प्रिय कोरोना...
प्रिय कोरोना...
कोरोना.. कोव्हिड-19
तुला प्रिय कसा म्हणावं? असं काही नांव असेल,असा काही रोग असेल असं वाटल ही नव्हतं. तू सुनामी प्रमाणे अचानक आलास,जगावर राज्य करायला. अस्तित्वाचा प्रश्न येतो तेव्हा माणसें हतबल होतात. सेन्सेक्स खाली आ णणारा, अनेकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान करणारा, मोठ्या स्पर्धा रद्द करणारा, अनेक व्यवसाय धोक्यात आणणारा, राष्ट्रप्रमुख यांचेही दौरे रद्द करायला लावणारा, तू जगभर आपले साम्राज्य प्रस्थापित करत आहेस. सर्व मानवजात देवानंतर तुझाच विचार करत आहे.
Man proposes,God disposes. आता हे चित्र बदलले आहे. Man proposes Corona disposes. हे खरंच आहे. आधी केलेले नियोजन लोकांना रद्द करावा लागंत आहे.१२० देश लाखो लोकांना लागण,हजारो मृत्यू असे तुझे थैमान सुरू झालं.शाळा, चित्रपट गृह, सार्वजनिक कार्यक्रम बंद,एकत्र येणं बंद,हस्तांदोलन बंद, प्रेक्षक विना मॅच, यात्रा रद्द, देवालाही भेटण्यावरवर निर्बंध आले.असे तुझे निर्बंध सुरू झाले. पूर्वी प्लेग, देवी, कॉलरा यांनी मानवजात उध्वस्त केली. आधुनिक काळातील महामारी म्हणून तुला घोषित केलं आहे.
आता विज्ञानही हतबल आहे. अंधश्रध्दा वाढायला नैराश्य खतपाणीघालतं.लोक याला दैवी प्रकोप मानतात. नैराश्य आणि भिती याला लोकं शरण जातात. कलियुगात पाप वाढलं, अशा संकल्पना दृढ व्हायला लागतात.म्हणून अंधश्रद्धे पासून सुटका नाही. मृत्युला निमित्त लागते. आता यम एकटाच नाही. मृत्यु वेगवेगळ्या रूपाने वेगवेगळ्या नावाने येतो. लोकसंख्या वाढल्यामुळे त्याच्या मदतीला अनेक नवीन रोग मृत्यू साठी मदत करीत आहेत.
करोना तो बहाना हैपूर्वी शत्रूचा नायनाट करायचा असेल तर करो या मरो म्हणलं जायचं. आता कुछ भी मत करो ना म्हणावं लागत आहे. करोना केवळ हात धुऊन मागे लागलं नाही, तर हातधुवायला भाग पाडत आहे.फ्रान्स ने सार्वजनिक ठिकाणी चुंबना वर बंदी घातली आहे. खाणं, पिणं, वागणं, राहणं यावरील बंदी लोकांना आवडत नाही.लोकांना नुसतंच स्वातंत्र्य नको, त्याबरोबर स्वैराचारही हवा.
पण अस्तित्व धोक्यात येतं तेव्हाच माणसे जागी होतात. कोरोनामुळे जगाची लोकसंख्या ६० टक्के पर्यंत येईल अशी शक्यता वर्तवली जाते आहे.
लाखोंना लागण व हजारोंना मृत्यू हा परीघ विस्तारत आहे. कोरोनामुळे जगण्याचे परिमांण,समीकरणं, बदलत आहेत. विज्ञानाने एवढी प्रगती केली पण आज कोरोना व्हायरस पुढे सर्व हतबल आहेत. विज्ञानाने मृत्यू लांबवता येतो, पण थांबवता येत नाही. तू झंजावाता सारखा आलांस, तसाच झंजावातासारखा जावां, हीच इच्छा. मृत्यू कसा यावा याची प्रत्येकाची गणितं ठरलेली आहेत. मृत्यू अटळ आहे, तो नैसर्गिकच शांत चोरपावलाने यावा असे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यामध्ये तू विघ्न आणू नयेस. जन पळभर म्हणतील हाय हाय.. हे आम्हाला फक्त ऐकायला छान वाटतं.
