Shubhangee Dixit

Drama Crime

3.8  

Shubhangee Dixit

Drama Crime

गुप्तहेर आकांक्षा - भाग दोन

गुप्तहेर आकांक्षा - भाग दोन

9 mins
411


मागील भागात :

वैजयंती राजमाने यांच्यावर विषप्रयोग झाला. एकदा नाही तर दोनदा. त्याचा तपास करताना आकांक्षाला राजमाने यांच्या किचनमध्ये एक कागद सापडला. तिने तो कागद समोर धरताच तिची शुद्ध हरपली...

🔍🔎🔍🔎🔍🔎🔍🔍🔍🔎🔍🔎🔍🔍🔎

इन्स्पेक्टर प्रधानांनी आकांक्षाच्या हातातील कागद घेऊन एव्हिडन्स बॅगमध्ये ठेवला आणि आकांक्षा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं.

डॉक्टर म्हणाले, "ज्या वस्तू सोबत यांचा संपर्क आला त्यामध्ये विषाची मात्रा अतिशय कमी होती म्हणून यांच्या जीवाला धोका नाही. नाहीतर कठीण होतं. इंजेक्शन दिलं आहे. त्यांना येतील काही वेळाने शुद्धीवर."

"थँक्स डॉक्टर. यांना डिस्चार्जड मिळेल ना??" इन्स्पेक्टर प्रधान म्हणाले.

"येस व्हाय नॉट? सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्या की आपण नेऊ शकता पेशंटला." असं म्हणून डॉक्टर गेले.

जवळपास दोन तासांच्या अंतराने आकांक्षा शुद्धीवर आली. इन्स्पेक्टर प्रधान जवळच होते.

"तो कागद..." आकांक्षा म्हणाली. तिला नीट बोलता ही येत नव्हतं.

"आहे.. फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला आहे. तू ठिक आहेस ना आता??" इन्स्पेक्टर प्रधान म्हणाले.

"हो. मी ठिक आहे आता." आकांक्षा उठून बसली.

काही वेळाने सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण करून इन्स्पेक्टर प्रधान आकांक्षा सोबत तिला घरी पोहचवण्यासाठी आले.

"अरे, अजिंक्य तू?? किती दिवसांनी??" आकांक्षाची आई म्हणाली. हे वाक्य इन्स्पेक्टर प्रधानांना उद्देशून होतं. आकांक्षा आणि अजिंक्य एकाच कॉलेजमध्ये होते. तेव्हापासून एक दोनदा अजिंक्य आकांक्षाकडे येऊन गेला होता.

"हो काकू. ड्युटीमुळे येता येत नाही." अजिंक्यने पुढे होऊन आकांक्षाच्या आईला वाकून नमस्कार केला.

"मग आज पण ड्युटीवर आहेस का??" आकांक्षाचे बाबा बेडरूममधून बाहेर येत म्हणाले.

"हो आहे. त्याचं काय झालं की..." अजिंक्य पुढे काही बोलणार तोच आकांक्षा म्हणाली.

"बाबा, अहो मी एक केस घेतली आहे ना तिथेच भेट झाली. पूर्वाची मैत्रीण आहे ना त्यांची केस आहे." आकांक्षाने अजिंक्यला नजरेनेच गप्प बसण्यासाठी सांगितलं. अजिंक्य आकांक्षाच्या बाबांशी बोलत असताना आकांक्षाच्या आईने मोदक आणले.

"हे घे मोदक अजिंक्य.." असं म्हणून चार मोदक असलेली प्लेट अजिंक्य समोर ठेवली.

"नको काकू. कशाला?? आता ड्युटीनंतर घरीच जाणार आहे."

"अरे घे. संकष्टी आहे ना आज. बाप्पाला नैवेद्य दाखवला आहे. मला माहित आहे तुला मोदक आवडतात." आकांक्षाची आई म्हणाली.

अजिंक्यने मोदक घेतले.

"काकू, मी निघतो आता. उशीर होईल. पोलीस स्टेशनला पण जायचं आहे."

"ये पुन्हा. येशील ना??"

"हो काकू, नक्की येईन." असं म्हणून अजिंक्य बाहेर आला तेव्हा आकांक्षा त्याला सोडविण्यासाठी आली. दोघांना आकांक्षाची आई लांबूनच पहात होती.

"किती छान जोडी आहे हो. आकांक्षा आणि अजिंक्यची."

"का?? जावई बनवून घ्यायचा विचार आहे की काय??" आकांक्षाचे बाबा हसत म्हणाले.

"काय हरकत आहे?? किती सालस मुलगा आहे. अजिबात गर्व नाही. पण आपली आकु ऐकेल तर शपथ."

इकडे आकांक्षा आणि अजिंक्य बोलत होते.

"तू ठिक आहेस ना आता?? अचानक बेशुद्ध झालीस."

"अचानक नाही. तो कागद होता ना त्यामध्ये होतं काहीतरी. रिपोर्ट आले का त्याचे??"

"नाही. सकाळी येतील." अजिंक्य म्हणाला. काही वेळ दोघेही काहीच बोलले नाहीत.

"आकांक्षा, मला काहीतरी सांगायचं आहे तुला." अजिंक्य म्हणाला.

"जुन्या गोष्टींबद्दल बोलण्याची माझी अजिबात इच्छा नाही. तू खोटं बोलला होतास तेव्हा म्हणून.."

"मी त्याबद्दल तुझी माफी मागितली आहे आणि.."

"आणि काय?? मला काय बोलला होतास तू?? 'आकांक्षा मला शुगर आहे. त्यामुळे मला गोड वर्ज्य आहे. आणि तरीही विशालच्या बर्थडे पार्टीमध्ये पेस्ट्रीज, कोक हे सर्व..." आकांक्षा बोलत असतानाच अजिंक्य म्हणाला,

"ओ कमॉन आकांक्षा. त्या गोष्टीला पाच ते सहा वर्ष होऊन गेलेत. आणि मी याबद्दल बोललोच नाही. मी फक्त इतकंच सांगत होतो की तुझ्या प्रोफेशन मध्ये धोका जास्त आहे. काळजी घेत जा. जुने शत्रू खुप असतात. काही झालं तर..."अजिंक्य म्हणाला.

"मला काहीही होणार नाही. आणि झालं तरी कोणाला फरक पडणार?? आईबाबांना, पुर्वाला. बस्स. तू माझी काळजी करायची गरज नाही. अजून कोणाला फरक पडणार आहे?? या केस पुरतं तरी वी नीड टू कोऑपरेट विथ इच अदर." आकांक्षा म्हणाली.

"हम्म. मी सांगेन उद्या रिपोर्टबद्दल. मी निघतो आता. साडे आठ होत आले. चल बाय."

"बाय." आकांक्षाने अजिंक्यला निरोप दिला खरा. पण त्याने थांबावं असं तिला वाटत होतं.

दुसऱ्या दिवशी अजिंक्यने आकांक्षाला कॉल केला आणि तिला पोलीस स्टेशनला बोलावून घेतलं.

"आकांक्षा, हे बघ रिपोर्ट्स. डॉक्टर वाळिंबे म्हणाले त्या कागदावर विष होतं. ते विष एका समुद्री सापाचं होतं. जरी सिंथेटिक पॉईझन ०.७० मिलीग्रॅम होतं तरीही सी स्नेक पॉईझन आणि सिंथेटिक पॉईझन एकत्र आल्याने विष अजूनच जीवघेणं ठरलं. जर फक्त सिंथेटिक पॉईझन असतं तर काही काळ वैजयंती बेशुद्ध राहिल्या असत्या." अजिंक्यने रिपोर्टबद्ल पूर्ण माहिती दिली.

"असं आहे तर..विलास यांचे दोन नोकर आहेत ना त्यांना चौकशीसाठी पुन्हा बोलवावं लागेल."

"तुला संशय आहे का त्यांच्यावर??"

"हं.." असं म्हणून आकांक्षाने अजिंक्यला आपल्याला एक पुरावा सापडल्याचं सांगितलं. दुसरं असं की सिंथेटिक पॉईझन केकमध्ये कोणी मिसळलं याबद्दलही तिला थोडी फार शंका एका व्यक्तीवर येत होती. तिने विलास राजमाने यांची भेट घेतली.

"काका, तुमचे बिझनेस पार्टनर सोबत काही वाद झाले होते का??"

"हो. झाले होते वाद. आम्ही वेगळं होण्याचा डिसीजन ही घेतला होता परंतु, एका डिल मुळे आमच्यातला वाद मिटला. पण, तू असं का विचारत आहेस??"

"मला संशय आहे त्या बिझनेस पार्टनरवर आणि सदाकाकांबद्दल मला माहिती हवी आहे. ती मी काढेनच. बिझनेस पार्टनरचं नाव आणि पत्ता हवा आहे मला." आकांक्षा म्हणाली. विलास राजमाने यांनी पत्ता लिहून दिला.

थोड्यावेळाने आकांक्षा त्या पत्त्यावर पोहोचली."इंद्रजित साहेब आहेत??" दरवाजा उघडल्यानंतर बाहेर आलेल्या व्यक्तीला तिने विचारलं.

"हो. स्टडीमध्ये आहेत."

"मला त्यांना भेटायचं आहे. एका केस संदर्भात त्यांच्याशी बोलायचं आहे असं सांगा त्यांना." आकांक्षा म्हणाली.

"ठिक आहे. या बसा ना आपण. मी बोलवतो साहेबांना." असं म्हणून नोकर इंद्रजित साहेबांना बोलविण्यासाठी गेला.

"नमस्कार." इंद्रजित म्हणाले.

"नमस्कार. मला वैजयंती विलास राजमाने यांच्या केस बद्दल बोलायचं आहे. आपले आणि विलास यांचे काही वाद झाले होते का??" आकांक्षाने सरळ मुद्द्याला हात घातला.

"वाद झाले होते. पण.."

"इतके की आपण पार्टनरशीप तोडण्याचा निर्णय घेतला होतात. हे खरं आहे का??" आकांक्षाने विचारलं.

"हो खरं आहे..." इंद्रजित बोलता बोलता थांबले "तुम्हाला असं म्हणायचं आहे का की मी वैजयंती वहिनींना मारण्याचा प्रयत्न केला??"

"मी असं म्हंटलंच नाही. आपण असं का बोलत आहात पण?? खरंच काही..."

"हे पहा मॅडम..तुम्ही मला असं काही विचारू शकत नाही आणि कशात अडकवूही शकत नाही..कोण आहात तुम्ही?? मला प्रश्न विचारण्याची ऑथोरीटी तुमच्याकडे नाही." इंद्रजित ताडकन उठून बोलले.

"ऑथोरीटी??" आकांक्षा म्हणाली, "मी आकांक्षा सरदेसाई. खाजगी गुप्तहेर आहे मी. वैजयंती राजमाने यांची केस माझ्याकडे आहे.तसंच तुमच्याविरोधात पुरावाही आहे माझ्याकडे. हा पहा." असं म्हणून आकांक्षाने एक ड्रॉप्सची लहानशी बाटली काढून इंद्रजितना दाखवली. ती पाहून इंद्रजित थोडे अस्वस्थ झाल्यासारखे वाटले. हे पाहून आकांक्षा म्हणाली,

"आणि ही बॉटल फॉरेन्सिकमध्ये पाठविली की नक्की तुमच्या बोटांचे ठसे मिळतील."

"कसे मिळतील बोटांचे ठसे?? मी काहीही केलेलं नाहीए."

"राजमाने यांच्या नोकरांकडून मला समजलं आहे की तुम्हीच केकमध्ये विष मिसळलंत जेव्हा केक काही वेळासाठी किचनमध्ये होता तेव्हा आणि ते ही या ड्रॉपरने."

"नाही. सगळे खोट बोलत आहेत. मी काहीही केलं नाही." इंद्रजित ओरडले.

"खोटं तर तुम्ही बोलत आहात. तुम्ही ड्रॉपरने सिंथेटिक पॉईझन केकमध्ये मिसळलं आणि हेच ते ड्रॉपर आहे आणि यावर तुमच्या बोटांचे ठसेही आहेत." आकांक्षाही आता मोठ्याने बोलली.

इंद्रजित आवेशाने ओरडले, "या ड्रॉपरने नाही तर मी सिरींजने ते विष केकमध्ये मिसळलं होतं. मग या ड्रॉपरवर माझ्या बोटांचे ठसे येतीलच कसे?? आणि मी जेव्हा विष मिसळलं तेव्हा तिथे कोणीही नव्हतं..."

आकांक्षा हलकेच हसत म्हणाली, "हो. बरोबर बोललात तुम्ही. ना ड्रॉपर तुमचा आहे ना मला कोणी सांगितलं. सॉरी, मिस्टर इंद्रजित खरं वदवून घेण्यासाठी मला खोटं बोलावं लागलं. हा एक साधा आय ड्रॉपर आहे." आकांक्षाचं बोलणं ऐकून इंद्रजित डोक्याला हात लावून सोफ्यावर बसले. त्यांना अटक झाली. चौकशीत समजलं की विलास राजमाने यांना त्यांच्याच पत्नीच्या वैजयंतीच्या मृत्यूच्या कटात अडकवून पूर्ण बिझनेस स्वतःच्या नावावर इंद्रजित यांना करायचा होता. इकडे अजिंक्यने सदाकाकांना अटक केली.

आकांक्षाने विचारलं तेव्हा तो म्हणाला, "यांच्या मुलीने समुद्रातातील जीव शास्त्राचा अभ्यास केलेला आहे. त्या समुद्री सापाचं विष तिनेच सदाकाकांना आणून दिलं असावं असा माझा संशय होता. घरावर पाळत ठेवली होती. आजूबाजूला विचारलं. यांना एकच मुलगी आहे. "

"हम्म. आणि त्यांच्या डोक्याला जखम झाली नव्हती. रक्त नाही तर तो एक पदार्थ आहे. 'आळता' म्हणतात त्याला."

"आळता?? हे नाव पहिल्यांदाच ऐकत आहे."

"हा पदार्थ. पायाचे तळवे आणि तळहात रंगविण्यासाठी वापरला जातो. मेंदिसारखाच परंतु रंग लाल असतो याचा. गडद असला तरी रक्तासारखाच दिसतो. कागद सापडण्याआधी जेव्हा भिंतीवर डाग दिसला तेव्हाच संशय आला होता सदाकाकांवर." आकांक्षा म्हणाली.

"म्हणजे केस सॉल्व्ह झाली.." अजिंक्यला हायसं वाटलं.

"नाही. सदाकाकांनी असं का केलं असावं?? याचं कारण समजलेलं नाही अजून." आकांक्षा विचार करीत म्हणाली.

"उद्या मिटींग घेऊया. कारणही समजेल." अजिंक्य म्हणाला.

दुसऱ्या दिवशी सदाकाका, इंद्रजित, विलास राजमाने, सदाकाकांची मुलगी नेत्रा, यांना पोलीस स्टेशनमधील एका मोठ्या रूममध्ये आणण्यात आलं सोबत इन्स्पेक्टर अजिंक्य प्रधान, आकांक्षा आणि दोन कॉन्स्टेबलही होते.

"सदाकाका, जे काही असेल ते खरं सांगा?? विषप्रयोग का केलात?? आणि त्यातही आपल्याच मुलीची मदत घेतलीत ?? आणि नेत्रा मॅडम तुम्ही सुद्धा साथ दिलीत??"

"हो. कारण, तिच्या आईला आणि भावाला या विलासनेच दूर केलंय तिच्यापासून." सदाकाका म्हणाले.

"मी?? सदाकाका मी काय केलं??" विलास यांनी विचारलं.

"खून. खून केलास तू माझ्या मुलाचा आणि बायकोचा. इतका श्रीमंत असूनही तुझ्याकडे मला देण्यासाठी पैसे नव्हते. नाही म्हणालास तू. त्या दोघांवर जर वेळेवर उपचार झाले असते तर ते दोघेही जिवंत असते विलास आत्ता. जिवंत असते." सदाकाका रडत म्हणाले. कोणी काहीच बोललं नाही. "मी सूड घेतला. लाईट्स गेले तेव्हा तो कागद तुझ्या बायकोच्या नाकाजवळ नेला. ओठांनाही पुसला. त्यामुळे ती गेली. मला आज बरं वाटत आहे. तुला तुझ्या बायकोच्या खूनाच्या आरोपाखाली अटक झालेली पाहुन."

"सगळ्यात वाईट गोष्ट कोणती असते तर सूड. यासाठी तुम्ही इतकी वर्षं थांबलात? याबद्दल मला विलासकाकांनी सांगितलं होतं. पण ती दहा वर्षांपूर्वीची गोष्ट होती. आणि तुम्हाला माहित नसेल तर मी हे ही सांगते की, विलास काकांना तेव्हा लॉस झाला होता बिझनेसमध्ये. बंगला, कार, वैजयंती काकूंचे दागिनेही अगदी त्यांचं ऑफिसही गहाण पडलं होतं. कुठून पैसे देणार होते ते तुम्हाला?? तुम्हाला ते खोटं वाटलं. इतकी वर्ष मनात राग धरून बसलात?? एकदा बोलला असतात तर??" आकांक्षाने सदाकाकांना विचारलं. ते गप्प बसले.

"आणि इंद्रजित साहेब आपण?? केक ऑर्डर कोणी केला?? त्या व्यक्तीवरच विषप्रयोगाचा संशय येईल असं वाटलं ना?? सिंथेटिक पॉईझनची मात्रा कमी असली तरीही समुद्री सापाचं विष आणि सिंथेटिक पॉईझन हे एकमेकांत मिसळल्याने अत्यंत घातक असं विष तयार झालं. त्यातच वैजयंती यांचा मृत्यू झाला." अजिंक्य म्हणाला.

"सदाकाका, तुम्ही बोलला होतात तुम्हाला कोणीतरी अंधारात धक्का मारल्याने तुम्ही पडलात आणि तुम्हाला जखम झाली. पण ती जखम नव्हती तर 'आळता' होता. तो रक्तासारखाच दिसतो. विशेषतः कमी उजेड असेल तर. जो विषारी कागद आम्हाला मिळाला त्यावर तुमच्या बोटांचे ठसे आहेत. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही जर ते विष हाताळलंत तर तुमच्यावर त्याचा इफेक्ट का झाला नाही??" आकांक्षाने विचारलं.

"मी आधीच त्या अँटिडोट घेतला होता.नेत्राने दिला होता मला." सदाकाका म्हणाले.

दुसऱ्या दिवशीच सदाकाका, नेत्रा आणि इंद्रजित यांना अटक करून कोर्टापुढे सादर करण्यात आलं. शिक्षाही झाली. आर्या आणि सोहम आकांक्षाकडे येऊन गेले. पप्पांना खोट्या आरोपातून सुखरूप बाहेर काढल्याबद्दल दोघांनीही आकांक्षाचे मनापासून आभार मानले.

...........................................

काही दिवसांनी...

"तू इथे??" अजिंक्यने आकांक्षाला विचारलं.

"हो. आमचं पथक आहे ना. ढोल ताशा पथक. आज मिरवणूक आहे." आकांक्षा सुंदर दिसत होती. व्हाईट कुडता पायजामा, डोक्यावर केशरी फेटा, नाकात नथ, कानात झुमके, गालावर अगदी बारीकशी सहज न दिसणारी खळी ती बोलत होती तेव्हा अजिंक्य पहातच राहिला.

"सुंदर.." तो बोलून गेला.

"काय??तु काही म्हणालास का??"

"नाही. हेच सुंदर. पहाटेची मिरवणूक. गुढीपाडवा म्हटल्यावर मिरवणूक तर हवीच. आत्ताच बघ ना किती गर्दी होऊ लागली आहे. सो बंदोबस्त आहे आज इथे आमचा.." अजिंक्य म्हणाला.

"हम्म.."आकांक्षा आजूबाजूला पहात म्हणाली.

"आकांक्षा, मला काहीतरी सांगायचं आहे तुला. मी.. माझं अजुनही तुझ्यावरच प्रेम आहे. आज दिवस खुप चांगला आहे. प्लीज तू नाही म्हणू नकोस."

"तू ड्युटीवर आहेस हे विसरलास का?? आपण नंतर बोलू या विषयावर. चल मी जाते. बाय." आकांक्षा म्हणाली.

"देवा, तिने एकदातरी वळून पाहिलं तर मी समजेन की ती अजूनही माझ्यावर प्रेम करते." असं अजिंक्य मनात म्हणत असताना आकांक्षाने वळून पाहिलं आणि एक स्माईल दिली. अजिंक्यला खुप आनंद झाला.

गुढीपाडव्याच्या मिरवणूकीत आकांक्षाच्या ढोल ताशा पथकाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक निघाली होती. आज मराठी नववर्षारंभ म्हणजे गुढीपाडवा आज होता खरा पण अजिंक्य आणि आकांक्षाचं नातंही कदाचित नव्या दिशेने वाटचाल करणार होतं.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama