Shubhangee Dixit

Thriller

3  

Shubhangee Dixit

Thriller

गावाकडची जत्रा

गावाकडची जत्रा

6 mins
310


आपल्या गरोदर असणाऱ्या बायकोचं ओटीभरण करून, सासरी दोन दिवस राहून घरी यायला सदाला म्हणजेच सदानंदला रात्रीचे तीन वाजले. बस रस्त्यातच पंक्चर झाली आणि पंक्चर काढता काढता ड्रायव्हरला पाच तास लागले. नाहीतर सदा आठ वाजताच घरी पोहचला असता. त्यात पुन्हा त्याने जवळचा रस्ता निवडला घरी जाण्यासाठी. काटेकुटे खाचखळगे होतेच.


"घ्या. चपल्लला पण आताच तुटायची होती?. अंगठाच तुटला. सदाभाऊ, चला आता. लंगडत." सदा स्वतःशीच म्हणाला.


पायाखाली पालापाचोळाअसल्याने काटेकुटे टोचत नव्हते म्हणा तसे. पण आडवाटेने ते पण रात्री तीनला म्हणजे जीवावर उदार होऊनच जाणं. फेरा असतो ना. तीन वाजता. भूतांचा. सासरच्यांनी पांढरा शर्ट आन् पँन्ट दिली होती. जावयाचा पोशाख. आता सर्वच सफेद नको म्हणून बारीकशी नक्षी होती शर्वटवर. निळ्या रंगाची. तर, सदा पटापट पाऊल उचलत जात होता. समोर काय होतं. फक्त अंधार. त्यातच त्याला कंदिलाचा उजेड हालताना दिसला. त्याला वाटलं 'चला, उजेड आहे म्हणजे गाव जवळ आलं.' भरभर चालण्याच्या नादात सदाच्या पायात काटा मोडला.

"आई गं. " सदा कळवळला. त्यानं खसकन काटा ओढून काढला आणि फेकून दिला.


समोर अजूनही कंदिलाचा उजेड दिसत होता. सदा त्या रोखानं निघाला. थोडं जवळ गेल्यावर त्यानं पाहिलं तर सात आठ आडदांड माणसं कंदिलाभोवती बसले होते. राकट चेहरा, भरदार मिशा आन् दंड तर असे की पैलवान पण मात खाईल.

"ही कुणीकडचीची भूतं जमली म्हणायची??" सदा मनाशी म्हणाला.

एका झाडाच्या मागं उभं राहून तो त्याचं बोलणं ऐकू लागला.

"ए, समद्यांनी यकसारकं वाटून घ्यायचंय. ना जास्त ना कमी. मागणं भांडणं नाय पायजेत."

"व्हय सरदार, हा भिवा लय भांडतो. समदं सामान घेऊन वर पुना जास मेहनत केली त्याचे पैशे घेतो हा." दुसरा आपल्या सरदाराला म्हणाला.

"ए गप. माझं पुराण नको सांगू. काम कर काम. आज लय माल मिळाला या गावाच्या जत्रंत. बरोबर का नाय सरदार??" हा भिवा असावा.

"व्हय."

"सरदारानी तर दारूगोळ्याच्या नावाखाली असा काय धूर केला की समदे बेसुद झाले. मणून तर त्यांचं सामान लुटता आलं. दागिनं जमलं. पैसं मिळालं. येताना पाटलाच्या वाड्यातला खंजीर बी आणलाय सरदारानी." भिवा म्हणाला.

सगळे कुत्सित हसले. त्यांचा सरदार मिशीवर ताव देत हसत होता.

"हे तर डाकू हायत. या गावच्या जत्रंत मंजी आमच्याच गावात चोरी करून आले का काय हे लोकं??" सदा स्वतःशीच म्हणाला.


सदाच्या गावात चार दिवसांची जत्रा होती. उद्या पालखी असल्याने सदा टाकोटाक गावी निघून आला होता. कारण, पालखीचा मान सदाच्या वडिलांकडे म्हणजे अप्पांकडे हता. म्हणून सदा आजच सासुरवाडीतनं घरी यायला निघाला होता. तर हे संकट उभं ठाकलं होतं. तो पुन्हा त्यांचं बोलणं ऐकू लागला. सर्व माल मोजून झाल्यावर त्यांनी जवळच एक खड्डा खुणून त्यात माल पुरून ठेवला गेला अन् त्यावर भला मोठा दगड ढकलत आणून ठेवून दिला. कंदिल उचलून सर्वजण निघून गेले. सदाने कानोसा घेतला. पाय उचलला त्याने चालण्यासाठी तर पायाला रग लागली होती. पाय बधीर झाला होता. यका पायावर कितीतरी वेळ उभा होता सदा. हळूहळू झाडाच्या बुंध्याला टेकून तो खाली बसला. काही मिनिटांनी तो उठून गावाच्या दिशेने चालू लागला.


जिथे दारुगोळा म्हणजे फटक्यांची आतषबाजी होत असे तिथे तो पोहचला. ते एक मोठं मैदान होतं. तिथे पोहताच आजूबाजूचं दृश्य पाहून त्याने डोक्याला हात लावला. मैदानाच्या मध्यभागी फटाके तसेच होते आणि आजूबाजंनी सगळे गावकरी बेशुद्धावस्थेत होते. जवळच असलेल्या मंदिराबाहेर एक विहीर होती. त्यातील पाणी सदाने रहाटाला असलेल्या बादलीने शेंदून घेतलं रहाटाच्या दोरापासून बादली वेगळी केली आणि मैदानात येऊन प्रत्येकाच्या चेहर्‍यावर पाणी शिंपडू लागला तसं एकेक करून सर्वांना जाग येऊ लागली. पुरुष जसे होते तशाच स्त्रियाही होत्या. एकाला शुद्ध आली की तो दुसर्‍या दोन तीन जणांना शुद्धीवर आणत होता. सर्वजण शुद्धीवर आले होते तोच स्त्रियांच्या गटातून ओरडण्याचे आवाज येऊ लागले कारण त्यांचे सर्व दागिने गायब झाले होते. यामध्ये सदाची आई आणि बहिणही होती.


सदाने कसंतरी सर्वांना शांत केलं आणि सर्वांना घेऊन तो पाटील वाड्याकडे निघाला. तिथेही काही वेगळं दृश्य नव्हतं पाटील वाड्याचं दार सताड उघडं होतं. सदा आणि काही गावकर्‍यांनी आतमध्ये जाऊन सर्वांच्या चेहर्‍यावर पाणी शिंपडून शुद्धीवर आणलं. काहीवेळाने पाटीलवाड्यात चोरी झाल्याचं आणि पाटलांचा पुर्वजांपासूनचा वाड्यात असलेला खंजीर चोरीला गेला होता. हे समजले तेव्हा हलकल्लोळ माजला. गावात पहिल्यांदाच असं काही घडलं होतं. इतकी मोठी चोरी झाली होती. तेही जत्रा असताना. गोंधळ वाढू लागला तसा सदा पाटलांजवळ जाऊन म्हणाला, "पाटील मला थोडं बोलायचंय. पण, ह्ये लोक शांत बसंना झालेत. जरा शांत करा यांना."

"सर्वांनी शांत बसा जरा. सदाभाऊंना कायतरी सांगायचं आहे. गप्प बसा." पाटील चढ्या आवाजात म्हणाले तसे सर्वजण शांत झाले.


सदाने जे घडलं ते थोडक्यात सर्वांना सांगितलं. यावर उपाय म्हणून पोलीस स्टेशनला जाण्याचा निर्णय घेण्यात आला. काहीजण बाईक घेऊन निघाले तर काही सायकल. सदा गण्याच्या बाईकवर बसला. पाटील आपल्या मुलाच्या बाईकवरून येणार असं ठरलं. पहाटेचे साडे चार झाले होते. गावाबाहेर असलेल्या एसटी स्टँड जवळच पोलीस स्टेशन होतं. तिथले सर्वजण पाटील यांना ओळखत होते. सदाने जे काही घडले ते सविस्तर इन्स्पेक्टरला सांगितले.

"तुम्ही चेहरे पाहिलेत का त्यांचे??"

"नाही साहेब. अंधार होता. दिसलं नाही व्यवस्थित. हा पण त्यातल्या एकाचं नाव भिवा होतं आणि तो सरदार असं सारखं म्हणत होता. त्याला पाहिलं फक्त." सदा म्हणाला.

"हं...भिवा ..भिवा..." काहीतरी आठवत इन्स्पेक्टर इनामदार यानी एक फाईल टेबलाच्या खणातून बाहेर काढली आणि उघडून सदा समोर ठेवली, "यातला हा फोटो पहा..हाच होता का??"

"हाच होता..भिवा. साहेब." सदाने भिवाला ओळखलं.

"ही एक टोळी आहे दरोडेखोरांची. आसपासच्या गावांमध्ये हैदोस घातला आहे. कधी टोळीने तर कधी एक एकटे चोरी करण्यासाठी हे लोक बाहेर पडतात. दिवसा वेश बदलून वावरत असल्याने यांना कोणी पकडू शकलेलं नाही. तुम्ही ती जागा दाखवू शकाल जिथे त्यांनी चोरी केलेले दागिने पुरून ठेवले आहेत??"

"हो साहेब. दाखविन की."

"ठिक आहे. आमचा एक कॉन्स्टेबल तुमच्या बरोबर पाठवतो. त्यांना ती जागा दाखवा. आता सापळा लावूनच त्यांना पकडले पाहिजे. ते लोक नक्की येतील तिथे आज नाही तर उद्या." इन्स्पेक्टर इनामदार म्हणाले, "आपण निश्चिंत रहा. चोरीला गेलेले दागिने पूर्ण कारवाई झाल्यानंतर परत मिळतील."

"धन्यवाद साहेब. साहेब, अजून एक विनंती. आज गावात पालखी आहे. गावकर्‍यांकडनं मी विनंती करतो की तुम्ही पण दर्शनाला यावं जी." पाटील म्हणाले. इन्स्पेक्टर इनामदार हलकेच हसले.

"येईन नक्की येईन. पण मला जास्त वेळ थांबता येणार नाही. दर्शन घेईन मी."

"बरं साहेब. येतो आम्ही."

"हो या." असे म्हणून इन्स्पेक्टर इनामदार यांनी आपला एक कॉन्स्टेबल गावकऱ्यांसोबत ती जागा पाहण्यासाठी पाठवला.


पालखी सोहळा आनंदात पार पडला. कुठेही गालबोट लागलं नाही. इनामदार साहेब दर्शनासाठी येऊन गेले होते. रात्री जेवणं झाल्यानंतर सदाच्या घरी गप्पा मारत बसले होते. दोन-तीन दिवस त्या जागेवर पाळत ठेवल्यानंतर ती टोळी पोलीसांच्या कचाट्यात सापडली. एक आठवड्यानंतर इनामदार साहेबांनी आपला एक कॉन्स्टेबल पाटलांच्या वाड्यावर पाठवला. चोर पकडले गेले आहेत. मुद्देमाल ही मिळाला आहे. आपण येऊन आपल्या दागिन्यांची ओळख पटवून घेऊन जावेत. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. सर्वजण जमेल तसं पोलीस स्टेशनला जावून आपले दागिन्यांची ओळख पटवून दागिने इतर वस्तू घेऊन येत होते. हे सर्व सदाभाऊंमुळे शक्य झालं. आमच्या चीजवस्तू आम्हाला परत मिळाल्या असे सर्व गावकरी म्हणत होते. अप्पांना म्हणजेच सदाच्या वडिलांनाही आपल्या मुलाचं कौतुक वाटत होतं. आईने तर नजर उतरवून टाकली होती सदाची.


गावकऱ्यांना या वर्षीची जत्रा चांगलीच लक्षात राहिली होती. आता थोडा कुठे धूर दिसला की गावकरी लगेच नाक आणि तोंड झाकून घेत होते. सदाला म्हणजे सदानंदला एकच प्रश्न सतावत होता.

बस पंक्चर झाली नसती तर?

पण ही जत्रा त्याच्या कायम लक्षात राहिल अशीच होती.


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller