Shubhangee Dixit

Romance Tragedy Inspirational

3  

Shubhangee Dixit

Romance Tragedy Inspirational

पत्र

पत्र

9 mins
243


अक्षता आणि विशालचं नुकतंच लग्न झालं होतं. विशालला पूर्ण एक महिन्याची सुट्टी मंजूर झाली होती. दहा दिवस तर लग्नाच्या तयारीत गेले. लग्न सुरळीत पार पडलं. पुढील दोन तीन दिवसांमध्ये जागरण गोंधळ, कुलदेवतेचं दर्शन तसेच सत्यनारायण पूजनही केले गेले. आता पंधरा दिवस तरी थोडे निवांत मिळतील असं विशाल, अक्षता आणि विशालच्या कुटुंबातील सर्वांना वाटत असतानाच ड्युटीवर जॉईन होण्यासाठी विशालला कॉल आला. घरातील सर्वचजण चिंतेत होते. नवीनच लग्न झाले आणि लगेच विशाल जाणार. सर्वांना माहित होतं पण, अक्षता?? तिला कसं समजून सांगणार होतं कोणी. जाण्याची तयारी विशालच्या आईने करून दिली. अक्षताही मदतीला होतीच.


निरोप घेताना विशाल आईबाबांच्या पाया पडून अक्षताकडे आला. ती तिथेच उभी होती. तिच्याजवळ जाऊन विशाल म्हणाला, "मी येईन परत लवकरच. सुट्टी मिळाली की लगेच." इतकं बोलून काही क्षण अक्षताकडे पहात राहिला. अक्षतानेही त्याच्याकडे पाहिलं तिच्या नजरेत आर्जवं दिसत होती परंतु, विशालने ती पाहूनही त्याकडे दुर्लक्ष केलं. सर्वांचा निरोप घेऊन विशाल आपल्या पहिल्या प्रेमाला भेटण्यासाठी निघाला. त्याचं पहिलं प्रेम हे देशप्रेम होतं. यासाठीच विशाल आर्मीमध्ये भरती झाला होता. आर्मीमध्ये राहूनच देशसेवा उत्तम करता येईल असं त्याचं म्हणणं होतं.


दिवस जात होते यानंतर विशाल पुन्हा लवकर आला नाही. अक्षता आणि विशाल दोघेही कॉलवर बोलत होते परंतु मोबाईलवर असं कितीसं बोलणं होणार होतं?? ड्युटीवर जाताना विशालने अक्षताकडून प्रामिस घेतलं होतं की, ती रडणार नाही. खंबीर रहाणार. अक्षता यावर काही बोलली नाही. फक्त तिने यावर उत्तर म्हणून एक मेसेज केला होता विशालला, "दूर आहात आणि आठवण आली तरी रडू नको. असं कसं वचन मागितलंत?"

"अगं, मी तुझ्याजवळच आहे. मी येईन लवकर सुट्टी मिळाली की." विशालने यावर मेसेज केला.

"मी वाट पाहतेय. आई बाबा ही वाट पहात आहेत तुमची. लवकर या."

"हो येईन."


हे रोजचंच बोलणं होत होतं. कधी कधी नेटवर्क नसल्याने सात आठ दिवस बोलणं होत नसे. तेव्हा अक्षताचा जीव कासावीस होत असे. वेगवेगळ्या शंकाकुशंका तिच्या मनात घर करत असत. इतकं असूनही विशालने घेतलेल्या प्रॉमिसमुळे तिला रडताही येत नसे.


आज गावात यात्रा होती. विशालचे आईवडील दोघेही ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी नैवेद्य घेऊन पुढे गेले होते. स्वयंपाकघरातील सारं आवरून अक्षताही दर्शनासाठी जाणार होती. तोच दरवाजावर टक टक झाली आणि मागोमाग 'पोस्टमन' असा आवाज आला.


"आता कोणाचं पत्र आलं असेल??" असं म्हणत अक्षता दाराजवळ आली. पोस्टमनकाकांनी तिला पत्र दिलं आणि तिची सही घेतली. लिफाफाबंद होतं ते पत्र. कँपचा पत्ता पाहताच अक्षताला भिती वाटली. न जाणो त्या पत्रात काय असेल?? "हे तर व्यवस्थित असतील ना?? सारं काही ठिक असेल ना?? काही अघटीत तर..नाही असं कसं होईल?? मी पत्र वाचू का?? नको. काही असेल तर मी..." अक्षताच्या मनात पुन्हा अनेक शंकाकुशंकांनी घर केलं. "यांनी फोनही केला नाही. दहा पंधरा दिवस झाले. बोलता बोलता तेव्हा नेटवर्क प्रॉब्लेम झाला होता. मेसेजही जास्त केले नाहीत त्यांनी." अक्षताने पत्र पुन्हापुन्हा पाहिलं. कँम्पचाच ॲड्रेस होता. तिने दरवाजा बंद केला. आपल्याला गावदेवीच्या दर्शनाला जायचं आहे हे ही ती विसरली. दरवाजाला टेकून खाली बसून राहिली. तिला रडताही येत नव्हतं. तितक्यात अक्षताच्या मोबाईलवर कॉल आला. ती उठली अणि पाहिलं तर अनोळखी नंबर होता. लॅन्डलाईन नंबर होता तो..तो नंबर पाहून तिला अजूनच भिती वाटली. कॉल रिसिव्ह करण्यासाठी तिने हातही पुढे केला नाही. न जाणो तो कॉल कोणती बातमी घेऊन येईल?? पंधरा मिनिटं कॉल येत होता. तिने तो रिसीव्ह केला नाही. तिची हिंमत झाली नाही कॉल रिसीव्ह करण्याची.


अक्षता खूप वेळ शून्यात नजर लावून बसली होती. अश्रू गोठले होते खुप रडावं वाटत होतं तिला. ते पत्र, तो कॉल यांनीच अक्षताचं मन सुन्न झालं होतं. आपले सासू सासरे बाहेरून आवाज देत आहेत याकडेही तिचं लक्ष नव्हतं. दाराजवळच ती बसून होती. स्तब्ध पुतळा असावा तशी.

"आकांक्षा दार उघड गं. काय झालं दार का उघडत नाहीस??" बाबा म्हणाले.


"अगं, तू विशालचा फोन का नाही उचललास?? तो किती वेळ झाला तुला फोन करत आहे." आई म्हणाल्या. विशालचं नाव ऐकताच अक्षता सावध झाली. ती उठली आणि तिने दरवाजा उघडला. आईंना तिने मिठी मारली. खुप रडावं वाटत होतं तिला. आईंनी डोक्यावर हात फिरवला तेव्हा कुठे तिला बरं वाटलं. मन शांत झालं होतं. पुन्हा मोबाईलची रिंग झाली. यावेळी बाबांचा मोबाईलवर कॉल आला होता. त्यांनी कॉल रिसीव्ह केला आणि अक्षताकडे दिला. पलिकडे विशाल बोलत होता,


"अक्षता, तुला किती कॉल केले गं. का कॉल रिसीव्ह नाही केलास?? मला किती काळजी वाटत होती. त्यादिवशी नेटवर्क प्रॉब्लेम झाला म्हणून तुझ्याशी बोलता आलं नाही. पत्र पाठवलं आहे तुला. मिळालं का गं ते?? आलं का घरी?? त्यासाठी तुला कॉल करत होतो."

"तुम्ही..ठीक आहात ना??"


"हो गं अक्षता. मी ठिक आहे. माझा मोबाईल बिघडला आहे. स्क्रीन गेली आहे. त्यामुळे तुला कॉल करू शकलो नाही. सरांच्या संमतीने हा कॉल केला आहे. ठेवू आता?? मी लवकर येईन. काळजी करू नकोस आणि रडू नकोस. बाय टेक केअर."

"बाय." असं अक्षता म्हणाली आणि विशालने तिकडून कॉल कट केला.

"काय बाळा?? काय झालं?? अगं, तो ठिक आहे. विशालला काहीही होणार नाही."

"बाबा, मी खुप घाबरले होते. पत्र आणि कॉल एकत्रच आले. त्यामुळे खुप भिती वाटली मला." अक्षता म्हणाली, "त्यांनी पत्र पाठवलं आहे." असं म्हणून अक्षताने ते पत्र लिफाफ्यातून बाहेर काढून वाचण्यास सुरवात केली.


प्रिय अक्षता,


आज तुझी खुप आठवण येत आहे. कॉल करावा तर इथे नेटवर्क मिळत नाही. कॉलवर खरं सांगायचं तर मनातलं काही बोलताच येत नाही. नाही का?? तुला काय वाटतं?? पत्रातून मनातल्या भावना पोहचतात. मला माहित आहे तू माझ्यावर रागवली आहेस. एक वर्षापूर्वी आपलं लग्न झालं आणि एका आठवड्यातच मला ड्युटीवर जॉईन होण्यासाठीचा आदेश आला. आपण नीट भेटलोही नाही. पंधरा दिवस लग्नाच्या तयारीमध्ये घाईत गेले. एक आठवडा किती पटकन गेला ना. तुझा नववधूचा साज असलेला चेहरा अजूनही माझ्या डोळ्यांसमोर आहे. तेव्हापासून मी तुला पाहिलेलं नाही. प्रत्यक्ष पहाणं वेगळं आणि फोटोमध्ये पहाणं वेगळं असतं. तू समोर असावीस असं सारखं वाटतं पण, मला माझं कर्तव्य, माझी ड्युटी सोडून नाही येता येत तुझ्याकडे.

मी पण कसा आहे ना?? माझंच सांगत राहिलो. तुला विचारलंच नाही. कशी आहेस तू?? स्वतःची काळजी घेतेस ना?? आई बाबा कसे आहेत?? मला माहित आहे तू खुप हुशार आहेस. सर्वांची काळजी घेशील. माझी आठवण येते का तुला?? आता तू म्हणशील.. हे विचारणं झालं का?? वेळेवर जेवतेस ना?? आणि हो सकस आहार घेत जा. म्हणजे हे आवडत नाही ही भाजी आवडत नाही असं करायचं नाही. यावर तुझं उत्तर काय असेल हे ही मीच सांगतो. "मला सांगत आहात तुम्ही. तुम्ही वेळेवर जेवण घेता का??" बघ. मला सगळं माहित आहे ना तुझ्याविषयी?? एक आठवडा निरीक्षण केलं होतं अक्षता मी. तुला लग्नातली ती घटना आठवते का?? तू प्रिती करवी चिठ्ठी पाठवली होतीस की, "माझं नाव तेच राहू दे. मला माहेरचंच नाव हवं आहे." तुला चिठ्ठीत उत्तर दिलं होतं आठवतं??


"पाहू. काय करायचं ते??" आणि जेव्हा तांदळामध्ये तुझं नाव लिहण्याआधी तुझ्याकडे पाहिलं तेव्हा तुझे ओठ काहीतरी पुटपुटत होते. तुला सांगू खरंच?? मी तेव्हाच हरवलो होतो. वसुधा म्हणाली, "विशाल दादा, नाव सुचत नाही का?? मी सांगते." तेव्हा कुठे भानावर आलो आणि अंगठीने नाव कोरलं होतं, "अक्षता". तुझ्या चेहर्‍यावरचा आनंद पहातच राहिलो होतो मी. मला माहित आहे. मी पाठवलेली ती चिठ्ठी अजूनही जपून ठेवली आहेस तू. खरंच, असं वाटतं आत्ताच्या आत्ता तुला भेटायला यावं. असो.


अक्षता, प्लिज तू माझ्यावर रागवू नकोस. तुझा आवाज जरी ऐकला ना तरी मला खुप बरं वाटतं. तू सारखी विचारत असतेस की मी कधी येणार आहे?? मला सुट्टी कधी मिळणार आहे?? मी येईन लवकर येईन पण कधी ते सांगता येत नाही. कदाचित या महिन्यात नाहीतर दिवाळी, गणपती सणाला नाहीतर असाच कधीही येईन. येण्याआधी तुला नक्की सांगेन. तु "बॉर्डर" सिनेमा पाहिला आहेस ना?? त्यामध्ये ते गाणं आहे बघ. "संदेसे आते है हमें तडपाते है" असंच काहीसं झालं आहे माझं. मी तुला भेटायला, आपल्या घरच्यांना भेटायला कधी येईन?? कधी सुट्टी मिळेल?? असं वाटत रहातं. माझ्या सोबत जे आहेत. माझे मित्र त्यांचेही असेच आहे. सर्वांना कायम घरची आठवण येत असते. कॉल, विडीओ कॉल, मेसेजवर किती बोलणार आहोत. इथे सगळ्या राज्यातले आहेत मित्र आहेत माझे. पंजाब, राजस्थान, कर्नाटक, पश्चिम बंगाल, युपी सर्वजण एकत्र आहोत इथे भावाभावा सारखे रहातो. सर्वांनी "भाभीला आमचा नमस्ते सांग" असा निरोप दिला आहे.


अक्षता, तू मला एक वचन दे. तू रडणार नाहीस. तू म्हणशील, "असं कसं वचन मागता तुम्ही?? दूर आहात माझ्यापासून आणि रडू नको असं म्हणता." मी इकडे येण्यासाठी निघालो तेव्हा म्हणाली होतीस मला आठवतं? देशाच्या जवानाची पत्नी आहेस तू आकांक्षा. तू खंबीर रहायलाच हवंस. खुप सुचना करतो ना गं मी तुला?? सॉरी. रिअली सॉरी. तुला एक गंमत सांगू?? तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मनात एकच प्रश्न होता अक्षता. मी तुला पसंत पडेन की नाही?? कारण, आधी तीन मुलींनी मला नकार दिला होता. पहिली गोष्ट मी आर्मीमध्ये आहे म्हणून आणि दुसरी गोष्ट गावी रहावं लागेल म्हणून. अक्षता, तू तसं नाही केलंस. मला स्विकारलंस. सारं काही स्विकारलंस, त्याचसोबत जबाबदारीही स्विकारलीस. मी काय केलं तुझ्यासाठी?? लग्नानंतर एका आठवड्यातच मी इकडे आलो. तू..तू मला यासाठी मला माफ करशील ना?? मला सुट्टी मिळाली ना की मी लगेच येईन आणि येण्याचं सर्वात आधी तुला सांगेन.


माझं एक ऐकशील अक्षता?? म्हणजे मला त्यादिवशी आईने सांगितलं. तु आठवड्यातून चार दिवस उपवास करतेस. एकच वेळ जेवतेस. का गं चिऊ?? तू जेवत नाहीस आणि इकडे मला कसं जेवण जाईल?? आमचं जेवण इथे वेळेवर असतं गं. तू नको इतकी काळजी करू आणि प्लीज कडक उपवास तर नकोच करूस. निदान उपवास करायचाच असेल तर फराळ तरी करत जा. मला माहित आहे. उपवास तू माझ्यासाठी करतेस ना?? मी लवकर तुझ्याकडे यावं, तुला भेटावं म्हणून उपवास करतेस ना?? नको करूस गं असं. मला त्रास होतो ते ऐकूनच राजा. पूर्ण दिवस फक्त पाणी पिऊन रहाणं हे योग्य आहे का?? आपल्यावर जबाबदारी आहे. मग, ती पार पाडण्यासाठी आपण मनाने खंबीर आणि शरीराने निरोगी असायला हवं. हो ना?? इतकंच ऐक. हवं तर उपवास कर पण फराळ खाऊनच. तुझ्या या फौजीला तुझी काळजी वाटते आहे आता. माझी काळजी मी व्यवस्थित घेत आहे. तु ही स्वतःची काळजी घेत जा चिऊ आणि आई बाबांचीही. आईकडे माहेरीही जाऊन ये. तुला आणि मामींना बरं वाटेल. मी लवकरच येईन मला सुट्टी मिळाली की. मी सांगितलेलं ऐकशील ना अक्षता? माझ्यासाठी??


अजून एक खुप महत्वाचं सांगायचं आहे. कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका. अगदी कोणत्याही. तुला समजलं असेल ना?? मी कशाबद्दल बोलत आहे ते. फक्त एक लक्षात असू दे. हा तुझा फौजी तुला भेटायला लवकरच येईल. काळजी नसावी. आपल्या घरीही सांग माझी काळजी करू नका. मी आगदी व्यवस्थित आहे. या फौजीला तुमची आठवण येते. खुप आठवण येते. देशप्रेमापुढे आठवण बाजूला ठेवून कर्तव्यासाठी मी कायम तत्पर आहे. आकु, तुला कॉल करेन. पत्र वाचून झाल्यानंतर ते ठेवून देशील ना?? अश्रूंनी डोळे भरले तरी ते अश्रू तिथेच थांबावशील?? मी ही आता लिहीणं थांबवतो. नाहीतर मलाच रडू येईल आता. येईन मी. लवकर येईन. काळजी घे. खंबीर रहा आणि हे ही लक्षात असू दे, या फौजीला ही तुमची सर्वांची खुप आठवण येते. न सांगता येण्यासारखी. आई, मी येईन तेव्हा मला तुझ्या हातची पुरणपोळी आणि कटाची आमटी हवी आहे. सर्वांनी काळजी घ्या.


तुमचाच फौजी,

विशाल


पत्र वाचून झालं होतं. तरीही अक्षता पुन्हा ते वाचत होती. तिला आनंद तर झाला होता परंतु, आता बोलणं कधी होईल हे माहीत नव्हतं. मनात आलेल्या सर्व शंका या पत्राने आणि कॉलने दूर केल्या होत्या. रात्री सर्वजण झोपल्यानंतर अक्षताने पुन्हा पत्र वाचलं. तिला विशालची खुप आठवण येत होती. एक मोठा श्वास घेऊन तिने सावरलं स्वतःला. आपण खंबीर रहायचं. विशालच्या सांगण्याप्रमाणे वागायचं तिने ठरवलं.


ग्रामदेवतेच्या यात्रेनंतर आठ दिवसांनी गुढीपाडवा होता. अक्षता पहाटेच उठली आणि स्वतःचं सारं आवरलं. बाहेर येऊन अंगण साफ करू लागली. त्यानंतर अक्षताने सडा शिंपडून अंगणात रांगोळी काढण्यास सुरूवात केली. तितक्यात तिला चाहूल लागली. मागे कोणीतरी उभं आहे असा भास तिला झाला. अक्षताने पटकन मागे वळून पाहिलं तर तिथे विशाल उभा होता. आकांक्षा पहातच राहिली. चटकन उठून तिने विशालला घट्ट मिठी मारली.

"बायको, मी आलो आहे ना आता?" यावर अक्षता काही बोलली नाही. दीड वर्षाचा विरह आज संपला होता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance