शब्दांना पंख फुटले तर
शब्दांना पंख फुटले तर
"काय लिहतेस??" प्राजक्ताला आईने विचारले."काही नाही गं आई. एक कविता लिहतेय." प्राजक्ता म्हणाली.
"बघू कोणती कविता आहे?? पाहू दे." असं म्हणून प्राजक्ताच्या आईने प्राजक्ताची डायरी घेतली आणि कविता वाचू लागली. चारोळी होती.
आठवणींचा सुगंध असा
पारिजात फुलतो जसा
मन कुपी अत्तराची
सुगंधी आठवणींचा ठेवा..
"हे कधीपासून चालू आहे.."
"काय आई??" प्राजक्ताने विचारलं.
"अशा कवितांचा अर्थ समजतो का तुला?? कविता लिहणं म्हणजे तू कोणाच्या तरी प्रेमात आहेस." आई म्हणाली.
"अगं आई, असं काहीही नाहीए. तुला कोणी सांगितलं की मी प्रेमात आहे?? अगं, मला आवडतं लिहायला. काहींना कथेच्या रूपात लिहायला आवडतं, काहींना कवितेच्या रूपात लिहायला आवडतं." प्राजक्ता आईला समजावत म्हणाली.
"बरं बरं. आता इथे आहेस म्हणून चालत आहे. सासरी गेल्यावर नाही चालणार बरं हे सगळं. तिथे तर वेळही भेटणार नाही म्हणा. लिही तू. पण, सवय नको लागू देऊ." आई म्हणाली.
"आई, तू पण ना. कसं गं प्रत्येक गोष्ट आणि बोलणं माझ्या लग्नाच्या विषयावर येऊन थांबवतेस??"
"लग्नाचं वय उलटत चाललं आहे. मग म्हणणारच ना मी??"
"आई प्लीज..." प्राजक्ता म्हणाली.
"काही बोलत नाही मी. पण सांगते. विसरू नकोस म्हणजे झालं."
"हो." प्राजक्ता म्हणाली, "अरे हा...आई मावशीचा मेसेज आला होता तिने तुला कॉल करायला सांगितला आहे."
"हो? थांब. मी करते कॉल तिला." असं म्हणून आईने आपला मोबाईल घेऊन बहिणीला कॉल केला. प्राजक्ता हसली आणि मनात म्हणाली, "चला, दोन तासांची निश्चिंती मिळाली. नाहीतर सारखा लग्नाचा विषय." असं म्हणून प्राजक्ताने पुन्हा कविता लिहण्यास सुरवात केली.
यथावकाश प्राजक्ताचं लग्नही झालं. प्रणव स्वभावाने खुप छान होता. एक दिवस कपाटामध्ये आपली फाईल शोधत असताना ड्रॉवर मध्ये एक डायरी सापडली.
"ही कोणाची डायरी??" असं मनाशी म्हणून त्याने पहिलं पान पाहिलं तर प्राजक्ताचं नावं होतं. एक दोन कविता वाचल्या त्याने. तोच प्राजक्ताने किचनमधून आवाज दिला.
"अहो, आज ऑफिसला नाही जायचं का?? नाश्ता कधी करणार आहात??" प्राजक्ताच्या या आवाजाने तो भानावर आला. त्याने ती डायरी बॅगेत ठेवली आणि तयारी करून ऑफिसला निघून गेला. ऑफिसमध्ये पुन्हा त्याने डायरी वाचली. खुप सुंदर कविता होत्या त्यामध्ये. दीडशे ते दोनशे कविता असतील.
एक महिन्यानंतर प्रणवने प्राजक्ताला एका कार्यक्रमासाठी जायचं आहे असं सांगितलं. तिने विचारलं असता प्रणवने सांगितलं की जवळची व्यक्ती आहे. जावंच लागेल. ते दोघेही एका सभागृहाच्या द्वाराजवळ पोहताच सर्वजण दोघांकडे पहात होते. प्राजक्ताला थोडं विचित्र वाटलं. स्टेज जवळ आल्यावर तिथे आपले आवडते कवी चिन्मय सावंत स्टेजवर मुख्य अतिथी असलेले तिने पाहिलं. त्यांची प्रत्येक कविता तिने वाचलेली होती. एकदा तरी त्यांना भेटावं ही इच्छा आज पूर्ण होत होती. प्रणव प्राजक्ताला स्टेजवर घेऊन आला. प्राजक्ताला चेअरवर बसवून त्याने माईक हाती घेतला.
"नमस्कार सर्वांना. सरप्राईज. हो. एक महिन्यापूर्वी सकाळी ऑफिसच्या घाईत असताना एक फाईल कपाटामध्ये शोधत असताना ड्रॉवर मध्ये मला ती डायरी सापडली. खूप सुंदर कविता होत्या. मनाला मोहवणाऱ्या. ती डायरी दोन दिवसात मी वाचून काढली होती. तीच डायरी मी काही दिवसांनी प्रसिद्ध कवी चिन्मय सावंत यांनाही वाचण्यासाठी दिली. त्यांनाही या डायरीमधील कविता खूप आवडल्या. ती डायरी माझ्या पत्नीची प्राजक्ताची होती आणि डायरीच्या शेवटच्या पानावर कवी चिन्मय सावंत यांना एकदातरी भेटण्याची इच्छा व्यक्त केली गेली होती. आज या डायरीचे एका काव्यसंग्रहात रुपांतर होऊन त्याचे प्रकाशन प्रसिद्ध कवी चिन्मय सावंत यांच्यातर्फे होत आहे."
प्रणवचे बोलणे संपताच. टाळ्यांचा कडकडाट झाला. प्राजक्ताचे डोळे भरून आले. अश्रूंमुळे तिला समोरचं धूसर दिसत होतं. तिला आईचं ते वाक्य आठवलं. "सासरी असं काही चालणार नाही." आणि आज कवी चिन्मय सावंत यांच्यातर्फे काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले.
काव्यसंग्रहाचे नाव होते, "शब्दांना पंख फुटले तर.."
⚘✍🏻⚘✍🏻⚘✍🏻⚘✍🏻⚘✍🏻⚘✍🏻⚘✍🏻⚘✍🏻
