Shubhangee Dixit

Others

3  

Shubhangee Dixit

Others

भाऊ बहिण

भाऊ बहिण

5 mins
299


"शितले बास..माझं डोकं खाऊ नकोस आता तू. नाही म्हंटलं ना मग नाही. मी निघतोय. तू ऑटो बघ तुझ्यासाठी. लग्न होईपर्यंत मला भेटायचं नाही आणि बोलायचं नाही आणि लग्न नसेल करायचं तर सांग तसं स्पष्ट. बाय." असं म्हणत शिरीष कट्ट्यावरून उठला. बाईकला किक मारून निघूनही गेला. नेहमी तो शितलला घरापासून थोडं दूर सोडत असे. शितल पहात राहिली.


"ऑटो.." शितल ने ऑटोला हात केला.

"समता नगर.." तिने सांगितलं. ऑटो चालू झाली. तसंच, शितलंच विचारचक्रही. घरी पोहचली तेव्हा आईने विचारलंच.

"काही झालंय का??"


"म्हणजे??"


"चेहरा बघ. बारा वाजलेत." आई म्हणाली.


"काही पण हा. लग्न होणार आहे माझं. मग असंच होणार ना? तुला, पप्पांना आणि त्या पागलला सोडून जावं लागेल म्हणून थोडं..." असं म्हणून तिने आईला मिठी मारली.


"ए तायडे!! पागल कोणाला म्हणालीस गं??" शितलचा धाकटा भाऊ सुरज बेडरूममधून बाहेर येत म्हणाला.


"तुला नाही म्हणाले सुऱ्या." शितल म्हणाली.


फ्रेश होऊन आल्यावर शितल बेडरूममध्ये आली तेव्हा सूरज मागे आला.

"फिस्कटलं का??"


"काय??"


"जे बोलायला गेली होतीस ते??" सूरज एकदम हळू आवाजात म्हणाला.


"हम्म..लग्न पण फिस्कटतंय बहुतेक.." शितल थोडीशी हिरमुसली होती.


"काय?? आईला पप्पांना समजलं तर??" सूरजला टेन्शन आलं.


"नाही समजणार. डोन्ट वरी. शिरीषने तर स्पष्टच सांगितलं. लग्न नसेल करायचं तर कळव."


"मग??"


"मग काही नाही. तू त्याला जाऊन सांगणार आहेस की 'लग्न होणार नाही. लग्न मोडलं.' " शितल म्हणाली.


"काय?? मी?? ए, नाही. मी...जा.. त्याची बॉडी कसलीए. एका हातात उचलून फेकून देईल मला तो." सूरज घाबरला.


"मेरे पास एक प्लॅन है.." शितल हसत म्हणाली.


पंधरा दिवसांनंतर...


सूरज दोन मुलांना घेऊन शिरीषकडे आला. शितलच्या प्लॅनप्रमाणे. "हाय" शिरीषने दार उघडताच सूरजने त्याला हाय केलं. 


"हम्म.. हाय.. ये .." सूरज शिरीषच्या घरात प्रवेश करता झाला. सोबत ती दोन मुलंही. एक मुलगा आणि एक मुलगी होते. शिरीषने पिण्यासाठी पाणी आणून दिलं.


"थँक्स.."


"थँक्स मामा" ती दोन्ही मुलं म्हणाली. शिरीष त्यांचं हे बोलणं ऐकून चमकला. लहान मुलं अशी मामा म्हणत नाही..अंकल नाहीतर काका असं म्हणतात.


"ताईने निरोप दिला आहे तुला.. आपलं तुम्हाला.." सूरज अडखळला.


"तुला म्हंटलास तरी चालेल. अजून लग्न व्हायचं आहे माझं तुझ्या ताईसोबत." शिरीष हसून म्हणाला.


"अं... तेच सांगायला आलो होतो की. ताई तयार आहे लग्नाला."


"अरे वा!! समजलं म्हणजे तिला सांगितलेलं." 


"हो..." सूरजचा घसा कोरडा पडला. "पाणी मिळेल??" 


"किचनमध्ये फ्रीज आहे. हवं तेवढं पाणी पी." असं म्हणत शिरीषने शितलला फोन लावला.


"शितू.. शितू...आय लव्ह यू..तू तयार झालीस लग्नाला. मला वाटलंच होतं तू मला कधीच सोडून जाणार नाहीस. कधी लग्न होतंय असं झालं मला." शितलने हॅलो म्हणण्या आधीच शिरीष म्हणाला.


"इश्श.. तू पण ना." शितल लाजली. काहीक्षण बोलल्यावर शितल म्हणाली, " सूरज आहे की गेला??"


"आहे. देतो त्याला कॉल." 


"हा.. ताई.."


"सूऱ्या, घरी ये. तुला बघतेच आता. सगळ्या प्लॅनची वाट लावलीस." शितल हळू आवाजात म्हणाली.


"ह...हा हा हाह...येतो ना घरी. सांगितला निरोप मी..ठेवू फोन??" सूरज ने असं म्हणून कॉल कट केला.


"हे कोण आहेत दोघं??" शिरीषने विचारलं.


"अरे.. हे आमच्या बाजूलाच रहातात. त्यांच्या घरी थोडा प्रॉब्लेम झाला आहे. म्हंटलं या दोघांना चला थोडं फिरून येऊ."


"अच्छा!! गोड आहेत रे हे दोघं." शिरीष म्हणाला,"तुम्ही मामा कसं म्हणालात मला??"


"मम्मीने सांगितलं. आम्ही सर्वांना मामा म्हणतो. काका नाही म्हणत." 


"असं."


"एक काम होतं. करशील का??" सूरज म्हणाला.


"हो सांग." 


"यांना तुझ्याकडे ठेवशील आजचा आणि उद्याचा दिवस?? म्हणजे त्यांच्या घरी प्रॉब्लेम..." 


"राहू दे. नाहीतरी मी इथे एकटाच रहातो. आई बाबा गेल्यापासून. राहू दे. दोन दिवसांचा तर प्रश्न आहे."



सूरज घरी आल्यावर शितल खुप ओरडली त्याला. "लग्नाला तयार नाही" असं सांगायचं होतं तर "लग्नाला तयार आहे" असा निरोप दिला होता सुरजने. इकडे शिरीषने नूडल्स बनवून मुलांना खाऊ घातल्या. दोघांनी खुप सतावलं त्याला. "मामा" नावाचा गजर होत होता सारखा. दोन दिवस असेच गेले. 


"हॅलो, शितल हाच ॲड्रेस आहे ना गं??"


"हो गं श्रेया. तोच ॲड्रेस आहे."


"काय गं? माझ्या मुलांना असं परक्याच्या घरी ठेवलंस. कशी असतील ती ? काय करत असतील? आणि शहाणी तू नाही आलीस सोबत." श्रेया म्हणाली


"एक मिनिट..कोणीही परकं नसतं. प्रत्येकजण कधी ना कधी भेटलेला असतो आणि माझा नवरा म्हणजे तुझा भाऊ आहे असं समज.."


"हं..पुरे..ठेव आता. मी पोहचले आहे सोसायटी जवळ."


"बरं बाय. टेक केअर." असं म्हणत शितलने कॉल कट केला.


डोअर बेल वाजली. तेव्हा शिरीषने दरवाजा उघडला. श्रेया आणि शिरीष दोघेही समोरासमोर होते. काही बोलण्याआधीच आतून..

"मम्मी मम्मी" असं म्हणत आरोही आणि अथर्व धावत आले.


"ही..ही..तुझी मुलं आहेत." शिरीषने विचारलं.


"हो. माझीच आहेत."


"तूच सांगितलंस ना यांना सर्व??" शिरीषला राग येत होता. 


"मी का सांगेन?? माझं तुझं काही नातं आहे??" श्रेया म्हणाली. 


"नाही. काहीच नातं नाहीए. ते तेव्हाच संपलं जेव्हा तू.. जेव्हा तू पळून जाऊन लग्न केलंस. त्या धक्क्याने आई बाबा जग सोडून गेले. एकटा मी राहिलो." शिरीषला राग असह्य होत होता. त्याने मोबाईल उचलून शितलला कॉल.." शितल मला पंधरा मिनिटांच्या आत तू इथे हवीस." मोबाईल सोफ्यावर फेकून देत तो श्रेयाला म्हणाला, "इथेच उभी रहा. आत यायचं नाहीस."

शिरीषचा अवतार पाहून दोन्ही मुलं घाबरली होती. शितल आली. श्रेयाने एक रागीट कटाक्ष शितलकडे टाकला. शिरीष हॉलमध्ये फेऱ्या मारत होता. शितलने चॉकलेट्स मुलांना दिले आणि त्या बेडरूममध्ये पाठवलं.

"शितल, हे सगळं काय आहे??" शिरीषने विचारलं


"काय?? अरे हा..रक्षाबंधन पंधरा दिवसांवर आहे. माहित आहे ना? तुम्ही विसरलात वाटतं दोघं पण. कसं लक्षात राहणार. नाही का?? शिरीष. काय श्रेया??"


"तू हिला का बोलवलंस इथे?? ही माझी बहीण नाही." शिरीष रागाने म्हणाला.


"हा सुद्धा माझा भाऊ नाही. शितल तू असं वागशील असं वाटलं नव्हतं." श्रेया म्हणाली.


"शिरीष आणि श्रेया प्लिज. तुम्ही दोघे असं वागू नका. जे झालं ते झालं. आई बाबा परत येणार नाहीत शिरीष. त्यांनीही माफ केलं असेल श्रेयाला तू पण माफ कर ना रे. ते बघ. त्या पिल्लांकडे बघून तरी. तुला त्यांनी मामा म्हंटल्यावर तुला बरं नाही वाटलं??"


"पण, मी सगळं कसं विसरू?? तिच्यामुळेच मी आज इथे एकटा रहात आहे. माझं कोणी नाही. मी कसं विसरू ते सगळं??" शिरीष आपलं डोकं धरून सोफ्यावर बसला. रडत होता तो. शितल आणि श्रेया आहेत हे विसरून. तोच एक लहानगा हात त्याच्या खांद्यावर विसावला. त्याने वर पाहिलं तर ती आरोही होती. 

"मामा, तू रडू नकोस. मम्मी पण नेहमी तुझी आठवण काढून रडत असते. पप्पा तिला खुप समजवतात. रात्री पण रडते ती. मी पाहिलंय."

"शिरीष, प्लीज." असं म्हणून शितल श्रेयाला घेऊन घरात आली. शिरीष उठून उभा राहिला. त्याने डोळे पुसले आणि श्रेयाला हळूच विचारलं, "दीदे, तुला काय गिफ्ट पाहिजे रक्षाबंधनचं." शितलने दिलेली राखी श्रेयाने शिरीषच्या हातात बांधली. शितलने मनातल्या मनात देवाचे आभार मानले.

💝💝💝💝💝💝

"अहं....असं यायचं नाही आत...आधी उखाणा घे. आणि शिरीष तू...भाजीत भाजी सोडून कोणताही उखाणा घे. शितल म्हण आता." श्रेया म्हणाली.


"नाशिकची द्राक्ष गोव्याचे काजू

शिरीष रावांचं नावं घ्यायला 

मी कशाला लाजू??" शितल लाजत म्हणाली.


"अरे वा!! शिरीष तू.."


"रुक्मीणीने केला पण श्री कृष्णालाच वरीन,

शितलच्या साथीने आदर्श संसार करीन."


शितल मोहरली. श्रेया शिरीषला ..या दोघा भाऊ बहिणींना एकत्र पाहून तिच्या मनात समाधान होतं. आठवत होतं ते सारं जे तिने श्रेया आणि शिरीषची भेट होण्यासाठी केलं होतं.

🌺🌺🌺🌺🌺


Rate this content
Log in