शुभांगी दिक्षीत

Thriller

3  

शुभांगी दिक्षीत

Thriller

पछाडलेला तो

पछाडलेला तो

4 mins
29


   पूर्ण रात्र मनोज जागा होता. पात्रांची नावे तर त्याने लिहली होती पण, त्यांच्या भोवती कथानक गुंफणं थोडंसं अवघड जात होतं. कथेचा बेस त्याला काही सुचत नव्हता. लॅपटॉप बंद करून तो तसाच ठेवून त्याने लाईट बंद केली आणि किचनमध्ये आला. किचन अस्ताव्यस्त पाहून मनोज स्वतःवरच चिडला. त्याने साफसफाई करण्यास सुरुवात केली. दोन तास त्याने किचन स्वच्छ करण्यामध्ये घालवले. आज शनिवार असल्याने त्याला ऑफिसला सुट्टी होती. मनोज जरी काम करत असला तरीही तो कथेबद्दल विचार करत होता आणि स्वतःशीच आनंदीत होत होता. कथेचा बेस कदाचित मनोजला मिळाला होता.


    टू मिनिट नूडल्स दहा मिनिटात बनवून झाल्यानंतर मनोजने त्यांचा आस्वाद घेतला. पुन्हा लॅपटॉप घेऊन लिहण्यास सुरुवात केली. मनोजची पाठ दरवाजाकडे होती. मनोजला मागे पावलांची चाहूल लागली. त्याने पटकन मागे वळून पाहिलं. कोणीही नव्हतं. समोर असलेल्या कॉफीचा त्याने एक सिप घेतला तेव्हा मनोजला जरा बरं वाटलं. तो पटपट टाईप करत होता. कथेचे मुद्दे, किती भाग असणार? प्रत्येक भागात काय काय असणार आहे. वाचकांना कथेत कसं गुंतवून ठेवता येईल. सरतेशेवटी त्याने पात्रांची नावं बदलली. नायकाचं नाव होतं 'अजिंक्य'

"तिचं नावं काय ठेवू? आराधना? नको. अपूर्वा? अनघा? अपर्णा? अनुष्का? नको? 'अ' वरून तर नको. त्याचं नाव 'अ' तिचं पण नाव 'अ' पासून सुरू होणारं नको. काहीतरी भारी नाव पाहिजे. मायरा? नको? आर्या चांगलं आहे. 'अ' नाही 'आ' आहे." मनोज स्वतःशीच बोलत होता. सर्व काही ठरवण्यात आणि लिहण्यात म्हणजे टाईप करण्यात रात्र झाली. पुन्हा मनोजने टू मिनिट्स नूडल्स तयार केले आणि त्यांचा आस्वाद घेतला. किचन व्यवस्थित केलं आणि पांघरूण घेऊन लाईट बंद करून झोपलाही. त्याला शांत झोप लागली.


   मस्त झोप झाली होती मनोजची. एक मोठ्ठा आळस देऊन तो कॉफी बनविण्यासाठी किचनमध्ये जाणार तोच स्टडी रुममध्ये कोणीतरी असल्याचा भास मनोजला झाला.

"कोण आहे?" असं म्हणत तो स्टडीरूममध्ये आला. ती व्यक्ती चेअरवर रेलून बसली होती. ब्लॅक हूडीमध्ये चेहरा नव्हता. होता एक ब्लॅक पॅच. मनोजच्या अंगावर काटा आला.

"मी आहे...तुझ्या कथेचा नायक...अजिंक्य." ब्लॅक हुडी घातलेली ती व्यक्ती म्हणाली.

"हं...भास असेल..मास्ख काढ म्हणजे समजेल कोण आहेस तू...नाहीतर मी पोलिसांना बोलवेन...चोर आहेस तू??....वेट तू माझा लॅपटॉप का घेतला आहेस??" असं म्हणत मनोजने त्या व्यक्तीकडून लॅपटॉप घेण्याचा प्रयत्न केला, पण त्या व्यक्तीने त्याला जोरात ढकललं आणि मनोज जमिनीवर पडला तशी ती व्यक्ती खदाखदा हसली,

"तु तुझ्या कथेत लिहलंस तशी शक्ती आहे ना माझ्यात? पण, तुला एक गोष्ट माहित नाही तुझी पूर्ण गोष्ट चुकीची आहे. माझं काय कॅरॅक्टर रंगवलं आहेस तू? सायको किलर? मी सायको किलर नाहीए..." असं म्हणत ती व्यक्ती लॅपटॉप फेकणार तोच तो ओरडला..."एऽऽऽ एकच लॅपटॉप आहे माझ्याकडे हा...आणि तू जी स्टोरी बोलतोयस ती तर एक काल्पनिक कथा आहे. खरं काही नसतं तसं..." मनोज म्हणाला. ती व्यक्ती त्याच्या जवळ आली. मनोज जमिनीवरच बसला होता, "हा घे लॅपटॉप आणि मी सांगेन तशीच स्टोरी लिहायची आणि हिरोईनचं नाव मालविका ठेव." असं म्हणत त्या व्यक्तीने थोडी कथा सांगितली.

"काय? नाव? माल..विका. अर्थ आहे का नावाला? दोन्ही वेगळे शब्द आहेत. त्या लेडी व्हिलन असतात त्यांचं नाव असतं असं आणि काय म्हणतोस? लव्ह स्टोरी? हॅऽऽ ती तर कोणीपण लिहू शकतं. थ्रिलर, क्राईम स्टोरीज लिहायला डोकं वापरावं लागतं आणि त्याच लोकांना आवडतात त्यातही त्यात लव्ह स्टोरी असेल तर ठिक आहे पण, फक्त लव्ह स्टोरी कोणी वाचत नाही. सगळंच गोड गोड, कोण वाचणार? काही तरी चमचमीत नको?" मनोज म्हणाला.

"एऽऽऽ" ती व्यक्ती ओरडली, "तू कोणे ठरवणारा की काय लिहायचं काय नाही? ठरवणार तर मी की तू पुढे काय लिहायचं आणि काय नाही. समजलं? हे कायम लक्षात ठेव, तुमच्या कथेतली पात्र ठरवतात की तुम्ही पुढे काय लिहणार आहात. ते लेखक लोकं नाही ठरवू शकत कधीच. सुरुवात कर...लॅपटॉप घे..."

"अरे पण.."

"घे..."

मनोजने लॅपटॉप हातात घेतला. त्याला काहीही सुचत नव्हतं त्या व्यक्तीने म्हणजेच अजिंक्य ने एक चुटकी वाजवली आणि मनोजची बोटं झरझर लॅपटॉपवर फिरू लागली. त्याला थांबताही येईना. कोणीतरी हात बांधून आपल्याकडून टाईप करून घेत आहे असं मनोजला वाटलं. हात मागे ओढण्याचा प्रयत्न केला तरी कीबोर्डला हात चिकटून बसले आहेत असं त्याला वाटत होतं. जी स्टोरी लिहली जात होती ती एक लव्ह स्टोरी होती. जी मनोजला अजिबात आवडली नव्हती.


   अचानक बोटं थांबली. मनोजने पाहिलं तर "मिशन लव्ह" असं त्या स्टोरीचं नाव होतं. दोन भाग पूर्ण झाले होते.

"आता लिही....हे घे स्टोरीचे ड्राफ्ट्स..पण, एक लक्षात ठेव जर काही चुकीचं आणि मनाचं लिहलंस तर तुझा हा एकुलता एक लॅपटॉप....मी पुन्हा येऊन फोडुन टाकेन." असं म्हणत ती व्यक्ती अदृश्य झाली. मनोजने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि वॉशरूममध्ये धाव घेतली. तिथे असलेली पाण्याची बादली त्याने आपल्या डोक्यावर रिकामी केली तेव्हा कुठे त्याला बरं वाटलं.


   आज मनोजची मुलाखत होती.

"सर...आतापर्यंत आपण फक्त क्राईमस्टोरीजवर नॉव्हेल्स लिहली आहेत..मग आता ही लव्ह स्टोरी...

"मिशन लव्ह ही फक्त एक लव्ह स्टोरी नाहीए. यात प्रेमाचे सर्व रंग आहेत."

"कथा कशी सुचली?"

"असं समजा की, माझ्या कथेतील एका पात्राने मला ही कथा सुचवली कारण, आपण जेव्हा कथा लिहायला सुरुवात करतो तेव्हा ती पात्रंच असतात जी आपल्याला कथा पुढे नेण्यासाठी मदत करतात डायरेक्शन करतात, मार्ग दाखवतात. या कथेतील 'अजिंक्य' ने मला मार्ग दाखवला असं मी मानतो." मनोजची मुलाखत छान पार पडली. 

   काही वेळाने एक मुलगी त्याच्या समोर आली.

"सर, तुम्ही माझी कथा लिहाल का?? अन्विता नाव आहे माझं पण, माझी लव्ह स्टोरी नाहीए. मला अजिंक्यने सांगितलं तुमच्याकडे येण्यासाठी.." तिने अजिंक्यकडे इशारा केला. अजिंक्यला पाहताच मनोजच्या सर्वांगावर काटा आला. मनोज स्तब्ध होऊन अजिंक्य आणि अन्विताकडे पाहत राहिला.

त)


(कथा पूर्णतः 'काल्पनिक' आहे. कोणत्याही कथा, लेखक, लेखिका, कथेतील पात्रे यांच्याशी संबध नाही. असल्यास योगायोग समजावा.)


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller