प्रेमाने भरलेली ओंजळ
प्रेमाने भरलेली ओंजळ
आपले आयुष्य म्हणजे एक प्रकारची सर्कस असते जी जगत असताना अनेक बाजूंनी आपल्याला स्वतःला सावरून , तोलून धरावे लागते आणि आपल्या कलाकौशल्याचा आविष्कार जगाला दाखवावा लागतो. मग तो आविष्कार प्रेमाचा असेल , आपुलकीचा असेल , खंबीर पाठिंब्याचा असेल वा कुटुंबाला धरून पुढे चालत राहण्याचा , तिथे आपल्या बुद्धीचा , भावनांचा , संयमाचा कस लागत असतो. प्रत्येक वेळेस समोरच्या व्यक्तीच्या ओंजळीत भरभरून सुखांचं , आनंदाचं दान घालण्याच्या नादात अथवा नियतीच्या विधिलिखितानुसर अनेकदा आपली ओंजळ रिकामीच राहून जाते. परंतु ज्या व्यक्तीच्या आयुष्यात आपण आनंदाचे दिप तेजाळतो त्या व्यक्तीचे दोन प्रेमाचे आणि आधाराचे शब्द , त्याच्या मनाला असलेल्या आपल्या प्रेमाची , अस्तित्वाची जाणीव एका क्षणात आपली रिती ओंजळ भरून जातात अन् मग तिथे उणेपणाला कसले आले स्थान ?
राजाभाऊ आणि सुमनताईंचं , थोरल्या केदारच्या पाठीवर ३ वर्षांनी जन्मलेलं शेंडेफळ असणारी कस्तुरी ही आपल्या नावाप्रमाणेच आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या आयुष्यात सुगंध पसरवणारी , ज्याला त्याला आपल्या लोभस हास्याने , मदतीला तत्पर असण्याने आणि मधाळ बोलण्याने आपलंसं करणारी अतिशय गोड मुलगी. लहानपणापासूनच कस्तुरी तिच्या घरातच नव्हे तर शेजारी पाजारी , नातेवाईक , मित्र मैत्रिणी यांची देखील खूप लाडकी होती. कोणीही हक्काने तिला मदतीसाठी हाक मारू शकत होते इतका सगळ्यांचा तिच्यावर विश्वास आणि जीव होता. आईची ती लाडकी परी तर बाबांचा आणि दादाचा तर ती जीव की प्राण होती. आजी आजोबा तर तिला डोळ्यांत तेल घालून जपायचे. तिला कोणीही कुठल्याही करणावरून ओरडले तर ते आजी आजोबांना अजिबात सहन व्हायचे नाही.
यथावकाश केदार आणि कस्तुरीचं शिक्षण पूर्ण झालं. आता केदार असिस्टंट मॅनेजर म्हणून एका नामवंत कंपनीत रुजू झाला तर कस्तुरी देखील एका शाळेत रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरीस लागली. दोघं सकाळी एकत्रच बाहेर पडत. केदार कस्तुरीला रोज तिच्या शाळेत सोडत असे. कस्तुरीची शाळा दुपारी सुटत असल्याने ती परत येताना बसने घरी यायची आणि केदार संध्याकाळी. एकंदरीत छान चाललं होतं त्यांचं.
केदार आणि कस्तुरीच्या नोकरीला २/३ वर्षे उलटली आणि आता घरात केदारच्या लग्नाच्या चर्चा घडू लागल्या. थोरला भाऊ असल्याने सगळ्यांचे म्हणणे होते की आधी केदारचे दोनाचे चार हात करा म्हणजे मग कस्तुरीच्या लग्नाच्या धावपळीत कुसुमताईंच्या हाताशी सूनबाई असतील. अखेर एक दिवस रात्रीच्या जेवणानंतर गप्पा मारत बसले असताना राजाभाऊ आणि कुसुमताईंनी हा विषय केदार जवळ काढला.
राजाभाऊ : अरे केदार , तुझ्याशी जरा बोलायचं होतं.
केदार : बोला ना बाबा , त्यात आढेवेढे कसले घेता ?
सुमनताई : केदार , तुझं वेळेत शिक्षण पूर्ण झालं , तुला छान कायमस्वरूपी नोकरीही मिळाली. तुला नोकरीला लागून देखील आता ३ वर्ष होतील. आजी आजोबा पण आता थकत चाललेत रे , तेव्हा आता तू तुझ्या लग्नाचा विचार करावा असं आम्हा सगळ्यांना वाटतंय.
राजाभाऊ : अरे त्या पाठक काकांनी तर त्यांच्या ओळखीतली काही स्थळं देखील सुचवली आहेत. म्हणाले , आधी केदारला विचार मग फोटो दाखवतो.
केदार : आई , बाबा , सगळं मान्य आहे मला पण.....
सुमनताई : पण काय ? तू तुझी बायको निवडली आहेस का ? असेल तर तसं स्पष्ट सांग , सगळं व्यवस्थित जुळून आलं तर आमची काही हरकत नाही बरं , काय हो ?
राजाभाऊ : अर्थातच , अरे शेवटी संसार तुम्हां दोघांना करायचा आहे ना..?
केदार : आई , अगं तसं काही नाहीये गं. पण मला असं वाटतं की आधी कस्तुरीच्या लग्नाच्या दृष्टीने आपण प्रयत्न करूया. कस्तुरी सारख्या गोड , हसऱ्या आणि मनाने हळव्या मुलीला जपणारा तिचा जीवनसाथी तिला मिळाला आणि तिला एकदा का आपण सुखरूप तिच्या घरी पोचतं केलं म्हणजे आपल्या कुणालाच तिची काळजी राहणार नाही ना ! तुला काय वाटतं आज्जी ?
कस्तुरी : दादा , अरे , काहीतरीच काय ? मला नाही इतक्यात लग्न वगैरे करायचं. तू तुझं आटपून घे.
यावर सगळे हसले.
केदार : कस्तू , अगं आटपून घ्यायला लग्न म्हणजे काय अंघोळ आहे का ? आणि अगं ,आता तूही २४ ची व्हायला आलीस. हेच योग्य वय आहे तुझं लग्नाचं.
आज्जी : कस्तुरी , बाळा , केदार योग्य बोलतोय. मुलीचं लग्न योग्य वयात झालं ना की मग तिच्या आयुष्यातल्या पुढच्या सगळ्या गोष्टी वेळेवर पार पडतात.
आजोबा : बरोबर आहे आजीचं. ते काही नाही , राजा , तू आधी त्या पाठकला सांग काही मुलांची स्थळं सुचवायला. आधी आपल्या बाहुलीच्या लग्नाचा मंडप सजवू आपण आणि एक बाहुली या घराबाहेर गेली की मग आपण दुसरी बाहुली घरात आणू , काय ?
कस्तुरी : काय हो आजोबा.....!
असं म्हणून कस्तुरी लाजून आत पळून गेली.
राजाभाऊ : बाहुला आयुष्यात येणार म्हणून बाहुली लाजून आत पळून गेली बघा..
यावर सगळेच मनापासून हसले. राजाभाऊंनी दुसऱ्याच दिवसापासून कस्तुरीसाठी स्थळं शोधणं सुरू केलं. आपला जीव असलेल्या त्यांच्या कस्तुरीला त्यांना आपल्यापासून खूप लांब पाठवण्याची अजिबात इच्छा नव्हती. त्यामुळे ते त्यांच्या शहरातच राहणारा मुलगा कस्तुरीसाठी शोधत होते. एक दिवस पाठक काका एक स्थळ घेऊन स्वतःहुन राजाभाऊंच्या घरी आले.
पाठक काका : राजा , आपली कस्तुरी आपल्या सगळ्यांच्या डोळ्यांसमोर इथेच राहील अशी तुझी इच्छा आहे ना ? तर तसंच स्थळ आणलंय मी आज आपल्या बाहुलीसाठी , सुमंत रानडे. माझ्या आत्तेबहिणीचा मुलगा. सुमंत बँकेत आहे. घरी फक्त तो आणि माझी प्रीतीताई आणि अनयराव. तेही बँकेतून रिटायर्ड तर ताई प्रोफेसर म्हणून. दोन मोठ्या बहिणींची लग्नं झाली आहेत. थोरली रसिका असते बंगलोरला तर धाकटी संजीवनी लंडनला. हा बघ त्याचा फोटो.
राजाभाऊंनी फोटो पाहिला. गोरापान , निळ्या डोळ्यांचा आणि ओठांवर मोहक स्मितहास्य असलेला सुमंत राजाभाऊ , कुसुमताई आणि आज्जी आजोबांना तर पाहताक्षणीच पसंत पडला.
राजाभाऊ : व्वा ! मुलगा तर खूपच रुबाबदार आहे.
सुमनताई : हो ना , सुसंस्कारित आणि मनमिळावू वाटतो अगदी.
पाठक काका : अहो , वहिनी , रानडे फॅमिली सुद्धा अतिशय समंजस आणि प्रेमळ आहे. आपल्या कस्तुरीचा खूप छान सांभाळ करतील ते आयुष्यभर. राजा , तुम्ही सगळे आज कस्तुरी सोबत बोलून घ्या आणि उद्या मला कळवा म्हणजे मग आपण मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम करून घेऊ , कसे ?
राजाभाऊ : बरं ,आज रात्री केदार आणि कस्तुरी सोबत बोलून उद्या सकाळी तुला कळवतो.
आणि पाठक काका निरोप घेऊन निघून गेले. आजी आजोबांनी पुन्हा एकदा सुमंतच्या फोटोवरून कौतुकाने दृष्टी फिरवली.
आज्जी : सुमे , सगळं मनासारखं जुळून आलं तर छान होईल नाही ? खूप सुंदर दिसेल आपली कस्तुरी आणि सुमंतची जोडी नाही का ?
सुमनताई : हो , अगदी सगळं छान जुळून येईल , नका काळजी करु तुम्ही.
हे बोलणं सुरू असतानाच कस्तुरी तिथे आली.
आज्जी : आली गं माझी बाहुली , आत्ता तुझ्याबद्दलच बोलत होतो आम्ही.
कस्तुरी : माझ्याबद्दल ? काय गं आज्जी ?
आजोबा : अगं , आत्ताच पाठक काका आले होते. त्यांनी तुझ्यासाठी त्यांच्या भाच्याचं , सुमंत रानडेचं स्थळ आणलं आहे , हा बघ त्याचा फोटो.
आणि कस्तुरीने त्याचा फोटो हातात घेतला. त्या फोटोकडे तिने पाहिलं आणि......आणि त्याची ती समोरच्याच्या हृदयाचा ठव घेणारी भेदक नजर , ओठांवर असलेलं मधाळ हसू तिच्या हृदयाचा देखील वेध घेऊन गेली.
सुमनताई : कस्तुरी , तुला आवडला का मुलगा ? कधी करूया दाखवण्याचा कार्यक्रम ?
कस्तुरी : अं..... अं.....तू....तुम्ही आणि दादा मिळून ठरवा. आणि असं म्हणून ती लाजून तिच्या खोलीत पळून गेली.
तिच्या या कृतीने सारेच समजले की सुमंतची जादू तिच्यावर झाली आणि म्हणूनच ती लाजली. संध्याकाळी केदार घरी आल्यानंतर राजाभाऊंनी त्याच्यासोबत देखील चर्चा केली. केदारला देखील सुमंत आवडला आणि चर्चेअंती येत्या रविवारी कस्तुरीच्या कांदे पोह्यांचा अर्थात दाखवण्याचा कार्यक्रम पार पाडायचे ठरले. राजाभाऊंनी पाठक काकांना लगेचच तसे कळवले. दुसऱ्या दिवशी पाठक काकांनी निरोप कळवला की येत्या रविवारी रानडे मंडळी दुपारी ३ च्या सुमारास कस्तुरीला बघायला येणार होती.
आपल्या आयुष्यातला पहिला वहिला मुलगा बघण्याचा कार्यक्रम म्हणून कस्तुरी थोडीशी बावरली होती परंतु आपल्या आयुष्यात येऊ पाहणाऱ्या आपल्या हक्काच्या माणसाच्या चाहुलीने ती सुखावली देखील होती. येत्या रविवारी सुमंत आणि तिची पहिली भेट कशी असेल , कस्तुरीला तर सुमंत पाहताक्षणीच आवडला होता पण सुमंतला कस्तुरी आवडेल ? पाहूया पुढच्या भागात.....
क्रमशः
