहेत. पूर्वी वहिनी वैचारिकतेला
जपत आता वाहिन्या वैचारिक दारिद्र्यतेला खतपाणी घालत आहेत. वाहिन्यांच्या प्रचंडधबधब्याखाली प्रेक्षक नाहुन निघत आहेत. उदंड झाल्या वाहिन्या, उदंड झाल्या प्रेम कहाण्या. विवाबाह्य संबंधाचा महापूर आला आहे. कपटीपणा. ढोंगीपणा, इर्षा, बदला, कृत्रिम, सुमार अभिनय, सुमार दिग्दर्शनाच्या मालिकांतील रटाळपणा , वैचारीक दारिद्र्य रेषेखालील आशयाने भरलेल्या निर्बुद्ध प्रेक्षकासाठी बनलेल्या मालिका वास्तवापासून दूर आमच्या प्रेक्षकांना एका मंतरलेल्या घरात नेत आहेत. हे फार भयानक आहे.घरातली जिवंत माणसे सोडून, मालिकेतल्या पात्रांची काळजी करणे, त्यांची विचारपूस करणे, त्यांच्याबद्दल चौकशीकेल्याशिवाय कुटुंबाच दैनंदिन वर्तुळ पूर्ण होत नाहीं.घरामध्ये मोठी माणसे नसल्यामुळे घराचा ताबा बिग बॉस ने घेतला आहे. कोणतेही संस्कार व मूल्य न जपणार्या मालिकेनी धुमाकूळ घातला आहे. बिग बॉस मधीलशिव्या,भांडणे,अश्लीलता ,सुखलोलुपता, आमच्या तरुणांसमोर काय आदर्श ठेवत आहेत.
कारण नसताना भांडण, वाद-विवाद कशासाठी. कुठेच वैचारिक चर्चा नाही. एखाद्या चित्रपटाचा आस्वाद कसा घ्यायचा .एखादं सुंदर गाणं त्याचा अर्थ आणि रसग्रहण. आपल्या संगीताचा वारसा, राजकारण, त्याच्या ऐवजी तू तू मै मै यामुळे कोणता संदेश तरुणांसमोर ठेवला जातो याचा विचार करण्याची वेळ आली आहे. काही लोकांना विकृत, अश्लील आवडतं म्हणून सर्वांनाच कशासाठी ?काय पहावं, काय पाहू नये हे आपल्या हाता असलं तरी, मोठ्यांना काही मालिका बघायच्या असतात व मुलं सुद्धा कळत नकळत पाहतात, तसेच अनुकरण करायला लागतात.
वाहिन्यानो तुम्ही काही प्रमाणात मनोरंजन करत असाल, पण तुम्ही कुटुंबा समोर भयानक प्रश्न निर्माण करून ठेवले आहेत, हे ही नाकारून चालणार नाही. तुमच्यासमोर पालक हतबल झाले आहेत. नको ते नको त्या वयात मुले पाहून अनुकरण करत आहेत. प्रेम, आत्महत्या मृत्यूला कवटाळणे तुमच्या साक्षीने ने तुमच्यासमोर होत आहे. आता तुम्हीच संस्काराची जबाबदारी घ्यायला हवी.आदर्श तुम्हीच निर्माण करू शकाल.
सजीव माणसे हतबल झालीत. मुलांना ताळ्यावर तुम्हीच आणू शकाल. अश्लील उद्योग मंडळ तुम्हीच थांबवू शकता.
एक हतबल प्रेक्षक.
